मिथून चक्रवर्ती यांची माहिती नसलेली कहाणी कच-यात सापडलेल्या मुलीला दत्तक घेतल्याची!

1

भारतीय समाजात सर्वात घृणास्पद गोष्ट कोणती असेल तर मुलगी झाली म्हणून तिचे पालकत्व पालकांनी नाकारणे ही होय! काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये अशीच एक अनाथ मुलगी कच-याच्या ढिगा-याजवळ सापडली, ज्यावेळी लोकप्रिय अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना ही बाब समजली त्यावेळी त्यांनी या मुलीला मदत करायचा आणि तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.


दिशानी चक्रवर्ती जवळून जाणा-या काही लोकांना आढळून आली आणि तिला सेवाभावी संस्थेच्या तसेच सरकारी अधिका-यांच्या मदतीने वाचविण्यात आले. कचराकुंडीजवळ बेवारसपणे पडलेल्या या लहान मुलीबद्दल सांगण्यात आले की, ती खूपच अशक्त आहे, आणि सतत रडत आहे. मिथून यांना ही बाब समजली आणि ते मदतीला आले, त्यांनी तिला ज्या घरात ठेवले होते तेथे जावून पाहिले.

मिथून यांनी तिला दत्तक घेण्याचे ठरविले, त्यावेळी त्यांच्या पत्नी योगिता बाली यांनी त्यांच्या निर्णयाचे पूर्णत: समर्थन केले. असे सांगण्यात येते की योगीता बाली यांना तर ते लहानसे मुल हाती घेवून खेळवण्याची इतकी उत्सुकता होती की, त्या तेथे रात्रभर थांबल्या आणि त्यांनी सारी प्रक्रिया सलगपणे पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी या बाळाला घरी आणून त्याचे नाव दिशानी असे ठेवले. त्यानंतर दिशानी हिला कुटूंबाचे प्रेम आणि काळजी मिळत राहिली.

त्यांची तीन मुले मिमोह, उष्मेय, नमाशी यांच्यासोबतच मिथून आणि योगिता यांनी दिशानीचा सांभाळ केला. एका वृत्तानुसार, त्यांनी तिला कधी परकेपणाने वागवले नाही किंवा तिला कशाची उणिव भासू दिली नाही. दिशानी हिने नुकताच बॉलिवूडमध्ये येण्याचा मनोदय जाहीर केला, आणि त्यासाठी न्यूयॉर्क फिल्म अकादमी येथे त्या याबाबतचे प्रशिक्षण घेत आहे.

मिथून यांना शांतपणे सामाजिक काम करत राहणे आवडते. ते अनेक रुग्णालये आणि सेवाभावी संस्था चालवितात ज्यातून अनेकांना मदत केली जाते आणि त्यांच्या जीवनाला हातभार लावला जातो.