हॅपी माईंडस् इंटरनॅशनल - मुलांचे विश्व समृद्ध करणारे परिपूर्ण बालसंगोपन केंद्र

0

मातृत्वाचा आनंद हा खरे तर शब्दांच्या पलीकडचा... पण त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी घेऊन येणारा.... पूर्वी एकत्र कुटुंबात लहान मुलांना वाढवताना अनेकांची मदत होत असे. पण सध्याच्या काळात खास करुन शहरी भागांतील विभक्त कुटुंबात बालसंगोपन हा मोठा प्रश्नच पालकांपुढे असतो. त्यातच नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी तर हा प्रश्न अधिकच अवघड होतो. अमेरिकेसारख्या देशांमध्ये अतिशय व्यावसायिक पद्धतीने काम करणारी उत्तम अशी बालसंगोपन केंद्रं उपलब्ध आहेत, पण आपल्याकडे मात्र अजूनही अशा प्रकारच्या केंद्रांची चांगलीच कमतरता आहे. स्वतःच्या अनुभवातून ही गोष्ट समजलेल्या सोनिया चुघ यांनी मात्र यामध्ये बदल करण्याचा ठाम निर्णय घेतला आणि जन्म झाला हॅपी माईंडस् इंटरनॅशनल या डे केअर सेंटर अर्थात बालसंगोपन केंद्राचा (Happy Minds International)...

आणि आज मुंबईसारख्या शहरात सत्तरपेक्षा जास्त तरुण माता या त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी सोनिया चुघ यांच्या निश्चितच आभारी आहेत. सोनिया यांनी त्यांच्या लहानग्यांची जबाबदारी आपल्या या केंद्राच्या माध्यमातून घेतली नसती, तर या माता त्यांची कारकिर्द इतक्या सहजपणे करुच शकल्या नसत्या. मात्र आपल्यासाठीही हा अनुभव खूप काही शिकवणारा असल्याचे अतिशय नम्रपणे सोनिया सांगतात. “ त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद किंवा त्यांची मते ही माझ्यासाठी खरोखरच अतिशय मौल्यवान आहेत. खरे म्हणजे माझी भूमिका ही शिक्षिकेची असली पाहिजे, पण मीच दररोज त्यांच्याकडून केवढे तरी शिकत असते. त्याचबरोबर पालकांबरोबरचा माझा संवादही मला सातत्याने काहीतरी शिकविणारा अनुभव असतो.” आज अनेक मुलांसाठी आपले घरच बनलेल्या या केंद्राची कथा सोनिया यांच्याकडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

आग्रा हे सोनिया यांचे मूळ शहर... त्या एका पुरणमतवादी कुटुंबात वाढल्या. त्यांचे वडील हे बॅंकेत नोकरीला होते. लखनौ विद्यापीठातून सोनिया यांनी कम्प्युटर ऍप्लिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर लवकरच त्या अमेरिकेला गेल्या आणि तेथे नोकरी केली. मात्र जेंव्हा त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला, तेंव्हा मात्र त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना जाणवू लागल्या. खास करुन त्यांचे बाळ तेंव्हा अवघ्या सहा महिन्यांचे असल्याने... मात्र तरीही भारतात आल्यावर त्यांनी सहकारी उपाध्यक्ष या नात्याने २०११ मध्ये जे पी मॉर्गनमध्ये कामाची धुरा स्विकारली. पण मार्च २०१२ मध्येच त्यांनी ही नोकरी सोडली. त्याबाबत बोलताना त्या सांगतात, “मी माझ्या आईवडीलांना माझ्याकडे रहायला बोलावले आणि बाळाला सांभाळायला बाईही ठेवली आणि एक वर्षभर काम करत राहिले. पण या सगळ्या व्यवस्थेनंतरही मी खूश नव्हते. खात्रीचे बालसंगोपन केंद्र उपलब्ध नसल्यामुळे केलेली ही एक तात्पुरती व्यवस्था आहे, हे मला जाणवत होते.” हा त्यांच्यासाठी मोठाच धक्का होता, कारण बालसंगोपन केंद्र हे अमेरिकेतील एक संघटीत क्षेत्र आहे, हे त्यांना चांगलेच माहित होते पण भारतात मात्र त्याच्या अगदी विपरित परिस्थिती असल्याचे त्यांना दिसून आले.

नोकरी सोडल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आणि आपल्या बालसंगोपन केंद्राच्या कल्पनेवर त्यांनी मार्च २०१२ मध्ये काम करायला सुरुवात केली आणि ऑगस्ट २०१२ मध्ये हॅपी माईंडस् इंटरनॅशनलचा जन्म झाला. सुरुवातीला सहा कर्मचाऱ्यांसह त्यांनी कामाला सुरुवात केली. विविध देशांत या क्षेत्रात कोणते मॉडेल अस्तित्वात आहे, याचा सोनिया यांनी त्यासाठी अभ्यास केला. “ इतर सगळ्याच ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर खूपच व्यावसायिकता असल्याचे मला जाणवले, जे भारतात आणण्याची गरज होती,” सोनिया सांगतात.

हॅपी माईंडस् इंटरनॅशनल हे बालसंगोपन केंद्र हे एक परिपूर्ण असे मॉडेल असून शिक्षण आणि मुलांची काळजी या दोन्ही गोष्टी इथे उपलब्ध आहेत. रविवार वगळता वर्षभरात त्यांना केवळ चौदा सुट्टा असतात, या क्षेत्रातील हे एक खास वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

मुलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी या केंद्राची अतिशय समर्पित अशी रचना असून तीन सुस्पष्ट श्रेणी आहेत – बेबी झोन (चार महिने ते दीड वर्ष या वयोगटातील मुले), टॉडलर झोन (चार वर्षांपर्यंतची मुले) आणि आठ वर्षांपर्यंतची मुले, जी शाळा सुटल्यानंतर या केंद्रावर येतात. या केंद्रात रात्री साडे आठ वाजेपर्यंत मुले राहू शकतात, ज्यानंतर त्यांचे पालक त्यांना घरी घेऊन जातात. सध्या या ठिकाणी दीडशे मुलांची काळजी घेतली जाते. “ मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रीत करणारे असे हे मॉडेल आहे. मुले रोज येथे शिकत असतात, बालसंगोपनाचा समृद्ध अनुभव येथे त्यांना मिळू शकतो. त्याशिवाय सामाजिक आणि भावनिक विकास हे पैलूही तेवढेच महत्वाचे असतात आणि या पैलूंवरही आम्ही विशेष भर देत असतो,” सोनिया सांगतात.

आपला मुलांच्या पालकांबरोबर सातत्याने संवाद असल्याचे सोनिया आवर्जून सांगतात, जेणेकरुन कोणताही निर्णय घेताना आवश्यक ते पुरेसे ज्ञान आणि माहिती पालकांना मिळू शकेल आणि हा निर्णय ते अधिक सक्षमपणे घेऊ शकतील.

सोनिया यांची मुलगी आता पाच वर्षांची आहे आणि हॅपी माईंडस् इंटरनॅशनलमधील सर्वात पहिले मुल म्हणजे तिच असल्याचे, त्या अभिमानाने सांगतात. ती येथे अतिशय उत्तम प्रकारे वाढत आहे. डिसेंबरपासूनच त्यांनी रात्रीही सेवा देण्यास सुरुवात केली असून, पालकांना आणखी मदत करण्याचा यामागचा हेतू आहे.

“ एचएमआयमध्ये आम्ही सातत्याने मुलांच्या विकासावरच संपूर्ण लक्ष केंद्रीत करत असतो, मग त्यासाठी वेगळेवेगळे मार्गही अवंलबिले जातात, जसे की पालकांबरोबरचा नियमित संवाद असो किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरचा संवाद असो ज्यामाध्यमातून पुढे पालकांपर्यंत माहिती पोहचू शकते. या रचनेचा मुलांना प्रचंड फायदा झाल्याचा आम्हाला अनुभव आहे,” सोनिया सांगतात.

लेखक – सास्वती मुखर्जी

अनुवाद - सुप्रिया पटवर्धन