महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जपणारी संस्था - ʻगडवाट- प्रवास सह्याद्रीचाʼ

महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जपणारी संस्था - ʻगडवाट- प्रवास सह्याद्रीचाʼ

Friday December 11, 2015,

6 min Read

सह्याद्री म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते गडकिल्ले आणि गडकिल्ले म्हटले की नजरेसमोर उभे राहतात ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर क्रांतीची ज्योत तेवत ठेवणारे, इथल्या माणसामाणसात चेतना निर्माण करणारे असे असामान्य युगपुरुष म्हणजे शिवराय. या शिवरायांमुळेच सोनेरी महाराष्ट्र घडला, त्यांच्या प्रेरणेमुळेच येथील तळागाळातील सामान्य माणसाने जुलमी सत्तेविरोधात रणांगणात लढा दिला आणि अभेद्य राहिला. शिवरायांबद्दल लिहायचे झाले तर शब्दच अपुरे पडतील, त्यांची प्रेरणा आजही जगभरातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनी घेतली आहे. शिवकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत महाराष्ट्रात अनेक संत, पराक्रमी मावळे, युगपुरुष जन्माला आले. याच महाराष्ट्राची ही यशोगाथा आणि येथील अनमोल भूमीपुत्रांची माहिती जगात पसरविण्याच्या निर्धाराने ʻगडवाट- प्रवास सह्याद्रीचाʼ संस्था सुरू झाली. आजमितीला ʻछत्रपती शिवराय आणि त्यांचे विचारʼ, हा या संस्थेतील सर्वांना जोडून ठेवणारा एकमेव दुवा आहे. शिवरायांच्या समाजोद्धारक विचारांचा वारसा जपताना ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक कार्य़ात कायमच आपले योगदान देत असते.

image


पुणे येथील राहुल बुलबुले, संभाजी जाधव आणि त्यांच्या काही मित्रांनी भटकंतीच्या उद्देशाने फेसबुकवर सुरू केलेल्या ʻगडवाट - प्रवास सह्याद्रीचाʼ या ग्रुपचे आता एका संस्थेत रुपांतर झाले आहे. गडकिल्ले फिरण्याच्या आणि त्यांना जाणून घेण्याच्या छंदातून १७ जुलै २०११ रोजी या परिवाराची स्थापना झाली. ʻगडवाट - प्रवास सह्याद्रीचाʼ या नावातच या परिवाराची खरी ओळख सामावली आहे, असे सांगताना या संस्थेचे सभासद सांगतात की, ʻसिमेंटच्या जंगलांना सावत्र नजरेने पाहत सह्याद्रीतील पर्वतरांगावर उभ्या असलेल्या गडकिल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या तमाम जिवलगांची नाळ जोडून तयार झालेला गडवाटचा परिवार आहे. गडवाटची सुरुवात फेसबुकवरील एक ग्रुपशी झाली. आजमितीला या संस्थेत अनेक तरुण-तरुणी कार्यरत असून, संस्थेने यशस्वी चार वर्षेदेखील पूर्ण केली आहेत. निव्वळ भटकंतीच्या उद्देश्याने सुरू करण्यात आलेल्या या गटाचा उद्देश कालांतराने मागे सरला आणि गडकिल्ल्यांचे उद्गाते छत्रपती शिवाजी महाराज, हा विचार संघटनेतील सर्वांना एकत्र बांधुन ठेवणारा दुवा बनला. समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत महाराजांचे विचार पोहोचवणे, महाराजांचे विचार केवळ प्रबोधनातूनच नव्हे तर कृतीतून लोकांमध्ये रुजवणे, ही संस्थेच्या स्थापनेमागील संकल्पना आहे.ʼ

image


संस्थेच्या स्थापनेपासून ते आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना ते सांगतात की, ʻछंदापायी गडकिल्ल्यांची भटकंती करत असताना हळूहळू आम्हाला सह्याद्रीतील गडकिल्ल्यांबद्दल आपुलकी निर्माण होत गेली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गडकिल्ल्यांकडे पर्यटन स्थळ, सहलीचे ठिकाण म्हणून पाहणाऱ्या लोकांमध्ये तसेच किल्ल्यांना भेट देणाऱ्या लोकांमध्ये आत्मीयता निर्माण करण्याचा प्रयत्न फेसबूक या समूहसंपर्क माध्यमाद्वारे करण्यात आला. त्यासाठी २०१२ साली १९ फेब्रुवारीचा शिवजयंतीचा मुहूर्त साधुन पहिली मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेकरिता लोणावळ्यानजीक बेजबाबदार पर्य़टकांच्या जाळ्यात अडकलेल्या किल्ले लोहगडाची निवड करण्यात आली. या किल्ल्यावर फलक मोहिम राबविण्यात आली. तसेच श्रमदानाच्या माध्यमातून किल्ल्याची साफसफाई करण्यात आली आणि तेथील महादेवाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या मोहिमेद्वारेच आमच्या विचारांशी एकरुप असलेले अनेक सदस्य एकएक करुन भेटायला सुरुवात झाली आणि गडवाटचा परिवार विस्तारत गेला.ʼ

image


वर्तमानात जगत असताना भूतकाळाशी आपली असलेली नाळ तुटू द्यायची नाही या विचारांशी सर्व सदस्यांचे एकमत झाल्यानंतर गडवाटच्या सदस्यांनी विस्मृतीत चाललेल्या ऐतिहासिक दिनविशेषांना पुन्हा एकदा उजाळा द्यायचे ठरविले. म्हणून त्यांनी राजमाता जिजाऊ जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, शिवराज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा यांसारखे उत्सव साजरे करणे तसेच पुण्यतिथी दिनी मानवंदना देऊन आठवण ठेवणे, असे गडवाटने ठरवले. तसेच हे उत्सव धोपटमार्गाने साजरे न करता, समाजप्रबोधनाचे कार्य करण्याचे गडवाटने ठरविले. २०१३ सालची शिवजयंती त्यांनी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ʻसन्मतीʼ या पुण्यातील अनाथाश्रमात, २०१४ची शिवजयंती सातारा येथील बालसुधारगृहात तसेच २०१५ सालची शिवजयंती महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या ʻआधारतीर्थʼ आधाराश्रमातील अनाथ मुलांसोबत साजरी केली. ʻगडवाट - प्रवास सह्याद्रीचाʼ, ही संघटना महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, पोवाडे, मार्गदर्शनपर व्याख्याने यांच्या माध्यमातून मुलांच्या बालमनावरच चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करते. जेणेकरुन प्रत्येक मूल स्वःकृर्तृत्वावर उभे राहिल आणि एक सुजाण भारतीय नागरिक बनेल, असा या संघटनेचा स्वार्थ हेतू असल्याचे संघटनेचे सदस्य सांगतात. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपताना गडवाट संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यात मुंबईतील मानव सेवा संघातील अनाथ मुलांना खाऊ आणि कपड्यांचे वाटप, शिवनेरी गडाजवळील निजामपूर गावातील शाळेला ग्रंथदिंडीची भेट, २०१३ साली दुष्काळग्रस्त खटाव तालुक्यातील डिकसळ गावातील जनावरांच्या छावणीला एक टन चारा आणि पाण्याचा टॅंकरची मदत, या कार्यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. याशिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी दरवर्षी गडवाट परिवार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत असतो.

image


सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक वारसा जोपासण्यात देखील गडवाटचा परिवार कायम अग्रणी असतो. या संस्थेमार्फत दरवर्षी दसऱ्याच्या सणाला महाराष्ट्रभर गडकिल्ल्यांवर तोरण लावले जाते. तर दिवाळीनिमित्त शिवस्मारकाच्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय २०१५ सालापासून राजमाता जिजाऊ जयंतीच्या दिवशी जन्मलेल्या बालिकांसाठी प्राथमिक संगोपनाचे किट तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येते. या उपक्रमाद्वारे ते स्त्री शक्तीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. या वर्षी संभाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनानिमित्त रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीतील शाळेला ग्रंथदिंडी भेट देऊन, राज्यभिषेकदिन साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी गडवाटतर्फे त्यांच्या तुळापूरयेथील समाधीस्थळावर रक्तदानाचा कार्य़क्रम आयोजित केला जातो. मुंबईतील पर्यटन स्थळ असलेल्या जुहु चौपाटी येथील दुर्लक्षित शिवस्मारकाची गेली चार वर्षे दर दोन ते तीन महिन्यांनी गडवाट संस्थेतर्फे साफसफाई करण्यात येते.

image


शिवरायांचे विचार घरोघरी पोहोचावेत म्हणून गडवाट संस्था महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध इतिहास अभ्यासकांची व्याख्याने आयोजित करते. सह्याद्री आणि गडकिल्ले ही आपलीच जबाबदारी आहे, त्यांचे संगोपन संवर्धन हे आपले कर्तव्य आहे, अशी या संस्थेची भूमिका आहे. म्हणूनच गेली ४ वर्षे गडवाट संस्था अनेक किल्ल्यांवर उन्हाळ्यादरम्यान ʻसह्याद्री स्वच्छता मोहीमʼ राबविते. तसेच निसर्गाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी विविध किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावात, किल्ले परिसरात वृक्षारोपण तसेच बीजरोपण या मोहिमा राबवल्या जातात. सह्याद्री स्वच्छता अभियाना अंतर्गत कलावंती बुरुज, किल्ले प्रबळगड, किल्ले चंदेरी, किल्ले पेब, किल्ले इरशाळगड, किल्ले मल्हारगड, कास तलाव आणि परिसर तसेच किल्ले अंजनेरी या किल्ल्यांवर सफाई करण्यात आली. तर निसर्ग संवर्धन बीजरोपण मोहिमेअंतर्गत, किल्ले इरशाळगड, माणिकगड, कर्नाळा, टकमक किल्ला (विरार), गंभीरगड, प्रबळगड, राजगड, वर्धनगड, कावनई किल्ला, अंजनेरी, रामशेज ह्या किल्ल्यांवर झाडे लावण्यात आली तसेच बीजरोपण करण्यात आले, असे या संस्थेचे सदस्य सांगतात.

आजवरच्या या प्रवासात आलेल्या कडूगोड अनुभवांबद्दल बोलताना गडवाटचे शिलेदार सांगतात की, ʻहा प्रवास करताना अनेक बरे-वाईट अनुभव आले. चांगल्या अनुभवांनी मनाला उभारी दिली तर वाईट अनुभवांनी पुढची वाटचाल कशी करावी, हे शिकवले. गड- किल्ल्यांवरचे प्रेम, त्यांच्याबद्दलची आस्था, तळमळ हे आम्हा सगळ्यांमधील साम्य आहे. गडवाटच्या अगदी पहिल्या कलावंतीणच्या मोहिमेपासून ते अगदी काल-परवाच्या हरिहरगडाच्या मोहिमेपर्यंत, आम्हाला आमच्यात हेच साम्य दिसत होते.ʼ गडवाट संस्थेला एकूणच सर्वच स्तरातून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. वेळोवेळी संस्थेनेसुद्धा आपल्या कामाचे अभिप्राय लोकांकडून घेण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. ज्या चुका होत असतील त्या दुरुस्त करून, संस्थेतील माणसांना सोबत घेऊनच पुढे जायचे ही गडवाटची परंपरा आहे. संस्था असो वा व्यक्ती, समाजाशिवाय आपण सगळे कायमच अपूर्ण असतो. याच समाजाप्रती काम करताना जेव्हा आपण एक पाऊल उचलतो, तेव्हा समाज मदतीसाठी चार पाऊले चालून पुढे येतो, हेच सह्याद्रीतल्या विविध मोहिमामध्ये जाणवल्याचे संस्थेचे सभासद सांगतात. आजच्या तरुण पिढीला गडवाट संस्थेतील काही सदस्य सल्ला देतात की, वर्तमानातील घर, कार्यालय, काम, जबाबदाऱ्या सांभाळून महिन्याकाठी किमान एका किल्याला तरी भेट द्या. भेट देणे म्हणजे अर्थात एक सहल नसावी, किमान गडकिल्ल्यांच्या बाबतीत तरी. किल्यांच्या बाबतीत थोडेसे वाचून जा, किल्ल्यांचा अभ्यास करा, शोध घ्या, किमान एक तरी किल्ला डोळस पद्धतीने अभ्यासा, किल्ल्याचे अवलोकन करताना किल्ल्याला किंवा परिसराला तुमचा कोणताही त्रास होणार नाही, कचरा पसरणार नाही याची विशेष खबरदारी घ्या, कोणतेही अतिसाहस करू नका, किमान काही तास तरी तो किल्ला जगून बघा, घरी परतल्यावर त्या किल्ल्याची माहिती, तुम्ही केलेल्या अभ्यासाचे मुद्दे कागदावर किंवा संगणकावर उतरवुन काढा. ती माहिती मित्रांना सांगा, पोस्ट करा, ब्लॉग लिहा, माहिती संकलित करा. पुढच्या वेळी त्याच किल्ल्याला भेट देणाऱ्या कोण्या नव्या भटक्याला तुमची माहिती उपयोगी पडेल. तसेच आजकालच्या तरुण पिढीने भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगतात. आजच्या तरुण पिढीने भरपूर वाचन करायला हवे. वाचन मग ते फक्त एकाच कोणत्या विषयाचे नसून, विविध विषयांचे असावे. विविध विषय हाताळा, वाचा, स्वत:ला प्रश्न विचारा, त्यांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न करा. इतिहासाप्रति आवड निर्माण करा.

image


आपल्या महाराष्ट्राचा, भारताचा वैभवशाली इतिहास फेसबुक, व्हॉटसअपच्या माध्यमातून अभ्यासू नका. इतिहासाची साधने तपासा, पत्रे शोधा त्यांचे अनुवाद वाचा आणि त्यानंतर सुद्धा स्वत: मधला वाचक कायम जिवंत ठेऊन इतिहासाचे अवलोकन करा, असा सल्ला ते आजच्या तरुणांना देतात.