घरगुती उपकरणांना स्वयंचलनाच्या पलीकडे नेण्यामागे पंचविशील्या तरुणांकडे कोणती प्रेरणा असेल बरं ?

0

विज्ञानकथा असू देत की, जागतिक तंत्रज्ञान जत्रा घरगुती स्वयंचलित उपकरणांची त्यात हजेरी असतेचं.

भविष्यात आपली घरं ही अधिक गुंतागुंतीची, वेगळ्या पद्धतीची आणि 'स्वयंचलित' या शब्दाला वेगळं प्रमाण देणारी असतील. पण फक्त डोमोटिक्स अर्थात घरगुती स्वयंचलितच नव्हे तर त्याबरोबर वेगवेगळे हार्डवेअर जोडण्याबरोबरच, नेटवर्क आणि कम्युनिकेशन एकत्रित करून वाय-फाय (Wi-Fi) च्या कक्षेत आणलं आणि बस्स एकच बटण दाबून तुम्हाला अपेक्षित असलेल्या घरगुती सुविधा प्राप्त झाल्या तर. हे स्वप्न प्रत्यक्षात आणलंय एनआयटी-जयपूरच्या ग्रॅज्यूएटसनी, ज्याला ते ' द सेन्सफुल एनीवे स्वीच' (the senseful anyway switch)'असे संबोधतात अर्थात बटणाचा सुयोग्य वापर करून अपेक्षित कृती करणे.


भविष्याचं बटण

'क्लोव्हर बोर्ड' (Clover Board) जणू एकप्रकारे ज्ञानेन्द्रियचं आहे. एक 'क्लोव्हर बोर्ड' दुसऱ्या 'क्लोव्हर बोर्ड' शी संपर्क साधतो, दिलेला आदेश अचूक टिपतो आणि क्षणार्धात त्या आदेशाचं पालन करतो. 'क्लोव्हर बोर्ड' प्रकाशाची उपलब्धता आणि वापरणाऱ्याच्या वेळापत्रकाची सांगड घालून प्रकाशव्यवस्था नियंत्रित करतो. याच्या निर्मात्यांच्या मते या बटणामुळे उपभोक्ते तापमान कमीजास्त करताना १०-१५% तर प्रकाशावर ३०-४०% रक्कम वाचवतात.

दुसऱ्या भाषेत सांगायचं तर, क्लोव्हर बोर्ड हा कुठेही लावता येणारा बोर्ड आहे. याच्या बटणांना सांकेतिक क्रमांक नाही आणि सर्व प्रकारच्या उपकरणांना आपण हे जोडू शकतो. त्यामुळे तुम्ही बेडरूममध्ये लोळत लोळत तुमच्या स्वयंपाकघरातला दिवा बंद करू शकता.

आपल्या बोर्डवर 'अवे' (Away) थीम सेट करून ठेवली असेल तर घरातून बाहेर पडताना 'Away' च बटण दाबा, घरातली सर्व उपकरणं बंद होतील.

या बोर्डमध्ये असलेल्या थीम्समुळे तुम्ही तुमच्या घरातला प्रकाश आणि तापमान घड्याळानुसार सेट करू शकता. उदाहरणार्थ, रोज सकाळी आठ वाजता १० मिनिटांकरता गिजर सुरु करणे, घराची सुरक्षा बघणे. घरातील व्यक्तींच्या अनुपस्थित चोरी होत असल्यास अलार्म वाजला जातो आणि याची सूचना घरातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचते.


पण, इतर घरगुती स्वयंचलित उपकरणही ह्या सगळ्या सुविधा देतात ना? क्लोव्हर बोर्डच्या निर्मात्यांना हे मान्य नाही. त्याचं म्हणणं आहे, पारंपरिक घरगुती उपकरणं आणि सेवा या पूर्णपणे स्वयंचलीत नाहीत. स्मार्ट फोनद्वारे उपकरण वापरता येणं म्हणजे स्वयंचलन नव्हे. आपला फोन हातात न घेता आपली उपकरणं गरज असेल तरच काम करणं महत्वाचं आहे.

ग्राहकाच्या मागणीनुसार उत्पादनात बदल घडवताना खूपशा जुन्या कंपन्या घराची वायरिंग आणि इतर गोष्टीही बदलतात. ज्यामुळे गैरसोयीसोबत खिशालाही चाट पडते.

प्रवास

निशांत कुमार, निर्मल कुंवर आणि रितिका ध्यावला रोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या आवडीने एकत्र आले. या रोबोटिक्स मित्रांनी कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच तंत्रज्ञानाच्या मदतीने अडचणी सोडवायला सुरुवात केली होती.

नोकरी लागल्यावरही तंत्रज्ञानाची त्यांची भूक भागत नव्हती. नवीन तंत्रज्ञान आणि समस्या यावर त्यांचा नेहमी खल सुरु असे. त्यांची तंत्रज्ञानाची ओढ पाहिल्यावर निशांतचा मोठा भाऊ विवेक राज त्यांच्या टीममध्ये सामील झाला. त्याने टीमला नेटवर्किंगवर काम करणाऱ्या प्रसिद्ध संशोधन संस्था, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांशी गाठ घालून दिली.

या टीमने मोठं अंतर कापलयं. नवीन हार्डवेअर बाजारात आणताना आधीच पसंतीस उतरलेलं उत्पादन हे नवीन उत्पादनाला जम बसवण्यात अडथळा ठरतं, हे ह्या उद्योजकांना कळतंय .

सह-निर्माते सांगतात, अंतिम उत्पादन हे मूळ कल्पना असलेल्या उत्पादनापेक्षा वेगळं असत. म्हणजे आपल्याला त्यांची जी खासियत सांगितली जाते ती प्रत्यक्षात फक्त १०% च असते. उरलेले ९०% प्रयत्न हे त्याला हवं तसं बदलण्यात आणि मोठ्या निर्मितीसाठी खर्ची पडतात.

रितिका सांगते, सर्व्हिस कंपनी स्थापन करणे हे फार वेगळी अनुभूती देणार आहे. घरगुती/कार्यालयीन स्वयंचलित कंपनी चालवताना चीनमधून दुसऱ्यातिसऱ्याकडून उत्पादन घेणं सहज शक्य आहे. पण मग आमची कंपनी दुय्यम ठरेल आणि भविष्यात आम्ही कुठलाही नवीन शोध लावू शकणार नाही.

ती म्हणते, "आम्हाला असं उत्पादन बनवायचंय जे मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस उतरेल. त्यामुळे सतत नवीन प्रयोग केले पाहिजेत."

या प्रवासाने आमची अनुभवाची शिदोरी भरत असल्याचं रितिका सांगते.

"या प्रवासात आम्ही तांत्रिकदृष्ट्या वरचढ उत्पादन बनवायला शिकलोच शिवाय लोकांचे कंगोरेही अनुभवायला मिळाले. हार्डवेअर कंपनी स्थापन करण्याचं बघितलेलं स्वप्न आणि ते प्रत्यक्षात आणताना झालेली कसरत भयंकर होती. पण उत्पादन तयार झाल्यावर झालेला आनंद शब्दांत सांगू शकत नाही. "

या नवख्या उद्योजकांच्या प्रवासाने त्यांना कठीण परिस्थितीत पैशाचं महत्व कळायला मदत केली. नाजूक प्रसंगी आपल्या भावनांवर ताबा ठेवणं, संयम ढळू न देणं आणि निराश न होता खंबीरपणे उभे राहणे या गोष्टीही ते शिकत गेले.

पुढील तिमाहीत मर्यादित संख्येत आपली उत्पादन बाजारात आणण्याचा विचार हे धाडसी तरूण सध्या करत आहेत. २०१६ च्या दुसऱ्या तिमाहीत ते त्यांची उत्पादनं पूर्ण ताकदीनिशी उतरवणार असल्याचं रितिका सांगते.

"भारतीय चांगल्या डिझाईनची हार्डवेअर बनवू शकत नाहीत असा एक सर्वसामान्य समज आहे. हा समज आता खोत ठरणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहाचण्याकरता आम्ही पुढील महिन्यात विस्तारणार आहोत."

या फर्मला आयआयएम अहमदाबादकडून दीर्घकाळ प्रतीक्षेत असणार १० लाखांचं अनुदान प्राप्त झालयं . काही गुंतवणूकदार आणि भागीदारांच्या मदतीने १५ दशलक्षांपर्यंत व्यवसाय पोहोचवण्याचं ध्येय असून क्लोव्हर बोर्डला भारतातल्या पहिल्या आठ शहरांमध्ये न्यायचं आहे.

एक हजाराहून अधिक क्लोव्हर बोर्डची मागणी नोंदवली गेलीय. ऊर्जेचं व्यवस्थापन, सौर ऊर्जा आणि बॅटरी तंत्रज्ञानाचा मिलाप साधत शाश्वत असं काहीतरी करायचंय.

थोडक्यात, या निर्मात्यांना घरांना व्यक्तिमत्व द्यायचंय. ज्यामुळे आपण आपल्या घराशी संवाद साधू शकू आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपलं घर आपला आवाज ओळखेल.

लेखक : तरुष भल्ला

अनुवाद : साधना तिप्पनाकजे