पाचवी शिकलेले ‘MDH’ चे ९४ वर्षीय तरुण सीईओं; २१ कोटी वार्षिक पगारातून नव्वद टक्के करतात दान 

धर्मपाल गुलाटी यांचा अद्भूत जीवनप्रवास

1

दररोज तुम्ही दूरचित्रवाणीवर ‘असली मसाले सच सच, एमडीएच!’ असे जिंगल आणि त्याच्या तालावर नाच करणारे आजोबा पहात असाल, हीच ओळख आहे या मसालाकिंग धर्मपाल गुलाटी यांची! आज वयाच्या नव्वदीनंतरही तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह या जाहिरातीतून दिसून येतो. १९२३मध्ये पाकिस्तानात जन्मलेल्या धर्मपाल गुलाटी यांची वार्षिक कमाई २१ कोटी रुपये आहे आणि त्यातील ९०% कमाई ते दान करतात हे कदाचित अनेकाना माहितही नसेल. त्यांच्याबद्दल आज जाणून घेवूया. 


एमडीएच म्हणजे ‘महाशिया दि हट्टी’ ही कंपनी! जेवणाची रूची वाढविणा-या वेगवेगळ्या स्वादांचे मसाले तयार करते. आणि भारता शिवाय शंभर देशात ते निर्यात केले जातात. मागील आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल ९२४ कोटी रुपयांची झाली होती. या मसाल्यांच्या स्वादासोबतच याची महत्वाची खासियत म्हणजे या मसाल्याच्या पाकिटावर असते धर्मपाल गुलाटी यांचे छायाचित्र! ते या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. केवळ पाचव्या वर्गापर्यंत शाळा शिकलेल्या गुलाटी यांना सीइओ म्हणून कंपनीत वार्षिक पगार २१ कोटी रुपये मिळतो, ज्यातील ९०टक्के रक्कम ते दान करतात. मसाला किंग त्यांना म्हणूनच संबोधले जाते कारण देशात अवाढव्य पगार घेणा-या ज्येष्ठ सीइओंमध्ये त्यांचा अग्रक्रम लागतो. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीचा निव्वळ नफा २१३ कोटी रुपयांचा झाला होता.


सुमारे साठ वर्षापूर्वी धर्मपाल गुलाटी यांनी मसाला कंपनीचा कार्यभार हाती घेतला होता, केवळ पाचवी पर्यत शिक्षण घेतल्यानंतरही त्यांचा ध्यास असतो की नव्या पिढीतल्या तरुणांनी शिकावे म्हणून ते आपल्या कमाईचा मोठा भाग त्यावर खर्च करतात आणि २० शाळा चालवितात जेथे कमी खर्चात शिकण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. या शिवाय ते एक धर्मादाय रुग्णालय देखील चालवितात.

त्यांच्या कंपनीबाबतचा संक्षिप्त इतिहास असा की, पाकिस्तानात असलेल्या सियालकोट या पंजाब प्रांतातील गावात १९१९मध्ये महाशय चुन्नीलाल या त्यांच्या वडिलांनी लहानसे दुकान सुरु केले. त्यांच्या दुकानात त्यांनी मिरचीचे तिखट विकण्यास सुरुवात केली, आणि त्याला खूप लोकप्रियता मिळत गेली, त्यामुळे त्यांना ‘देगी मिरचवाले’ म्हणून लोक ओळखू लागले, ‘देगी मिरची’ ही मध्यम तिखट असलेल्या मिरचीपैकी आहे, त्याचे तिखट लाल दिसते मात्र सौम्य तिखट असते. त्यानंतर त्यांनी हळूहळू सर्व प्रकारचे मसाले विकण्यास सुरुवात केली आणि आज साठ वर्षानंतर मोठे मसाला निर्यातदार म्हणून उदयास आले आहेत.


महाशय गुलाटी यांचा मुलगा धर्मपाल यांच्यात जन्मत:च उद्योजकता होती, त्यांनी लहान वयातच पाचवीपर्यंत शिक्षण घेतले मात्र नंतर शाळेत मन रमत नाही म्हणून वडिलांना हातभार लावण्यासाठी लहानसहान कामे करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी साबण तयार करणे, सुतारकाम, अशी कामे केली. देशाच्या फाळणी नंतर त्यांचे कुटूंब दिल्लीत आले आणि त्यावेळी त्यांच्या हाती केवळ १५०० रुपयाची पुंजी होती. त्यावेळी मग त्यांनी दिल्लीत टांगा चालविण्याचे काम सुरु केले, करोलबाग ते कँनोटप्लेस असा ते टांगा चालवित असत. त्यांनतर त्यांनी वडीलांचा मसाले विकण्याचा व्यवसाय पुन्हा सुरु केला. करोलबागच्या अजमलखान रस्त्यावर त्यांनी मसाल्याचे दुकान सुरु केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यावेळी त्यांनी १९५९मध्ये एक जागा विकत घेतली. आणि स्वत:ची मसाला फँक्टरी सुरु केली. पाचव्या वर्गात शाळा सोडलेले धर्मपाल आज ९४वर्षांचे आहेत, आणि सर्वाधिक कमाई करणारे देशातील ज्येष्ठ उद्योजक आहेत. आज एमडीएच ची साठ उत्पादने विकली जातात. त्यात देगी मिरच, चाट मसाला आणि चना मसाला यांना सर्वाधिक मागणी असते. त्यांचे मसाले केरळ, कर्नाटकात उत्पादीत होतात आणि इराण, अफगणिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात विकले जातात.


याच नावाची धर्मादाय संस्था आज ते चालवितात, महाशय चुनीलाल चँरिटेबल ट्रस्ट. त्या अंतर्गत ते २० शाळा चालवितात. एमडीएच आंतरराष्ट्रीय शाळा, महाशय चुनीलाल सरस्वती शिशूमंदीर(जी त्यांच्या वडीलांच्या नावाने चालविली जाते.) माता लिलावती कन्या विद्यालय(जी त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे चालवितात) आणि महाशय धर्मपाल विद्यामंदीर इत्यादी. नवी दिल्ली सुभाष नगर मध्ये ते डोळ्याचे रुग्णालय चालवितात, त्यांनतर त्यांनी १९८४मध्ये जानकीपूरी भागात २० खाटांचे रुग्णालय सुरु केले,ज्याचा विस्तार आज ३०० खाटा पर्यंत झाला असून पाच एकर जागेत ते विस्तारले आहे. जेथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा अत्याधुनिक पध्दतीने उपल्बध आहेत.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.