नेटीझन्सचा नवा अड्डा.... नुक्कड कथा... 

0

दूरदर्शनवर ८० च्या दशकात एक मालिका होती ‘नुक्कड’. ज्यांनी ही मालिका पाहिली, त्यांना त्यातले कलाकार आजही आठवतात. घनशू भिखारी, पांडू हवालदार अशी अनेक पात्रं लोकांच्या कामच्या स्मरणात राहिली आहेत. ती त्यांच्या आठवणींचा भाग बनली आहे. नुक्कड म्हणजे काय तर शहरातल्या वस्तीतली मध्यवर्ती जागा. जिथं गप्पा टप्पा होतात, वाद होता, मित्र जुळतात, नवीन नाती तयार होतात आणि ती अनंत काळापर्यंत टिकण्यासाठी नुक्कडच कारणीभूत ठरतं. इतकं की आपण त्यांचा कधी भाग बनलो हेच समजत नाही. सर्व कसं आपसूक घडतं, ठरवून नाही. म्हणूनच नुक्कड ही जागा आयुष्यभर लक्षात राहते, त्याच्या सकारात्मक आठवणींमुळे.

सध्या इंटरनेटवरही असंच नुक्कड सुरु झालं आहे, ते आहे कथांचं.... ‘नुक्कड कथा’ हा नेटीझन्सचा व्यक्त होण्याचा नवा अड्डा आहे. इथं मराठी साहित्याला नवीन पालवी फुटते आहे, नवीन साहित्यिक घडत आहेत. अशी ही नुक्कड कथा कमालीची लोकप्रिय होत आहे ती त्याच्या एकूणच आशयघन मांडणीमुळे. 

मोबाईलमुळं फेसबुक आणि इतर सोशल मीडियाचं विश्व अगदी हातात आलं. लोक त्याच्या नुकसानीबद्दलच जास्त बोलतात. पण त्याचबरोबर त्याचे फायदेही आहेत. अगदी काही क्लिकवर असलेल्या या माध्यमानं अनेकांना लिहितं केलं. याचा फायदा नवीन साहित्य तयार व्हायला झाला हे कुणी नाकारणार नाही. इंग्रजी यात अग्रेसर राहिली. टायनी स्टोरी, स्मॉल स्टोरी असे अनेक नेटीझन्सचे प्रयोग सोशल मीडियावर व्हायला लागले. मग आपली मराठी कशी मागे राहिली. नोव्हेबर २०१५ मध्ये नुक्कड ब्लॉग सुरु झाला. लघुकथा किंवा लघुतम कथा या आकृती बंधाचा शोध घ्यायचा हा महत्त्वाचा उद्देश त्यामागे होता. आणखी एक महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे गोष्टी सांगणाऱ्यांना रोज नवीन काहीतरी उद्दीष्ट मिळावं. काही कालावधीतच या ब्लॉगला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन महिन्यात ३०० हून अधिक नुक्कड कथा हाती आल्या. त्या सांगणाऱ्यांची मोठी यादीच तयार झाली. आज नुक्कड गोष्टी सांगणाऱ्यांची संख्या १०० च्या वर गेलीय. ते सातत्याने लिहित आहेत. आणि हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही तर, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी आणि कॅनडा इथले मराठी तरुण-तरुणी सुद्धा नुक्कड कथा सांगू लागलेत. नुक्कड कथाची जबाबदारी असलेला अक्षय वाटवे सांगतो, " नुक्कड कथा हा एक इंटरनेटवरचा नवा व्यवसायिक दृष्टीकोनही स्पष्ट करतोय. विविध कथांच्या माध्यमातून नवीन कथाकारांना एकत्र आणण्याबरोबरच त्यांना गुगल एडवर्ड आणि हिटच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून देण्य़ाची ही संकल्पना आहे. जसजश्या हिट वाढत जातील, तसा हा व्यवसायही वाढत जाईल"  

नुक्कड कथेला तात्कालिन संदर्भ आहेत. त्या त्यावेळच्या बोलीभाषेतच जन्माला येतात. ही कथा मनाला भिडते कारण तिच्या मांडणीत एक निरागसता असते, ती मनापासून सांगितलेली असते. म्हणूनच ती शाश्वत असते. आजवर ३०० हून अधिक नुक्कडकथांमधून हेच जाणवलंय. 

नुक्कड कथा म्हणजे काय?

ज्या कथेला कोणतेही व्याकरण नाही ती नुक्कड कथा. तिला इतिहास नाही, तिने स्वतःची वाट स्वतः शोधायची आहे. प्रत्येक नुक्कड कथा ही स्व‘तंत्र’ असते; कधी तिचे आकृतिबंध समान असू शकतात पण, आशय मात्र पूर्ण वेगळाच असतो. कमीत कमी अवकाशात जास्तीत जास्त आशय देणे हा तिचा प्रमुख स्वभाव असतो. चार ओळींपासून चारशे शब्दांपर्यंत तिचा विस्तार असू शकतो. बुकहंगामा डॉट कॉमच्या फेसबुक पेजच्या मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही आपली नुक्कड गोष्ट पोस्ट करू शकता. 

नुक्कड अभिवाचन -

नुक्कड कथाला चांगला प्रतिसाद मिळाला. नेटीझन्सनी ही कल्पना उचलून धरली. त्यामुळं सहाजिकच आता त्याचा पुढचा टप्पा गाठण्याचं ठरवण्यात आलं. नुक्कड कथा अगदी एखादा शेर सांगावा तशी सांगण्यात येणे. शेवटच्या वाक्यात अनेकदा ती पूर्ण होते. अगदी त्रिवेणीसारखी नवे अर्थही देते. अशा या कथांचे ८९ व्या साहित्य संमेलनात अभिवाचन करण्यात आले. त्यानं श्रोत्यांची मनं जिंकली. ह मो मराठेंना ही एकूण कल्पनाच भारी आवडली. इतर साहित्यिकांनी त्याला उजवा कौल दिला यामुळे आता नेटीझन्सनी याची पुढची पायरी गाठायचं ठरवलं. आता युटूबच्या माध्यमातून नुक्कड कथा कधीही कुठेही सांगता येतात. पाहता येतात आणि ऐकता ही येतात. २६ जानेवारी २०१६ला नुक्कड टीव्ही हे युटूब चॅनल सुरु झालं. त्याला ही चांगला प्रतिसाद मिळतोय. अक्षय वाटवे सांगतो " हा अभिवाचनाचा कार्यक्रमही व्यावसायिक दृष्टीकोनातून आकृतीबंध करण्यात आलाय. यातून मिळणारा निधी, नवे लेखक घडवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.  त्यामुळे मराठी साहित्य जतन आणि साहित्यिकांना आर्थिक लाभ मिळवून देणे  हा मुख्य उद्देश आहे." 


सिनेमा जसा रिलीज होतो ना तसंच नुक्कड टीव्हीवर दर शुक्रवारी सकाळी ‘नऊ वाजता’ एक नुक्कड कथा प्रदर्शित केली जाते. प्रत्येक कथेला सरासरी १५००० व्ह्यूव्ज मिळतात. ही संख्या दिवसागणिक वाढत जातेय. यातूनच नवे तरुण अभिवाचकही तयार होत आहेत. नवा प्रेक्षकवर्ग तयार होत आहे. काही नवीन दाखवलं तर ते पहाण्याची प्रेक्षकांची तयारी असते. हेच नुक्कड कथानं दाखवून दिलंय.

नुक्कड कथा या संकल्पनेला मूर्त स्वरुप दिलं सुनील गोवर्धन, जयंत पोंक्षे, विक्रम भागवत यांनी. यातला क्रिएटिव्ह भाग अक्षय वाटवे आणि डिजिटल मार्केटिंग सोहम सबनीस हे दोन तरुण पाहतात. एकूण काय तर नुक्कड कथांची मुळं जगभर पसरत आहे, गोष्टी सांगणारे असंख्य लोक एकत्र येऊन शब्दांची उधळण करत आहेत.

यासारख्याच आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

कथाकथनाची कला शिकवणारं ‘कथालय’

विवेकी विचारांची पेरणी करुन भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ‘अक्षरमित्र’

स्वप्नांनाच उद्दिष्ट बनवा : रश्मी बंसल