तुरुंगात अभ्यास करुन देशात अव्वल आलेला ‘अजित’

0

वाराणसीच्या एका विद्यार्थ्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पर्यटन व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमात संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने ६८१ गुण मिळवले आहेत. ऑगस्टमध्ये वाराणसीच्या काशी हिंदू विद्यापीठात झालेल्या २८ व्या पदवीदान समारंभात या विद्यार्थ्याला सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आलं. या विद्यार्थ्याचं नाव आहे अजितकुमार सरोज आणि धक्कादायक बाब म्हणजे अजित हे सध्या वाराणसी मध्यवर्ती तुरूंगात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी १० वर्षांची शिक्षा भोगत आहेत.२३ वर्षांचे असलेले अजित मूळचे उत्तरप्रदेशातील चक्के या गावात राहणारे आहेत. तुरुंगातूनच पत्राद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करुन अत्यंत कष्टाने त्यांनी ही पदविका मिळवली आहे.


२०१० मध्ये अजितकुमार यांच्या कुटुंबाचं त्यांच्या शेजाऱ्यांशी भांडण झालं आणि याच वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या गुन्ह्याखाली अजित यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. शिक्षा झाली तेव्हा अजित हे बीएस्सीच्या पहिल्या वर्षाला होते. पण तुरुंगात गेल्यानंतरही त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं. पर्यटनविषयक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यापूर्वीच अजित यांनी एचआयव्ही आणि आहार व पोषण विषयात पदविका मिळवली होती. त्याचबरोबर अजित यांनी आपत्ती व्यवस्थापन, मानवाधिकार, एनजीओ व्यवस्थापन यासारख्या विषयातही प्रमाणपत्र अभ्यासक्रम ६५ टक्के गुण मिळवून पूर्ण केले आहेत.


अजित यांना सुवर्णपदकानं सन्मानित करण्यात आलं तेव्हा त्यांनी या यशासाठी तुरुंग प्रशासनाचेही आभार मानले कारण तुरुंगात आल्यानंतर हिंमत न हरता त्यांनी प्रशासनाच्या मदतीनं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका मिळवली.


इग्नू विद्यापीठाच्या वाराणसी शाखेअंतर्गत २० जिल्हे येतात आणि यात ६ हजाराहून जास्त विद्यार्थी शिकतात. एवढ्या विद्यार्थ्यांपैकी सुवर्णपदक मिळवणारे अजित हे पहिले विद्यार्थी ठरले आहेत. वाराणसी तुरुंगातून याआधीही काही कैद्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे पण अव्वल येण्याचा विक्रम करणारे अजित हे एकमेव कैदी आहेत असं तुरुंग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अजित यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. हत्या केल्याचा कलंक तर मिटवता येणार नाही पण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा आहे. पर्यटनाबाबत एक मास्टरप्लॅन तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर न्यायालयं आणि सरकार कैद्यांना कशाप्रकारे मदत करु शकतात यावर पुस्तक लिहिण्याची त्यांची इच्छा आहे. अजित हे तुरुंगात दररोज सहा तास अभ्यास करतात. तसंच इतर कैद्यांनाही शिक्षित केलं तर तेही गुन्हेगारीच्या मार्गावर जाणार नाहीत असं अजित यांचं मत आहे.

अजितचे वडील रामबचन यांना मुलाच्या तुरुंगात असण्याचं दु:ख आहे. पण कुटुंबाच्या नावावर लागलेला कलंक पुसून मोठं काहीतरी करुन दाखवेन असं वचन अजितने वडिलांना तुरुंगात जाताना दिलं होतं, ते वचन मुलानं पूर्ण केल्याचा त्यांना आनंद आहे.


गुन्ह्याच्या मार्गावर पाऊल पडलं असलं तरी जर एखाद्यानं निर्धार केला तर त्याला चांगला नागरिक बनता येतं हेच अजितकुमार यांनी आपल्या यशातून सिद्ध करुन दाखवलं आहे.

लेखक - निशांत गोयल

अनुवाद - सचिन जोशी