वेब बेस्ड टॅक्सी सेवेच्या नियमनासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम लागू

* स्वतंत्र ॲप आधारित टॅक्सी परवाना मिळणार* गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई* टॅक्सी सेवेचे आधुनिकीकरण होणार

0

 राज्यातील प्रवाशांना किफायतशीर तसेच सुरक्षित प्रवासाची साधने उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने संकेतस्थळ आधारित (वेब बेस्ड ) टॅक्सी सेवेचे नियमन करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असून “महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम 2017”लागू करण्यात येत असल्याची माहिती परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


रावते पुढे म्हणाले की, संकेतस्थळ आधारित टॅक्सी सेवा मोठ्या शहरांत कार्यरत आहेत. यामध्ये ओला, उबेर, टॅक्सी फॉर श्युअर अशा टॅक्सी चालनात असुन प्रवाशांची मागणी व पुरवठा या आधारावर प्रवाशांकडून भाडे आकारणी होत असल्याने गर्दीच्या काळात जादा भाडे आकारणी करीत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे जादा भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे. तसेच या निर्णयामुळे प्रवाशांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार आहे. हा नियमामुळे टॅक्सीमध्ये किंवा टॅक्सीच्या वाहन चालकाकडे जीपीएस/जीपीआरएस यंत्रणेसह वाहनात मार्गक्रमण केलेले अंतर, मार्ग व भाडे दर्शविणारा निदर्शक असणार आहे. या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे  रावते यांनी यावेळी सांगितले.

सध्याच्या काळ्या पिवळ्या टॅक्सींनाही समुच्चयकाकडे नोंदणी करुन ॲप आधारे टॅक्सी चालविता येईल. मात्र काळ्या पिवळ्या टॅक्सींना गर्दीच्या वेळेत ॲप आधारित आणि कमी गर्दीच्या काळात नेहमीच्या मिटर पध्दतीने टॅक्सी चालविता येणार नसून यामध्ये कोणताही गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत टॅक्सीचा रंगाची रुपरेषा बदलून वेगळी ओळखही देण्यात आली आहे. या नियमाच्या माध्यमातून काळी-पिवळी टॅक्सी संकेतस्थळ आधारित टॅक्सी यांचे फायदे कायम ठेवून टॅक्सी सेवेचे आधुनिकीकरण,उन्नतीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे  रावते यांनी यावेळी सांगितले.


नियमावलीतील वैशिष्टये :-

§ या नियमाअंतर्गत समुच्चयकास ज्या शहरात व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक राहील.
§ ॲप आधारित टॅक्सी परवाना असा स्वतंत्र परवाना टॅक्सींसाठी देण्यात येईल. अशा टॅक्सी वातानुकूलीत असतील.
§ या टॅक्सी स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या असतील.
§ या टॅक्सीमध्ये किंवा टॅक्सीच्या वाहन चालकाकडे जीपीएस/जीपीआरएस यंत्रणा असेल तसेच वाहनात मार्गक्रमण केलेले अंतर, मार्ग व भाडे दर्शविणारा निदर्शक असेल.
§ समुच्चयकाकडे 24x7 कार्यरत नियंत्रण कक्ष असेल आणि टॅक्सीमध्ये प्रवासी बसल्यावर नियंत्रण कक्षही वाहन संपर्कात असणे आवश्यक आहे. 
§ कोणात्या समुच्चयकाकडे कोणत्या टॅक्सी नोंदणीकृत आहेत याची माहिती देण्यात येईल.
§ सध्याच्या काळ्या पिवळ्या टॅक्सींनाही समुच्चयकाकडे नोंदणी करुन ॲप आधारे टॅक्सी चालविता येईल. मात्र काळ्या पिवळ्या टॅक्सींना गर्दीच्या वेळेत ॲप आधारित आणि कमी गर्दीच्या काळात नेहमीच्या मिटर पध्दतीने टॅक्सी चालविता येणार नाही.
§ प्रवाशांना प्रवासाचे देयक देणे बंधनकारक राहील. सदर देयक कागदी देयक अथवा अन्य इलेक्टॉनिक पध्दतीने असू शकेल.
§ प्रवास भाडयाचे दर कमाल आणि किमान अशा पध्दतीने प्रवासभाड्याची मर्यादा शासनाकडून निश्चित करुन देण्यात येईल त्या मर्यादेच्या आत मागणी पुरवठा या त्यांच्या तत्वाने भाडे आकारणी केली जाईल.
§ प्रवासाचे भाड्याचे लहान टॅक्सी, मध्यम आरामदायक टॅक्सी आणि मोठ्या टॅक्सी साठी वेगवेगळया दर आकारणी राहील.
§ बाहेरगावाहून येणारे सामानासहीत प्रवाशी किंवा विमानतळाकडे ये-जा करणारे प्रवाशी यांचेसाठी मोठ्या टॅक्सींची आवश्यकता असल्याने समुच्चयकाकडे किमान 30% टॅक्सी या 1400 CC इंजिन क्षमतेपेक्षा जास्त इंजिनक्षमता असणाऱ्या असतील. अशा मोठ्या टॅक्सींसाठी रुपये 2.61 लक्ष एवढे परवाना शुल्क आकारण्यात येईल. इतर लहान टॅक्सींसाठी रुपये 25,000 एवढे परवाना शुल्क आकारण्यात येईल.
§ या टॅक्सींचा वरील भाग पांढरा, मागील व पुढील बंपर पांढरे आणि वाहनाच्या खालचा भाग डॅफोडील पिवळा असा रंग असेल.

( सौजन्य - महान्युज)