गुड बाय ऱ्हिदम हाऊस - एका सुरेल प्रवासाची सांगता.... 

0

काळा घोडा फेस्टीवलची सांगता नुकतीच झाली. विविध रंगांची उधळण करणारा काळा घोडा फेस्टीवल ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणचं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे ऱ्हिदम हाऊस. जो मुंबईत राहतो आणि ज्याला थोडं फार गाणं ऐकायला आवडतं अश्या व्यक्तीला ऱ्हिदम हाऊस माहित नाही असं होणार नाही असं दाव्यानिशी सांगावसं वाटतंय. काळा घोडा फेस्टीवल संपत असताना अशा या ऱ्हिदम हाऊसबाहेर लटकणारी पाटी अनेकांना दु:खी करुन गेली. गुड बाय सेल... होय ऱ्हिदम हाऊस कायमचं बंद होतंय. 

परगावाहून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हमखास ज्या ठिकाणी जायला सांगायचं त्यात ऱ्हिदम हाऊस असायचंय. मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाचा ऱ्हिदम हाऊस भाग बनलं होतं. अनेकांच्या भेटण्याचं ठिकाण होतं ऱ्हिदम हाऊस. अनेकांच्या इथंच पहिल्यांदा भेटीगाठी झाल्या आणि नंतर त्याचं रुपांतर गहिऱ्या मैत्रीत झालं. असं हे ऱ्हिदम हाऊस बंद होतंय म्हटल्यावर अनेकांचे डोळे पानावले असतील. अनेकांना हळहळ वाटली असणार. संगीत क्षेत्रातून नव्हे तर सामान्य मुंबईकरांच्या सांस्कृतिक जडणघडणीचा भाग बनलेल्या ऱ्हिदम हाऊसला शेवटची भेट देण्यासाठीही अनेकांनी आवर्जून इथं उपस्थिती लावली. मित्रांसोबत. सेल्फी काढले. 

एकेकाळी व्हिलायल, नंतर रिकॉर्डर् टेप, सीडी, आणि आता ब्ल्यू रे सारख्या गोष्टी घेण्यासाठी येणारा प्रत्येकासाठी ऱ्हिदम हाऊसमध्ये हक्काची जागा होती. विरंगुळा होता. या जागेत आपलं पण होतं. हवं तेवढ म्युझिक ऐकायचं. आणि समृध्द होऊन बाहेर पडायचं अशी भावना अनुभवता येणार नाही याची सल राहिल पण या ऱ्हिदम हाऊसनं जगणं समृध्द केलं आणि आयुष्यभर लक्षात राहतील, हृदयात जपून ठेवता येतील अश्या आठवणी दिल्या हे आपलं संचित आहे असं म्हणणारेही सापडतील. हीच ऱ्हिदम हाऊसची खरी कमाई असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

ऱ्हिदम हाऊसनं 1948 पासून संगीत क्षेत्राला वाहून घेतलंय. आज सुमारे 68 वर्षे ही सेवा अविरत सुरु होती. पण 29 फेब्रुवारी 2016 ला हा सुरेल प्रवास संपणार आहे. धावत्या मुंबईत अनेक गोष्टी लुप्त झाल्या. इतिहास जमा झाल्या. पण गेली 68 वर्षे ऱ्हिदम हाऊस मुंबईची शान बनून होतं. मुंबई दर्शनासाठी येणाऱ्यांच्या यादीत ऱ्हिदम हाऊस ही जागा अगदी कायमची असायची पण आता ती नसेल. पण तिचा इतिहास समृध्द असा इतिहास नक्कीच असेल हे नव्यानं सांगायला नको. 

70 आणि 80 ज्या दशकात ऱ्हिदम हाऊसचं महत्त्व फार होतं. लता मंगेशकर स्वत: इथं येत. तिथल्या विनायल एलपी विकत घेत. बिटेलची एलपी घेण्यासाठी तर अनेकांनी रांगांही लावल्या होत्या. त्या आठवणी सांगतात रमेश परदेशी सांगतात, “इथं नेहमी गर्दी असायची. आम्ही संध्याकाळी ऑफिसवरुन घरी निघालो की पाऊले सहज इकडे वळायची. मग सोमोवारमध्ये चहा किंवा कॉफी घेतल्यावर ऱ्हिदम हाऊसमध्ये मनमुराद संगीताचा आंनद लुटायचा आणि लोकलमध्ये याच संगीताच्या तालावर स्वार होऊन ठाणे गाठायचं असं खुप काही ऱ्हिदम हाऊसनं आम्हाला दिलं.” 

1970 ते 1991 पर्यंत मुंबईच्या संगीत क्षेत्रातलं अभिवाज्य घटक बनलेलं ऱ्हिदम हाऊस अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार राहिला. पंडीत रविशंकर, अल्लाहरखाँ, जाकिर हुसैन, अनेकांनी इथं आवर्जून भेट दिली. याला कारण ही तसंच होतं. रंग भवन इथं अनेक मैफिली होत. मोठ मोठे कॉन्सर्ट होत. त्यामुळं तिथली तिकिटं इथं विकली जात. त्यामुळं इथं येणं आणि संगीतप्रेमींना भेटणं अनेकांना आवडलं., अनेक कलाकारांनी स्वत: सही केलेल्या एलपी आणि सीडीज इथं मिळायच्या त्यामुळं रसिकांची चंगळ असाय़ची. मुंबईला जागतिकीकरणाचा वेढा बसण्यापूर्वी हे असं सर्व काही मस्त सुरु होतं. 

बॉम्बेचं मुंबई झालं आणि त्याचबरोबर संगीत क्षेत्रातलयाही अनेक गोष्टी बदलल्या. एलपी डिस्क आता इतिहासजमा झाल्या होत्या. त्यांची जागा टेपरेकॉर्डसनं घेतली होती. काही काळातंच टेप रेकॉर्डला राम राम ठोकण्यात आला आणि सीडी बाजारात आली. मग डिव्हीडी आणि आता पेन ड्राईव इथं पर्यंत सर्व ठिक होतं. पण इंटरनेटच्या क्रांतीनं म्युझिक क्षेत्राची पार वाताहत केली. 2002 ला चर्चगेटचं ग्रुव्ह बंद पडलं. त्याचवेळी ऱ्हिदम हाऊसची अवस्थाही लवकरच अशीच होईल असं वाटू लागलं होतं. पण तसं झालं नाही. टाईम्ससारख्या मोठ्या ब्रान्ड असलेल्या प्लॅनेट एमची अवस्थाही बिकट झाली. त्या परिस्थितीतही ऱ्हिदम हाऊस तग धरुन लागलं. त्यानंतर जग ऑनलाईन झालं. एका क्लिकनं सर्व काही आपल्या घरच्या कम्प्युटर आणि त्यानंतर हातातल्या मोबाईल हँडसेटवर येऊ लागल्या.

अगोदर टुजी, नंतर थ्रीजी आणि आता फोरजीच्या जगात ऱ्हिदम हाऊस सारख्या पारंपारिकपणे संगीत क्षेत्रातला वाहून घेतलेल्या दुकांनाची संख्या नामशेष होत गेली त्यावेळी ते तग धरुन राहिलं हे विशेष. पण आता रोडोवलेली ग्राहकांची संख्या आणि एकूणच संगीतक्षेत्राची झालेली वाताहत यामुळं ऱ्हिदम हाऊस बंद करण्याचा निर्णय घ्याला लागला असं मेहमुद कलमरी सांगतात.

 “हा निर्णय घेताना खुप दु:ख होतंय. पण आमच्या हातात असं काहीही राहिलेलं नाही. नुकसानीत व्यवसाय करणं जास्त काळ शक्य नाही. पुढे काय करायचं या जागेवर काय होईल याबद्दल आम्ही अजूनही निर्णय घेतलेला नाही. पण मुंबईची ओळख असलेलं आमचं किंबहुना संपूर्ण मुंबईकराचं ऱ्हिदम हाऊस बंद होतंय, हे निश्चित चांगली गोष्ट नाहीय. सध्या आम्ही आमचा स्टॉक संपवतोय. गुड बाय सेल असे स्टिकर लावलेत. अनेक जण येतात. विचारतात. भावुक होतात. फोटो काढतात. पण नॉस्टेलजिक होता. मला वाटतं हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. आमच्या इतकंच मुंबईतल्या संगीतप्रेमींनी या दुकानावर प्रेम केलं हे आमचं भाग्य. खरं तर नेव्हर टू से गुड बाय असं म्हटलं जातंय. आम्हाला ही असंच वाटतं. पण रसिक ऱ्हिदम हाऊसला मनातून कधीच गुडबाय करणार नाहीत. ते तिथंच राहिल असं मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी दडून कायमचं. ” मेहमुद सांगत होते. 

रिकामे रॅक, आवराआवरीसाठी भरलेले बॉक्स असं भकास असलेल्या या ऱ्हिदम हाऊसमध्ये अजुनही सुरांची यात्रा सुरु आहे. अगदी शेवटच् दिवशीपर्यंत इथले सुरुंची ही मैफिल थांबणार नाही. अनेकांच्या आठवणीं फुलवणाऱ्या आणि त्याद्वारे मनात कायम राहणाऱ्या ऱ्हिदम हाऊसला लास्ट अदेवू. म्हणजे शेवटचा सलाम...