वीटभट्टीवर मजुरी करून ‘मिस्टर दिल्ली’ चा पुरस्कार पटकावणा-या ‘विजय’ यांच्या संघर्षाची यशोगाथा  

0

यशाचा कोणताही शॉर्ट कट नसतो व कोणताही यशाचा डोंगर हा रातोरात उभारला जात नाही. प्रत्येक यशाच्या मागे एक संघर्षाची व न संपणारी कहाणी असते जिला पार करून एक यशस्वी माणूस त्या स्थानावर पोहोचतो आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मनुष्य सगळ्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक, निष्ठावान असतो. याप्रकारे नित्य समर्पण, ध्येय व कठीण परिश्रमानंतर मिळणारे यश हे दीर्घकाळ टिकणारे  असते व अश्या सगळ्या लोकांसाठीही हे एक प्रेरणा स्त्रोत्त आहे जे समान ध्येयाच्या दिशेने प्रयत्नशील आहेत. अश्याच यशाचे एक प्रेरक आहेत दिल्लीचे बॉडी बिल्डर (शरीरसौष्ठवपटू) विजयकुमार, ज्यांना १० एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या ‘मिस्टर दिल्ली’ साठी गोल्ड मेडलने सन्मानित केले आहे. विजयकुमार यांचे हे यश ११ एप्रिलला वर्तमानपत्रात व दूरदर्शन वाहिन्यांवर ठळक अक्षरात प्रसिद्ध झाले. बघता बघता विजयकुमार दिल्ली व एनसीआर च्या इतर बॉडीबिल्डर साठी एक आदर्श बनले जे आयुष्यात ‘मिस्टर दिल्ली’ व यासारखे अन्य पुरस्कार मिळवू इच्छिता. पण यशाच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांचा प्रवास अतिशय खडतर व संघर्षमय होता आणि काट्यांवर चालणाऱ्या त्यांच्या रक्तबंबाळ पायांना क्वचितच कुणी बघितले असेल. या स्थानावर पोहोचण्यासाठी त्यांनी वीटभट्टीवर मजुरी करणे, दुध विकण्यापासून दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी मध्ये चहाची हातगाडी लावण्याचे काम केले आहे. दिवस-रात्र मेहनत करून आपले ध्येय निश्चित केले पण त्यानंतर सुद्धा त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. आपला भूतकाळ न विसरता आपल्या सारख्याच इतर तरुणांना बॉडी बिल्डर बनण्यासाठी काही सूचना करीत आहेत. काय आहे त्यांची ‘मिस्टर दिल्ली’ बनण्याची वास्तविकता व भविष्यातील योजना? विजय यांनी आपले अनुभव युअर स्टोरीला सांगितले ......

बालमजुरी ते दुध विक्रेता –

एका गरीबाच्या डोक्यावरून पितृछात्र हरवणे काय असते हे विजयकुमार यांच्यापेक्षा चांगले कुणी सांगू शकत नाही. जेव्हा विजयकुमार फक्त १० वर्षाचे होते तेव्हाच त्यांच्या रोजंदारी करणाऱ्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आपल्या पाच भावाबहिणींमध्ये वयाने मोठे असलेल्या विजयकुमार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर विजय यांनी कधीच वळून आपले बालपण बघितले नाही की किशोरावस्था बघितली नाही. अचानकच ते मोठे झाले. विजय सांगतात की, ‘घरखर्च चालवण्यासाठी आईने वडिलांच्या मजुरीवर मला वीटभट्टीवर  कामाला पाठवले. तेथे दिवसभराच्या कामाचे १०-१५ रुपये मिळायचे जी कमाई मी आईच्या हातात ठेवायचो. हा परिपाठ बरेच वर्ष चालू होता. काही काळाने मजुरी करून जमवलेल्या रकमेतून एक म्हैस विकत घेतली व त्यानंतर मजुरीचे काम सोडून आपल्या म्हशीचे व इतर शेतकऱ्यांकडून दुध विकत घेऊन शहरात जाऊन विकण्याचे काम करू लागलो.’

आयुष्यात आलेल्या या चढउताराच्या व्यतिरिक्त विजय याचं एक स्वप्न होतं. ते गावाच्या आखाड्यात पहिलवानांना शक्ती प्रदर्शन करून कुस्त्या खेळतांना बघायचे. पहिलवानांच्या पिळदार शरीराची त्यांना नेहमीच भुरळ पडायची. त्यांच्या प्रमाणे आखाड्यात भिडण्याची त्यांची इच्छा होती पण परिस्थितीने लाचार असलेल्या विजय यांनी आपली मनातील इच्छा वर्षानुवर्ष मनातच दाबून ठेवली परंतु आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवले.

दिल्लीत मिळाला मार्ग—

जवळजवळ ५-६ वर्ष उत्तरप्रदेश मेरठच्या केहावी गावात संघर्ष करणारे विजय १५ वर्षापूर्वी कामाच्या शोधात मेरठमधून दिल्लीला आले. इथे त्यांनी डिफेन्स कॉलनी मध्ये चहाची एक हातगाडी सुरु कली. या नव्या व्यवसायाला सांभाळून अनेक वर्षांपासून मनात दाबून ठेवलेल्या आपल्या सुप्त इच्छेचा विचार केला व त्यावर अंमल सुरु केला. बॉडी बिल्डींग (शरीर सौष्ठव) साठी त्यांचे नवीन ठिकाण बनले लाजपत नगर मध्ये अशोकभाई यांचे जिम. विजय सांगतात की, येथील जिमचे मालक सुभाष भडाना यांनी माझी बॉडी बिल्डींग साठीची योग्यता ओळखून त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. सुभाष भडाना सर माझे गुरु व प्रशिक्षक आहेत. वास्तवात भडाना सर हे स्वतः बॉडी बिल्डींग चॅम्पियन असून ते तरुणांना बॉडी बिल्डींगसाठी प्रोस्ताहित करतात..

त्यांनी या जिममध्ये आपल्या शरीरावर खूप मेहनत घेतली. ते दिवसभर काम व रात्री आपल्या शरीरावर मेहनत घ्यायचे. एका बॉडी बिल्डरच्या गरजेनुसार त्यांना कधीच पौष्टिक आहार व खुराक मिळाला नाही. याशिवाय ते तासंतास घाम गाळत आपल्या शरीराला आकार देत होते. यासाठी त्यांना सुभाष सरांनी भरपूर सहयोग दिला. विजय आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरुंना देतात.

जेव्हा युपी सोडले तेव्हा बनले ‘ मिस्टर दिल्ली’ –

विजय यांची वर्षाची मेहनत सफल झाली जेव्हा १० एप्रिल २०१६ मध्ये दिल्लीत वर्ल्ड बॉडी बिल्डींग फेडरेशन व दिल्ली बॉडी बिल्डींग फेडरेशन द्वारा आयोजित स्पर्धेत दिल्लीसहित अनेक राज्यांतून आलेल्या बॉडी बिल्डरांना मागे टाकत त्यांनी गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. या यशानेच त्यांना ‘मिस्टर दिल्ली’ च्या पुरस्काराने सन्मानित केले गेले. परंतु विजय यांच्यासाठी हे काही पहिलेच यश नव्हते तर त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. ते दिल्लीच्या ‘मिस्टर वायएमसी’ पुरस्काराने सुद्धा सन्मानित आहेत. सन. २०११ मध्ये ‘मिस्टर कोलकत्ता’ स्पर्धेत ते ५ व्या स्थानावर होते. त्यांनी ‘मिस्टर एशिया’ स्पर्धेत पण भाग घेतला होता पण तिथे त्यांना कुठलेही पदक मिळाले नाही. याचे कारण ते आर्थिक परिस्थिती सांगतात कारण एखाद्या बॉडी बिल्डरला ज्या साधनांची गरज असते ती त्यांना उपलब्ध होऊ शकली नाहीत. आता विजय यांचे पुढचे ध्येय ‘मिस्टर इंडिया’, मिस्टर एशिया’ व मिस्टर युनिव्हर्स’ आहे. ते देशासाठी पुढच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिंकू इच्छित आहेत. सध्या मेरठ जिल्ह्यातील त्यांच्या गावात उत्साहाचे वातावरण आहे. बॉडी बिल्डींगचे आकर्षण असलेल्या मेरठच्या सगळ्या लोकांसाठी विजयकुमार कोणत्याही प्रेरणेपेक्षा कमी नाहीत.

गावात जिम उघडून मातीचे ऋण फेडण्याची इच्छा ---

दिल्ली जवळील नोएडा मध्ये सेक्टर ९३ मध्ये आज ‘हेल्थ क्लब’ नावाचे विजय यांचे स्वतःचे एक जिम आहे. इथे ते लोकांना सामान्य फिटनेस पासून बॉडी बिल्डींगचे प्रशिक्षण देतात. ही जिम कधी ते त्यांच्या  मित्रांकडून घेतलेल्या उधारीवर चालवत होते पण आज त्यांची प्रगती चांगली आहे. सुविधांचा अभाव तरी अनेक जणांना  ते मोफत प्रशिक्षण देतात. विजय सध्या विपिन त्यागी, कुलदीप त्यागी, अमित पाल, कंचनलोहिया, सुरजित चौधरी व प्रशांत चौधरी यांच्या बरोबर ६ लोकांना मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी प्रशिक्षण देत आहेत. विजय सांगतात की, ‘माझे एक स्वप्न आहे की माझ्या जन्मगावी ज्यांच्याकडे पैशाचा अभाव आहे पण गुणवत्ता असलेल्या अश्या गुणी मुलांना प्रशिक्षण देऊन पुढे जाण्यासाठी प्रोस्ताहित करू इच्छितो. मी त्यांच्यासाठी गावात एक जिम उघडणार आहे. गावाच्या मातीचे खूप उपकार आहेत ते ऋण मला फेडायचे आहे.

शेवटी आयुष्यातील कठीण प्रसंगी गावातच त्यांना जगण्याची उमेद व आधार मिळाला. त्यांची आई त्याच गावात राहते व आजपण त्यांच्या घरी एक म्हैस आहे. विजय यांना एका गोष्टीचे खूप दुखः आहे की आयुष्यातील या धावपळीच्या जीवनात त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले.’

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

गुंगा पहलवान: मूक साक्षीदार, सरकारी अनास्थेचा !

बॉक्सिंग चँपियनचा टेंपो ड्रायव्हर होतो तेव्हा...

कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणा-या अरूणिमा यांच्या इच्छाशक्तीला सलाम

लेखक – हुसेन तबीश
अनुवाद – किरण ठाकरे