कोल्ड-प्रेस्ड फ्रेश ज्यूससाठी देशातील पहिले नाव ‘रॉ प्रेसरी’

कोल्ड-प्रेस्ड फ्रेश ज्यूससाठी देशातील पहिले नाव ‘रॉ प्रेसरी’

Wednesday December 23, 2015,

6 min Read

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेक जण दररोज ज्यूस पितात. टेट्रा पॅकमध्ये मिळणाऱ्या ज्यूसपेक्षा जवळपासच्या ज्यूसवाल्याने बनविलेला मोसंबी ज्यूस किंवा ऊसाचा रस पिण्यालाच यावेळी प्राधान्य दिले जाते. मला आश्चर्य वाटते की ऑरगनाईज्ड ज्यूस मेकर्स ज्यूसचे हे दोन प्रकार टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध का करुन देत नाहीत?

माझ्या मनात हा विचार येण्यासाठी स्टार्टअप ‘रॉ प्रेसरी’ जबाबदार आहे. कारण त्यांचेही येता जाता पिता येतील असे कोल्ड-प्रेस्ड ज्यूसेस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तथापि, ‘रॉ प्रेसरी’ची उत्पादने इतर पेयांप्रमाणे केवळ तुमच्या टेस्ट बडला लक्ष्य करत नाहीत तर ती तेवढीच आरोग्यदायीही आहेत.

image


‘रॉ प्रेसरी’ हे हेल्थ फूड ऍण्ड बेव्हरिज बनविणारे मुंबईतील एक स्टार्टअप आहे. कोल्ड-प्रेस्ड ज्यूसच्या माध्यमातून लोकांना दररोज पौष्टीक खाद्यपदार्थ देणे हे त्यांचे लक्ष्य आहे. एका फ्लेवरमध्ये उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या टेट्रा पॅकमधील ज्यूसपेक्षा वेगळे असलेले ‘रॉ प्रेसरी ज्यूसेस’ हे विविध साहित्याचे मिश्रण करुन बनविले आहे. जे तुम्हाला बारीक व्हायला, तेजस्वी दिसायला, तुमच्या आरोग्याचे सर्वतोपरी रक्षण करण्यासाठी, तंदुरुस्त जीवनशैलीकरिता मदत करते. या ज्यूसला आरोग्यदायी बनविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने हे ज्यूस तयार केले जातात.

‘रॉ प्रेसरी’चा संस्थापक अनुज रायकन याने बराच काळ हेल्थ इण्डस्ट्रीमध्ये परिक्षक म्हणून काम पाहिले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करत असतानाच त्याची ओळख कोल्ड-प्रेस्ड फ्रेश ज्यूस या संकल्पनेशी झाली, जी तिथे नवीन नाही. जेव्हा त्याला स्वतःचे काहीतरी करावे असे वाटले तेव्हा कोल्ड-प्रेस्ड ज्यूसेसने त्याला एक चांगला पर्याय उपलब्ध करुन दिला. अनुज सांगतो, “जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि भारताबाहेर काम करत होतो, मला भारतामध्ये हेल्थ प्रोडक्ट्स उपलब्ध नसल्याचं स्पष्टपणे लक्षात आलं. जे काही तुमच्या घरातील स्वयंपाकघरात शिजतं तेच आरोग्यदायी समजलं जातं. अनेक उत्पादनांचे लो फॅट, नो प्रिझरवेटिव्ह, नो शुगरचे दावे फोल असतात.”

image


अनुजने ड्यूक युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रामधून पदवी प्राप्त केली आहे आणि उद्योजक म्हणून करिअरची सुरुवात करण्यापूर्वी त्याने निरव मोदी ज्वेल्स येथे विक्री खात्याचा उपाध्यक्ष म्हणून शेवटची नोकरी केली. ‘रॉ प्रेसरी’साठी पायाभूत गोष्टींची व्यवस्था करताना तसेच टीम आणि पैसा उभा करण्याबरोबरच संकल्पना कागदावर उतरवल्यापासून सहा महिन्याच्या आत ‘रॉ प्रेसरी’ची सुरुवात करतानाही त्याला पूर्वीच्या कामाचा अनुभव कामी आल्याचे तो सांगतो. जानेवारी २०१४ ला ‘रॉ प्रेसरी’ अस्तित्वात आली आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांनी २,५०० ग्राहकांना ८५,००० ज्यूसच्या बाटल्या विकल्या.

‘रॉ प्रेसरी’च्या उत्पादनांना दोन प्रकारात विभागता येईल – एक म्हणजे दर दिवशीसाठीचे ज्यूस कमिटमेंट पॅकेज आणि दुसरे म्हणजे क्लिन्जिंग पॅकेज. अनुज सांगतो या वेगवेगळ्या विभागात उत्पादने तयार करण्याची कल्पना त्याला मित्रमैत्रीणी आणि कुटुंबियांशी साधलेल्या संवादातून तसेच लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्याने केलेल्या ५०० लोकांच्या सर्वेक्षणातून सुचली. “स्वानुभव, बाजाराचे सर्वेक्षण, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांच्या प्रतिक्रिया, इण्डस्ट्री एक्सपर्ट्स बरोबर केलेली चर्चा आणि प्रत्यक्ष दुकान चालवणाऱ्या दुकानदारांच्या भेटीगाठी आणि त्यांच्याशी झालेली चर्चा यामुळे आम्हाला एक सर्वांगीण दृष्टीकोन लाभला,” असं अनुज सांगतो.

भारतातील पॅकेज ज्यूसचे मार्केट जवळपास २००० कोटींचे आहे. ज्यामध्ये डाबरचे ‘रिअल’ आणि पेप्सीकोचे ‘ट्रॉपिकाना’ यांचा समावेश आहे. हेक्टर बेव्हरिज्स या स्टार्टअपचे उत्पादन असलेले ‘पेपर बोट’ हे सुद्धा आता त्यांच्या स्पर्धेत उतरले आहे. तथापि मोठमोठ्या शहरांमध्ये पॅकेज ज्यूसला खूप मागणी असली तरी त्याच्याबरोबरीनेच कोल्ड-प्रेस्ड फ्रेश ज्यूसलाही दिवसेंदिवस मागणी वाढते आहे. “भारतातील ग्राहकांना चांगलं माहिती आहे की फ्रेश ज्यूस नेमका कसा असतो. कारण आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात रस्त्यावर फ्रेश ज्यूसची विक्री होते तेवढी कुठल्याच देशात होत नाही. आपल्याकडे लिंबू-पाणी, ऊसाचा रस, गाजराचा रस सगळं काही रस्त्यावर मिळतं. त्याचबरोबर भारतात घऱी ज्यूस तयार करणारे लोकही खूप मोठ्या प्रमाणात आहेत,” असं अनुज सांगतो.

‘रॉ प्रेसरी’ जवळपास सुरु झाले होते आणि त्यांना थोडी आर्थिक मदतही मिळाली. या उद्योगासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमधून प्रोडक्शन सामुग्री मागविली. सध्या ज्यूस बनविण्यासाठीची जागा ते दुसऱ्यांबरोबर भागीदारीत वापरतात. प्रोडक्शनसाठी त्यांची २२ जणांची टीम आहे. प्रोडक्ट डिलीव्हरीसाठी २५ जणांचा वेगळा ग्रुप आहे. “जवळपास ३० जण आमच्या पे-रोलवर आहेत आणि आम्ही अप्रत्यक्षरित्या ६५ जणांना सांभाळतो,” अनुज सांगतो.

image


सध्या ‘रॉ प्रेसरी’ ज्यूसेस मुंबई आणि पुण्यात उपलब्ध आहेत आणि लवकरच दिल्लीतही उपलब्ध होणार आहेत. याच्या ग्राहकसंख्येपैकी ७० टक्के ग्राहक या २० ते ६० वयोगटातील महिला आहेत आणि उर्वरित ग्राहक ३० -४५ वयोगटातील पुरुष आहेत. “जे लोक आमचे ज्यूस पितात ते त्यांची जंक फूड खायची सवय सोडू इच्छित असतात; कुणाचं लग्न असतं म्हणून त्यांना त्वचा चांगली दिसायला पाहिजे असते ; तर कुणाला सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचं असतं, अशी अनेक कारणं असतात, ” अनुज सांगतो.

२५० मिलीच्या या ज्यूसच्या बाटल्या १५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. अनुज सांगतो की तुमची ऑर्डर जितकी मोठी असते तितका तुम्हाला किंमतीत फायदा मिळतो. त्यामुळेच, ‘रॉ प्रेसरी’च्या वेबसाईटवर मिळणाऱ्या पॅकेजेसचा कालावधीही तीन किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा असतो, जेणेकरुन तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ठराविक लक्ष्य साध्य करायला मदत होईल.

ऑर्डरनुसार फ्रेश ज्यूस सकाळी आठ वाजता ग्राहकांच्या घरी पोहचविला जातो. किरकोळ बाजारात ‘रॉ प्रेसरी’ची उत्पादने मुंबईतील मोठमोठ्या किराणा दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, तसेच बिग बास्केट डॉट कॉमवर, काही जिममध्ये, योगा सेंटर्स, कॅटरिंग सर्विस आणि काही कॉर्पोरेट कॅन्टीन्समध्येही उपलब्ध आहेत. प्रत्येक स्टोअरमध्ये उपलब्ध मालापेक्षाही मागणी जास्त असते आणि अनुज सांगतो की ते मागणीपेक्षा पुरवठा कमी ठेवण्यालाच प्राधान्य देतात.

“आमचं उत्पादन नाशवंत आहे. आमचं उत्पादन आणि बाजारात उपलब्ध असलेले इतर ज्यूस यामधला हा खूप मोठा फरक आहे. आमचे ज्यूस तीन दिवसापर्यंतच वापरता येऊ शकतात. त्यामुळे आम्हाला ते त्या कालावधीत विकले जाणं गरजेचं असतं. समजा ५० ग्राहकांना आमचा ज्यूस खरेदी करायचा आहे. तर आम्ही ४० बाटल्याच पुरवतो जेणेकरुन ज्यूस वाया जाण्याऐवजी उर्वरित १० जण दुसऱ्या दिवशी परत येतील. सगळ्यांची यादी करुन ठेवणं मला अजिबात जमत नाही आणि त्यामुळे नेमकी ग्राहक संख्या मोजून उत्पादन घ्यायचं म्हटलं तरी अडचण येते,” अनुज सांगतो.

हे एक स्टार्टअप असल्यामुळे मार्केटिंगसाठी त्यांच्याकडे जास्त पैसा नाही. त्यांचे जवळपास सर्व काम तोंडी प्रसिद्धिनेच चालते. स्टोअरमध्ये ते बऱ्याच प्रमोशनल ऍक्टीव्हिटीज करतात. अनुज सांगतो की त्यांना पुरवठ्याची किंमत जास्त पडत नाही कारण ते खरेदी करताना अनेकदा मोठ्या प्रमाणातच खरेदी करतात. चेन स्टोअर्समध्ये उपस्थित रहायचे आणि कुठल्या प्रकारचे ग्राहक त्यांचे उत्पादन घेतात हे समजून घ्यायचे अशी त्यांची कार्यपद्धती आहे.

सुरुवातीपासून ‘रॉ प्रेसरी’ला मिळालेला प्रतिसाद पाहून अनुज खूष आहे आणि त्यांच्या उत्पादनामध्ये आणखी काही ज्यूस आणि क्लीन्जेसचा समावेश करण्याची त्याची योजना आहे. भविष्यात लहान मुलांसाठी आरोग्यदायी आणि चविष्ट असलेली स्मूथीसारखी काही उत्पादने तयार करण्याचाही त्याचा विचार आहे. सुप आणि डिप्ससारखे हेल्दी रॉ फूड तयार करण्याबाबतही त्याचा विचार सुरु आहे.

“तीन दिवस टिकणारे उत्पादन घेऊन आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसं पोहचू शकतो यावर आमचे काम सुरु आहे. जसे आम्ही कोल्ड-प्रेस ज्यूस कंपनी म्हणून सर्वात पहिले आहोत, त्याचप्रमाणे आम्हाला असे ज्यूस ४० -४५ दिवस टिकविणारी पहिली कंपनी बनायचं आहे. ते ध्येय आहे. पौष्टीक मूल्य जपत आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह्ज न मिसळता ज्यूस इतके दिवस टिकविण्यासाठी आम्हाला नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मिळवायचं आहे. त्यानंतर आम्ही इतर शहरातही आमचा कार्यविस्तार करु शकतो आणि लवकर मोठे होऊ शकतो,” असं अनुज सांगतो.

‘रॉ प्रेसरी’ आणखी निधी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळी निधी उभा करण्यासाठी काही वेगळे डावपेच आखल्याचे अनुज सांगतो. “आम्ही डिस्ट्रीब्यूशन, मार्केटिंग आणि प्रोडक्शनसाठी कुणाबरोबर तरी हातमिळवणी करु इच्छितो. त्याकरिता आम्हाला या क्षेत्रातला अनुभव असणारे लोक पाहिजे आहेत,” असं अनुज सांगतो.

लेखक : प्रिती चामिकुट्टी

अनुवाद : अनुज्ञा निकम