आडवळणाच्या गावचे वळणदार निर्माते राजेंद्र विनोद!

0

चिन्नागोटीगल्लू… हे एका गावाचे नाव आहे. ऐकलेय कधी? आंध्र प्रदेशातील एका आडवळणाच्या आणि लगतच्या गावांव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही नाव नसलेल्या या गावाचे जर काही वैशिष्ट्य असेल तर ते हे की चिन्नागोटीगल्लू हे चित्रपट उद्योगातील ख्यातनाम निर्माते राजेंद्र विनोद यांचे जन्मगाव आहे. लगतच्या हिंदुपूर शहरात राजेंद्र विनोद यांचे शिक्षण वगैरे झाले. राजेंद्र विनोद अवघे २४ वर्षांचे आहेत. ते ज्या भागातून आलेले आहेत, तिथे चित्रपट निर्मिती ही काय भानगड आहे, हे देखिल लोकांना कळत नाही.

प्रत्येकाच्याच अपेक्षा राजेंद्र विनोद यांच्यासंदर्भात आता उंचावलेल्या आहेत आणि हीच बाब आपण आयुष्यात खुप काही मिळवलेले आहे, याचेच द्योतक असल्याचे राजेंद्र विनोद यांना वाटते.

रेल्वे कर्मचारी राजेंद्र नायडू आणि गृहकृत्यदक्ष वाणी यांचे विनोद हे शेंडेफळ. विनोद हे टोकाचे मातृ-पितृभक्त. विनोद यांच्या बहिणीचे लग्न ती १३ वर्षांची असतानाच उरकले. लाडकी बहीण सासरी गेल्यानंतर विनोद यांना एकटे-एकटे वाटू लागले. बहिणीच्या आठवणींतून बाहेर पडावे, एकटेपणा घालवावा म्हणून तो कल्पनाविश्वात रमू लागले. हे विश्वही त्यांना भावले.

गतकाळावर नजर टाकताना विनोद म्हणतात, ‘‘काल्पनिक पात्रे जणू माझ्या आयुष्याचा भाग बनलेली होती. तेव्हा मी अकरा वर्षांचाच होतो. आणि माझ्या लक्षात आले, की अरे आपण स्वत:ही आता कल्पनाविश्वाचाच एक भाग बनलेलो आहोत. बालपणातली ती कल्पनाशक्तीच चित्रपट उद्योगात माझ्यासाठी संजीवनी सिद्ध होते आहे.’’

मानसशास्त्र आणि जनसंज्ञापन या विषयांची, क्षेत्रांची राजेंद्र विनोद यांना आवड होतीच. ती देखिल या क्षेत्रात उपयोगाला आली. अभियांत्रिकीतील पदवी प्राप्त केल्यानंतर पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले, हे आणखी विशेष!

छोट्या शहरातील मोठे स्वप्न

विनोद म्हणतात, ‘‘एखादी व्यक्ती केवळ छोट्या शहरात जन्मलेली आहे म्हणून तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्यापर्यंतच जास्तीत जास्त मजल मारावी काय? किंवा मग त्याच गावातील छोट्यामोठ्या कंपनीत एखादी छोटीशी नोकरीच त्याने करावी काय? म्हणजे यातली पहिली गोष्ट तरी चालेल, पण दुसरी तर अजिबातच वाईट. छोट्या गावातल्या लोकांनी मजलही जरा छोटीच मारावी, हा लोकांचा समजच मला हाणून पाडायचा होता. स्वप्नवत यश मिळवायचे होते आणि त्यासाठीच्या प्रवासातला पहिला टप्पा म्हणून मी बंगळुरू गाठले.’’

२०१२ या वर्षात विनोद यांनी बंगळुरूतील विख्यात ‘विजटून्ज कॉलेज ऑफ मिडिया अँड डिझाईन’मध्ये प्रवेश घेतला. मल्टिमिडिया क्षेत्रातला एक विशेष कोर्स त्यांनी निवडलेला होता. लघुपटांच्या निर्मितीचे ज्ञान आणि काही प्रमाणात संधी उपलब्ध करून देणारा हा कोर्स होता.

विनोद सांगतात, ‘‘हेच तर मला हवे होते. हिंदुपूर येथील बिट प्रौद्योगिकी संस्थेतून बी.टेक. करत असताना व केल्यानंतरही चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपण काही तरी करून दाखवू म्हणून मनाची तयारी मी केलेलीच होती.’’ बालपणापासूनच कल्पना आणि कथानकांतून जगत आलेले विनोद आपल्या लघुपटांच्या माध्यमातूनही कितीतरी भावनावीष्कार कॅमेऱ्यातून चित्रित करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असतात.

विनोद यांनी त्यांच्या स्वत:च्या ‘आर्वी फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून १० लघुपट, जाहिरातपट आणि वृत्तपटांचे यशस्वी दिग्दर्शन केलेले आहे. पैकी एका कलाकृतीचे ते स्वत:च निर्मातेही आहेत.

तेलगू, तमीळ आणि मराठीसह अन्य भारतीय भाषांतून तसेच इंग्रजी आणि फ्रेंचसह अन्य विदेशी भषांतूनही ते चित्रपट तयार करतात. त्यांनी तयार केलेला ‘लेपक्षी’ हा वृत्तपट तेलगू, तमीळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, गुजराती आणि आसामीसह अकरा भाषांतून डब केला गेला, हे विशेष! त्यांचा इंग्रजी चित्रपट ‘चेंज’ हा पटकथेबद्दल ऑस्कर पुरस्कारासाठीही नामांकित झाला.

लघुपटांच्या माध्यमातून काही पुरस्कार पटकावल्यानंतर विनोद यांच्या निर्मितीक्षमतेला मान्यता मिळायला सुरवात झाली. नोव्हेंबर २०१४ मध्ये दिल्ली येथे आयोजिण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘आर्वी फिल्म्स’चा सर्वश्रेष्ठ प्रॉडक्शन हाऊस म्हणून सर्वसंमतीने गौरव करण्यात आला. एक लाख रुपये एवढ्या किरकोळ बजेटमध्ये आपल्या प्रत्येक लघुपटाची निर्मिती यशस्वीपणे करण्यात सातत्याने मिळवलेल्या यशाबद्दल ‘आर्वी फिल्म्स’ला ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’चे नामांकनही मिळालेले आहे. ‘लिम्का’त लवकरच ‘आर्वी’चे नाव समाविष्ट असलेले दिसेल.

विनोद म्हणतात, ‘‘माझे चित्रपट विविध विषयांवर आधारित असतात. ‘एस फॉर एस’ आणि ‘पॉयनाम’ भावाबहिणीच्या नात्यावर बेतलेला आहे, तर ‘फिअर’ हा एक भीतीदायक लघुपट आहे. ‘ओव्हर रिॲक्शन’ आणि ‘एक्झाम’ हे विनोदी लघुपट आहेत, तर ‘चेंज’ हा सामान्य युवकांच्या जगण्याच्या पारंपरिक पद्धतीचे दर्शन घडवणारा आहे. दुसरीकडे ‘आर्नी’ हा ‘महिला सशक्तीकरण’ या विषयाला वाहिलेला आहे. ‘लेपक्षी’ परंपरा या विषयाला वाहिलेला आहे.’’

दोन ते दहा मिनिटांपर्यंत कालावधीच्या या चित्रपटांसाठी विनोद आपला पैसा, प्रतिभा पणाला लावतात. चित्रपट साकारल्यानंतर विविध लघुपट महोत्सवांतून ते पाठवले जातात. नंतर हे लघुपट यूट्यूबवरही पाहिले जाऊ शकतात. अडीच-तीन तास चालणाऱ्या ‘फिचर फिल्म’पेक्षा राजेंद्र विनोद हे लघुपटातून अधिक उत्तमप्रकारे अभिव्यक्त होऊ शकतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे लघुपटांमध्ये साचेबद्धपणा राखणे गरजेचे नसते. लघुपटांमध्ये तुलनेत प्रयोगांना अधिक वाव असतो.

आमिर खान यांच्या ‘पीके’च्या धर्तीवर राजेंद्र विनोद यांना ‘विज्ञान आणि धर्म’ या विषयावर चित्रपट निर्मिती करायची आहे. विनोद सांगतात, ‘‘माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून अंधश्रद्धा, जादूटोणा याविरुद्ध लोकांचे प्रबोधन करण्याची माझी इच्छा आहे. स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही अंधश्रद्धा बळावलेल्याच स्थितीत आहेत. हे चित्र बदलायला हवे.’’

विनोद आई-वडिलांनाच प्रेरणास्थानी मानतात. आपले सर्वस्व मानतात. विनोद म्हणतात, ‘‘मला सर्वांत जास्त पाठबळ कुणाचे असेल तर ते आई-बाबांचेच. माझी स्वप्ने त्यांनी आपली मानली. स्वत:च्या इच्छा कधीही माझ्यावर लादल्या नाहीत. मी आज जे काही आहे, ते केवळ त्यांच्यामुळेच आहे. माझ्या यशाचा प्रत्येक क्षण त्यांच्या मालकीचा आहे. स्वतंत्रपणे विचार करण्याची सूट मला त्यांनी दिली. माझ्या वर्तुळाबाहेर जे काही आहे, ते सारे जाणून घेण्यासाठी वर्तुळाबाहेर पडण्यासाठीचे बळ त्यांनीच मला दिले. यामुळेच माझ्या कल्पनाशक्तीच्या पंखांमध्ये शक्ती संचारली आणि मी इथवर भरारी घेऊ शकलो. मित्रांकडूनही मला सहकार्य मिळाले. प्रोत्साहन मिळाले.’’

Related Stories