एका लहानशा खोलीपासून सुरुवात करत, व्यावसायिक साम्राज्याची उभारणी – भारत बायलप्पा यांची कथा

एका लहानशा खोलीपासून सुरुवात करत, व्यावसायिक साम्राज्याची उभारणी – भारत बायलप्पा यांची कथा

Monday April 11, 2016,

6 min Read

“ If you fail, never give up, because F.A.I.L. means ‘First Attempt In Learning’,” – late Dr. A.P.J Abdul Kalam.

भारत बायलप्पा यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून जणू काही हेच सिद्ध करुन दाखविले आहे आणि त्याही पुढे जात, आपल्याला असे म्हणावे लागेल की, विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी केलेल्या अयशस्वी प्रयत्नांतूनच जणू काही त्यांच्या उद्योजकतेच्या ध्येयांची पायाभरणी झाली आहे. एक वेळ तर अशीही आली की त्यांना नोकरी करण्याशिवाय पर्यायच राहीला नाही, पण उद्योजकतेविषयी त्यांच्या मनात असलेली आवड नेहमीच जिवंत राहीली. त्यांच्या या प्रवासात एप्रिल, २००७ मध्ये योगायोगाने एक चांगले वळण आले आणि त्यांनी सेटव्ह स्टाफींग सोल्युशन्स या भरती कंपनीला सुरुवात केली.

image


सेटव्ह स्टाफींग सोल्युशन्सचे २०१२ मध्ये नव्याने नामकरण करण्यात आले आणि ‘भारत हेड हंटर्स’ (Bharat Head Hunters) या नव्या नावासह कामाला सुरुवात झाली. कंपनीतर्फे बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही प्रकारच्या रिक्रुटर्सना इन-हाऊस भरती प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि सल्लागार सेवा देऊ करण्यात येते. एकदा का ग्राहकांनी आपल्या गरजा कंपनीपर्यंत पोहचविल्या की ते शक्य त्या सर्व लक्ष्य कंपन्यांची यादी तयार करतात, उमेदवारांच्या नावांची यादी बनवितात, त्यांच्याबरोबर बैठक घेतात आणि कंपनी आणि ग्राहक यांची त्यांच्या गरजांच्या आधारे जुळणी करतात. सध्या भारत हेड हंटर्सकडे शंभरहून जास्त कर्मचारी आहेत.

ग्राहकाकडून पहिलावहिला चेक मिळाला तेंव्हा...

व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसा हा खरंच खूप महत्वाचा घटक आहे का? भारत यांनी एका लहानशा खोलीतून, भाड्यावर आणलेल्या फक्त एका संगणकाच्या सहाय्याने सुरुवात केली. त्यांना ग्राहकाकडून पहिल्यांदा मिळालेला चेक होता, २,९०,००० रुपयांचा... आणि यातूनच त्यांनी व्यवसाय वाढीला सुरुवात केली. त्यांनी दोन संगणक, दोन टॅबलेटस् विकत आणले आणि दोन जणांना नोकरीला ठेवले.

पहिल्याच वर्षापासून त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली आणि एक एक पायरी चढत भारत हे आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ जाऊ लागले. लवकरच ते आणि त्यांची टीम भाड्याच्या नव्या जागेत गेली, जेथे दहा कर्मचाऱ्यांसाठी जागा होती. सुरुवातीला मिळालेल्या या यशाचे प्रमाण नंतर कमी झाले आणि ग्राहकांकडून पैसे मिळण्यात उशीर होऊ लागल्याने भारत हेड हंटर्सला लवकरच रोख रकमेचा तुटवडा भासू लागला. खरं म्हणजे त्यांचा ताळेबंद सकारात्मक होता, मात्र तरीही भारतातील भरती उद्योग हा खूपच धोक्याचा असल्याचा समज झाल्यामुळे, कोणतीही बॅंक किंवा गुंतवणूकदार त्यांना मदत करण्यासाठी तयार होत नव्हते. “ त्यामुळे जेंव्हा आम्हाला निधीची गरज होती, तेंव्हा शेवटी माझ्या पत्नीची बचत आणि सोनेच आमच्या मदतीला आले,” भारत सांगतात.

शैक्षणिक प्रवास

image


भारत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. बंगळुरुच्या पद्मावती प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले तर व्ही व्ही पुरम कॉलेज ऑफ सायन्समधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर गांधी कृषी विज्ञान केंद्र (जीकेव्हीके) महाविद्यालयातून पदवी घेण्याची त्यांची इच्छा होती, मात्र त्या परिक्षेत ते दोन वेळा नापास झाले. “ मला माझ्या गावात परत जाऊन, शेती करण्यामध्ये रस होता, मात्र माझ्या कारकिर्दीबाबत माझ्या पालकांना खूपच काळजी वाटत असल्याने, त्यांनी मला यासाठी परवानगी दिली नाही,” भारत सांगतात.

त्यानंतर भारत यांनी बंगळुरुच्या अल-अमीन कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीजमध्ये प्रवेश घेतला. त्याचबरोबर त्यांनी एलपीजी वितरणाच्या व्यवसायालाही सुरुवात केली. मात्र त्यामुळे हजेरी कमी भरल्यामुळे त्यांना अंतिम परिक्षेसाठी हॉल तिकीटच नाकारण्यात आले.

कॉलेज ड्रॉपआऊट असलेल्या भारत यांनी तरीही आपली आवड सोडली नाही आणि दोन मित्रांच्या सह सॅनिटरी वेअरचा व्यवसाय सुरु केला. निधीची कमतरता आणि फारशी गंभीर वृत्ती नसलेले सहसंस्थापक, यामुळे त्यांना लवकरच हा व्यवसाय बंद करावा लागला. मात्र यामधून ते एक महत्वपूर्ण धडा शिकले. तो म्हणजे, कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी बाजारपेठेचे गणित समजून घ्या कारण ते प्रत्येक व्यवसायाबरोबर बदलत असते.

द शो मस्ट गो ऑन! धोका पत्करणे आणि अपयशी होणे हाच तर यशाकडे जाणारा मार्ग आहे. भारत यांनी त्यानंतर इंटीरीयर डीजाईनच्या कामात हात घातला. त्यापूर्वी एका इंटीरीयर डिजाईनिंग कंपनीमध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या अनुभवातून ही कल्पना जन्माला आली होती. त्यावेळी काम करताना त्यांनी डिजाईन प्लॅनिंग, समस्या निवारण आणि इतर अनेक कामांमध्ये उत्तम कामगिरी केली होती. दुर्दैवाने, या क्षेत्रामधील मुलभूत अर्हतेच्या असलेल्या अभावामुळे हा व्यवसायाही चांगल्या प्रकारे चालू शकला नाही. मात्र यातूनही ते एक महत्वाचा धडा शिकलेच. तो म्हणजे, जर एखाद्याकडे गुंतवणूकीची ताकद नसेल, तर त्या क्षेत्रातील विशेष ज्ञान हे अतिशय महत्वाचे असते.

भारतामध्ये अचानकपणे तेजीत आलेल्या सॉफ्टेवअर व्यवसायाचे महत्व लक्षात घेऊन, भारत यांनी ओरॅकल आणि व्हिज्युअल बेसिक्समधील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी टाटा इन्फोटेक एज्युकेशनची फ्रॅंचायझी घेतली, ज्यामधील त्यांचा हिस्सा अगदी कमी होता. कंपनीने नफा मिळविण्यास सुरुवात केल्यापासूनच, या कंपनीत अधिक हिस्सा असणाऱ्यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि अखेर त्यांना कंपनी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र हा अनुभवही त्यांना आणखी एक धडा शिकवून गेलाच. तो म्हणजे, कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणे हे अतिशय महत्वाचे आहे. भागीदारांची प्रत्येक हमी आणि अट ही सहीशिक्यानिशी कागदावर उतरविली गेलीच पाहिजे.

अखेर भरती उद्योगातील प्रवेश

भारत यांनी सेफ हॅंडस् कन्सल्टंटस् या भरती कंपनीला सुरुवात केली, मात्र या कंपनीच्या प्रगतीने फारसे खूष नसल्यामुळे त्यांनी अखेर ती बंद केली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे त्यांना अखेर व्यवसाय सोडावा लागला आणि दिल्ली स्थित एका भरती कंपनीत नोकरी करावी लागली.

image


अवघ्या तीन ग्राहकांसह सुरुवात केलेल्या भारत हेड हंटर्सकडे सध्या ६६ ग्राहक आहेत. भारत हेड हंटर्स निश्चित शुल्काच्या आधारे काम करत नाही, तर येथे नेमणूकीच्या व्याप्तीच्या आधारावर रक्कम निश्चित केली जाते. जॉईंट वेंचर्चद्वारे अमेरीका, युके, सिंगापूर आणि जर्मनीतही विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.

२००७-०८ च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल १८ लाख रुपयांची होती तर २०१५-१६ मध्ये ही उलाढाल ४ कोटींवर जाऊन पोहचली होती. २०१६-१७ साली त्यांचे लक्ष्य आहे १० कोटी रुपयांचे....

त्यांच्या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून, भारत हे सध्या एका सॉफ्टवेअर टुलच्या रचनेचे काम करत असून, त्याद्वारे उपलब्ध संधींसाठी योग्य उमेदवार ओळखता येतील. त्याशिवाय ते जॉबफेअरगुरु हे सॉफ्टवेअरही विकसित करत आहेत, ज्याद्वारे योग्य उमेदवार ओळखता येईल, त्याला प्रशिक्षण देता येईल आणि केवळ त्याच्या शिक्षणाच्याच आधारेच नाही, तर त्याची गुणवत्ता आणि शिक्षण या आधारे त्याची नेमणूक करता येईल.

सध्या ते ग्लोबल रिक्रुटमेंट व्हिलेज, एक जॉब डिलिव्हरी केंद्र, या त्यांच्या स्वप्नातील प्रकल्पावर सध्या काम करत आहेत. त्याचबरोबर एक मोठी सेल्स टीम उभारण्याचीही त्यांची योजना असून, या टीमच्या माध्यमातून शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलेल्या तरुणांना ओळखून त्यांना ग्लोबल रिक्रुटमेंट व्हिलेज अंतर्गत प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यानंतर या प्रशिक्षित उमेदवारांना त्यांच्या ग्राहकांसाठी भरती केले जाईल.

बाजारपेठेतील संधी

आज, भरती करणे म्हणजे केवळ उमेदवार मिळविणे, त्यांच्या मुलाखती घेणे आणि रिकाम्या जागा भरणे एवढेच राहिलेले नाही, तर याचा अर्थ योग्य क्षमतेचे उमेदवार आणि रिकाम्या जागा यांची सांगड घालून देणे हा आहे. हिरी, वेंचरसिटी, ग्रोन आऊटस बीलॉंग आणि मायरेफर्स सारख्या स्टार्टअप्स या क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहेत.

मॅट्रीक्स पार्टनर्सचे संचालक तरुन दावडा सांगतात, “ भारतातील रिक्रुटमेंटच्या बाजारपेठेचे मूल्य एक बिलियन डॉलर्स एवढे असून, ती २० टक्के सीएजीआर ने वाढत असून, या क्षेत्रात सध्या अनेक महत्वपूर्ण संधी उपलब्ध आहेत.”

या सारख्या आणखी काही यशस्वी उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

उद्योजकतेच्या जगतात सांगलीचा ठसा उमटवणाऱ्या पयोद उद्योगसमूहाच्या देवानंद लोंढे यांची यशोगाथा

दहावी नापास ते यशस्वी उद्योजक, 'मिट्टीकूल'च्या मनसुखभाई यांच्या यशोगाथेवर सीबीएसई बोर्डात धडा

‘मन की बात’ ने पालटले त्रिमुर्तींचे नशीब, स्वयंरोजगारातून देत आहेत इतरांनाही रोजगार!

लेखक – अपराजिता चौधरी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन