नो टेन्शन ‘तुरंत डिलीवरी’, कधीही-कुठेही

0

समजा तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात आलात. नोकरी किंवा मग व्यवसायासाठी. तुमचं पहिलं काम असतं या आपल्या स्वप्नाच्या शहरात एक घर शोधणं. तुम्हाला हवं तसं घर शोधण्यात अनेक दिवस जातात. नवीन शहर, राहण्याची जागा नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणापासून जवळ आहे का? तिथं पोचण्यासाठी किती आणि कसा प्रवास करावा लागतो. याचा सारासार विचार करुनच मग राहण्याची जागा पक्की केली जाते. ती पक्की होईस्तव दमछाक होऊन जाते. अगदी थकून जायला होतं. पण खरं तर यानंतर सर्वात थकवणारी गोष्ट तुमची वाट पाहत असते. ती म्हणजे जुन्या घरातलं सामान या नव्या घरात हलवणं. घर शोधण्याइतकंच हे जास्त डोकेफोडीचं काम असतं. म्हणजे एकतर आपल्या या नवीन शहरात तो हे सर्व सामान नेणारा मुवर्स असावा. बरं त्यानं काळजीपूर्वक हे 'शिफ्टींग' करावं. म्हणजे सामानाची कुठलीही मोडतोड न करता आणि ती ही अगदी फटाफट.. एकदम 'तुरंत'. याच सर्वांवर एक उपाय शोधून काढलाय मॅनेजमेन्ट केलेल्या तीन मित्रांनी. ते ही या क्षेत्रातला काहीही पुर्व अनुभव नसताना. कॉलेजच्या शेवट्या वर्षात असताना स्वतःचा व्यवसाय करायचा हे पक्क होतं. पण नक्की काय हे उमजत नव्हतं. म्हणून सिध्दार्थ अरोरा, अंकूर मुजूमदार आणि सतीश गुप्ता या तीनही मित्रांनी वेगवेगळ्या कंपनीत जवळपास पाच वर्षे काम केल्यावर ते पुन्हा एकत्र आले. यावेळी नवीन व्यवसायाचं क्षेत्र पक्क झालं होतं. लॉजिस्टिक एन्ड सप्लाय. पाच वर्षात इतर ठिकाणी काम करताना या क्षेत्रातल्या बारकाव्यांचा तिघांनी अभ्यास केला. यासाठी नक्की काय-काय हवं. त्याची नक्की गरज काय आहे याचा पुरेपुर अभ्यास झाल्यावर आणि आपण हे करु शकू हे मनोमन पटल्यावरच 'तुरंत डिलीवरी' या कंपनीची स्थापना झाली.

‘तुरंत डिलीवरी’ हे नाव ही कल्पकतेनं ठेवण्यात आलं होतं. तुरंत या नावात आपुलकी आहे. त्यात लागलीच आपलं काम होण्याची भावना आहे. नावामुळं ग्राहक नक्कीच आकर्षित होतायत, असं सिध्दार्थ अरोरा सांगतो. एप्रिल २०१५ मध्ये कंपनीची स्थापना झाल्यावर जुलै महिन्यापासून रितसर कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला मुंबई आणि दिल्लीत ऑफिस सुरु करण्यात आलेत. तुरंत डिलीवरीचं २४ तास चालणारं कॉल सेन्टर आहे. इथं दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरातल्या डिलीवरीचं बुकींग घेतलं जातं. जर ग्राहकाला पॅकींगची सुविधा हवी असेल तर ती ही दिली जाते. मग ती डिलीवरी लवकरात लवकर कशी होईल याची काळजी घेतली जाते. ती झाल्यावरच वेन्डरला कामाचे पैसे दिले जातात.

भारतातली लॉजिस्टीक एन्ड सप्लाई इंडस्ट्री अब्जावधीच्या घरात आहे. ई-कॉमर्स मार्केटमुळं या क्षेत्रात प्रचंड वाढ होत आहे. यात आधीपासून काम करणा-या अनेक प्रथितयश कंपन्या पाय रोवून आहेत. अशावेळी तुरंत डिलीवरीचा मार्ग सोपा नाहीए. पण तो कठीणही नाही असं अंकूर गुप्ता सांगतो. बाजारातली स्पर्धा पाहता कंपनीनं बी2बी आणि बी2सी लॉजिस्टक पुरवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलंय. यासाठी एलसीवी, व्हॅन, मिनी ट्रक सारख्या वाहनांचा वापर केला जातोय. याद्वारे मोठे उद्योजक, छोटे व्यावसायिक, आणि सर्व सामान्य ग्राहकांना ऑन डिमांड सेवा दिली जाते. शिवाय कंपन्यांबरोबर रितसर करार करुन सेवा पुरवली जातेय.

कसं काम करते 'तुरंत डिलीवरी'

तुरंत डिलीवरी प्रामुख्यानं चार प्रकारची कामं करते.

रिलोकेशन म्हणजे सामान एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेणं.

दुसरं ग्राहक सेवा म्हणजे कुठलंही सामान त्या ग्राहकाच्या सोयीनुसार हव्या त्या जागी हव्या त्यावेळी पोचवणं

तिसरं गोदामतल्या सामानांची ने-आण करणं.

चौथं म्हणजे नाजूक अश्या फ्रिज, टिव्ही, मायक्रोव्हेव सारख्या सामानाची डिलीवरी करणे.

सर्व प्रकारच्या ग्राहकांकडून समान आकारणी केली जाते. ज्याला फिक्स पॉईंट टू पॉईंट प्रायजिंग म्हटलं जातं

शिवाय कंपनी निर्देशित झोनमध्ये डिलीवरी देते. डिलावरी झाल्यावर ग्राहकाला एसएमएसद्वारे कळवण्यात येतं. त्यामुळं इतर स्पर्धकांच्या तुलनेत १५ टक्के कमी किमतीत सेवा देणं शक्य होत असल्याचं सतीश गुप्ता यांचं म्हणणं आहे.

सध्या मुंबई आणि दिल्ली शहरात असणा-या तुरंत डिलीवरीचा विस्तार होणारेय. लवकरच म्हणजे जानेवारी महिन्यात बेंगळूर इथं त्यानंतर अहमदाबाद आणि जयपूर इथं कंपनी आपला विस्तार करणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार कंपनीची उलाढाल दहा कोटींची असेल आणि येत्या काही वर्षात ती अब्जांच्या घरात जाईल असा विश्वास सिध्दार्थ अरोरा यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

Stories by Narendra Bandabe