'भक् साला' - आचरट गाढवाच्या 'logical' माकडउड्या’

पैसे ऐका ! पैसे बघा !! आणि पैसेच खा !!! - आधुनिक राजकीय बोधवाक्य

'भक् साला' - आचरट गाढवाच्या 'logical' माकडउड्या’

Wednesday August 19, 2015,

4 min Read

राहुल राजचा अलगदपणे झालेला प्रसिद्धीच्या जगामधील सहज-सोपा प्रवेश, हे त्याचे 'दुर्देवी सुदैव' म्हणावे लागेल. बिहारच्या पटना शहरात जन्मल्यामुळे, वयाच्या दहाव्या वर्षी अपहरण होणे, ही त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट राहिली नव्हती, पण त्यापुढे जे घडलं, त्याने मात्र त्याला परीकथेतील मायावी जगाची सफर घडवून आणली. अपहरण झाल्यानंतर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तो निसटला व त्याने पळून जाऊन स्वतःची सुटका करून घेतली. ह्या त्याच्या शौर्यासाठी त्याला 'राज्यपाल पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले.

त्याच्या आयुष्यातील महत्वाचे वळण मात्र तेव्हा आले, जेव्हा सहावीत असताना त्याची रवानगी सैनिकी शाळेत करण्यात आली. परंतु तो सैनिक बनण्यासाठी लागणारी शिस्त अंगी बाणवू शकत नाही हे त्याचे त्यालाच पुढील चार वर्षात समजले. शालेय शिक्षण संपल्यानंतर अशाच प्रकारचा धडा बहुतेक त्याला IIT-BHU इथे ही शिकायचा होता, म्हणूनच की काय पदवी अभ्यासक्रमाच्या चक्क तिसऱ्या वर्षी त्याने शिक्षण सोडले (असे सहसा कोणी करत नाही) आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखे संगीत, वाचन, लेखन अशा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला, ते सुद्धा त्याच्या आवडत्या गणित आणि विज्ञान ह्या विषयांची साथ-सांगत न सोडता.

'भक् साला' शी संबंधित प्रसिद्ध प्रतिक

'भक् साला' शी संबंधित प्रसिद्ध प्रतिक


आपण असे बोलू शकतो की राहुल राजच्या सुरुवातीच्या आयुष्यातील घटनांमुळेच फेसबुकवरील 'भक् साला' च्या अंगभूत उद्धटपणाचा जन्म झाला असावा. राहुल राजने स्वतःची विचारसरणी मांडताना, त्याच्या लिखाणामध्ये 'आचरट' बाज जोपासला आहे, हे 'भक् साला' च्या सुरुवातीच्या दिवसांमधील यशावरून सहज सिद्ध होतं. 'भक् साला' ची निर्मिती ३ ऑक्टोबर २०१० ला संता-बंता सारख्या बालिश विनोदांनी झाली. पण राहुलने कधी अशी कल्पनासुद्धा केली नव्हती की भारतात सामाजिक-राजकीय जागरुकता पसरवण्याचे, त्याचे स्वप्न साकार करण्याचे 'भक् साला' हे एक प्रभावी माध्यम बनेल.

तो सांगतो, की त्याच्या विद्यालयीन जीवनाने त्याला हेच शिकवलं की आपण सगळे गणितज्ञ बनण्याऐवजी फक्त हिशोबनीस बनण्यातच समाधान मानतो. गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यात लोकांना समजून घेण्याची आवड निर्माण झाली आणि त्यांच्या आयुष्यातून त्यांची गोष्ट बाहेर काढणे हेच आज त्याला सर्वात जास्त आनंद देणारं काम ठरलं आहे.

'गणित आणि साहित्य' किंवा 'कला आणि विज्ञान' हे विरुद्ध गुण असलेले पण त्याच्या आवडीचे विषय एकमेकांशी जोडण्याच्या स्वप्नरंजना मुळेच त्याला 'पल्स' ह्या पहिल्या महाविद्यालयीन रंगीत वर्तमानपत्राची निर्मिती करता आली.

'भक् साला' चे अधिकांश यश हे निःस्वार्थीपणे योगदान देणाऱ्या प्रतिभावान लेखकांमुळे मिळाले आहे.

Rahul Raj - पोलायेटली इनकरेक्ट

Rahul Raj - पोलायेटली इनकरेक्ट


अशा ह्या लेखकांना निवडण्याची प्रक्रिया समजावताना राहुलने आम्हाला सांगीतले, की तो लेखनशैली आणि सर्जनशीलतेबरोबरच लेखकांच्या वैयक्तिक मतांमधील प्रामाणिकपणाला सुद्धा महत्त्व देतो. कारण त्यामुळे त्याला भावनेच्या भरात अथवा क्षणिक राग व्यक्त करण्यासाठी लिहिल्या जाणाऱ्या शब्दबंबाळ लेखांवर नियंत्रण ठेवता येते. तसेच त्यामुळे एकांगीपणे एखाद्या सामाजिक विचारसरणीला चुकीच्या पद्धतीने मांडण्यापासून रोखता येते.

सध्या २,००,००० पेक्षा जास्त लाइक्स मिळवूनदेखिल, काटेकोरपणे केवळ प्रायोगिक तत्वावर आनंदाने काम करून 'भक् साला' अनेक कलाकारांना चालना देत आहे. ते सुद्धा फक्त आपण समाजासाठी काहीतरी करतो, हे समाधान मिळवण्याकरिता. राहुलचे प्रखर देशप्रेम हे त्याच्या profile चित्रावरून तसेच त्याच्या 'भक् साला' च्या फेसबुक पानावरसुद्धा निदर्शनास येते. त्याचे मनस्वी देशप्रेम, लोकांच्या भारतीय राजकारणावर असणाऱ्या 'तार्किक बुद्धिवादी' ते 'एकांगी जहालवादी' मतांमध्ये सुवर्णमध्य साधून, 'भक् साला' च्या रूपाने साकार झाले आहे.

राहुलला असं प्रामाणिकपणे वाटतं, की आपल्या सभोवताल प्रचंड प्रमाणात कोलाहल व गोंधळ माजलेला आहे, आणि असा चारीबाजूंनी पसरलेला अंधार सहजासहजी मिटवता येणार नाही, म्हणूनच आपल्यातील प्रत्येकाने स्वतःच एक मशाल व्हायला हवे.

भारतभर पसरलेला विध्यार्थी-वर्ग हा 'भक् साला' चा मुख्य कणा आहे, कारण त्यांच्याद्वारेच 'भक् साला' चा आशय सर्व देशभर वाऱ्यासारखा पसरला. राहुलला त्याचे हे संवेदनशील व कोवळ्या वयाचे अनुयायी आणि त्यांच्यावर असलेल्या 'भक् साला' च्या प्रभावाची पूर्ण जाणिव आहे, म्हणूनच त्याचे मत हे वस्तुस्थितीला धरून व संतुलित आहे, ज्यात तो सकारात्मक व नकारात्मक प्रभावाचा समतोल विचार करतो. त्याच्या मतानुसार आजच्या काळात आपल्या जीवनावर राज्य करणाऱ्या प्रसार माध्यमांचे आणि सहजासहजी उपलब्ध झालेल्या सामाजिक मंचाचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम होतात.

नकारात्मक बाजू -

१. आजच्या काळात आपण एक 'वैफल्यग्रस्त' समाज झालो आहोत.

२. आपण अशा भ्रमात आहोत, की सामाजिक मंचाने आपल्याला सशक्त केलं आहे, पण त्याचबरोबर आपण एक समाज म्हणून वाहवत चाललो आहोत, ह्या सत्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे.

सकारात्मक बाजू -

  1. आजची पिढी विद्यार्थीदशेत असतानाच किंवा शिक्षण संपल्यावर लगेच स्वतःच्या आवडीच्या कार्यक्षेत्रात जाण्याचा निर्णय आत्मविश्वासाने व स्वतंत्रपणे घेऊ लागली आहे, मग ते कार्यक्षेत्र कला, काव्य अथवा लिखाण असे जगरहाटीपेक्षा वेगळे का असेना.
  2. आजची पिढी हि आत्मविश्वासाने भरलेली आहे आणि तरुण उद्योजक नवनवीन व ठोस कल्पना घेऊन पुढे येत आहेत.

राहुल स्वतःच अजूनही त्याच्या व्यावसायिक आयुष्यात, त्याच्या अंकगणिताच्या प्रेमाखातर, तार्किक विश्लेषणात (logical analytics) हात आजमावत असतो.

'भाक साला'' च्या पानावरचे  विडंबनात्मक चित्र - पैसे ऐका ! पैसे बघा !! आणि पैसेच खा !!!

'भाक साला'' च्या पानावरचे विडंबनात्मक चित्र - पैसे ऐका ! पैसे बघा !! आणि पैसेच खा !!!


त्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काही मुल्यवान सल्ला दिला आहे.

  1. आधी तुम्ही तुमचे महाविद्यालयीन शिक्षण प्रामाणिकपणे व शक्य असल्यास वरच्या दर्ज्याच्या चांगल्या महविद्यालयातूनच पूर्ण करा.
  2. कुठल्याही गोष्टीबाबत स्वतःचे ठाम मत तयार करण्याआधी तुम्ही एक चांगले वाचक असणे आवश्यक आहे.
  3. नाविन्याचा ध्यास घ्या आणि प्रतिकूल गोष्टींबाबत तक्रार करत बसण्यापेक्षा तुमचा मूळ पाया पक्का करा.
  4. कुठल्याही क्षेत्रात पहिलं पाऊल हे नेहमीच महत्वाचं असतं कारण ते फक्त तुमच्या आयुष्याची दिशाच ठरवतं असं नाही तर ते तुमच्यातील यश मिळवण्याच्या क्षमतेला सुद्धा आकार देतं.
  5. अभियांत्रिकी क्षेत्र हे 'एका रात्रीत अभ्यास करून पार करता येतं' अशा चुकीच्या गोष्टींचा पायंडा पाडण्यासाठी नसून, तिथे आपला मूळ पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आम्ही 'भक् साला' ला आपणा सगळ्यांना 'निखळ करमणूक' देण्यासाठी शुभेच्छा देतो.