तिच्या समृद्ध जगण्याची कथा : नंदिता दास

नंदिता दासः अभिनेत्री, दिग्दर्शिका, मानवी हक्क कार्यकर्ती.... खऱ्या अर्थाने बहुआयामी... तीक्ष्ण बुद्धीमत्ता, जगण्याचे भान आणि जिव्हाळ्याच्या विषयांवर खंबीर भूमिका घेण्याची तयारी असलेली खऱ्या अर्थाने आजची स्त्री... विविध क्षेत्रात सहज मुशाफिरी करणारी ही गुणी अभिनेत्री सांगते आहे तिची कथा...तिच्याच शब्दात...

तिच्या समृद्ध जगण्याची कथा : नंदिता दास

Friday October 09, 2015,

9 min Read

image


नंदिता दास – एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री.... फायर, अर्थ, भवंडर यांसारख्या चित्रपटातून नंदिताने आपले अभिनयाचे नाणे खणखणीतपणे वाजवले आहे. आजपर्यंत तिने दहा वेगवेगळ्या भाषांतील सुमारे तीसहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तर २००८ मध्ये 'फिराक' चित्रपटाद्वारे तिने आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीलाही सुरुवात केली. आपल्या चाकोरीबाहेरच्या भूमिकांबरोबरच नंदिता ओळखली जाते ती तिच्या परखड विचारांसाठी... तिच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर ठाम भूमिका मांडताना ती मुळीच कचरत नाही. मानवी हक्कविषयक अनेक मोहिमांमध्ये ती सहभागी असून महिला आणि बाल हक्कांची ती खंदी पुरस्कर्ती आहे. ती केवळ एक अभिनेत्री आणि दिग्दर्शिकाच नाही, तर परिवर्तनासाठी लढणारी एक प्रभावी कार्यकर्तीही आहे आणि आजपर्यंतचे तिचे काम याचे साक्षी आहे.

नंदिता स्वतःच्या निवडींबाबत ठाम असते, तिचे वाचन उत्तम आहे, ती अतिशय बुद्धीमान आहे आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या शर्तीवर आयुष्य जगण्याची कला तिला साधली आहे. तुम्ही तिला जितके अधिक जाणून घ्याल तितकाच तिच्याबद्दलचा तुमचा आदर अधिक वाढेल. काय कथा आहे. तिच्या समृद्ध जगण्याची कथा जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...वरळीच्या तिच्या अतिशय सुंदर आणि कलात्मक पद्धतीने सजवलेल्या घरीच तिच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली.. तिची कथा, तिच्याच शब्दात...

प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्यः

माझे बालपण खूपच आनंदी होते.. माझे वडील चित्रकार तर आई लेखिका आहे. त्यामुळे कलेच्याच वातावरणात मी वाढले....खूप सारे संगीत आणि रंगभूमी... चित्रपट म्हणाल तर ते मात्र फारसे नाहीत... माझे आईवडील मला नेहमीच कला प्रदर्शनांना आणि पुस्तक मेळ्यांना घेऊन जात. एकूणच माझे बालपण खूपच मोकळेढाकळे होते. मला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य होते. त्याचप्रमाणे हवे ते करण्याचेही.... दुर्दैवाने आजच्या मुलांवर मात्र फक्त अभ्यासाचा ताण खूप जास्त आहे. सुदैवाने माझ्याबाबतीत मात्र असे घडले नाही. त्यापेक्षा जी गोष्ट आवडते तीच करण्यावर जोर दिला जात होता. असे बालपण मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते. माझे वडील ओडीसाचे आहेत तर आई गुजरातची... त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात मी ओडीसातील एका लहानशा शहरात जात असे आणि पुढचा महिना मुंबईत घालवत असे, तिथे माझ्या आईचे आईवडील रहात. अशाप्रकारे दोन अगदी टोकाच्या जगांमध्ये रहाण्याचा अनुभव माझ्यासाठी खूपच चांगला होता. एकूण काय तर, स्वातंत्र्य आणि प्रश्न विचारण्याची मोकळीक माझ्यासाठी खूपच मौल्यवान आहे. बालपणापासूनच हे आहे म्हणा ना! आज मलाही एक पाच वर्षांचा मुलगा आहे. माझ्या मुलाला बहरण्यासाठी आवश्यक तो अवकाश मी दिला पाहिजे, ही गोष्ट माझ्या बालपणातून मी शिकले आहे. मुलांना अति शिस्तीमध्ये रुतवून ठेवू नका. मी काही मुलांचे अति लाड करायला किंवा त्यांना बिघडवायला सांगत नाहीये. पण त्यांना स्वतःहून नविन गोष्टी शिकण्यासाठी किंवा वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी वेळ, त्यांचा स्वतंत्र अवकाश आणि संधी द्या. ते त्यांचे मार्ग नक्कीच शोधतील. ते काही गोष्टी उत्तमप्रकारे करतील. त्यांना ते करु द्या.


नंदिता दास

नंदिता दास


माझा प्रवासः

मी कधीच माझ्या आयुष्याचे नियोजन केलेले नाही. आज मी जेंव्हा मागे वळून पहाते, मग ते माझे शिक्षण असो किंवा काम, मी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली. काही गोष्टी मी करत राहिले तर काही सोडून दिल्या... पण खरे म्हणजे वाया असे काहीच गेले नाही.

मी दिल्ली विद्यापीठातून भूगोल विषयात पदवी घेतली कारण शाळेत माझे या विषयाचे शिक्षक खूपच चांगले होते आणि हा विषय मला खूप आवडायचा. मी यापेक्षा वेगळा काही विचार किंवा नियोजन केले नाही. पदवीनंतर काय करायचे हे मला माहितच नव्हते आणि सुदैवाने माझ्या पालकांनीही माझ्यावर कुठलाही दबाव टाकला नाही. जेंव्हा मी भूगोलातील बी ए पूर्ण केले त्यावेळी मात्र त्या विषयाने मला फारसे प्रेरीत केले नव्हते आणि दुसरे काय करायचे ते मला माहितच नव्हते. माझी आई पीएचडी आहे. पदव्युत्तर शिक्षण घे, हा तिने मला आजपर्यंत दिलेला कदाचित एकमेव सल्ला असेल. त्यावेळी मात्र मी आपल्याला खरच काय करायला आवडेल याचा शोध घेण्यासाठी एक वर्षाची सुट्टी घेऊन प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला. पदवीनंतचे हे वर्ष होते. त्यावेळी मी दक्षिणकडील जे कृष्णमूर्तींच्या सुंदर अशा ऋषी व्हॅली स्कूलमध्ये शिकविण्याचे काम केले. देशाच्या विविध भागात तर प्रवास केलाच पण परदेश प्रवासही केला. त्या एका वर्षात मला समजले की मला लोकांबरोबर रहायला खूप आवडते. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करायला आणि त्यांना आणि मलाही त्रस्त करणाऱ्या विषयांवर काम करायला मला आवडते. त्याच वेळी मी सामाजिककार्य या विषयावर पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर मी दिल्ली विद्यापीठात जाऊन या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी पथनाट्य करत होते. हे सुद्धा अभिनेत्री बनण्यासाठी नाही तर प्रेक्षकांशी जोडले जावे म्हणूनच... नाटक माझ्यासाठी एक प्रकारचे राजकीय प्रशिक्षणच होते. नाटक करण्यापूर्वी मला फारशी राजकीय समज नव्हती. ती समज मला मी माझ्या नाटकातून आली – अर्थशास्त्राचे राजकारण, नात्यांमधील राजकारण, लिंगाचे राजकारण, धर्माचे राजकारण – माझ्या नाट्य प्रशिक्षणा दरम्यान मला या सगळ्याची ओळख झाली. माझा पहिला चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर मी फायर केला, जो अनेक अर्थांनी माझा पहिला चित्रपट ठरला. आजपर्यंत मी तीसपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि माझ्या सुरुवातीच्या कामाचा मोठा परिणाम माझ्या चित्रपटांच्या निवडीवर झाल्याचे माझ्या कामाकडे पहाताना तुमच्या लक्षात येईल. जे वास्तव मी त्यावेळी पाहिले, त्यातूनच वास्तवाला भिडणाऱ्या आणि विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या गोष्टींचा भाग बनण्याची माझी नेहमीच इच्छा राहीली.

अभिनय आणि बरेच काही...

प्रामाणिकपणे सांगायचे तर मी स्वतःला फक्त एक अभिनेत्रीच समजत नाही. माझ्या अनेक आवडींपैकी अभिनय ही एक आवड आहे. अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि मानवी हक्कांच्या पुरस्कारासाठी माझे सुरु असलेले काम हे सगळे माझ्या कामाचे वेगवेगळे प्रवाह वाटू शकतात, मात्र खरे तर त्या सगळ्यांचा उद्देश एकच असून, ते एकमेकांना पुरक आहेत. या सगळ्या गोष्टींचे माझ्या सर्वांगिण विकासात एकत्रित योगदान आहे. जरी बहुतेक जण मला एक अभिनेत्री म्हणूनच ओळखत असले, तरीही अभिनय हा माझ्या एकूण कामातील केवळ एक छोटा भाग आहे.


नंदिता दास

नंदिता दास


चाकोरी बाहेरः

गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ मला मी तद्दन व्यावसायिक चित्रपट करत नसल्याबद्दल सतत प्रश्न विचारले जातात..मी प्रादेशिक चित्रपट का करते आणि ते कोण पहाते, हा प्रश्नही नेहमीचाच... मुंबई दिल्लीतील प्रेक्षक कदाचित प्रादेशिक सिनेमा पहात नसतील पण दिल्ली-मुंबई म्हणजेच काही भारत नाही, या व्यतिरिक्तही भारत आहेच की.... मला प्रादेशिक चित्रपट करायला आवडतात कारण त्यानिमित्ताने मला देशाच्या विविध भागात प्रवास करायला मिळतो, वेगवेगळ्या लोकांना भेटता येते, नविन भाषा शिकता येतात, नविन खाद्यपदार्थांची चव चाखता येते आणि वेगवेगळ्या कथांचाही एक भाग बनता येते. मी काम केलेल्या प्रादेशिक चित्रपटांपैकी बहुतेक चित्रपट हे साहित्यावर आधारीत आहेत आणि आपल्या देशातील सर्वच भाषांतील साहित्य समृद्ध आहे. त्याचबरोबर मला असेही वाटते की जेंव्हा मी प्रादेशिक चित्रपटकर्त्यांबरोबर काम करते त्यावेळी मला कमी तडजोडी कराव्या लागतात. जेंव्हा मी केरळला जाते तेंव्हा लोक माझ्याशी मल्याळी भाषेत बोलू लागतात. जेंव्हा बंगालला जाते, तेंव्हा त्यांना मी त्यांच्यातीलच एक वाटते. एक प्रकारे सगळ्यांनीच मला आपली मानली आहे आणि खरे सांगायचे तर ते मला प्रचंड आवडते.

जेंव्हा तुम्ही फारसे पारंपारिक किंवा गतानुगतिक नसता, त्यावेळी लोक तुम्हाला सतत विचारत रहातात, “हे का नाही, हे का”, “तुम्हाला व्यावसायिक चित्रपट का करायचे नाहीत”, “जर मोठ्या बॅनरकडून विचारणा झाली तर काय”, त्यांना वाटते की माझ्या कडे आत्मविश्वासाची कमी आहे किंवा काही तरी असे कारण आहे ज्यामुळे मी व्यावसायिक चित्रपटांपासून दूर रहाते. “मोठे व्यावसायिक चित्रपट न करण्याचा पर्याय ही कसा काय निवडू शकतो,” असे लोकांना वाटते. जेंव्हा मी माझ्या एखाद्या मित्राच्या लग्नात नृत्य करते, तेंव्हा लोक म्हणतात, “अरे, पण तू तर खूपच चांगली नाचतेस, मग तू व्यावसायिक चित्रपटांत कशी काम करत नाहीस.” पूर्वी या सगळ्यामुळे माझी खूप चिडचिड होत असे, पण आता मला त्याचे काहीच वाटत नाही. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे रहाण्याचे स्वातंत्र्य किंवा अवकाश हा समाज का देत नाही? मात्र काही काळाने मी हे फारसे गांभिर्याने घेणे बंद केले आहे. मी माझी कोणतीही मुलाखत वाचत नाही. मी टीव्हीवरच्या माझ्या मुलाखतीही बघत नाही. त्यामुळे एकूणच ते चित्रपटांचे जग माझ्या आयुष्यातील खूपच छोटा भाग आहे. पण माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयांवर बोलण्यासाठी मला चित्रपटांमुळेच एक व्यासपीठ मिळाले, हे देखील तितकेच खरे आणि त्यासाठी मी नक्कीच ऋणी आहे. मला अनेक परिषदांसाठी बोलाविले जाते जिथे मी ही अभिनेत्रीची टोपी घालून जाते, मात्र मी माझ्या अभिनयाविषयी बोलण्यापेक्षा माझ्या जिव्हाळ्याच्या सामाजिक विषयांवर खूप जास्त बोलू शकते.

कार्यकर्तीः

माझ्या आई-वडीलांसाठी समता धर्म होता. सहाजिकच ते दोघेही सर्वधर्मसमभाव आणि प्रत्येक बाबतीत समतेवर विश्वास असणारे होते. त्यामुळे अगदी कोणत्याही प्रकारचा भेदभाव ते करत नसत. एखादी व्यक्ती चांगली आहे, म्हणून तिच्याशी मैत्री करा, मग जात, धर्म, वर्ण किंवा इतर कोणत्याही गोष्टीची पर्वा करु नका... असे त्यांचे विचार होते. अशा प्रकारची मानवी मूल्य मला वाढवतानाच माझ्यामध्ये रुजवल्याबद्दल मी खरोखरीच त्यांची ऋणी आहे. मला नेहमीच वाटत आले आहे की, एखाद्याच्या कामाचा प्रभाव हा विस्तृत समाजावर व्हायला हवा आणि एका मोठ्या चांगल्या उद्देशाच्या दिशेने व्हावा... नेमके तेच साध्य करण्याचा प्रयत्न मी माझ्या रंगभूमीवरच्या कामातून, समाज कार्यातून, चित्रपटांमधून आणि माझ्या लेखनातूनही करत असते. महिला आणि बाल हक्कांबाबत मी खूपच ठामपणे भूमिका मांडते आणि ‘डार्क इज ब्युटीफुल’ ही नुकतीच सुरु केलेली मोहीम माझ्या खूपच जिव्हाळ्याची आहे. काळ्या वर्णाच्या विरुद्धचा वर्णभेद थांबविण्यासाठी मी या मोहीमेला पाठींबा देत आहे.

स्त्रियांनी अपराधी भावना बाळगू नयेः

मला वाटते, सर्व काही करण्याच्या प्रयत्नात स्त्रियांना बऱ्याचदा अपराधी वाटत रहाते. ते बदलण्याची गरज आहे. कोणताही दृष्टीकोन बदलण्यासाठी वेळ हा लागतोच. ते काही एका रात्रीत होत नाही. त्यासाठी प्रत्येक मोहिम आणि प्रत्येक संवाद किंवा चर्चा ही महत्वाचीच असते. कारण ते कोणाला भिडेल, ते तुम्ही सांगू शकत नाही आणि त्याद्नारे एखाद्याला जरी विचार किंवा पुनर्विचार करावासा वाटला तरी तो प्रयत्न नक्कीच सार्थकी लागतो. मला वाटते पिढीनुसारही बदल होतो. त्यामुळे हा बदल घडविण्यासाठी मी माझ्या मुलाला वेगळ्या प्रकारे वाढवू शकते. प्रत्येक महिलेला अपराधी न वाटणे, कोणतीही अपराधीपणाची भावना न बाळगता महिलांना आपल्या गरजा आणि इच्छा मोकळेपणाने मान्य करता येणे, यासाठी प्रयत्न करणे माझ्या मते आपली प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्य़ाचबरोबर पुरुषांनाही हे समजले पाहिजे की एका सुंदर जगाच्या निर्माणासाठी स्त्री-पुरुष समानता अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळे जगातल्या सगळ्या पुरुषांना माझे सांगणे आहे की, तुम्हालाही अशी जोडीदार हवी जी जी तुमच्याबरोबर खूष असेल आणि खेळीमेळीच्या वातावरणात तिच्या व्यक्तीमत्वालाही बहर येईल. मला वाटते, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिच्यासाठी तुम्हालाही हेच हवे असणार. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी अधिक समान जग असणे, ही चांगली गोष्ट आहे.


image


सापेक्ष यशः

सुदैवाने माझ्या आईवडीलांनी यश हा शब्द कधीच वापरला नाही. सुदैवाने त्याची कोणतीही कल्पना, किंवा तणाव किंवा त्याविषयीची महत्वाकांक्षा न बाळगता मी वाढले. यश म्हणजे काय मला माहित नाही. आनंद काय आहे, ते मला माहित आहे. मी असेही म्हणणार नाही की आनंद आणि यश समान आहेत, कारण यश हे एका पातळीवर संख्यात्मक असते. म्हणजे तुमचे एक लक्ष्य असते आणि तुम्ही ते गाठले तरच यशस्वी ठरता. माझ्यासाठी आयुष्य एक प्रवास आहे. मला माहित नाही उद्या माझ्या आयुष्याने माझ्यापुढे काय वाढून ठेवले आहे. मी त्याच्यासाठी तयार आहे. माझी अशी काही मंजिलही नाही, जिथे जाऊन पोहचायचे आहे. तसेच यश हे सापेक्ष असते, उदाहरणार्थ काही लोकांना मी यशस्वी वाटू शकते, तर काही लोकांना वाटेल की माझी बस चुकली, काहींना माझी दया यईल, तर काहींना माझा हेवा वाटेल, या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत आणि मी त्यामध्ये फारशी गुंतून पडत नाही.

करण्यासारखे खूप काहीः

प्रत्येक दिवस हा नवा असतो आणि नव्या नवलांवी परिपूर्ण असा... करण्यासारखे खूप काही आहे. आयुष्य खूपच लहान आहे आणि मला येथे खूप काही करायचे आहे. मला अनेक गोष्टींची आवड आहे, हजारो जागा अशा आहेत, जेथे मला प्रवास करायचा आहे, अनेक गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, गोष्टींची देवाण-घेवाण करायची आहे, मला वाचायचे आणि शिकायचे आहे. हेच मला पुढे नेत आहे.

स्वप्ने बघा, पण जाणतेपणीः

तुमच्या हृदयाचे ऐका आणि तुमच्या अंतःप्रेरणेला मारु नका. तुम्हाला खरोखर जे करायचे आहे, त्याचा पाठपुरावा करा. जेंव्हा एखादी व्यक्ती सांगते की तुम्ही स्वप्ने पाहिली पाहिजेत, तेंव्हा तुम्ही जाणतेपणाने स्वप्न पाहिली पाहीजेत. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे त्याबाबत तुम्ही जागरुक असले पाहिजे. तुम्हाला खरोखर कोणत्या गोष्टी पाहिजेत त्याचा शोध घ्या आणि त्या दिशेने आत्मविश्वासाने चाला.

तर अशी ही नंदिता....ती अशी असल्याबद्दल आम्ही तिचे आभारी आहोत. तिची कथा, स्वप्ने आणि आकांक्षां याविषयी ती मोकळेपणाने बोलली...हे सारे खूपच प्रेरणादायी आहे. तिच्या भविष्यातील सर्व योजनांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा

    Share on
    close