स्पा आणि सलून्सना ऑनलाईन व्यासपीठ देऊन ग्राहकांची सोय करणारी ‘स्टायलोफी’

0

आजच्या आधुनिक काळात माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला आहे. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे चांगलं दिसण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. यासाठी स्पा आणि सलूनकडे लोक वळू लागले आहेत. त्यासाठी ग्राहकांना उपयुक्त असे स्टार्टअप्सही सुरू झालेत...असंच एक स्टार्टअप आहे गुरगावमधील स्टायलोफी(stylofie)... स्टायलोफी हे तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेलं सौंदर्य आणि आरोग्यविषयक स्टार्टअप आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील स्पा आणि सलूनसाठी ही एक ऑनलाईन बाजारपेठ आहे. सध्या हे स्टार्टअप गुरगावमध्ये काम करतंय आणि १०० चांगले स्पा आणि सलून त्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. हे एक असं व्यासपीठ आहे ज्याद्वारे ग्राहकांना संशोधन, तुलना, समीक्षा, वेबसाईट आणि मोबाईल ऍप बुकिंग तसंच त्याचे पैसेही देता येतात. स्टायलोफीच्या मदतीनं ग्राहकाला त्यांच्या पसंतीची सौंदर्यविषयक उपचार पद्धती, त्यांचं ठिकाण आणि सलूनची निवड करता येते. तसंच त्यांच्या सोयीनं तारीख आणि वेळही ठरवता येत असल्यानं ग्राहकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे. या स्टार्ट्अपमध्ये नुकतीच हाँगकाँगमधील स्वस्तिका कंपनीनं २ लाख ५० हजार अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.


प्रतीक अग्रवाल आणि सौरव डे या गुरगावमधील मॅनेजमेंट डेव्हलपटमेंट इन्स्टिट्यूटच्या दोन विद्यार्थ्यांनी ऑगस्ट महिन्यात स्टायलोफीची सुरूवात केली. स्टायलोफीची स्थापना करण्यापूर्वी प्रतीक यांनी एयरटेल, व्हिडिओकॉन आणि टेलिकॉम ओमानसारख्या दूरसंचार कंपन्यांमध्ये काम केलंय. तर सौरव यांना इंगरसोल-रँड, ऍक्सेंच्युअर, जेनपॅक्ट यासारख्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव आहे. आसपासच्या परिसरात स्पा नसल्यानं स्टायलोफीची संकल्पना या दोघांच्या मध्यरात्रीच्या संभाषणातून जन्माला आली. स्पामध्ये जाण्यासाठी मी कायम उत्सुक असतो पण नवीन स्पा शोधण्यासाठी ऑनलाईन माहितीच उपलब्ध नसायची असं प्रतीक सांगतात.

यावर चर्चा झाल्यानंतर मग त्यांनी संशोधन सुरू केलं. त्यानंतर केलेल्या सर्वेक्षणातून त्यांना प्रतीकसारख्याच अडचणींचा सामना करणारे अनेक लोक भेटले. यातील अनेकांना स्पाबाबतच्या सोयीसुविधा, अनुभव आणि लागणारा पैसा याची माहितीच उपलब्ध नव्हती. सौरव यांच्या मते सौंदर्य आणि आरोग्यक्षेत्राचा जवळून अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की ऑनलाईन व्यासपीठावरुन अनेक गोष्टी दिल्या जात असल्य़ा तरी यात कसली तरी उणीव आहे. ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर वीकेण्डला असलेल्या लांब रांगा, मानांकन देणाऱ्या आणि समीक्षा करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, शुल्काची माहिती ऑनलाईन उपलब्ध नसणे यासारख्या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज होती, असंही सौरव नमूद करतात. या संकल्पनेवर काम करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी विविध सलूनमध्ये जाऊन ग्राहकांचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. अनेकवेळा ग्राहक सलून व्यवस्थापकांशी सवलत मिळण्यासाठी भांडत असल्याचं त्यांना दिसलं. सदस्यत्व मिळण्यासाठी अनेकांनी ५० हजार रुपये अनामत रक्कम म्हणून दिली होती आणि त्यांना सेवांवर २५ ते ३० टक्के सूट मिळत होती. पण दर्जा आणि शुल्काबाबत माहिती नसल्यानं ते ग्राहक नवीन सलूनमध्ये जाण्यास तयार नसायचे. तर सलून चालकांच्यादृष्टीने त्यांच्याही काही समस्या होत्या. सोमवार ते शुक्रवार ग्राहक अगदीच कमी असल्यानं त्यांचा व्यवसाय नसायचा, तसंच नवीन सलून चालकांना त्यांच्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे मार्गच नव्हते. अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांच्याकडे फक्त कागद आणि पेन एवढेच मार्ग होते.

स्टायलोफीची नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे अडीच लाख अमेरिकन डॉलर ही गुंतवणुकीची रक्कम ते त्यांचं तंत्रज्ञान अधिक सक्षम आणि स्वरुप अधिक चांगलं करण्यासाठी खर्च करणार आहेत. स्टायलोफीच्या प्रमुखपदी असलेले उत्तम व्यावसायिक आणि उत्पन्नासाठीच्या त्यांच्या योजना या दोन गोष्टी कंपनीसाठी जमेच्या बाजू आहेत असं स्टायलोफीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या स्वस्तिका कंपनी लिमिटेडचे संचालक वैभव जैन यांना वाटतं. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरू केली आणि त्यांची आर्थिक गणितं भक्कम आहेत असंही जैन यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांच्याकडे ग्राहक वारंवार येत असल्यानं ते देत असलेल्या सेवेचा दर्जाही उच्च असल्याचं वैभव जैन सांगतात.

आजच्या काळात लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यानं स्पा आणि सलूनमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसंच आरोग्य आणि सौंदर्याचा विषय आला की त्यात इंटरनेटचा वाढता वापर महत्त्वाचा ठरतो. शहरी भागात तर चांगलं दिसण्यावर अधिक भर दिला जाऊ लागला आहे.

भारतासारख्या मोठ्या देशात सौंदर्याची ही बाजारपेठ ४ पूर्णांक ८ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात पोहोचली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतेय. सध्या स्टायलोफीला इव्ही कॅपनं सहाय्य केलेली पर्पल, झिफ्फी, व्यामो, अपॉइन्टी यांची स्पर्धा आहे. पर्पलला नुकतंच इव्ही कॅपने ५० लाख अमेरिकेन डॉलरचं अर्थसहाय्य दिलंय. तर झिफ्फीला ओरीयोजनं १५ कोटींचा निधी दिलाय. त्यामुळे येत्या काळात या क्षेत्राचा कसा विस्तार होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

http://www.stylofie.com


लेखक – आदित्य भूषण व्दिवेदी

अनुवाद- सचिन जोशी