स्वप्ने बघत रहा, जो पर्यंत ती खरी होत नाहीत.

0

युक्ती मेहंदीरत्ताची अनेक रूपे आहेत. एक उद्योजिका, दोन जुळ्या मुलांची आई, मॉडेल किंवा टीव्ही अँकर. परंतु आपल्या उद्योगाच्या माध्यमातून मुलांसाठी काहीतरी करण्यातच त्यांना सर्वाधिक समाधान मिळते. आपल्याला जे काम अगदी मनापासून करावेसे वाटते तेच काम आपण करत आहोत याचा त्यांना मोठा आनंद आहे. या कामाच्या माध्यमातून मुलांच्या जीवनात थोडेफार बदल घडवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

२००८ मध्ये त्यांनी Mrs Gladrags जिंकले होते. हा स्पर्धेतील दुसरा पुरस्कार. मात्र हा केवळ योगायोगाचा भाग असल्याचे त्या सांगतात. ‘युअर स्टोरी’ सोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी आपल्या उद्योगातील आणि इतर अनेक यशाबाबत सांगितले. आजकालच्या महिला इतक्या मागे का या विषयावर देखील त्यांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांची आगळी कहाणी.

'मी लवकर वयस्कर झाले'

माझे आई-वडिल दोघेही नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित घराची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकलेली होती. त्यांपुढे तसा दुसरा पर्याय देखील नव्हता. कारण घरात आम्हा तीन बहिणींमध्ये मीच सर्वात मोठी होते. शाळेतून आल्यानंतर मी कशा प्रकारे स्टूलवर उभी राहून गॅस शेगडी पेटवत असे. शिवाय घराच्या दरवाज्याला मी कसे बाहेरून कुलूप लावत असे हे मला आजही लख्ख आठवते.

मी तक्रार करत आहे असे समजू नका, परंतु मला कुठेतरी मनातून वाटते की मी माझ्या जीवनात लहानपणी मुलांच्या वाट्याला येणारे सुखाचे दिवस मनमोकळेपणाने अनुभवलेच नाही, त्यांचा आनंद मला इतर मुलांसारखा पाहिजे तसा घेता आला नाही. आम्ही लहानपणापासून विमान प्रवास करत असू. माझ्यासाठी ते अप्रूप राहिले नव्हते. परंतु कालांतराने मी किशोर वयीन झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा विमानात बसले तेव्हा मी असे दाखवले की या अगोदर मी भरपूर वेळा विमानात बसले आहे आणि असे वागले की जणू काही विमान प्रवास माझ्यासाठी मुळीच नवीन नाही. अशा प्रकारे परिपक्व आणि शिष्टाचाराला धरून माझी वागणूक दिसावी म्हणून मी माझ्या बालपणाच्या भोळ्या उत्साहाचा आणि अल्लडपणाचा गळा मात्र घोटून टाकला. मी तो विमानप्रवासाचा आनंद उपभोगू शकले नाही. मला माझे बालपण जगता न आल्याची सल माझ्या मनात कायम रूतून राहिलेली आहे. आणि याच कारणाने माझ्या मनात लहान मुलांसाठी कायम आकर्षण निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा मी मुलांना बागडताना, चित्रविचित्रपणे मनमोकळेपणाने, अल्लडपणे वागताना पाहते तेव्हा माझ्यात वेगळाचा आनंद आणि उत्साह संचारतो.

‘आर्मी पब्लिक स्कूल’मधून विज्ञान या विषयासह मी माझे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्या नंतर पुढच्या शिक्षणासाठी मेडिकल आणि इंजिनिअरींग या दोन अभ्यासक्रमांपैकी एकाची मला निवड करायची होती. मी इंजिनियरींग निवडले आणि 'बी ग्रेड'च्या शाळेत प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाले. पण मला तिथे शिकायचेच नव्हते. मोठ्या कष्टाने मी माझ्या आई-वडिलांचे मन वळवले आणि दुसरा सर्वात चांगला पर्याय निवडला. अर्थात, मी दिल्लीतील ‘एमसी’मधून गणित विषय घेऊन पदवी अभ्यासक्रमाचा अभ्यास सुरू केला.

त्यानंतर मी ‘एमबीए’ करण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आले. आपल्या प्रोजेक्टच्या कामासाठी मला इकडे तिकडे फिरावे लागले. त्यावेळी गल्लीबोळात, फुटपाथवर जगण्यासाठी संघर्ष करणारी, कसेबसे आपले अर्थहीन जीवन जगणारी मुले मला दिसली. ती दृश्ये पाहून त्यांच्या प्रति माझ्या मनात असलेल्या कोमल भावनांचे रूपांतर चिंतेमध्ये झाले.

'Mrs Gladrags, 2008'

माझे स्वप्न पूर्ण झाले असे मी म्हणणार नाही. कारण मी असे कोणते स्वप्न पाहिलेलेच नव्हते. हे पूर्णपणे आकस्मिक घडले होते. योगायोगानेच मी हे लक्ष गाठू शकले होते. मी ‘मिसेस ग्लॅडरॅग्ज २००८’ या स्पर्धेबाबत बोलत आहे. त्याचे झाले असे, की एका इन-फ्लाईट मॅगझिनमधून माझ्या पतीने 'मिसेस इंडिया' चा फॉर्म काढला आणि आम्ही तो भरून पाठवला. जर माझ्या पतीने मला प्रोत्साहन दिले नसते आणि मुबई ते दिल्लीच्या त्या दोन तासांच्या उड्डाणादरम्यान करण्यासाठी काही आणखी असते, तर मी या संधीचा फायदा घेण्याबाबत कधी विचारच केला नसता. योगायोगाने माझ्यासोबत माझे काही फोटो होते. मी सहज तो फॉर्म भरला, फोटो चिकटवले आणि पाठवून दिले. त्यानंतर ‘मिसेस ग्लॅ़डरॅग्ज २००८ हा किताब पटकावण्यापर्यंत पुढील गोष्टी आपोआप घडत गेल्या.

काही विचार करण्याच्या आधीच मी मुंबईला आले आणि 'Gladrags' ने आयोजित केलेल्या एका महिन्याच्या कार्यशाळेत सहभागी झाले. अंतीम फेरीच्या अगोदर या कार्यशाळेत उपस्थित राहणे एक अनिवार्य पायरी मानली जाते. ज्या प्रकारे मी तेथील लोकांना भेटू शकले आणि ज्या प्रकारे मी माझी वेळ तिथे घालवू शकले. त्यावरून तिथे घालवलेला एक महिन्याचा कालावधी माझ्यासाठी खूपच लाभदायक सिद्ध झाला. त्या एका महिन्यात मला माझ्यातील क्षमता आणि शक्तीची पारख करण्याची संधी मिळाली. अंतीम पाच स्पर्धकांसाठी पार पडलेल्या प्रश्नोत्तराच्या फेरीत माझा सामना राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीमत्वांचा समावेश असलेल्या जूरींसोबत झाला. त्यांच्या समोर पोहोचल्यानंतर ‘काहीही अशक्य नाही’ या घासून गुळगुळीत झालेल्या म्हणीच्या सत्यतेवर माझा पूर्ण विश्वास बसला. आपण स्वत:च गोष्टी शक्य किंवा अशक्य बनवतो हेच खरे.

संकल्पना प्रदर्शने

मी माझ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत: व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया नंतर मग उद्योजकतेची सुरूवात जवळजवळ आपोआपच झाली. ‘सिटी’ आणि ‘बर्कले’ बँकेत दहा वर्षे यशस्वीपणे काम केल्यानंतर आणि मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर सुद्धा मला तिथे खूपच बंदिस्त वाटत होते. मला माझे पंख पसरून उडायचे होते. एक दिवस अचानक मी बंधनमुक्त होण्याचा विचार केला आणि राजीनामा देऊन मोकळी झाले. पुढे काय करायचे याबाबत निर्णय घेणे खूपच सोपे होते- मला निश्चितच मुलांसाठी काहीतरी करायचे होते.

मुलांची अधिकतर प्रदर्शने म्हणजे केवळ शोरूम्स आणि शॉपिंग मॉल्सचा एक विस्तारीत भाग असतो. तिथे चारी बाजूंना आपल्या चमकदार उत्पादनांचे प्रदर्शन करणारे व्यापारी असतात. तिथेच लिहिण्या-वाचण्याच्या वस्तू विकल्या जातात. मी त्या जागेत एक ताजेपणा, एक जीवंतपणा आणू इच्छित होते.

‘संकल्पना प्रदर्शने’ ही भारतीय मुलांचा समग्र विकास आणि सार्थक उन्नतीसाठी काम करणारी, योजनाबद्ध पद्धतीने प्रदर्शने आयोजित करणारी कंपनी आहे. संकल्पना प्रदर्शनाची मुख्य दोन अंगे आहेत: एक म्हणजे प्रयोगात्मक उत्सव असलेली ‘मुलांची जत्रा’. या जत्रेच्या व्यासपीठाचा उपयोग करत आम्ही विविध व्यक्ती आणि कंपन्यांना आमंत्रित करतो. इथे या कंपन्या मुलांचा मानसिक, शारीरिक आणि भावनिक विकास लक्षात ठेवून तयार करण्यात आलेल्या आपल्या नव्या आणि आगळ्यावेगळ्या अशा उत्पादनांचे प्रदर्शन करतात. दुसरे म्हणजे 'सी-एंगेज' (C-Engage). सी-एंगेजचे आयोजन कॉर्पोरेट दाते वा सीएसआर करतात. या द्वारे आम्ही मुले आणि त्यांच्या समाजासोबत आम्ही सतत संपर्क ठेवून असतो. त्यांच्याशी चर्चा करून त्याना मदत करण्याचा प्रयत्न करतो. कॉर्पोरेट दात्यांकडून करण्यात येणा-या सकारात्मक सामाजिक हस्तक्षेपाचा परिणाम काय झाला याचे विश्लेषण आम्ही करतो. त्यासाठी विश्लेषण अहवाल तयार करून त्याचे मुल्यांकन करण्याच्या हेतूने आम्ही प्रतिकृती सुद्धा तयार करतो.

सुरूवातीचे चढ-उतार

‘मुलांची जत्रा’ या संकल्पनेला केवळ शॉपिंग मॉलच्या विस्ताराच्या स्वरूपापासून दूर ठेवत, तिला मुलांच्या सर्वांगिण विकासाशी संबंधित असलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे एक व्यासपीठ बनवण्यासाठी मी अथक प्रयत्न केले. माझा असा प्रयत्न असतानाही लोक ‘मुलांची जत्रा’ या कार्यक्रमाची तुलना एका सामान्य जत्रेसोबत करतात. यामुळे प्रायोजक मिळवणे आणि आमच्या योजनेत गुंतवणूक करता यावी या हेतुने कॉर्पोरेट दात्यांना आकर्षित करण्याच्या कामातील हाच सर्वात मोठा व्यत्यय बनला आहे. परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. कारण मला विश्वास आहे की एक ना एक दिवस आमच्या योजनेबाबत काही लोकांच्या मनात असलेला संशय पूर्णपणे निघून जाईल आणि येणा-या पिढ्यांचा विकास आणि त्यांच्या उन्नतीसाठी आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतील.

आपल्या उद्योगाला एक स्वीकारण्याजोगा आकार देण्यासाठी मला अनेक आव्हानाना समोरे जावे लागले. माझ्या महत्त्वाच्या नाते-संबंधांची कसोटी लागेल अशी ही वेळ आली होती. ज्यांच्याकडे मी मदत मागितली त्यांपैकी अनेकांनी मला सांगितले की मी चुकीचा मार्ग निवडला आहे आणि पश्चातापाशिवाय माझ्या समोर आता कोणताही मार्ग उरलेला नाही. जे काम कुणीही करण्याचे प्रयत्न केले नसताना, ते काम सुरू करून मी स्वत:ला अडचणीत टाकले आहे अशा प्रतिक्रियाही त्यांनी दिल्या. मला आर्थिक अडचणीचा सुद्धा सामना करावा लागला. यामुळे शेवटी मला माझ्या आई-वडिलांकडे आर्थिक मदत मागावी लागली.

अशा परिस्थितीत समस्येने अत्यंत बिकट रूप धारण केले होते. परंतु कसेही करून माझे स्वत्व सुरक्षित राहिले आणि माझ्या मनाची शांती आबाधीत राहिली. जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला आश्चर्य वाटते, की बिकट आर्थिक स्थिती आणि कुठूनही कसली मदत अथवा आश्वासन मिळत नसतानाही मी इतक्या कठीण परिस्थितीतून सहीसलामत कशी काय बाहेर पडू शकले. मला वाटते की असे क्षणच आपल्या संयमाची परीक्षा घेतात आणि आपला आपल्यावर किती विश्वास आहे, आपण आपल्या कामाच्या प्रति किती उत्साही आणि वचनबद्ध आहोत हे दर्शवतात.”

व्यक्ती एक, रूपे अनेक

‘संकल्पना प्रदर्शने’ या संकल्पनेच्या व्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून मी काही इतरही कामे करत असते. मी ‘अक्वाक्राफ्ट’ नावाच्या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करते. इथे कंपनीला व्यापार विकास आणि ग्राहक संपर्काबाबत सल्ला देणे ही माझी जबाबदारी आहे. ही कंपनी ग्रामीण आणि वंचीत समाजाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावांमध्ये पाण्याच्या मशीन ( वॉटर एटीएम) बसवणे, आणि शौचालये उपलब्ध करण्याचे काम करते.

कधी कधी मी टीव्हीवर प्रसारीत होणारे कार्यक्रम आणि समारंभाचे अँकरिंग करण्याचे काम सुद्धा करते. यामुळे माझी लोकांना भेटण्याची इच्छाही पूर्ण होते आणि माझे मूळ काम असलेले ‘संकल्पना प्रदर्शने’च्या कार्यासाठी प्रायोजक मिळवून देतील अशा प्रभावी लोकांना भेटण्याची संधीही मला मिळते.

महिला सर्व काही करू शकतात?

मूळात महिला सर्व कामे एकदाच करण्यासाठी जन्माला आलेल्या नाहीत. वास्तविक पाहता जगाचा अनुभव आणि ज्यांचा ती ताळमेळ बसवते अशा परिस्थिती तिला अनेक कामे एकाच वेळी करण्या योग्य बनवतात. आणि मी सांगते, की हे काम मुळीच सोपे नसते. ज्या व्यक्तीवर माझे प्रेम होते त्याच व्यक्तीशी माझा विवाह झाला. माझ्या पतीचे लालनपालन अशा घरात झाले जिथे एकच पालक कमावत होते. यामुळे मला माझे कुटुंब आणि पती यांचे संपूर्ण सहकार्य आणि आपल्या कामात व्यस्त राहण्यास अनुकूल असे वातावरण मिळाले. तरी सुद्धा माझ्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षांच्या तुलनेत माझे कुटुंबच माझी प्राथमिकता असेल हे सुद्धा मला सिद्ध करावे लागले.

आपल्या मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी कुण्या मोलकरणीच्या किंवा तत्सम महिलेच्या विश्वासावर सोडणारी मी एक वाईट आई आहे याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग आले. मी ठामपणे मानते की एक आई किंवा पत्नी म्हणून आपल्या कुटुंबाची देखभाल करणे आणि कुटुंबातील सदस्यांच्या सुख-दु:खाची काळजी वाहणे हे माझे कर्तव्य आहे. मला वाटते की जर आपले आई-वडिल आपल्याला चांगल्यातले चांगले शिक्षण देण्यासाठी जीवनभर कष्ट करत असतील, तर आम्हाला त्या ज्ञान, शिक्षण आणि विवेकाचा उपयोग आपल्या हितासाठी, तसेच जितके शक्य आहे तितके समाजाच्या भल्यासाठी सुद्धा केला पाहिजे.

स्वप्नांचा पाठलाग

मला वाटते की महिलांचे जीवन हे अनेक अपेक्षांच्या दबावात असते. यांपैकी बहुतेक अपेक्षा या त्यांची स्वत:ची निर्मिती असते. प्रत्येक महिलेची कहाणी वेगळी असते आणि त्यांच्या जीवनात येणा-या व्यक्ती आणि परिस्थिती सुद्धा वेगळ्या असतात. परंतु दुस-यांसाठी जगणे हे सर्व महिलांसाठी सारखेच असते. पहिल्यांदा आई-वडिलांसाठी, नंतर पतीसाठी आणि मुलांसाठी- जणू काही सर्वच महिलांच्या कपाळावर लिहिलेल्या रेषा सारख्याच असाव्यात, डीएनए एकच असावा. महिलेने स्वत:बद्दल विचार करणे हा सर्वात मोठा स्वार्थ मानला जातो, जणू काही ते भयानक स्वरूपाचे पापच आहे.

कधी-कधी सर्व बाजूंनी मदत आणि पाठिंबा मिळत असताना देखील आपण आपल्या स्वप्नांना साकार करण्यात अयशस्वी होतो ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण स्वत:ला स्वप्न पाहण्याची परवानगीच दिलेली नसते. आपण एक चांगली आई, चांगली पत्नी किंवा सून आहोत हे प्रत्येक वेळी सिद्ध करण्याची आपली जबाबदारी आहे या अनावश्यक भाराला महिलांनी उतरवून फेकून द्यावे. कारण जेव्हा आपण आपल्या आत असलेल्या उत्कट इच्छांना व्यक्त करू शकलो आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून कसून प्रयत्न केले, तर तो आवेग स्वाभाविकपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा वाहू लागेल. आणि मग तेव्हा कोणत्याही प्रकारचा दिखावा किंवा ढोंग होणार नाही. तसेच आपण आपले जीवन ख-या अर्थाने जगू शकू.

तेव्हा कृपा करून स्वप्ने बघत रहा, तो पर्यंत, जो पर्यंत ती खरी होत नाहीत.


worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe