जागतिक बुटक्यांच्या क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय संघाने ३७ पदके जिंकली 

1

भारतीय उपखंडाने नवा इतिहास रचला आहे, टोरोंटो येथे झालेल्या जागतिक ठेंगूंच्या क्रीडा  स्पर्धांमध्ये त्यांनी विक्रमी कामगिरी केली आहे. या खेळांच्या सातव्या आवृत्तीमध्ये २१ जणांच्या या चमूने ३७ क्रीडा  प्रकारात पदके मिळवली आहेत. ज्यात १५ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.


Image Source: Twitter
Image Source: Twitter

ऑन्टॅरियो प्रांतातील ग्युएल्प विद्यापीठात पार पडलेल्या या खेळांमध्ये सुमारे आठवडाभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ज्यात सुमारे चारशे ऍथलीट २४ देशांतून सहभागी झाले होते. भारताचे टोरंटो येथील उच्चायुक्त दिनेश भाटीया यांनी भारतीय चमूचे स्वागत आणि गौरव १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केला.

यावेळी बोलताना जॉबी मॅथ्यू ज्यांनी दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवले त्यांनी सांगितले की, “ माझा अनुभव रोमांचक होता. मी बॅडमिंटन दुहेरी मध्ये, एकेरीमध्ये, शॉर्टपूट मध्ये, भालाफेकीत, थाळीफेकमध्ये देखील भाग घेतला. आम्हाला भारतीय एथलीट असल्याचा अभिमान वाटला.”

बुटक्यांची ऑलिंपीक असलेल्या या स्पर्धामध्ये बहुतेक स्पर्धकांना कॅनडाला जाण्यासाठी कर्ज काढावी लागली. तरीही त्यांनी कोणताही तणाव न येवू देता जी कामगिरी केली त्यामुळे देशाला उज्वल यश मिळवता आले. या चमूचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक शिवानंद गुंजाळ म्हणाले की, “ आम्हाला स्वातंत्र्यदिनी देशाला नजराणा द्यायचा होता, येथे येवून आम्ही तो आदरपूर्वक प्रदान करतो आहोत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही १५ तारखेला १५ सुवर्ण पदके मिळवली याचा आनंद आहे.”

सेवाभावी सामाजिक संस्था श्रींगेरी विद्याभारती फाऊंडेशन (कॅनडा) यांनी दूतावासासोबत या चमूच्या भेटीचे प्रायोजकत्व केले होते, त्याबाबतच्या वृत्तानुसार वृंदा मुरलीधर फाऊंडेशनच्या प्रतिनिधी म्हणाल्या की, “ त्यांची दैदिप्यमान कामगिरी ऐकून आणि त्यांनी भारताला जो गौरव मिळवून दिला त्यामुळे मला वाटले की ते सारे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे पाहूणे असावेच आणि टोरेंटोमध्ये हा दिवस त्यांच्या सोबतच साजरा करावा.”