गर्भारपणातच नव्या उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या श्रद्धा सुद

गर्भारपणातच नव्या उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या श्रद्धा सुद

Tuesday April 05, 2016,

5 min Read


बहुतांश महिला मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी या काळात विश्रांती घेणे पसंत करतात. श्रध्दा सुद यांनी मात्र त्याच काळात 'ममाकोचर' सुरू करून उद्योग विश्वात पहिले पाऊल टाकले. आईपण आणि उद्योग क्षेत्र दोन्ही त्यांच्यासाठी नवीनच होते.एका सानुलीची आई आणि उद्योजिका अशा दोन्ही नव्या जबाबदार्‍या त्यांनी एकाच वेळी पेलल्या. मातृत्वाच्या गर्भारपणाच्या काळात घालता येतील असे उच्च दर्जाच्या फॅशनेबल कपड्यांची ममाकोचर कंपनी आहे.

गर्भारपणात जो अनुभव स्वतःला आला तो इतर स्त्रियांना येऊ नये हा ही कंपनी तातडीने सुरू करण्यामागचा हेतू होता. मातृत्वाची भावना तर खूप सुंदर असते पण बेढब कपड्यात सुंदर तर दिसता येत नाही. "माझ्या आठ महिन्यांच्या गर्भारपणाच्या काळात आॅफिसला घालण्यासाठी योग्य कपडे मी खूप शोधले. पण माझी घोर निराशा झाली. माझ्या स्टाइलला किंवा आजच्या स्त्रियांच्या जीवनशैलीनुसार कपडे मला मिळालेच नाहीत. आजच्या स्त्रियांना नीटनेटके, आकर्षक दिसायचे असते."

image


मग पूर्वाश्रमीच्या वकील असलेल्या श्रद्धा यांनी आपले क्षेत्र बदलायचे ठरवले आणि काळाची गरज ओळखून बदल घडवायचे ठरवले. "गर्भारपणाकडे पाहण्याचा बदलेला दृष्टिकोन ओळखण्याची गरज आहे. कोणाला आपले गर्भारपण लपवावे लागू नये किंवा शरीराच्या बदलेल्या आकाराची लाज वाटता कामा नये. तसेच तुम्ही कसेतरी गबाळे दिसता कामा नये. पूर्वीप्रमाणेच आपल्याला आत्मविश्वास वाटला पाहिजे, आपण सुंदर दिसले पाहिजे ." गर्भारपणात आपल्या बदलणाऱ्या त्वचेबद्दल लाज वाटत असल्यामुळे, कसेतरी वाटत असल्यामुळे गरोदरपणात नोकरी सोडणाऱ्या महिला त्यांना माहीत आहेत. "गरोदर असताना मी जेव्हा खरेदीला जायचे तेव्हा जे कपडे आढळायचे ते इतके विचित्र बसणारे असत, अत्यंत कौशल्यहिन आणि कुठलाही विचार न करता ते तयार केलेले असत. खरे तर गर्भारपण हा सगळ्यात आनंदाचा, मौजमजेचा काळ. या दिवसात तुम्हाला काळजी बरोबरच कौतुकाची, लाडाची गरज असते. पण मी मात्र माझा बराचसा वेळ परदेशातून योग्य कपडे मागवण्यात च घालवला. शिवाय यात माझे प्रयत्न, वेळ आणि पैसे वायाच गेले असे म्हण्टले तर वावगे ठरू नये. "

नवा उपक्रम

श्रद्धाने बाजाराचा थोडा अभ्यास करायचा ठरवले. या अभ्यासातून त्यांना जे आढळले ते अत्यंत आश्चर्यकारक होते. देशात प्रत्येक मिनिटाला ५१ जन्म होतात. त्यापैकी २० टक्के स्त्रिया जरी टायर एक आणि दोन शहरातल्या आहेत असे गृहीत धरले तरी जवळपास २५०० हजार कोटी रुपयांची बाजारपेठ असल्याचे आणि ती अजूनही बरीचशी दुर्लक्षित असल्याचे त्यांना आढळले. आपला ब्रॅण्ड सुरु करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे श्रद्धाने ठरवले. तेव्हा त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या पण ही गोष्ट त्यांच्यासाठी अडसर ठरणार नव्हती . "हा निर्णय नक्कीच मोठा आणि कठीण होता. ही संकल्पना माझ्या मनात इतकी घट्ट रुजली होती की ती जगासमोर मांडणे, सादर करणे यात तथ्य आहे असे वाटत होते."

image


बऱ्याच जणांनी त्यांच्या हेतूबद्दल नाही पण त्या ज्या काळात ब्रॅण्ड सुरु करत होत्या त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. श्रद्धा सांगतात की त्या वेळी ती संकल्पना त्यांच्या डोक्यात इतकी ठाण मांडून बसली होती की तेव्हा ती ऊर्जा वापरली गेली नसती तिचे रूपांतर सकारात्मक कार्यात झाले नसते तर तो गुन्हा ठरला असता.

"नाही मी थांबू शकत नाही' असे मी प्रत्येकाला ठामपणे, काहीसे हटवादीपणानेच सांगायचे. यानंतर कधीच योग्य क्षण येणार नाही. या आधीही उद्योजकतेची संकल्पना माझ्या मनात खेळत असे. पण उद्योग सुरू करण्यासाठी मनाची तयारी आणि ऊर्जेची योग्य पातळी यांचा संयोग होणे आवश्यक असते. मला जेव्हा तो अनुभव आला तेव्हा मला ती संधी सोडायची नव्हती. बहुतांश जण अनेक कारणे देत संधी प्रयत्न सोडून देतात. खरे म्हणजे एखादी गोष्ट न करण्यामागे अनेक कारणे देता येतात पण एखादी गोष्ट का करायची आहे या कारणांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. "

जुळ्यांचे आव्हान

एका गरोदर उद्योजिकेला कुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागले असेल याची कल्पना आपण करू शकतो. पण श्रद्धाच्या उत्साहापुढे ही आव्हाने थिटी होती. गरोदर स्त्रियांचे सर्वेक्षण, डिझाइनर शोधणे अशी अनेक कामे त्या उत्साहाने करत होत्या. एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतली नाही. पण खरे आव्हान तेव्हा उभे राहिले जेव्हा त्यांच्या मुलीचा जन्म झाला. "तिचा जन्म झाला तेव्हा जुळ्यांना सांभाळण्यासारखे होते. उद्योगाची संकल्पना आणि गर्भ दोघांचीही धारणा माझ्यात एकाच वेळी झाली होती. टाइम मॅनेजमेंटमधली ती बुद्धी पणाला लावणारी केस स्टडी होती. तुम्ही काहीही करा वेळ अपुराच पडतो. "

"एकटीने हे सर्व करायचे म्हणजे दैवी शक्तीच पाहिजे, पण अशा परिस्थितीत कुटुंबासारखी ताकद नाही. त्याचे योग्य श्रेय मी त्यांना दिलेच पाहिजे. त्या परिस्थितीत प्रत्येक जण पुढे आला. त्यांनी घराचा आणि बाळाचा ताबा सांभाळला. माझ्या वेळेनुसार त्यांनी त्यांचे कार्यक्रम आखून घेतले. त्यांच्या मदत आणि पाठिंब्याशिवाय मी काही करू शकले नसते. " एक स्त्री म्हणून विचार करताना त्यांना असे वाटते की स्त्रिया पुरेशी मदत मागत नाहीत आणि स्वतःवरती खूप काही ओढवून घेतात. आपण मदत घेतली पाहिजे. बाळाला जन्म देणे, सांभाळणे हे एक दिव्य आहे, मोठी परीक्षाच आहे. त्यामुळे तुमची कारकीर्द जेव्हा ऐन बहरात असते तेव्हा तुमच्या जवळच्या आणि लाडक्या व्यक्तींना पुढाकार घ्यायला सांगण्यास कोणतीही आडकाठी बाळगता कामा नये. श्रद्धाने सुरू केलेला उद्योग तीन महिन्यातच चांगला भरभराटीला आला. सर्व महत्वाच्या पोर्टल्सवर अॅमॅझॉन, फ्लिपकार्ट, जॅबॉंग, लाइमरोड आणि फर्स्ट सिटी इथे ममाकोचरने 30 ते ६० टक्के क्षेत्र व्यापले आहे."लोकांमध्ये याबाबत खूपच औत्स्युक्य आहे. वस्त्राप्रवारणाचा संपूर्ण विभाग म्हणून लोक त्याकडे बघत आहेत, लक्ष देत आहेत ." श्रद्धा सांगतात.

अपेक्षा -

अगदी थोड्या कालावधीत कंपनीने महिन्याला एक लाख रुपयांहून अधिक उलाढाल पहिली. यात उद्योगविश्वाचीही महत्त्वाची भूमिका आहे. "उद्योगजगत सर्वांचेच, महिलांचेही स्वागत करते. सर्व प्रकारे ते तुम्हाला सुसज्ज करते. तुमच्या क्षमतांना ते कमी लेखत नाहीत आणि तुम्हाला बरोबरीने वागवतात. " श्रद्धा यांची दोन्ही बालके आरोग्यसंपन्न, निरोगी, सुदृढ आहेत. त्यांना जे साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले का या प्रश्नावर त्या स्मितहास्य करून उत्तर देतात "ही चिमुकली पावले" आहेत. 

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आई झाल्यावर घेतला स्वतःतील उद्योजिकेची शोध, अशिनी यांच्या स्टार्टअपच्या जन्माची कहाणी !

मुलांसाठी शिक्षण आणि मनोरंजन यांचा मेळा - चंद्रिका बहल यांचं क्रॅकरजॅक कार्निव्हल

‘एजे प्लॅकल एज्युवेंचर्स’ – एक आगळावेगळा प्रयोग नवजात बालकांच्या शिक्षण आणि विकासासाठी...


लेखिका : बिन्जल शहा

अनुवाद : सोनाली कुलकर्णी-काकडे