घरगुती हिंसा आणि लैंगिक शोषणाने बळी पडलेल्या ३८०० स्त्रियांच्या मदतीसाठी ‘’समाधान’’

0

लखनऊची एक संध्याकाळ, १४ – १५ वर्षाची एक मुलगी शाळेतून घरी आपल्या दुचाकीवर जात असताना तिची नजर किराणा दुकानाजवळ दयनीय अवस्थेत उभ्या असलेल्या एका मुलीवर जाते. दोघींची नजरानजर झाल्यावर त्या मुलीला आभास होतो की ती मुलगी तिच्याकडे मदतीची याचना करत आहे. आपली दुचाकी तिच्या जवळ घेऊन जाताच ती मुलगी पटकन गाडीवर बसून ओरडू लागली, ‘’दीदी मला वाचव’’.

गाडीवर स्वार झालेली ही मुलगी होती रेणू डी सिंह. जी आज देहरादून मध्ये ‘’समाधान’’ नावाच्या एका संस्थेद्वारे घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांची मदत करत आहे. अशा स्त्रियांसाठी कायदेशीर लढाई देऊन त्यांच्या पुनर्वसनाचे काम त्या करतात. रेणू त्या कटू दिवसाची आठवण सांगते की, त्या मुलीला घरी आणल्यावर कळले की तिचे वडीलच तिच्या वर बलात्कार करायचे व ती गर्भवती राहिली . अशातच सावत्र आई पण तिला मारझोड करत तिच्याकडून घरकाम करून घ्यायची. तिची सख्खी आई पण त्याच गावात रहात होती. पोलीस जेव्हा तिच्या सख्या आईला गावाहून घेऊन आले तेव्हा नाईलाजाने रेणूला त्या मुलीला तिच्या आई सोबत गावाला पाठवावे लागले. या घटनेनंतर रेणूने त्या मुलीची विचारपूस करण्यासाठी तिला भेटण्याचा निश्चय केला. एक दिवस शाळेत न जाता ती त्यांच्या गावाला पोहचली. जिथे मुलीच्या आईने रडून सांगितले की, ‘गावातल्या जात पंचायतीच्या निर्णयाने तिचे लग्न एका वयस्कर माणसाशी लाऊन दिले. पण लग्नाच्या चौथ्या दिवशीच तिचे प्रेत गावातल्या तलावात पहायला मिळाले’’. ही घटना एकूण सुन्न झालेल्या रेणूने आपल्या दीदीला या घटने बद्दल सांगितले. तेव्हा तिच्या दीदीने तिला समजावले की, "कोणत्याही दु:खाला कवटाळून बसल्याने प्रश्न सुटत नाही तर त्यावर आपण विचार करून योग्य निर्णय घेतला पाहिजे’’. तेव्हा आपल्याला समाजातील मागासवर्गीय महिलांची मदत करण्याची इच्छा तिने प्रकट केली.


या घटनेनंतर रेणूने लखनऊच्या ख्रिश्चन कॉलेज मधून पदवी घेतली. त्या नंतर तिने कायद्याची पदवी घेतली. तिने देशाची आपत्कालीन परिस्थिती जवळून बघितली आहे. १४ – १५ वर्षाची रेणू ही जयप्रकाश नारायणच्या भाषणाने तसेच स्वामी विवेकानंदाच्या सिद्धांताने प्रभावित असायची. म्हणून आंदोलनकरी स्वभाव तिच्या नसानसात भिनला होता. आज त्यांची संस्था ‘’समाधान’’ ही उत्तराखंड आणि यूपी मध्येच कार्यरत नाही तर राज्यस्थान, बिहार, मध्यप्रदेश, सौराष्ट्र, विदर्भात पण सक्रीय होऊन घरगुती अत्याचार पिडीत स्त्रियांसाठी काम करते. या कामाच्या सुरवातीच्या प्रतिसादानंतर अनेक महिला वकील, डॉक्टर आणि वैज्ञानिक पण या संस्थेशी जोडल्या गेल्या ज्या आम्हाला मार्गदर्शन करतात.


प्रारंभीच्या काळात त्यांनी कारागृहातील महिला कैद्यांपासून सुरवात केली. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील पिडीत स्त्रियांच्या समस्या समजून निवारण केले. पिडीत महिलेला बलात्कारी म्हणून वागविणे चुकीचे ठरेल, म्हणून तिला सर्व्हाइव्हर संबोधने योग्य होईल असे त्या सांगतात. आज रेणू आणि तिची टीम अशा स्त्रियांना रेप व्हीकटीम न समजता रेप सर्व्हाइव्हर संबोधने योग्य मानतात. रेणू आणि त्यांची संस्था गावातल्या स्त्रियांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराची ओळख करून देतात. घरगुती हिंसा आणि लैंगिक शोषणाने बळी पडलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी ‘’समाधान’’ मागच्या २० वर्षा पासून हेल्पलाईन चालवत आहे. यांच्या मार्फत पिडीत स्त्रियांच्या समस्येवर तोडगा काढून त्याचे निवारण करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. तसेच त्यांची संस्था पीडितांच्या आश्रयाची सोय पण उपलब्ध करतात. जर रेप सर्व्हाइव्हर स्वतःच्या पायावर उभे करायचे असेल तर लहान सहान घरगुती कामे चटणी, लोणचे पापड यांचा व्यवसाय सुरु करण्यापेक्षा त्यांना शिक्षित करून वकील बनविले पाहिजे, यामुळे ती स्वतःच्या पायावर उभी राहून तिच्या सारख्या अनेक स्त्रियांची मदत करू शकेल. आज रेणूच्या यशस्वी प्रयत्नांनी १७०० रेप सर्व्हाइव्हर स्त्रिया देशाच्या वेगवेगळ्या भागात वकिलाच्या रुपात, तर अनेक स्त्रिया कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.


बार कौन्सिल ऑफ अलाहाबाद मध्ये रेणूने वकिलीसाठी आपल्या नावचे रजिस्ट्रेशन केले आहे. प्रारंभी त्यांना लोकांचा विरोध सहन करावा लागला. पिडीत महिलांसाठी काम करणे हे समाजबाह्य होते. रेणू गर्वाने सांगते की,’’अशा बळी पडलेल्या स्त्रियांच्या हक्कासाठी ती मोफत लढा देत आहे. त्यांच्या टीम ने ३८०० पेक्षा जास्त स्त्रियांची घरगुती हिंसाचारातून मुक्तता केली आहे. रेणूचे स्वप्न होते की प्रत्येक घरातल्या पिडीत महिलेला न्याय मिळाला पाहिजे. या साठी तिने स्त्रियांना पॅरा लीगल व्हॉलेन्टीयरचे ट्रेनिंग दिले आणि आज त्यांच्याकडे मदतनिसांची मोठी टीम तयार आहे. उत्तर भारत स्थित ‘समाधान’ ही अशी एक संस्था आहे की जिच्या कडे मोबाईल लीगल क्लिनिक आहे. जिच्यात एका बस मध्ये संपूर्ण ऑफिस आहे. ही बस उत्तराखंडातल्या १२२ तालुक्यांची पाहणी करून मागासवर्गीय जातीतील स्त्रियांना सल्ला देतात. ही अशी एक लीगल क्लिनिक बस आहे जी महिलांद्वारे, महिलांसाठी चालवली जाते. यात एक पण पुरुष सहकारी नाही. या बस मध्ये ६ मुलींची टीम आहे ज्या कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत. यात चार ह्या केंद्रातल्या मुली तर इतर दोन मुली ह्या वेगवेळ्या विद्यापीठातून येथे इंटर्नशीप करण्यासाठी आलेल्यांपैकी असतात. या लीगल क्लिनिकचा एक भाग बनलेल्या या विद्यार्थिनी स्वतः बस चालवतात व गरज पडल्यास त्याची दुरुस्ती पण करतात. तसेच टीमच्या सदस्यांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु करण्यात आला.


महिलांच्या उद्धारासाठी रेणूने स्वतःचा संसार न थाटता निरंतर सेवेत वाहून घेतले देहरादून मध्ये स्वतःचे एक केंद्र स्थापून तिथे पिडीत मुलींच्या निवासाची पण सोय उपलब्ध आहे. इथे त्यांची ओळख गुप्त ठेवली जाते. त्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. ‘समाधान’ मधल्या सगळ्या मुलींना दवाखान्याच्या सोयी उपलब्ध आहेत. तसेच कायद्याची पण मदत त्यांना केली जाते.


इथे येणाऱ्या सगळ्या मुली या १८ वर्षाच्या पुढे आहे. गरजू स्त्री फोनवरून किंवा ईमेलद्वारे यांच्याशी संपर्क साधू शकते. यांची एक टीम सर्व्हाइव्हरला भेटून पिडीत स्त्रीची वस्तुस्थिती समजावून घेते.यानंतर सदर महिलेच्या इच्छेनुसार तिच्या शिक्षणाचा खर्च करतात. या व्यतिरिक्त "समाधान’’ शाळा व कॉलेजमध्ये कँपचे आयोजन करून विद्यार्ध्याना वर्तमानातील कायद्याची माहिती देतात.

Website : www.samadhanngo.org

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे