वाहनचालक ते पुरस्कारप्राप्त उद्योजक, श्रीलंकेतल्या शरण्यन शर्मा यांची यशोगाथा

वाहनचालक ते पुरस्कारप्राप्त उद्योजक, श्रीलंकेतल्या  शरण्यन शर्मा यांची यशोगाथा

Thursday May 05, 2016,

7 min Read

मी जेव्हा शरण्यन शर्मा यांना कोलंबोमधल्या एका छोट्याश्या हॉटेलमध्ये भेटायला बोलावले तेव्हा ते सांगितलेल्या हॉटेलवर सहज पोहोचले त्या तटावर सारखेच दिसणारे अनेक हॉटेल्स होते." आठ वर्षांपूर्वी मी इथल्या प्रत्येक हॉटेलला सोडा आणि नाश्त्याचे पदार्थ नेऊन पोचवत असे." आपल्या वाहनचालक म्हणून काम करत असणाऱ्या दिवसांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.


या ओळखीनंतर त्यांच्या आयुष्याची यशोगाथा त्यांनी सांगायला सुरुवात केली. आज ते एक्स्ट्रीम-सिओ डॉट नेट या श्रीलंकेतील एका नामवंत डिजिटल मार्केटिंग फर्मचे सीइओ आहेत. शरण्यन यांच्या अन्य दोन कंपन्या आहेत. 'प्रिव्हीलेज सर्वर टेक्नोलॉजिस' आणि '7 अरेना टेक्नोलॉजिस'. आज त्यांच्या वावुनियामधल्या घराबाहेर डिलिवरी व्हॅन ऐवजी स्वत:च्या चार गाड्या उभ्या आहेत. जणू त्या त्यांनी केलेल्या संघर्षाची साक्ष देत उभ्या आहेत.

image


वावुनिया हे उत्तर श्रीलंकेतील शहर. तामिळ भाषिकांची वस्ती असणारं. शरण्यन यांचं कुटुंबीय २००९ मध्ये जाफनामधून इथं स्थलांतरित झालं. त्याचं कारण म्हणजे तमिळ -सिंहली नागरी युद्ध. " मी इथे आलो त्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी मी माझ्या कुटुंबियांना भेटलो. मला त्यांची खबर मिळत नव्हती, ते जिवंत आहेत की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं." या नागरी युद्धाचे शेवटचे काही महिने इतके भयंकर होते की त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्याचा कोणताच पर्याय नव्हता." मी त्यावेळी कोलंबोमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास करत होतो. मला शिक्षण सोडवं लागलं कारण माझ्या कुटुंबाकडून येणारी आर्थिक मदत बंद झाली होती." स्वत:ला पोसण्यासाठी त्यांनी वाहनचालकाची नोकरी धरली पण एकाच महिन्यात त्यांना तिथून जावं लागलं कारण तक्रार आली की ते खूप वेगाने गाडी चालवतात. या घटनेनंतर त्यांच्या मनात कुठेतरी उद्योजक होण्याचं स्वप्न बळ धरू लागलं.

" मला वाहनचालक म्हणून जगायचं नव्हतं. स्वत:चं काहीतरी सुरु करायचं होतं." शरण्यन सांगतात." त्या दिवसांत इ-कॉमर्सनं मला पछाडलं होतं. कारण हे एक असे क्षेत्र आहे जिथे प्रत्येकाला समान संधी मिळते. आणि म्हणूनच मला यामध्ये अधिक संशोधन करावसं वाटलं."

आत मुख्य समस्या अशी होती की त्यांच्याकडे न पैसे होते आणि ना ही यांत्रिक उपकरणं ज्याद्वारे त्यांना काही काम करता येईल. " माझ्याकडे २२,००० श्रीलंकन रुपये (एलकेआर) होते. पण अगदी सध्या संगणकासाठी सुद्धा मला तब्बल ४८,००० एलकेआर मोजावे लागणार होते. मला पैसे उधार घ्यावे लागले आणि मी सांगू शकत नाही किती कठीण काम होतं ते. मला कोणी ओळखत नव्हतं आणि त्यामुळे पैसे द्यायला सुद्धा कोणी तयार नव्हतं." ते आपल्या आठवणी सांगत होते. तरीही त्यांच्या भावाच्या शिफारसीनं त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना मदत केली. " मी व्यवसाय सुरु सुद्धा नव्हता केला आणि कर्जात बुडलो होतो." ते हसून सांगत होते.

image


शरण्यन हे ब्राम्हण कुटुंबातले त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबियांचा त्यांनी धार्मिक कर्तव्य पार पाडावीत असा आग्रह असे. त्यांनी काहीतरी असं नवं सुरु करावं यालाही त्यांच्या पालकांचा विरोध होता. जेव्हा दोन महिने त्यांना कमिशन मिळालं नाही तेव्हा तर त्यांना कुटुंबासमोर उभं राहणंसुद्धा कठीण झालं. त्यानंतर एका अमेरिकन कंपनीनं मला काम दिलं. " मला सकाळी काही लेख मेलवर मिळत असत आणि मला ते सुमारे ५०० अन्य साईटवर पाठवावे लागत. त्यांनी मला स्पष्ट केलं होतं की ते मला ओळखत नाहीत, त्यामुळे विश्वास ठेवणं तसं कठीण आहे आणि म्हणूनच पैसे सुद्धा कमी मिळणार होते. पण मला सुरुवात करण्यासाठी तेवढं पुरेसं होतं. एक महिनाभर या प्रकल्पावर काम केल्यावर मला पगार मिळाला पाच डॉलर. " ते सांगत होते.


" तर मुद्दा असा आहे " त्यांनी आपल्या आठवणी सांगणं सुरु ठेवलं ," की जेंव्हा तुम्हाला व्यवसाय करायचा असतो तेव्हा पैसे ही सर्वात मोठी समस्या असू शकत नाही. तो अर्थातच महत्त्वाचा आहे, पण पहिली समस्या मात्र नाही."

image


त्यांच्या या प्रकल्पांची मागणी वाढू लागली तसे त्यांनी दोन कर्मचारी मदतीला घेतले पण त्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. " माझ्याकडे काहीच नव्हतं सुरवातीला आलेली रक्कम मी टेबल आणि खुर्च्या आणि संगणक विकत घेण्यासाठी वापरली." ते सांगत होते .

आज शरण्यन यांच्याकडे ६५ कर्मचारी आहेत. ज्यांच्यातील सहा शारीरिक दृष्ट्या अपंगत्व असणारी मुले आहेत. " आमच्याकडे १७ संगणक आहेत जे श्रीलंकेतील सर्वोत्तम समजले जातात. प्रत्येक मजल्यावर आमच्याकडे जनरेटर बॅक-अप आणि वातानुकुलीत यंत्र आहेत. कार्यालयात काही कमतरता असेल तर मी ती लगेच पूर्ण करतो." ते म्हणाले. त्यांच्या एक्स्ट्रीम-सिओ डॉट नेट या कंपनीत कर्मचाऱ्यांना गृहकर्जासाठी सहाय्य दिलं जातं किंवा लग्नासाठी सुद्धा कर्ज दिलं जातं.

image


त्याचप्रमाणे भारत, चीन आणि फिलीपाईन्स मधून काही सल्लागार मंडळीना सुद्धा या कंपनीतर्फे पाचारण करण्यात येतं. सध्या मुंबईमध्ये त्यांची शाखा उघडण्याचे प्रयत्न शरण्यन यांचे सुरु आहेत. गेल्या सहा वर्षात कंपनीने ३८,००० सोशल मीडिया कॅम्पेन केले. "मी ज्या पहिल्या अमेरिकन कंपनीकडून पाच डॉलर कमावले, ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत." शरण्यन सांगत होते. फ़रक आता इतकाच आहे की, एक्स्ट्रीम-एसइओ डॉट नेट मधून मिळणाऱ्या सेवांकरता ते आता शंभर पटीने पैसे देतात.

कंपनीची भरभराट इतक्या वेगाने होण्यामागचं कारण म्हणजे शरण्यन यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे विविध योजना तयार असतात. एक फसली तर आम्ही दुसरी राबवतो ." हे सर्व आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. मला माहितेय मला फारसा अनुभव नव्हता. मी फक्त नफा किंवा यशाचा विचार नाही केला तर कंपनीवर वाईटात वाईट परिस्थिती उद्भवल्यास काय उपाय करता येतील याचे आराखडे बांधून ठेवले होते." कंपनीमध्ये सारं काही स्वयंचलित आहे." म्हणजे समजा एखादं काम सकाळी साडे आठ पर्यंत पूर्ण व्हावं असे निर्देश एखाद्याला दिले असतील आणि त्याने ते काम केलं नाही तर अन्य दोन जणांना त्या कामासंदर्भात सुचित केलं जातं." ते म्हणाले.

image


" कंपनीला काही नुकसान पोचणार नाही कारण प्रत्येक कामाला अनेक पर्याय उपलब्ध असतात. वेळेच्या बंधनात आपण असतो नियंत्रण ठेवणं हे आपल्या हातात असतं." विस्ताराच्या या प्रवासात, शरण्यन यांनी वावुनिया शहर कधीच सोडलं नाही. जे खरं तर अनपेक्षित आहे, कारण कोलंबोपासून दूर असणारं हे छोटसं शहर आहे. यावर त्यांचं स्पष्टीकरण असं ," मला आसरा देणाऱ्या माझ्या समाजाचं मी काही देणं लागतो, नाहीतर व्यवसाय करण्यात काहीच अर्थ उरत नाही." त्यांच्याकडचे अनेक कर्मचारी हे स्थानिक युवक आहेत ."मी त्यांना कामावर घेताना त्यांचा अनुभव बघत नाही तर त्यांना शिकण्याची किती आवड आहे हे बघतो. माझ्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचं नाव सुद्धा इंग्रजीत लिहिता येत नाही. मी त्यांना प्रशिक्षण दिलं आणि आता ते आयपीद्वारे संवाद साधू शकतात." हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. "मी सुद्धा माझ्या पहिल्या ग्राहकाकडून इंग्रजी शिकलो. मी केलेल्या चुका याच माझ्या सर्वात मोठ्या गुरु ठरल्या."

त्यांना त्यांच्या कंपनीत संदेश पसरवायचा आहे की व्यवसाय हा निव्वळ पैशांसाठी नाही तर अनुभव घेण्यासाठी सुद्धा करावा. शरण्यन यांच्या मते चांगली कंपनी तीच असते जी चांगल्या पद्धतीने सीएसआर म्हणजेच सोशल कोर्पोरेट रिस्पाॅन्सिब्लिटी (सामाजिक सामुदायिक जबाबादारी) सांभाळू शकते आणि समाजात आनंद पसरवते, ती नव्हे ज्यांच्या बँकेत बक्कळ पैसा नुसताच पडून राहतो. " तुम्ही माझ्या वैयक्तिक खात्यात ( कंपनीच्या नव्हे ) पाहिलत तर नेहमीच शुन्य शिल्लक असते. कारण मला नेहमीच स्वत:ला तहानलेला ठेवायचं असतं. " तुमचा पेला जर सतत भरलेला असेल तर तुम्ही तो भरण्याची तसदी घेणार नाही. पण जर तो रिकामा असेल तर आणि तरच तो भरण्यासाठी तुम्ही पाणी शोधाल"

गेल्या काही वर्षात शरण्यन आणि त्यांच्या कंपनीला अनेक प्रमाणपत्र (एसइओ, गुगल एनॅलिटिक्स इत्यादी) अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. २०१२, २०१३ मध्ये त्यांना सर्त्वोकृष्ट उगवता उद्योजक म्हणून प्रांतीय आणि राष्ट्रीय पातळीवर नामांकन मिळालं होतं. २०१३ मध्ये त्यांना एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढालीसाठी आणि संघर्ष सूरु असलेल्या भागातील हाताना काम दिल्याबद्दल उद्योजकता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी त्यांना सर्वात तरुण उद्योजक म्हणून सुद्धा गौरवण्यात आलं.

" मला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. मी कधीच कोणाचं अनुकरण करत त्यांच्या मागे गेलो नाही ." शरण्यन म्हणतात. पुढे ते सांगतात की, "मला स्वत:ची प्रतिमा जरी तयार करायची असली, तरी ती माझ्या पार्श्वभूमीमुळे (वावुनिया) किंवा माझ्या संपूर्ण कहाणीमुळे नव्हे किंवा माझ्या प्रवासातल्या कर्तुत्वामुळे नाही तर मी केलेल्या चांगल्या कामांमुळे माझी एक प्रतिमा बनावी अशी माझी इच्छा आहे."

उद्योजक बनण्याच्या त्यांच्या प्रवासादरम्यान, शरण्यन यांना अनेक अडचणींना समोरं जावं लागलं, पण त्या अडचणीसमोर ते झुकले नाहीत. " आमचं सरकार हे तंत्रज्ञानाची महती समजून घेण्यात अत्यंत निरुत्साही आहे. पे-पाल वापरून आमचे पैसे येतात, पण ते वापरण्यावर अनेक निर्बंध आमच्याकडे आहेत. ज्यामुळे आमच्या ग्राहकांना आम्हाला बँकेच्या माध्यमातून पैसे द्यावे लागतात आणि या अदलाबदली प्रकरणात खूप पैसे खर्च होतात. पण तुम्ही त्यांना दोष देत तुमचा वेळ वाया घालवू शकत नाहीत. यातून मार्ग सुद्धा तुम्हालाच शोधावा लागतो. "

सध्या ते उत्तर श्रीलंकेत छोट्या छोट्या स्टार्टअप मध्ये पैसे गुंतवत आहेत." श्रीलंकेत फक्त तीनच गुंतवणूक करणाऱ्या फर्म्स आहेत आणि त्यांचं उद्दिष्ट्य हे परताव्यावर केंद्रीत आहे. मला ही मानसिकता बदलायची आहे. माझा भर असतो तो ती कल्पना किती नाविन्यपूर्ण आहे यावर आणि किती फायदेशीर आहे यावर. ती कल्पना अडथळ्यांनी भरलेली असावी आणि आव्हानात्मक असावी. त्यामध्ये स्पर्धेत बाजी मारण्याची ताकद असावी."

शरण्यन यांच्याबद्दल सांगू तितकं थोडंच आहे कारण त्यांची उद्योजक बनण्याची कहाणी ही अनेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेली आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवातून आचरणाचे नियम शिकले आहेत. त्यांचा भर नेहमी शिकण्यावर राहिला आहे. म्हणजे शाळेत शिकण्यापेक्षा व्यवहार्य ज्ञानातून शिकण्यावर त्यांंचा भर अधिक आहे. त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला (पण उद्योजक झाल्यावर) शेवटी त्यांचं तत्वज्ञान समजतं ते त्यांच्याच वाक्यात ," माझ्या व्यवसायाच्या प्रत्येक पानावर मी 'माघार नाही' हे लिहून ठेवलंय, कारण अनोखं बनण्याचं ते पहिलं पाउल असतं."

शरण्यन यांची संपूर्ण कहाणी वाचण्याकरता 'त्यांच्या स्वत:च्या' वेबसाइट्ला भेट द्या .

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

नोकरी सोडली, कार विकली आणि सामील झाले स्वच्छ भारत अभियानात...

इंग्लंडमध्ये 'एमबीए'चे शिक्षण पूर्ण करून आपल्या गावातील चारा छावण्यांचा प्रश्न मार्गी लावणारा अमेय पाटील

एका ड्रायव्हरचा इंजिनिअर मुलगा ‘जिज्ञासा’ मार्फत देत आहे गरीब मुलांना शिक्षणाची उत्तम संधी

लेखक : फ्रान्सिका फेर्रारिओ

अनुवाद : प्रेरणा भराडे