अर्धवट शाळा सोडलेल्या भारताच्या पटणा शहरातील एका १९ वर्षीय तरुणाने, जगातील पहिल्या Android Smart-watch Company चा सह-संस्थापक होण्याचा मान मिळवला आहे.

अर्धवट शाळा सोडलेल्या भारताच्या पटणा शहरातील एका १९ वर्षीय तरुणाने, जगातील पहिल्या Android Smart-watch Company चा सह-संस्थापक होण्याचा मान मिळवला आहे.

Friday August 14, 2015,

5 min Read

आज सिद्धांत वत्स हे अशा एका तरुणाचे नाव आहे, ज्याच्या सारखं यश संपादन करण्याचं स्वप्न तुम्हाला पाहावंसं वाटेल. आज तो एक TEDx वक्ता, जगातील पहिल्या Android smart-watch company चा सह-संस्थापक, एका समाजसेवी संस्थेचा प्रशासक म्हणून तर ओळखला जातोच, पण अमेरिकच्या राष्ट्रपतींकडून मानाचं आमंत्रण मिळालेला अशीही एक वेगळी ओळख त्याने निर्माण केली आहे. आणि हे सगळं त्याने वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी प्राप्त केलं आहे.

मी स्वप्नाळू आहे

मी स्वप्नाळू आहे


त्याला भेटल्यावर काही क्षणातच तुम्हाला हे कळेल की त्याच्यामध्ये काहीतरी विलक्षण वेगळेपण दडलेलं आहे. त्याच्या नजरेतील स्वप्नांचा पाठलाग करण्याची असामान्य ओढ तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. त्याच स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी त्याने शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडण्याचा घेतलेला निर्णय हा कुणालाही चकित करणारा असाच आहे. ती आठवण सांगताना तो म्हणतो, "मी जेव्हा माझ्या पालकांना माझे शालेय शिक्षण लांबणीवर टाकण्याचा माझा निर्णय ऐकवला, तेव्हा तो त्यांच्यासाठी मोठा धक्का होता, आजही ते त्या धक्यातून सावरलेले नाहीत. "

आपण ह्या जगावेगळ्या तरुणाच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी थोड्क्यात जाणून घेऊया.

'मी स्वप्नाळू आहे.'

सिद्धांत वत्स मध्ये नक्कीच काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे, जे त्याला त्याच्या समवयस्क पिढीमधून वेगळं काढून पुढे नेऊन ठेवते. त्याच्या व्यक्तिमत्वातील अशा काही पैलूंवर आपण नजर टाकूया.

  1. त्याचं स्वपानाळूपण हेच त्याच्या यशस्वी उदयोजक होण्यामागील मूळ कारण आहे. उद्यम विश्वात काम करताना धोके पत्करण्याची त्याची सदैव तयारी असते कारण त्यांना तो धोके मानतच नाही.
  2. त्याचा असा पूर्ण विश्वास आहे की हिंदी चित्रपटांप्रमाणेच सगळं काही अखेरीस चांगलंच होतं, जर तसं नसेल तर तो त्यास शेवट मानत नाही. (पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त).
  3. त्याने त्याची समाजसेवी संस्था जेव्हा सुरु केली होती तेव्हा तो केवळ आठवीत शिकणारा मुलगा होता.
  4. तो स्वतःला नियमांच्या चौकटीत बंदिस्त करून घेत नाही, कारण त्याने आजवर तेच केलं आहे जे त्याला करावसं वाटलं व जे त्याच्या मनाच्या नैतिक कसोटीवर खरं उतरलं.

त्याच्या शिरपेचातील काही मानाचे तुरे

१. अॅन्ड्रॉएडली सिस्टिम्स

सिद्धांतने अपूर्व सुकांत आणि इतर दोन मित्रांच्या साथीने अॅन्ड्रॉएडली सिस्टिम्सची स्थापना केली जेव्हा तो केवळ १७ वर्षांचा होता.

अॅन्ड्रॉएडली स्मार्ट सखे-सोबती

अॅन्ड्रॉएडली स्मार्ट सखे-सोबती


तो म्हणतो "आम्ही जगातील पहिले अॅन्ड्रॉईड स्मार्ट-वॉच बनवले आहे . आम्ही त्याचे नामकरण 'अॅन्ड्रॉएडली' असे केले. ह्या घड्याळामधून तुम्ही फोन करू शकता, इंटरनेट पाहू शकता, व्हॉट्सअॅप वापरू शकता, संगीत ऐकु शकता आणि फोटोही काढू शकता. थोड्क्यात, तुमचा मोबाईल फोन जे करू शकतो, ते सगळं तुमचं घड्याळ करू शकेल."

त्याने त्याचं शालेय शिक्षण देखील केवळ ह्याचकरिता २ वर्ष लांबणीवर टाकलं होतं. अॅन्ड्रॉएडली स्मार्ट-वॉच २०१३ च्या मध्यापासून संपूर्ण जगात २२० डॉलर मध्ये उपलब्ध झाले आहे. त्याची या आधीच ११० देशांमध्ये विक्री झाली आहे व त्याची पुढील आवृत्ती (version) येत्या ऑगस्ट-सप्टेंबरला बाजारात येण्यास सिद्ध झाली आहे. सिद्धांत म्हणतो, "आगामी अॅन्ड्रॉएडली स्मार्ट-वॉच नविनतम Android version वर चालेल व त्याचबरोबर त्याचं स्वरूप ही खऱ्याखुऱ्या घड्याळासारखं दिसणारं असेल (सध्याचं त्याचं स्वरूप सामान्य घड्याळाच्या तुलनेत खूपच मोठं आहे). ते एखाद्या अद्ययावत फॅशनचे साधन म्हणून ही वापरता येऊ शकेल."

२. फलक फाउंडेशन

सिद्धांतच्या आईने स्थापन केलली 'फलक फाउंडेशन' ही समाजसेवी संस्था शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात जागृती करण्याचं कार्य करते. सिद्धांत जेव्हा ७ व्या इयत्तेत शिकत होता, तेव्हाच त्याने प्राथमिक संगणक अभ्यासक्रम , इंग्रजी आणि गणित हे विषय मुलांना शिकवायला सुरुवात केली होती. त्यानंतर, जनतेसाठी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करणे, अशा प्रकारची सेवा करण्यासाठी तो फलक फाउंडेशनमध्ये सामील झाला.

फलक फाउंडेशन ने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना त्याने सांगितले, "माझ्या NGO तर्फे, मला अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील विहाराच्या सहयोगाने यशस्वीरित्या भारतातल्या बोधगया मध्ये आंतरराष्ट्रीय विहाराची स्थापना करता आली. त्या कार्यासाठी प्रचंड प्रमाणात विदेशी गुंतवणूक केली गेली होती आणि उद्घाटनाच्या दिवशीच जवळजवळ १००० प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. ही घटना बिहारच्या अर्थव्यवस्थेला थोड्याफार प्रमाणात हातभार लावणारी तर होतीच, पण पर्यटन व्यवसायाला उत्तेजन देणारी सुद्धा होती.

३. जागतिक वक्ता

सिद्धांत ने आतापर्यंत वक्ता म्हणून १०० च्या वर परिषदांना हजेरी लावली आहे. त्यात टेडएक्स, होरासीस व्यापार परिषद (जी जगातील १०० अग्रमानांकित असलेल्या नव-आविष्कर्त्यांनी नावाजलेली आहे) आणि The BIG IF जेथे बिल गेट्स सुद्धा एक वक्ता म्हणून हजर होते.

४. पुरस्कार

सिद्धांत ने भारताच्या पंतप्रधान कार्यालयाकडून उल्लेखनीय उद्योजकतेसाठी दिला जाणारा पुरस्कार पटकावला आहे, त्याचबरोबर त्याला अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्याकडूनसुद्धा भेटीचं आमंत्रण मिळालेलं आहे.

चालना आणि प्रेरणा

सिद्धांत म्हणतो, "मला एकच एक गोष्ट जास्त काळासाठी करण्यात कधीच मजा आली नाही, आणि हीच सवय मला सदैव पुढे जाण्याठी प्रेरित करते. मला माझ्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे, मला ते सर्वकाही करायचं आहे जे माझ्या मनात उमटतं. मला कुठून तरी प्रेरणा मिळते असं नाही तर मला काहीतरी करायचंच असतं आणि मी ते करतोच, कारण मला असं वाटतं की माझ्याकडे सगळं काही करण्यासाठी खूप जास्त वेळ आहे."

आव्हानं

सिद्धांतच्या मते आपल्यासमोर सगळ्यात मोठी आव्हानं जर कुठली असतील तर ती म्हणजे आपल्या अशा शेजारी, परिवार आणि मित्रांना तोंड देणे की जे आपल्याला नाउमेद करतात.

ते आपल्याला सांगतात की आपली कल्पना कसल्याच योग्यतेची नाही, इतकेच नाही तर तुम्हाला सोडून इतर प्रत्येकजण आणि कधीकधी तर तुमच्या सोबत काम करणारे तुमच्याच संघातील सदस्यही तुम्हाला हेच सांगतील की तुमची कल्पना प्रत्यक्षात चालण्या योग्य नाही. पण कोणीच पुढे येऊन हे मात्र सांगणार नाही की नक्की काय चालू शकेल.

नेतृत्व परिषद - आगामी योजना

सिद्धांतला असा एक आंतरराष्ट्रीय मंच उभारायचा आहे की जेथे विविध कार्यक्षेत्रातील व्यक्तिमत्वं एकत्र येऊन एकमेकांना प्रेरणा देऊ शकतील.

"नेतृत्व परिषद (त्या मंचाचे नाव ) हे टेड च्या धर्तीवर काम करेल. तेथे अशी खाजगी स्वरुपाची परिषद असेल जेथे सदस्यांना त्यांच्या प्रेरणादायी गाथा एकमेकांना कथन करता येतील. शिवाय, हेच काम पुढे जाऊन आंतरमहाविद्यालयीन व आंतरशालेय स्तरावर देखील करता येइल. " सिद्धांतने त्याच्या मनातील आगामी योजना स्पष्ट करताना सांगितलं.
अॅन्ड्रॉएडली युअर्स

अॅन्ड्रॉएडली युअर्स


"या व्यतिरिक्त, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कदाचित मला अनपेक्षितपणे एखादी नवीन कल्पना सुचेल, आणि मी त्यावर काम करायला सुरुवात करेन." इति सिद्धांत.

तुम्ही सिद्धांतला त्याच्या ट्वीटर अकाउंट @siddhantvats वर भेटू शकता आणि त्याच्या फेसबुक पेजवर सामील होऊ शकता.