भारतातील वापरलेल्या साबणाद्वारे अस्वच्छ भारतीयांना स्वच्छता शिकविणारी अमेरिकन इरीनची ‘सुंदरा’

0

युनिलीव्हरद्वारा नुकत्याच करण्यात आलेल्या तपासणीत हे समोर आले आहे की भारतात सध्या जवळपास ७० दशलक्ष लोक असे आहेत ज्यांनी कधी साबण वापरलाच नाही.याचा सरळ अर्थ हा होतो की दर ३० सेकंदाला ५ वर्षाहून लहान वयाच्या एका मुलाचा सहज नियंत्रणात आणता येण्यासारख्या डायरिया किंवा तत्सम स्वच्छता संबंधित आजारामुळे बळी जातोय. म्हणूनच वास्तविक याची गरज आहे आणि यामुळेच आज मी इथे आहे – इरीन जैकिस, संस्थापिका, सुंदरा

आयर्लंडमध्ये धुळीने माखलेल्या मुलांच्या एका समूहाने इरीनला विचारले, “साबण म्हणजे काय?” ही अमेरिकी तरुणी त्यावेळी मिशिगन विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लहान मुलांचा अवैध व्यापार थांबविण्याच्या उद्देशाने एका एनजीओमार्फत थायलंडला आली होती. तिचे आयुष्य पालटविणारा हा विचार जेव्हा तिच्या मनात आला तेव्हा ती एका छोट्याश्या थाई खेड्यातील एका शाळेत होती. जेव्हा तिने हात धुण्यासाठी साबण मागितला तेव्हा तिला समजले की तिथे साबणाचा वापरच केला जात नाही. तिथे यापूर्वी कोणी साबण हा शब्दच ऐकला नव्हता हे समजल्यावर ती आश्चर्यचकित झाली. त्यांच्या बोलण्यावर इरिनचा विश्वास बसेना. ती लागलीच जवळच्या एका दुसऱ्या शहरात गेली आणि भरपूर साबणाच्या वड्या घेऊन तिथे परत आली. इरिन तेव्हाच्या आठवणी जागवत सांगते, “मी त्या लोकांना साबणाची पाकिटं उघडून साबणाला खरवडताना पाहिलं आणि मी अचंबित झाले.त्या लोकांना साबण कसा वापरायचा याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि त्यातले काहीजण कशाचाही विचार न करता साबणाची वडी डोक्यावर मारुन पाहत होते.”

“हा अनुभव घेतल्यानंतर मी या मुद्द्याला जगासमोर आणून यावर उत्तर शोधण्याच्या दिशेने आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. अनेकजण पाण्याविषयी बोलतात आणि तेही योग्यच आहे. मात्र साबण आणि स्वच्छतेविषयी शिक्षण देण्याविषयी कोण बोलतं किंवा हा मुद्दा कोणी उचलला आहे? आणि हे तर केवळ अर्ध समीकरण आहे. ” ती पुढे सांगते.

इरीनला सुरुवातीपासूनच माहिती होते की तिचे जीवन सामाजिक कार्य आणि उपक्रमांमध्ये व्यतीत होणार आहे. “एखादी बातमी पाहिल्यावर त्यासाठी काहीतरी करण्यासाठी प्रेरित होणं आणि त्या दिशेने प्रवास सुरु करणं हा माझा स्वभाव आहे. मी अशीच आहे. मला वाटतं की मी तिथे जाऊन त्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे.मला वाटतं की आपण कुठल्याही देशाचे नागरिक असू, कुठलीही भाषा बोलत असू किंवा कुठल्याही धर्माचे असू, प्रत्यक्षात आपण कुठे न कुठे कुठल्या न कुठल्या प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहोत.” मात्र ती या क्षेत्रात सक्रिय व्हायला साबण हे एकमात्र कारण नव्हते. ती लहान मुलांची तस्करी थांबविण्यासाठी काम करणाऱ्या संस्थाबरोबर काम करत होती. हे काम शांती देणारे होते खरे, मात्र खूप थकविणारे आणि मानसिकरित्या तोडणारे होते.

तेव्हाच्या आठवणी जागवत इरीन सांगते, “अनेक महिला माझ्याजवळ येऊन म्हणत – मी माझ्या मुलाबरोबर कसं वागायचं हे मला सांगण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू कधी तूझ्या नवऱ्याचा मार नाही खाल्ला आहेस. तू कधी तीन दिवस उपाशीपोटी नाही राहिली आहेस.” आणि हे ऐकून मी गोंधळून जायचे आणि विचार करायचे कारण त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. मी हे सर्व कधी अनुभवलंच नव्हतं. मग असं असताना मी माझे निर्णय त्यांच्यावर लादू कसे शकते? आणि हे माझं ते काम सोडण्यामागचं मोठं कारण होतं. कारण मला समजत होतं की ते खूप कठीण आहे आणि मी स्वतःला एका दुसऱ्या ग्रहावरचा प्राणी समजू लागले होते.”

त्या तुलनेत मला साबण आणि स्वच्छता हा साधासरळ विषय जास्त भावला. “तथापि इथेही मला साबणाचा विरोध करणाऱ्या अनेक लोकांचा सामना करावा लागला आणि खरं तर त्यांच्यामुळेच मी या कामाकडे आकर्षित झाले. मला वाटतं साबण वापरणे हा प्रत्येकाचाच हक्क आहे या गोष्टीशी क्वचितच कोणी असहमत असेल. मला वाटतं की स्वच्छता सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि 2015 च्या आधुनिक काळात एवढे सगळे भारतीय, किंबहुना जगातील कुठल्याही कोपऱ्यात राहणारे लोक या मुलभूत औषधापासून दूर असू नये. किमान लहान मुलांना तरी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्यायला पाहिजे. मला नाही वाटत की हा एक कोरा विचार किंवा भारतीय विचार आहे. मला वाटतं की ही एक सार्वभौमिक आवश्यकता आहे.”

आणखी एका कारणामुळे इरीन साबणाच्या पुनःनिर्मितीच्या कामाकडे आकर्षित झाली, ते म्हणजे याद्वारे एका पेक्षा अधिक सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची संधी. “सर्वात आधी हॉटेलमधील कचरा हा पर्याय असतो. केवळ अमेरिकेतच प्रतिवर्ष एक दशलक्षाहून अधिक क्वचितच वापरलेले साबण कचऱ्याच्या खड्ड्यात फेकले जातात. भारतात तर कचरापेट्या आधीच कचऱ्याने भरलेल्या असतात. अशा कचऱ्यात टाकलेल्या साबणांचा वापर करणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने एक खूप मोठं यश आहे. त्यानंतर आम्ही ज्या भागात काम करत असतो त्या भागातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना रोजगाराची संधी प्रदान करतो आणि त्यांना कामाच्या बदल्यात योग्य मोबदल्यासह सन्मानकारक रोजगाराची संधी प्रदान करतो.”

“त्याशिवाय आम्ही या महिलांना लोकांमध्ये बोलण्याचे आणि नेतृत्व कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण देतो. जेणेकरुन त्या स्वच्छता राजदूत बनून आपल्या समुदायाचं नेतृत्व करु शकतील. आमचा असा विश्वास आहे की जेव्हा शिकविणारा तुमच्यासारखाच दिसणारा असण्याबरोबरच तुमच्या भाषेत तुम्हाला शिकवणारा असेल, तुमच्यासारख्या जीवनानुभवांचा सामना त्याने केलेला असेल तेव्हा त्याने दिलेले स्वच्छतेचे शिक्षण अधिक प्रभावी ठरते. साबण उपलब्ध करुन देऊन स्वच्छतेचे धडे देण्यासाठी आमचे सर्वात जास्त लक्ष वंचित समुदायावर आहे. त्याचबरोबर आम्ही शहरातील अस्वच्छ वस्त्या आणि आदिवासी पाड्यांमध्येही काम करत आहोत. अशा प्रकारे आम्ही आमच्या ‘स्वच्छता सबको’ या अभियानाला साबणाशी जोडत लहान मुलांना या माध्यमातून साफसफाईच्या सवयींविषयी विचार करायला भाग पाडतो. जेणेकरुन ते स्वच्छतेचे काम हाथी घेऊन स्वस्थ युवावस्थेपर्यंत पोहचण्यामध्ये यशस्वी होतील.”

‘सुंदरा’चा संस्कृतमध्ये अर्थ सुंदर असा होतो. एका विशेष कारणाने इरीनने आपल्या संस्थेला या नावाशी जोडण्याचे ठरविले. “सुंदराचा पाया घातला तेव्हा मी वीस वर्षांची होते आणि माझ्या वयाच्या इतर मुलींप्रमाणेच मी सुद्धा सौंदर्याचा नेमका अर्थ शोधत असायचे. त्यावेळी मी थायलंडमधून न्युयॉर्कला परतले होते आणि तेव्हा मी माझ्या मित्रांना इन्स्टाग्रामवर असलेल्या कथित सुंदर मुलींच्या कपड्यांविषयी आणि त्यांच्या शेकडो फॉलोअर्सविषयी बोलताना पहायचे. एवढंच नाही ते त्यांच्यासारखं बनायला उत्सुक असायचे.”

“माझ्या आयुष्यात एक अशीही वेळ आली जेव्हा मी खूप उदासीन झाले आणि विचार करु लागले की हेच खरे सौंदर्य आहे का? मी माझ्या जीवनात गावांमध्ये यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर व्यक्तींना भेटले होते. त्यांचे ना शेकडो फोलोअर्स होते आणि ना त्या इन्स्टाग्राममधील व्यक्तींसारख्या प्रसिद्ध होत्या. असे लोक जे चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी निस्वार्थ भावनेने काम करत आहेत आणि आपल्या मुलांना शिक्षण देण्याकरिता अनेक गोष्टींचे बलिदान देत आहेत.

“या महिलांना मान्यता मिळवून देण्याकरिता काही तरी सकारात्मक करण्याचा मी निर्णय घेतला. खरं तर सौंदर्य माणसाच्या आत असतं. ते दुसऱ्यांची मदत करण्यात आहे, उज्ज्वल भविष्यासाठी लढण्यात आहे, ते त्या सर्व गोष्टींमध्ये आहे जे ‘सुंदरा’शी जोडलेले आमचे सामुदायिक प्रशिक्षक करत आहेत आणि मी या अंतर्सोंदर्याला उजळवू इच्छित होते,”इरीन सांगते. अखेर 2013 मध्ये ‘सुंदरा’ प्रत्यक्षात साकारली गेली.

इरीनच्या अनुसार सुंदराच्या कामाच्या पूर्ण प्रकियेतील साधेसरळपणा हेच सुंदराचे मोठे आकर्षण आहे. “आम्ही मुंबईतील एक डझनच्या वर हॉटेल्सकडून वापरानंतर उरलेले साबण एकत्र करतो आणि यामध्ये मोठमोठ्या चेन्सपासून छोटे बुटीकसुद्धा समाविष्ट आहेत. त्यानंतर आम्ही हा साबणाचा कचरा मुंबई बाहेरील आमच्या कार्यशाळेत आणतो. इथे आमच्याकडे या साबणांना स्वच्छ करण्यासाठी प्रशिक्षित स्थानिक महिलांची एक टीम आहे. त्या या साबणाचे बाह्यआवरण काढून टाकून त्याचा चुरा करतात आणि त्यानंतर त्याला ब्लीचमध्ये घालून सुकवतात. त्यानंतर त्याला एका मशीनमध्ये टाकण्यात येतं जे उच्च दाबाच्या माध्यमातून त्याला एका नवीन साबणाच्या वडीचे रुप देते. या संपूर्ण प्रक्रियेला सात मिनिटांचा कालावधी लागतो. त्यानंतर दर महिन्याला हा साबण 30 हून जास्त शाळांमध्ये वितरित केला जातो. तसंच लहानांबरोबर मोठ्यांनाही स्वच्छतेचे धडे देण्यासाठी विविध माहितीसत्रांचं आयोजन केलं जातं”

इरीन सांगते की सुंदराची सर्वात मोठी विशेषता हे केवळ त्याचे साधेपण नाही. “यामध्ये आमच्या व्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रांचं यश सामावलं आहे. सर्वात मह्त्वाचं म्हणजे या कामामुळे पर्यावरणाचा फायदा होतो कारण यामुळे कचरा कमी होतो. त्यानंतर हॉटेल्सचा नंबर येतो जी सीएसआर कार्यक्रमाच्या माध्यमातून फायद्यात असतात. त्याशिवाय अनेक महिलांनाही याचा फायदा होत आहे. कारण त्यांना एका सन्मानजनक नोकरीबरोबरच योग्य मजुरी प्राप्त होते आणि स्वच्छतेविषयी शिक्षित होऊन एका संपूर्ण समुदायाच्या भल्याच्या दिशेने काम पुढे सरकतं. जेव्हा की आमचा प्रयत्न अद्याप खूपच छोट्या स्तरावर सुरु आहे. मात्र आम्ही भविष्यासाठी एक चांगले उदाहरण घालून देण्यात यशस्वी होत आहोत.”

भारतात महिलांनी अशा प्रकारे काम करणे तितकेसे सोपे नाही आणि श्यामल वर्णाच्या अमेरिकी महिलेसाठी तर नाहीच नाही. मात्र इरीनला मुंबई आणि आसपासचा प्रवास बराच सुरक्षित वाटतो. मात्र विविध नोकरशहांच्या बरोबर दैनंदिन होणाऱ्या चर्चेदरम्यान तिला तिच्या स्थितीची वारंवार आठवण करुन दिली जाते. ती टीकेच्या सुरात सांगते, “मला अनेकदा बोलणी करताना स्वतःला गंभीरपणे घेतलं जावं या उद्देशाने बरोबर पुरुषांना न्यावं लागतं. कधी कधी मला वाटतं की आम्ही एक चांगली बैठक करण्यात यशस्वी झालो आणि तेवढ्यात मला सल्ला दिला जातो ‘घरी जा आणि लग्न करा’. पण मला माहिती आहे की हे सर्व गैरसमजामुळे असतं त्यामुळे मी त्याला गांभीर्याने घेत नाही.”

सुंदराचे कार्य मुख्यतः अनुदान आणि देणग्यांवर चालते. इरीन सांगते, “या व्यतिरिक्त आमच्याकडे काही कॉर्पोरेट प्रायोजकही आहेत. लिंक्डइनद्वारा सामाजिक उद्यमितावर आधारित एक स्पर्धा ‘लिंक्डइन फॉर गुड’ सुद्धा आम्ही जिंकलोय.” सध्या ती ‘सुंदरा’ बरोबर अधिकाधिक कर्मचाऱ्यांना जोडण्याबरोबरच सहभागी हॉटेल्सची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र स्वतःला मालक म्हणवणे तिला आवडत नाही. ती म्हणते की ती इतर काहीही असू शकते पण मालक नाही. ती सांगते, “मी केवळ अशा लोकांमधली एक आहे ज्यांचं लक्ष दुनियेतील या समस्येकडे गेलं आणि जिने त्याच्या निराकरणासाठी एक छोटासा प्रयत्न केला. मला वाटतं प्रत्येक वर्षागणिक आमच्याकडून होणाऱ्या चूका कमी होत जात आहेत आणि आमच्या अभियानाला यश प्राप्त होत आहे. मात्र असं करण्यासाठी मी योग्य व्यक्तींना शोधून त्यांना बरोबर घेणं शिकले आहे. मात्र त्यानंतर मी त्यांच्या मार्गातून बाजूला होते. निश्चितच हे सर्व मी एकटी करु शकले नसते.”

इरीन सांगते की समाजसेवेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटातून तिला प्रेरणा मिळाली. अनेक भारतीयांना हा चित्रपट गरिबीने त्रस्त भारताच्या चित्रीकरणामुळे लक्षात राहिला आहे. मात्र इरीनसाठी हा चित्रपट केवळ डोळे उघडणारा चित्रपट म्हणून महत्वपूर्ण आहे.

“मला माहिती आहे की अनेक भारतीयांना हा चित्रपट आवडत नाही. ते याला देशाचा अपमान करणारा चित्रपट समजतात. अशात मी जेव्हा माझ्या कामाच्या प्रती लोकांचा हा दृष्टीकोन पाहिला तेव्हा इतर देशांतील अशाच लोकांच्या समस्यांबाबत माझे डोळे उघडले आणि त्यामुळेच चित्रपटामुळे मला एक माध्यम मिळाले असे मी म्हणते.” इरीन पुढे सांगते, “मी कोणी हिरो नाही. मी फक्त पैसा आणि संरचना मिळवून देण्यात मदत करत आहे आणि खऱ्या नायिका तर त्या महिला आहेत ज्या घराबाहेर पडून हे काम यशस्वीरित्या पार पाडत आहेत. विशेष करुन तरुण मुलींसाठी स्वच्छतेबाबत जागरुकता महत्त्वाची असते.”

पुढच्या वर्षीपर्यंत मुंबईतील 25 ते 30 हॉटेल्सपर्यंत आपला विस्तार करण्याचे ‘सुंदरा’चे लक्ष्य आहे. तसेच इतर शहरात कार्यविस्तार करण्याचाही त्यांचा विचार आहे. तसेच ते साबणाच्या पुनःनिर्मितीत रुचि असणाऱ्या लोकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या शोधात आहेत.

इरीनसाठी एका उद्योजकाचा झगा घालण्यापूर्वी आपल्या आत्मसंकोचावर नियंत्रण मिळवणे ही मोठी परीक्षा होती आणि म्हणूनच ती इतरांना दुसऱ्यांची मदत घेण्यासाठी प्रेरित करताना म्हणते, “सर्वात वाईट काय होऊ शकतं?” ती पुढे म्हणते, “या जगाला वाकड्यातिकड्या मार्गावरुन चालणाऱ्या जास्तीत जास्त लोकांची गरज आहे आणि तुम्ही त्यातले एक का असू शकत नाही? जर तुम्ही असं करण्यात यशस्वी झाला तर ते तुमच्यासाठी जास्त चांगलं असेल.”

Related Stories

Stories by Anudnya Nikam