ॲसिड पिडीतांना शासनातर्फे आता पाच लाख रूपयांची मदत मिळणार

ॲसिड पिडीतांना शासनातर्फे आता पाच लाख रूपयांची मदत मिळणार

Monday March 06, 2017,

2 min Read

ॲसिड हल्ल्यातील पिडीतांना शासनाकडून यापूर्वी तीन लाख रूपये मदत देण्यात येत होती. यामध्ये शासनाने वाढ केली असून आता पाच लाख रुपये मदत मिळणार आहे. पिडीतांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. समाजाने देखील पुढे आले पाहिजे असे, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


image


वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित राज्य महिला आयोग आणि दिव्यज फौंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त सक्षमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ॲसीड हल्ल्यातील पिडीतांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोग आणि दिव्यज फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. राज्य महिला आयोगाने ॲसिड पिडीतांसाठी एक योजना सादर करावी. शासन योजनेची अंमलबजावणी करेल. ॲसीड हल्लेखोरांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी याकरिता कायदे देखील कडक करण्यात येत आहेत. या पिडींतांना ॲसिड हल्ल्याचे बळी न म्हणता त्यांनी या हल्ल्याशी चार हात करत त्यावर मात केली असेच म्हणावे लागेल. अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी ॲसिड पिडीतेला घर आणि नोकरी देऊन खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर सक्षमा या कार्यक्रमाचा एक भाग झालात ही आनंदाची गोष्ट आहे.

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ॲसिड हल्ल्यातील व्यक्ती खचून न जाता आत्मविश्वासाने उभ्या राहिल्या आहेत. राज्य महिला आयोग आणि दिव्यज फाऊंडेशन यांनी या क्षेत्रात केलेले कार्य स्तुत्य आहे. सक्षमा कार्यक्रमामुळे पिडीतांमध्ये नक्की आत्मविश्वास निर्माण होईल. राज्य शासन पिडीतांच्या पाठीशी आहे. ॲसिड हल्लेखोरांना कडक शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.


image


प्रास्ताविकात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, ॲसिड हल्ल्यावर मात करत ताठ मानेने आपले आयुष्य जगणाऱ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी सक्षमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

अमृता फडणवीस म्हणाल्या, ॲसिड पिडीतांना आत्मविश्वास देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिडीतांचे पुर्नवसन करून त्यांना जगण्याची उमेद देण्याच्या कामात शासनाबरोबरच प्रशासनाचीही जबाबदारी महत्वाची आहे. हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी कायदे कठोर व्हावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


image


यावेळी रॅम्पवॉकमधून जनजागृती व्हावी या उद्देशाने पिडीतांसोबत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त अजोय मेहता, अमृता फडणवीस, दिवीजा फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर, अभिनेता विवेक ओबेरॉय, अभिनेत्री जुही चावला, सोनाली बेंद्रे, साक्षी तन्वर, दिव्या खोसला, वंदना गुप्ता, सुधा शर्मा, संगीतकार अनु मलिक यांनी रॅम्पवॉक केले.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सक्षमा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ॲसिड हल्ल्यातील पिडीतांच्या पुनर्वसनाकरिता कार्यरत असणा-या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

यावेळी पिडीतांचे मनोधैर्य वाढविण्याकरिता, एक माहितीपट दाखविण्यात आला. तसेच अमृता फडणवीस यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी पिडीतांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी यावेळी संदेश दिले. (सौजन्य - महान्युज)