विदर्भातील एक शेतकरी, ज्याने लाखो शेतक-यांना दिलासा देऊन फोर्ब्स नियतकालिकात मिळवली जागा!

0

विदर्भाचे नाव ऐकताच तुमच्या मनात ओसाड जमीन, आत्महत्या करणारे शेतकरी आणि भूकबळींचे एक भयावह चित्र समोर येऊ लागते. मात्र याच भयावह स्थितीमध्ये एक नाव असेही आहे ज्याने विदर्भाच्या नावाला जगप्रसिध्द फोर्ब्स नियतकालिकात जागा मिळवून दिली.

७९वर्षांचे दादाजी रामाजी खोब्रागाडे, एक असे शेतकरी ज्यांनी केवळ विदर्भालाच नाहीतर सा-या देशाला एक उच्च दर्जाचे तांदूळाचे वाण उपलब्ध करून दिलेच पण त्याशिवाय गरीबीशी लढा देणा-या शेतक-यांना उत्पन्नाचा चांगला पर्याय मिळवून दिला. महाराष्ट्रातील विदर्भात नांदेड नावाच्या गावात सामान्य शेतकरी दादाजी खोब्रागाडे पाच एकर शेतीवर शेतीचे काम करून सात जणांच्या आपल्या कुटूंबाचे पालन-पोषण करत असत. दादाजी शेतीबाबत जागरुक असत आणि नविन प्रयोग करून पहाण्याची त्यांना आवड आहे. विदर्भात शेतक-यांचा प्रयत्न कमी लागवड करून जास्त उत्पन्न घेण्याचा राहिला आहे. काहीसे असेच दादाजी यांना करावेसे वाटत होते. नांदेड मध्ये धान (तांदूळ) सर्वात जास्त पिकणारे पिक आहे. परंतू येथील सिंचनाचा प्रश्नही मोठा आहे. कमीतकमी पाण्यात तांदूळाची चांगली पैदास करणे म्हणजे स्वप्न पहाण्यासारखेच होते. १९८३मध्ये दादाजी यांनी आपल्या तीन एकर शेतात धानाच्या नव्या बियाणांचा प्रयोग केला आणि नव्या पध्दतीच्या उन्नत बियाणांच्या निर्मितीचा प्रवास सुरू झाला. खरेतर याचे आणखी एक कारण होते ते म्हणजे दादाजींच्या शेतात धानाच्या पिकाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर प्रयोग सुरू होते. हे त्यांच्या शेतामुळेच होऊ शकत होते. मात्र दादाजींना यात शक्यता दिसत होत्या. दादाजी त्यांच्या शेतात पटेल-३ नावाच्या बियाणांचा वापर करत होते. त्यांनी या बियाणातून थोडे वेगळे दिसणा-या बियाणांना वेगळे काढण्यास सुरुवात केली. हळुहळू त्यांनी वेगळ्या केलेल्या बियाणांची सलग चारवर्षांपर्यंत पेरणी करण्यास सुरूवात केली.१९८९मध्ये त्यांनी या प्रक्रियेतील धान्यापासून तीन क्विंटल नव्या वाणाचे उत्पादन केले. आता त्यांनी या नवीन वाणाचे लोकांना वितरण सुरू केले, त्यांच्या या प्रयोगातून जे नव्या प्रकारचे बियाणे निघाले त्याचे त्यांनी सर्वात आधी गावाचे जमीनदार भिमराव शिंदे यांना वितरण केले. भिमराव यांनी दादाजी यांच्याकडून एक क्विंटल बियाणे घेऊन आपल्या शेतात पेरले. या नव्या जातीच्या बियाण्याने भिमराव यांनी चार एकरात ९०गोणी (९०क्विंटल) तांदूळ पिकवता आला. दादाजी आणि भिमराव जेंव्हा हे नव्या प्रकारचे धान बाजारात विकायला गेले तर घाऊक खरेदीदारांनी त्यांना इतका चांगला तांदूळ बघितला नसल्याचा अभिप्राय दिला. त्यांनी त्याचे नाव आणि प्रकार कोणता असा प्रश्न केला तेंव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिले, मग दादाजींनी त्याचे नांव एचएमटी असल्याचे सांगितले. हे काही वैज्ञानिक नाव नाही, हे सांगितले तर कुणालाही हसायला येईल दादाजीनी आपल्या हातावरील घड्याळाचे नांव त्याला सांगून टाकले होते. याचे कारण सांगताना ते म्हणतात की त्यावेळी अचानक मला काहीच सुचत नव्हते आणि घरी जायला उशिर होणार होता. त्यांनी सतत आपल्या घड्याळाकडे पाहिले आणि त्यावरील नाव आपल्या नव्या वाणाला देऊन टाकले.

त्याच दरम्यान १९९४ मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याशी संबंधित संस्था सिंदेवाही राईस स्टेशन, येथून काही लोक दादाजींकडून एचएमटीचे पाच किलो बियाणे घेऊन गेले. त्यांनी दादाजींना हे सांगून हे बियाणे नेले की त्यावर त्यांच्या संस्थेला संशोधन करायचे आहे. दादाजींना आनंद झाला आणि त्यांनी शोध लावलेल्या तांदूळाच्या वाणाला त्यांच्या सुपूर्द केले. सन१९९८मध्ये महाराष्ट्र राज्यात पीकेवी- एचएमटी नावाने एका नव्या बियाणाला बाजारात आणण्यात आले, त्याची किंमत १२००रुपये प्रतिक्विंटल होती. दादाजींना जेंव्हा हे सारे समजले तेंव्हा ते खूप निराश झाले. कारण ते नवे पीकेवी-एचएमटी बियाणे खरेतर त्यांचेच एचएमटी बियाणे होते. त्यात काहीच फरक नव्हता. आणि सर्वात जास्त निराशेची बाब म्हणजे ना संस्थानाने, ना सरकारने त्यांना त्याचे श्रेय दिले नाही की सन्मानही केला नाही.

खरेतर सन१९८३मध्ये ज्या एचएमटी बियाणाचा शोध त्यांनी लावला होता, त्याची लोकप्रियता खूप वाढत होती आणि सरकारला नाईलाजाने त्यासारखेच बियाणे देण्याची गरज वाटत होती. असे असले तरी दादाजी खोब्रागाडे त्याने खचले नाहीत, त्यांनी हा विषय सकारात्मक पध्दतीने घेतला, आणि आपल्या शेतात पुन्हा एकदा नव्या पध्दतीच्या बियाणांच्या वाणासाठी शोध सुरू केला. हळुहळु त्यांनी सहा प्रकारच्या नव्या वाणांचा शोध घेतला आणि वेगवेगळ्या गावात आणि मेळाव्यात त्याचे प्रदर्शन केले. यापैकीच एका प्रकारच्या बियाणाला त्यांनी डी आरके (दादाजी रामाजी खोब्रागाडे) असे नाव दिले. या बियाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुगंध होता. १९९० पर्यंत नांदेड गावात पक्की घरे आणि त्यात पक्क्या जमिनी पहायला मिळत नव्हत्या परंतू १९९२-९३ नंतर या गावाचा जणू कायापालट झाला. एचएमटीच्या बियाणाने चांगली कमाई झाल्याने प्रत्येक शेतक-याला आर्थिक स्थैर्य आले. आज तुम्हाला चांगली घरे आणि त्यात लावलेल्या टाइल्स पहायला मिळतात.

एक शेतक-याच्या यशाची ही कहाणी केवळ नांदेड गावापुरती मर्यादित राहिली नाही तर आजूबाजूची राज्य आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात सर्वत्र पसरली. काही वर्षांनी २००४ नंतर दादाजी यांच्या धाकट्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली त्यामुळे त्यांना आपली दोन एकर शेती विकावी लागली. आता ते उरलेल्या तीन एकरात शेती करत आपल्या कुटूंबाचा निर्वाह करत होते, सोबतच तांदुळावरील आपल्या प्रयोगांच्या प्रयत्नांना मजबूत करत होते.

दादाजींच्या नव्या एचएमटी आणि डिआरके या वाणांचा उपयोग देशातील पन्नास टक्के पेक्षाजास्त शेतकरी करु लागले होते असे समजायला हरकत नाही. सामान्या बियाणांच्या तुलनेत या वाणांचे अधिक उत्पादन होत होते सोबतच त्याला कमी पाणी लागते. हे सारे गुण शेतक-यांना एखाद्या वरदानापेक्षा कमी महत्वाचे नव्हते आणि दादाजी त्यांना देवापेक्षा कमी नव्हते. मात्र दुर्भाग्य हेच होते की ना सरकारने ना कुण्या संशोधन संस्थेने त्यांच्या या कामाची दखल घेऊन सन्मान केला होता. दादाजींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त खराब झाली होती मात्र त्यांनी कधीच कुणासमोर हात पसरला नाही. दादाजी एक गरीब दलित शेतकरी कुटूंबात जन्मले म्हणून त्यांनी नेहमीच कर्मावर भर दिला आणि संघर्ष करत लढाया लढल्या.

याच महत्वाकांक्षेचे फळस्वरुप त्यांना भारताचे तत्कालिन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी पन्नास हजार रुपये रोख, एक गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. दादाजींच्या एचएमटी बियांणांनी केवळ देशातील नाहीतर विदेशातील शेतक-यांच्या जीवनात बदल झाला आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. त्याचा परिणाम म्हणून सन२०१०मध्ये जगप्रसिध्द नियतकालिक फोर्ब्समध्ये दादाजींच्या नावाची निवड आपल्या यादीत केली ज्यांनी लाखो लोकांचे जीवन आपल्या शोधाने बदलण्यात मदत केली. ही उपलब्धी एक सामान्य शेतक-यासाठी महत्वाचीच आहे. त्यांच्या गावाला जर कुणी भारताच्या नकाशात पहायचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांना ते दिसणारही नाही. इतक्या छोट्या गावातील गरीब शेतकरी शेतीच्या क्षेत्रात नव्या बदलाची क्रांती घडवू शकतो. असे असूनही त्यांच्या जीवनातील अडचणी कायम होत्या. आजही त्यांच्यासमोर कुटूंबाचे पालन-पोषण हा प्रश्न होताच. एचएमटी-डिआरके या नव्या वाणांना वेळेवर प्रसिध्दी न मिळणे आणि मिळते तेंव्हा दादाजींच्या स्थितीत अधिक बिघाड होणे या सा-या गोष्टी त्यांच्यासोबतच या देशाच्या खराब पध्दतींवर प्रकाश टाकणा-या आहेत. फोर्ब्समध्ये नाव झळकल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी खूप मोहिमा काढण्यात आल्या, अनेक माध्यमांनी त्यांच्या मुलाखती प्रसिध्द केल्या. समुह संपर्क माध्यमात लोकांनी त्यांच्या कार्याची चर्चा केली. त्यामुळे नँशनल इनोवेशन फाऊंडेशन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारने दादाजींना राष्ट्रीय पुरस्कार देउन सन्मान केला. आणि त्यांच्यासोबत तीन करारही केले ज्यानुसार दादाजींना त्यांनी तयार केलेल्या नव्या वाणांना पेटंट (स्वामित्व हक्क)च्या प्रक्रियेतून बाजारात आणण्यात आले आणि त्यातून मिळणा-या निश्चित रकमेचा स्रोत सुरु झाला. एखाद्या शेतक-यासाठी त्याच्या एका शोधाने जगातील करोडो शेतक-यांचा फायदा होतो यातूनच त्यांची प्रतिभाशक्ती दिसून येते. मर्यादीत साधनांच्या बळावर कुटूंबाचे पालन करणा-या दादाजींच्या या योगदानासाठी सा-या विश्वाच्या ते सदैव स्मरणात राहतील.

लेखक : सर्वेश उपाध्याय

अनुवाद: किशोर आपटे.