महिला हक्कांसाठी ऐकाच… ‘आत्मा की पुकार’

0

सामाजिक विषयांवर नेहमी आवाज उठवतो, आपल्या हिताला बाधा आणतो म्हणून शिक्षण माफियांनी २००४ मध्ये एका युवकाचे अपहरण केले होते. मोठ्या धाडसाने तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून निसटला. आणि तेव्हापासून सामाजिक कार्यात तो अधिक अग्रेसर अधिक आग्रही बनला. पुढे ‘महिलांचा विकास’, ‘महिला हक्कांचे रक्षण’ आणि ‘महिला सशक्तीकरणा’साठीच्या सेवाकार्यात स्वत:ला वाहून घेतले. चला तर तुमचीही ओळख करून देत आहोत, या धाडसी आणि तितक्याच हळव्या मनाच्या तरुणाशी… कुंदन यांच्याशी… कुंदन श्रीवास्तव, वय वर्षे २५… चंपारण्यातील (बिहार) रक्सौल इथला जन्म आणि व्यवसायाने इंजिनियर असलेले कुंदन… आज देशभर त्यांचा नावलौकिक आहे. देशातील युवा समाजसेवकांमध्ये आघाडीचे आणि अत्यंत धडाडीचे म्हणून ते गणले जातात.

कुंदन यांना सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यांबद्दल ‘युनिव्हर्सल ह्युमॅनिटी’ तसेच ‘पीठाधीश’सह कितीतरी पुरस्कारांनी गौरवान्वित केले गेलेले आहे.

कुंदन श्रीवास्तव
कुंदन श्रीवास्तव

अत्यंत उत्साही असलेले कुंदन आपल्या गतकाळाचे स्मरण करताना स्वत:च्या आयुष्याची कथा काहीशी अशी सांगतात…

‘‘शिक्षण व्यवस्थेत नोकरशाहीच्या आशीर्वादाने फोफावलेल्या माफिया दबदब्याविरुद्ध मी अभियानच सुरू केलेले होते. माझ्या अभियानाने या गुंडांचे धाबे दणाणले होते. मग त्यांनी माझे अपहरण केले. तब्बल सात दिवस मी अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होतो. मी जिवंत घरी परतेन, याची आशाही मला नव्हती, पण तरीही मी हिंमत सोडली नाही. त्यांच्या तावडीतून अखेर मी निसटलोच. अपहरणकर्त्यांच्या लक्षात आले तसे त्यांनी माझा पाठलागही केला. माझ्या दिशेने गोळी झाडली. पायात गोळी लागली. जखमी अवस्थेतही मी पळत राहिलो. अखेर सुटलो आणि वाचलोही.’’

या घटनेने त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण दिले. घरी परतल्यानंतर कुंदन यांनी विचार केला, की एका चांगल्या उद्दिष्टासाठी लढा जारी ठेवणे किती महत्त्वाचे आहे.

ते सांगतात, ‘‘अपहरणाच्या घटनेने जर मी खचून गेलो असतो, तर पुढली सगळीच गोष्ट संपुष्टात आली असती. पण या घटनेने माझे संकल्प आणखीच दृढ बनले.’’

पुढे मग कुंदन यांनी आपले शिक्षणही सुरू ठेवले आणि लढाही. अभियांत्रिकीची पदवी घेतली. ते सांगतात, ‘‘अपहरणाच्या घटनेनंतर पुढल्याच वर्षी माझे शिक्षण पूर्ण झाले, ही बाबही माझ्यासाठी फार महत्त्वाची ठरली. यादरम्यानच माझा धाकटा भाऊ कर्करोगाने मरण पावला. माझे सामाजिक कार्य आणि शिक्षणातली व्यग्रता या दोन्ही गोष्टी मला एका अर्थाने उपयोगीच पडल्या. कारण भावाच्या मृत्यूच्या दु:खातून एरवी मी बाहेर पडू शकलो नसतो.’’

‘बी इन ह्युमॅनिटी फाउंडेशन’

कुंदन यांनी आपल्या गावातील शोषित तसेच वंचित घटकातील मुलांसाठी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचा आपला प्रयत्न सुरूच ठेवलेला होता. पुढे ते दिल्लीला आले. दिल्लीत ‘९१ मोबाईल्स’ नावाच्या एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी पत्करली. कुंदन सांगतात, ‘‘कुटुंबासाठी नोकरी करणे गरजेचेही होते. आता जेव्हापासून मी दिल्लीत आलो, तेव्हापासून महिलांवरील अत्याचाराच्या एकएक गोष्टी माझ्या कानावर पडत गेल्या. वाचण्यात येत गेल्या. बघण्यात आल्या. आणि मी ठरवून टाकले, की या विषयात आपण लक्ष घालावे. आणि यातूनच ‘बी इन ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना झाली. ‘बी इन ह्युमॅनिटी फाउंडेशन’ ही प्रत्येक घटकांतील व वर्गातील महिलांसाठी काम करणारी युवकांची एक संघटना आहे.

‘बी इन ह्युमॅनिटी फाउंडेशन’ एक स्वावलंबी संघटना आहे. कुंदन सांगतात, ‘‘आम्ही कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचे दान किवा अनुदान स्वीकारत नाही. आमच्या उत्पन्नातील काही भाग आम्ही या समाजकार्यासाठी खर्च करतो.’’

संस्थेच्या माध्यमातून कुंदन यांनी विविध गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिलांची मदत तर केलीच, त्यासह अनेक महिलांच्या पुनर्वसनातही मोलाची भूमिका बजावली. कुंदन म्हणतात, ‘‘बलात्कार, ॲसिड हल्ला, विनयभंग, हुंड्यासाठी छळ अशा गंभीर गुन्ह्यांची झळ पोहोचलेल्या महिलांसाठी अजून बरेच काही करायचे राहिलेले आहे. या महिलांचा समाजाने सन्मानाने स्वीकार करावा, अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे आणि हे तेवढे सोपे काम नाही. आम्ही आमच्या पातळीवर व क्षमतेनुसार अशा महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम करतो.’’

शिवाय ‘आत्मा की पुकार’ (आत्म्याची साद) हा उपक्रमही संस्था चालवते. ‘आत्मा की पुकार’अंतर्गत महिलांसंदर्भातले गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक परिवर्तनाची मोहीम राबवली जाते.

‘टायटल इज अनटायटल्ड’

कुंदन सांगतात, ‘‘आम्ही देशाच्या विविध भागांतून वक्त्यांना आमंत्रित करतो. गुन्ह्यात बळी पडलेल्या महिलांना मानसिक धक्क्यातून सावरण्यात मदत व्हावी म्हणून समुपदेशकांचीही मदत घेतो. महिलाविषयक गुन्हे जर संपुष्टात आणायचे असतील तर पुरुषकेंद्रित व्यवस्थेचे देशातून उच्चाटन करावे लागेल. तरुणांची मानसिकता बदलावी लागेल. स्त्री ही देखील तुमच्याप्रमाणे एक व्यक्ती आहे, हे त्यांच्या मनात खोलवर रुजवावे लागेल. आम्ही अनेक शाळांतूनही कार्यक्रम घेतो आणि मुलांमध्ये लैंगिक समानतेचे तत्व रुजवण्याचा आमच्या परीने प्रयत्न करतो. आरोग्य आणि स्वच्छतेसंदर्भातही मुलांना जागरूक करतो.’’

कुंदन यांचे नुकतेच एक पुस्तकही लिहून झालेय. ‘टायटल इज अनटायटल्ड’ असे या पुस्तकाचे नाव आहे. समाजात ज्या विषयांवर औदासिन्य आहे, त्या विषयांवर या पुस्तकात विस्तृत चर्चा केली गेलेली आहे. कुंदन म्हणतात, ‘‘शिक्षण असो अगर महिला सशक्तीकरण आम्हाला हे शब्द, या संकल्पना खऱ्या अर्थाने समाजात रुढ कराव्या लागतील. आणि प्रत्येकानेच याची सुरवात करायला हवी.’’