वीस निरक्षर आदिवासी महिलांच्या इच्छाशक्ती आणि मेहनतीने गावात आली विहीर! 

0

महिलांना दुर्बल समजणारे विचार त्यावेळी शरमले, जेव्हा एक चमत्कार झाला. “गावात पाणी तर इंद्र देवाच्या कृपेनेच येईल.” असा विचार ठेवणारा समाज त्यावेळी उभा राहून पाहत होता, जेव्हा खडकांच्या मधून पाण्याची धारा वाहू लागली आणि ज्यांना दुर्बल समजले जात होते, त्या हातात कु-हाड, टिकाव, फावडा घेऊन आनंदाने नाचत होत्या. हे या वीस महिलांची इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि काहीतरी करण्याची जिद्द होती, ज्यांनी पाण्याच्या समस्येने ग्रासलेल्या भागाला पाणी उपलब्ध करून दिले. ४०दिवसाच्या कठोर परिश्रमाने त्या महिलांनी विहीर खोदुन पाणी काढले, ज्याची पहिले थट्टा केली जात होती. विहिरीतून  पाणी आल्यानंतर पडीत जमिनीवर आज या महिला भाज्यांचे उत्पादन घेत आहेत.

मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्याच्या खालवा ब्लॉकचे लंगोटी गाव आदिवासी बहुसंख्या असलेले गाव आहे. एकोणीसशे लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याची खूप समस्या झाली. गावात दोन हातपंप होते, ते हळू हळू वाळले. पावसाचे दिवस तर संपले. पावसाळ्यानंतर एक महिना देखील गेला. मात्र, त्यानंतर महिलांच्या समस्या वाढू लागल्या. २०११नंतर पासूनच पाण्याची समस्या वाढली होती. आणि या समस्येचे सर्व ओझे गावातल्या महिलांवर आले. सकाळी उठून दोन ते अडीच किलोमीटर लांब अंतरावर पायी चालत चालत भांडी घेऊन दुस-या गावात पाणी घेण्यासाठी जावे लागत होते. तेथे जाऊन देखील वीज आणि शेती मालकाच्या मर्जीनेच पाणी मिळायचे. अनेकदा महिलांना खाली भांडे घेऊन पुन्हा यावे लागत होते. पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत होती. प्रत्येक महिला स्वतःच्या घरी पुरुषांना पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विनवण्या करत असत, मात्र, त्यावेळी त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. ही समस्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि महिलांना याचा नेहमी सामना करावा लागत होता. 

आता महिलांचा संयम तुटू लागला होता. घरातल्या चार भिंतींच्या आत निघणारा आवाज आता बाहेर येण्यास सुरुवात झाली. एक एक करून गावातल्या महिला एकत्र होण्यास सुरुवात झाली. घरातल्या पुरुषांकडे अनेक दिवसांपासून त्या विनवण्या करत होत्या. मात्र या भागात पाणी आणण्याची जबाबदारी महिलांची होती, म्हणून गावातल्या पुरुषांच्या प्रकृतीवर देखील कुठलाही परिणाम झाला नाही. महिलांना स्पष्ट सांगितले होते की, आतापर्यंत जसे त्यांनी पाणी आणले तसेच त्यांनी आणावे. आता वेळ होती, पंचायतकडे जाण्याची. महिलांनी पंचायतीत जाऊन  मागणी केली की, कपिलधारा योजनेमार्फत त्यांच्या गावात विहीर खोदली जावी. मात्र पंचायत देखील जसे चालले आहे, तसेच चालू देण्याच्या विचारात होती. महिलांना आश्वासन देऊन हात वर करण्यात आले. मात्र महिलांनी आपली जिद्द सोडली नाही. एक दिवस, दोन दिवस, १०दिवस, महिनाभर महिलांचे पंचायतमध्ये येणे सुरु होते. पंचायतनेदेखील स्वतः त्यातून आपला हात काढण्यासाठी फाईल बनवून सरकारी अधिका-यांकडे पाठवून दिल्या आणि महिलांना सरकारी कार्यालयाचा रस्ता दाखविला. सरकारी कार्यालयात देखील फ़ाईलकडे कुणीही लक्ष दिले नाही, जे नेहमीच होते. एका टेबलापासून दुस-या टेबलावर आणि एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात फाईल फिरत होती. फाईल नंतर आता चकरा मारण्याची वेळ गावातल्या महिलांची होती. अनेक दिवस सरकारी अधिकारी लोकांना भेटल्यानंतर त्यांना समजले की, सरकारी काम सोपे नाही. 

सरकारी उदासीनतेने महिलांना पूर्णपणे निराश केले. मात्र, म्हणतात नं... प्रत्येक समस्येचे निराकरण दुखापत झाल्यानंतरच होते. महिलांनी नव्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली. सर्वांनी एकत्र मिळून निर्णय घेतला की, आता आम्ही दुस-या गावात विहिरीचे पाणी आणण्यासाठी जाणार नाही. तर, विहिरीलाच आपल्या गावात आणू. कुणी मदत करो किंवा न करो. गावातल्या या असाक्षर आणि कमी शिकलेल्या २०महिलांनी संकल्प केला की, आम्ही मिळून गावात विहीर खोदू. आता प्रश्न हा होता की, विहीर कोठे खोदली जावी. गावातील विहीर खोदण्यासाठी स्वतःची जमीन कोण देईल, हा प्रश्न होता. याचे समाधान देखील या बैठकीत झाला. ५०वर्षाच्या गंगाबाई आणि ६०वर्षाच्या त्यांच्या वहिनी रामकली यांनी गावातल्या विहिरीसाठी आपली जमीन मोफत दिली. इतकेच नव्हे तर, गंगाबाई आणि रामकली यांनी न्यायालयात जाऊन विहिरीसाठी जमीन गावाला देण्याचे प्रतिज्ञापत्र देखील दिले. 

ही बाब संपूर्ण गावात पसरली की, महिला विहीर खोदण्यासाठी जात आहेत, तेव्हा गावातील अनेक पुरुषांनी या २०महिलांची थट्टा करण्यास सुरुवात केली. टोमणे मारू लागले की, १०फूट माती तर खोदून घ्याल, मात्र जेव्हा खडक येतील, तेव्हा काय कराल. असे म्हणतात की, जेव्हा विचार मजबूत असतील तर छोट्या- मोठ्या गोष्टी मध्ये येत नाहीत. खडकांसारखे विचार ठेवणा-या महिलांनी निश्चय केला की, ज्यांच्या घरी जमीन खोदण्याचे जी अवजारे  असतील, ती त्यांनी घेऊन यावीत. दुस-या दिवसाचे काम संपवून महिला आपापल्या घरातून घमेले, फावडा आणि कुदळ,तगारी, तसले, हातोडी घेऊन निघाल्या. घरातल्या लोकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी डोक्याच्या वर गेले होते, त्यामुळे महिलांनी कोणाचेही ऐकले नाही. निश्चित वेळी रामकली आणि गंगाबाई यांच्या जमिनीवर सर्व महिला एकत्र झाल्या. नारळ फोडून जमीन खोदण्याची सुरुवात झाली. एक- एक दिवस असाच जाऊ लागला आणि जमिनीने देखील महिलांना साथ दिली. एकमेकांच्या मदतीने काम चालत होते. खड्डा खोदण्यास सुरुवात झाली आणि हळू हळू खड्डा मोठा झाला. मात्र, खड्डा काही खोलवर गेल्यानंतर मोठ मोठे खडक दिसायला लागले. हीच या महिलांची अग्निपरीक्षा होती. महिलांच्या या कार्याच्या विरोधात असलेले पुरुष पुन्हा एकदा त्यांची थट्टा करू लागले. पुरुष हे जाणण्यासाठी उत्सुक होते की, आता या महिला काय करू शकतील? खरेच आहे, प्रबल इच्छाशक्ती आणि मनौधैर्य यांच्यासमोर खडक देखील माती बनते. महिलांचे मनौधैर्य तुटले नाही, परंतु खडक तुटण्यास सुरुवात झाली. खडक तुटायला लागले आणि महिलांच्या रस्त्यात अडथळा बनलेले हे खडक माती बनले. महिलांची खिल्ली उडवणा-या चेह-यांवर आता कौतुकाचे भाव होते. मात्र म्हणतात की, सकारात्मक विचार न ठेवणारे नेहमीच वाईट विचार करतात. अद्यापही समाजाच्या एका मोठ्या घटकाला हा विश्वास होता की, महिलांनी कितीही काही केले तरी, पाणी येणे अशक्य आहे. 

एक दिवशी दुपारी अचानक गावात गोंधळ उडाला की, घागरा पलटण यांच्या विहिरीतून पाणी आले आहे. संपूर्ण गाव विहिरीच्या आजूबाजूला जमा झाले. खूपच वेगळा क्षण होता की, विहिरीतील खडक तुटले होते आणि मधोमध पाण्याची धार येत होती. त्या २०महिला जमिनीच्या २५फूट आतमध्ये गाणे गात एकमेकांचा हात पकडून नाचत होत्या. बघणारे देखील अचंबित होते. आनंदी तर सगळे होते, मात्र काही बोलण्याची आणि कौतुक करण्याची ताकद गावातल्या पुरुषांमध्ये नव्हती. खरच चमत्कार घडला होता. गावातीलच नव्हे तर, जवळपासचे पंचायतचे आणि सरकारी अधिकारी त्या ठिकाणावर पोहोचले, हे पाहण्यासाठी की, कशाप्रकारे गावातील २०आदिवासी महिलांनी आपल्या मनौधैर्याच्या बळावर विहिरीला गावात आणून दाखविले. 

२६वर्षाच्या फुलवती यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “माझ्या हाताला भेगा पडल्या होत्या, रक्त निघत होते. सर्व महिलांची हीच स्थिती होती. मात्र आनंद या गोष्टीचा आहे की, आता आम्हाला लांबून जाऊन पाणी आणावे लागत नाही आणि कुणाला पाणी मागावे लागत नाही. आज आम्ही विहिरीच्या पाण्याने पडीत जमिनीवर भाज्यांचे उत्पादन घेत आहोत.” 

गावातील या महिलांना कामात मदत करणारी संस्था स्पंदन, यांच्या सीमा प्रकाश यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “हे काम सोपे नव्हते, परंतु महिलांनी करून दाखविले. ३० फुट पर्यंत खोदण्याचे काम सहज नसते. आता या विहिरीत वर्षभर पाणी राहते. महिला भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. आता महिलांच्या चेह-यावर चमक आणि त्यांचा आत्मविश्वास बघायला मिळतो.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !

गावांच्या विकासासाठी व्यावसायिक कारकीर्दसोडून २२वर्षाच्या मोना कौरव बनल्या महिला सरपंच, वर्षभरात पालटले चित्र!

दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव
लेखक : सचिन शर्मा
अनुवाद : किशोर आपटे