क्रिकेटमधील आद्य द्रोणाचार्य शशिकांत नाईक

क्रिकेटमधील आद्य द्रोणाचार्य शशिकांत नाईक

Monday December 21, 2015,

5 min Read

कसोटीपटू खंडू रांगणेकर यांची कर्मभूमी असलेल्या ठाणे शहरातील सेंट्रल मैदानात भावी क्रिकेटपटू घडविणारे आद्य द्रोणाचार्य म्हणजे शशिकांत नाईक. सुमारे तीन दशकांहून अधिक काळ शशिकांत यांनी अनेक शिक्षणसंस्था, कंपन्या, क्रिकेट क्लब आणि महामंडळे यांसारख्या अनेक माध्यमातून जवळपास २१ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गुरुमंत्र दिला. १९७१ ते १९९८ या आपल्या कारकिर्दीत शशिकांत सरांनी टेनिस क्रिकेटमध्ये ६० पदकांवर आपले नाव कोरले आहे. मूळचे कर्नाटक राज्यातील असलेले शशिकांत सर आपल्या आजवरच्या आय़ुष्यातील क्रिकेट कारकिर्दीबद्दल मोठ्या अभिमानाने सांगतात.

image


क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीबद्दल बोलताना शशिकांत सर सांगतात की, ʻकर्नाटकातील कुमठा गावात मी राहत होतो. माझे आई-वडिल मुंबईला होते. १९६८ साली सातव्या इयत्तेत शिकत असताना मी एक-दीड महिन्याकरिता मुंबईला आलो. तेव्हा माझ्या वडिलांनी आमच्या हॉटेलमध्ये (त्याकाळी पॅव्हेलियन हॉटेल) मला कपबशी विसळण्याच्या कामाला नेमले. त्यावेळी सेंट्रल मैदानात खासगी कंपनीतील काही कर्मचारी क्रिकेट खेळण्यासाठी येत असत. त्यांचा खेळ पाहून मलादेखील क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायची इच्छा होत असे. त्यावेळी अनंत दामले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक होते आणि ठाण्यातील क्रिकेटपटूंना ते प्रात्यक्षिकांसह मैदानावर प्रशिक्षण द्यायचे. त्यावेळी मी त्यांच्या हालचाली टिपायचो. कंपन्यांच्या स्पर्धेनंतर मी आयोजकांकडून तुटका फुटका बॉल आणि बॅट मागून घेऊन एकलव्याच्या जिज्ञासेतून क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.ʼ आपल्या प्रशिक्षकपदाच्या प्रवासाबद्दल बोलताना शशिकांत सर सांगतात की, ʻमी कधीच सिझन बॉल क्रिकेट खेळलो नाही. क्लबस्तरावर मी टेनिस बॉलने खेळण्यास सुरुवात केली. माझे दोन्ही बंधू सुरेश आणि सुधाकर चांगले क्रिकेट खेळायचे. मात्र योग्य प्रशिक्षणाअभावी ते मागेच राहिले. क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि आवड यांच्यामुळे मी नंतर ʻमॉर्निंग क्रिकेट क्लबʼची स्थापना केली. तेथे मी मुलांना सिझन बॉलने प्रशिक्षण द्यायचो. मुंबई रणजी क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी त्यावेळेस सात-आठ वर्षांचे होते. ते त्यांच्या भावासोबत माझ्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी येत असत. त्यानंतर मी माझ्या हॉटेलमधील काही मुलांना सोबत घेऊन ʻपॅव्हेलियनʼ नावाचा एक संघ तयार केला. तो संघ त्याकाळी एवढा समतोल आणि बलाढ्य होता की, मुंबईतील संघ ठाण्यातील संघांना दचकू लागले होते.ʼ

आपल्या या प्रशिक्षणाला ठाणेकरांच्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल तसेच आपल्या प्रशिक्षणपदाच्या अनुभवाबद्दल बोलताना शशिकांत सांगतात की, ʻमाझ्या संघाचे यश पाहिल्यानंतर ठाण्यातील लोकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला होता. क्रिकेट हा तसे पाहता आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या वर्गाचा खेळ आहे. गुणवत्ता असूनदेखील गोरगरिबांना हा खेळ आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे मी गुणवत्तावान गरिब खेळाडूंना मोफत किंवा कमी शुल्क आकारुन क्रिकेट शिकवण्यास सुरुवात केली. मी ज्या कॅम्पचे आयोजन करतो, तेथे किमान १५ ते २० मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत मी २१ हजार मुलांना प्रशिक्षण दिले असून, त्यापैकी जवळपास आठ हजार ५०० मुलांना मी मोफत शिक्षण दिले आहे. ठाण्यातील क्रीडापटूंना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात, म्हणून मी शहरातील सर्व क्लब एकत्रित करुन ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनची स्थापनादेखील केली. मी पाठवलेले प्रत्येक नाणे हे खणखणीतच वाजायला हवे, अशी माझी भूमिका असायची. म्हणजे मी जर एखाद्या प्रशिक्षणार्थ्याची शिफारस ʻएमसीएʼकडे केली, तर त्यानेदेखील तिथे उत्तम खेळ करुन माझे नाव उंचवायला हवे, या मताचा मी आहे. माझा मुलगा मी प्रशिक्षक असलेल्या सेंट जॉन बाप्टिस्ट शाळेत शिकला. मात्र मी कधीही माझ्या प्रशिक्षकपदाचा गैरवापर करुन त्याला शाळेच्या संघात स्थान दिले नाही. त्याला मुळात तेव्हा क्रिकेटची आवडही नव्हती आणि मी कधी त्याच्यावर लादलीदेखील नाही.ʼ शशिकांत यांनी आजवर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्ञानसाधना महाविद्यालय, टि. जे. हायस्कूल, बिम्स पॅरेडाईज अशा अनेक संस्थामध्ये खेळाडूंना प्रशिक्षण दिले. क्रिकेटप्रति समर्पित असलेल्या शशिकांत यांनी कधी आपल्या पदाचा गैरफायदादेखील घेतला नाही. याबद्दल शशिकांत आपला अनुभव सांगतात की, ʻमाझ्या भावाचा मुलगा ज्ञानसाधना महाविद्यालयात शिकायला होता. तेव्हा तेथे क्रिकेट संघाची निवड सुरू होती. ८७ जणांमधुन निवड करण्यात आलेल्या १८ जणांच्या संघात त्याची निवड झाली होती. पण जेव्हा त्या १८ जणांमधून दोघांना वगळण्याची वेळ आली, तेव्हा मीच त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवला कारण उर्वरीत खेळाडू त्याच्यापेक्षा सरस होते. मी माझ्या क्रिकेटच्या प्रेमाआड कोणालाही येऊ दिले नाही अगदी घरातल्यांनाही.ʼ प्रशिक्षकपदाच्या आजवरच्या कारकिर्दीतील अनेक आठवणींबद्दल बोलताना शशिकांत सांगतात की, ʻमुंबईचे संघ एकेकाळी ठाण्याच्या संघांना कमी लेखायचे. त्यावेळी एमसीएमध्ये १७ वर्षाखालील मुलांची निवड होणार होती. अभिजीत काळे हा त्याकाळी सेंट जॉन बाप्टीस्ट शाळेत शिकायला होता. त्याचा खेळ पाहून मी त्याला दोन महिने प्रशिक्षण दिले. त्या निवडचाचणीकरिता जवळपास ४५० मुले होती. त्यापैकी अभिजीत एकटाच ठाण्याचा होता. तेव्हा अभिजीत ११ वर्षांचा होता आणि सचिन, विनोद १४ वर्षांचे होते. त्या वेळेस अंतिम १५ जणांच्या संघात अभिजीतची निवड झाली. त्यावेळी ʻविश्वनाथ चषकʼ पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत होता. अनेक मातब्बर संघ त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. सचिन आणि विनोदसारखे गुणवान खेळाडू या स्पर्धेत खेळत असूनदेखील अभिजीतने या स्पर्धेत आपली छाप पाडली होती. या स्पर्धेत अभिजीतने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.ʼ

image


क्रिकेटच्या बदलत्या स्वरुपाबद्दल आपली भूमिका मांडताना शशिकांत सांगतात की, ʻहल्ली क्रिकेटच्या टी-२० या पद्धतीचे वेड सर्वांना लागले आहे. या क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या शैलीपेक्षा फटकेबाजीला जास्त प्राधान्य दिले जाते. तुम्ही कसे खेळला आहात, यापेक्षा तुम्ही किती फटकेबाजी केली आहे, हे पाहिले जाते. त्यामुळे फलंदाजांची शैली बिघडते. कसोटी क्रिकेटमध्ये कधीकधी तुमच्यावर दोन ते तीन दिवस फलंदाजी करायची वेळ येते. अशावेळेस एकंदरीतच तुमच्या खेळाचा तसेच फलंदाजीचा कस लागतो. टी-२० मध्ये अशा शैलीदार फलंदाजीचा खेळ पाहायची संधी मिळत नाही. टी-२० क्रिकेटपद्धतीत एखाद्या सामन्यात जर तुम्ही अपयशी ठरलात, तर दुसऱ्या सामन्यात तुम्हाला संघाबाहेरचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे माझ्या मते तरी, हल्ली क्रिकेटमध्ये गुणवत्तेपेक्षा फटकेबाजीला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.ʼ संपूर्ण आयुष्य क्रिकेटकरिता समर्पित केलेल्या शशिकांत यांचा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांपर्यंत क्रिकेट पोहोचवण्याचा संकल्प आहे.

image


सचिन पावसकर आणि हरीश मोकाशी या सहकाऱ्यांच्या साथीने हे सर्व शक्य झाल्याचे शशिकांत सांगतात. शशिकांत नाईक यांनी सेंट जॉन बाप्टीस्ट या शाळेत तब्बल ३४ वर्षे प्रशिक्षण दिले. आजवर या शाळेने८५ सामन्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तर ३२ सामन्यात उपविजेतेपद मिळवले आहे. या शाळेचे २२ विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहेत. याच शाळेतील अभिजीत काळे या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील खेळ केला आहे. शशिकांत यांना आजवर शरद पवार, देवगौडा यांसारख्या अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेटमधील शशिकांत यांच्या योगदानाबद्दल त्यांना छात्रवृंद आचार्य पुरस्कार, स्वा. सावरकर पुरस्कार, ठाणे गौरव, खंडू रांगणेकर पुरस्कार, ठाणे द्रोणाचार्य पुरस्कार, ठाणे गुणीजन पुरस्कार यांसारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.