बियॉन्ड ऑस्ट्रेलिया – भारतीय डॉक्युमेन्ट्रीच्या शोधात

0

मुंबईत नुकताच १४ वा मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल अर्थात मिफ पार पडला. जगभरातल्या सर्वोत्कृष्ट माहितीपटांचा खजिना मिफ २०१६ द्वारे लोकांसाठी खुला करण्यात आला होता. वरळी दूरदर्शन, मुंबई विद्यापीठ कलिना इथं या माहितीपटांचं स्क्रिनींग झालं. जगभरातले माहितीपट निर्माते आणि दिग्दर्शक या निमित्ताने मुंबईत एकाच व्यासपीठावर आले होते. हे माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि समाजातल्या विविध विषयांवर प्रकाश टाकण्याचा मिफचा मनसुबा असतो. या फिल्म फेस्टीवलमध्ये सर्वाधिक भर असतो ते जगभरात भेडसावणारे प्रश्न जे माहितीपट उलगडून दाखवतात. मिफच्या माध्यमातून हे माहितीपट लोकांपर्यंत पोहचवले जातात.

यंदा मिफमध्ये ऑस्ट्रेलियन माहितीपटांचा बोलबाला होता. ऑस्ट्रेलियातून तब्बल पाच माहितीपट या महोत्सवात दाखवण्यात आले. ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात सर्वाधिक पसंतीचा ठरला तो 'प्रिजन सॉग्स'. ऑस्ट्रेलियातल्या बियॉन्ड माध्यम कंपनीनं या माहितीपटाची निर्मीती केलीय. तर केर्लिक मार्टीन हे या माहितीपटाचे दिग्दर्शक आहे. प्रिजन सॉग्स प्रेक्षकांना आवडण्यामागची अनेक कारणं आहेत. एक तर जगभरात कुठेच होत नाही असा प्रयोग प्रिजन सॉग्सच्या माध्यमातून करण्यात आलाय. थेट तुरुंगात जाऊन तिथल्या कैद्यांशी संवाद साधण्याचा आणि त्यांची कथा गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा हा प्रयोग होता. तसा हा प्रयोग नवाच. म्हणजे या माहितीपटातले सर्वच कैदी वेगवेगळ्या आरोपाखाली शिक्षा भोगतायत. आपण केलेला गुन्हा आणि त्यावर आता होणारा पश्चाताप आणि समाजानं आपल्याकडे आयुष्यभर गुन्हेगार म्हणून पाहू नये यासाठी केलेली याचना, असं या गाण्यांचं स्वरुप आहे. 


या माहितीपटाचे निर्माते हैरी बार्डवेल यांनी म्हटलं की, “हे काहीसं महात्मा गांधींच्या तत्वावर चालण्यासारखं होतं. एखाद्याकडून गुन्हा झाला किंवा त्यानं केला तर पुन्हा समाजात त्याची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांना एक संधी देणं आवश्यक असतं. मी ऐकलंय तुमच्याकडच्या कैंद्यांसाठी महात्मा गांधींच्या पुस्तकावर परिक्षा वैगरे घेतली जाते. समाजात पुनर्प्रस्थापित होण्यासाठी आणि कैद्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी ते महत्वाचं माध्यम ठरतंय. आमची प्रिजन सॉग्स ही डॉक्युमेन्टरीही याच प्रयोगाचा भाग आहे म्हणा. हे थोडसं भारतीय कनेक्शन असल्यासारखं आहे.”

प्रिजन सॉग्स निर्मितीची प्रक्रिया तेवढी सोपी नव्हती. ऑस्ट्रेलियातल्या उत्तरेला एकूण लोकसंख्यच्या ३० टक्के लोक राहतात. इथल्या तुरुंगात ८० टक्के कैदी हे स्थानिक आहेत. ते इथले मुळ निवासी आहेत. यांच्या तुरुंगात येण्याच्या कथा चित्रविचित्र आहेत. परिस्थितीजन्य आहेत. यावरच संगीत आणि गाण्याच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचं काम प्रिजन सॉग्सच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं, त्यासाठी जेल ऑथोरिटीशी संपर्क साधून, संबंधित परवानग्या मिळवून, कैद्यांची निवड आणि त्याचं ट्रेनिंग असं सर्व करायला सुमारे एक वर्षभराचा कालावधी गेला. ड्राविन भागातल्या बिरमाह तुरुंगाची निवड करण्यात आली. ही ऑस्ट्रेलियातली पहिली म्युझिकल डॉक्युमेन्टरी ठरणार होती. यामुळं त्याचं संगीत आणि गाणी ही महत्वाची होती. 


कैद्यांच्या भावना, त्यांना आपल्या गुन्ह्याबद्दल वाटणारी लाज, त्यांचा तुरुंगातला अनुभव हे सर्व सांगितिकरित्या पडद्यावर साकारत होतं. शेकडो कैद्यांच्या मुलाखतींनंतर अगोदर २२ आणि सरते शेवटी ९ कैद्यांची प्रिजन सॉग्ससाठी निवड झाली. जगभरातल्या माहितीपटांच्या महोत्सवात प्रिजन सॉग्सनं बाजी मारलीय. या क्षेत्रात सर्वाधिक महत्वाचा समजला जाणारा बेनिफ मीडीया फेस्टीवलमध्ये मानवतावादी आणि शोध विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. शिवाय ऑस्ट्रिलियातल्या डिरेक्टर्स गिल्डचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला. हे एक मोठं यश होतं.

प्रिजन सॉग्सला मिळालेल्या यशानंतर बियॉन्डनं ऑस्ट्रेलियाबाहेर ही माहितीपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी भारत हे चांगलं ठिकाण असल्याचं हॅरी बार्डवेल सांगतात. ते म्हणतात “ भारतीय समाजात असलेली विविधता हा एक जागतिकदृष्टीनं खजिना आहे. यामुळं इथल्या सामाजिक माहितीपटांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी बियॉन्ड नक्कीच प्रयत्न करेल. मिफमध्ये आम्ही अश्याच लोकांना भेटतोय”

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माहितीपटाचं मार्केट खूप मोठं आहे. जगभरातल्या नावाजलेल्या फिल्म फेस्टीवलमध्ये माहितीपटांना मागणी असते. त्यांचा विशेष विभाग असतो. यामुळं भारतीय माहितीपटांना चांगली मागणी येऊ शकते असा विश्वास हॅरी बार्डवेल यांना वाटतोय. यासाठीच ते सध्या चांगल्या भारतीय माहितीपटांच्या शोधार्थ आहेत. बियॉन्ड ही भारतीय माहितीपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलं. यासाठी सध्या त्यांची चाचपणी सुरु आहे. भारतीय कंपन्या किंवा स्वतंत्रपणे माहितीपट बनवणाऱ्या निर्मात्यांना बियॉन्डशी जोडण्याचा हॅरी यांचा प्रयत्न आहे. यामुळं मिफ २०१७ मध्ये बियॉन्डची निर्मिती असलेला माहितीपट पहायला मिळेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.

Related Stories

Stories by Narendra Bandabe