'कोर्सगिग.कॉमʼ : व्यावसायिक प्रशिक्षण आणि अध्ययन साहित्य उपलब्ध करुन देणारे ऑनलाईन माध्यम

0

ʻमला आजपर्यंत या गोष्टीची जाणीवच नव्हती की एक महिला असूनही, मी एखादे काम करण्यास सक्षम आहे. कोणत्याही उद्देश्याला प्राप्त करण्यासाठी स्वप्ने पहा, त्यावर प्रेम करा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा. त्यानंतर सर्व जग तुमचेच असेल.ʼ अनिता सेंथिल यांच्या या शब्दांमध्येच त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा आपल्याला अंदाज येतो. केरळमधील पलक्कड नावाच्या एका लहान गावातील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अनिता यांना त्यांच्या पालकांनी आपली कारकिर्द घडविण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्याशिवाय कारकिर्द घडविण्यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबादेखील दिला होता.

अनिता यांनी जे काही करुन दाखविले आहे, ते करण्याचा विचार स्वप्नातदेखील त्यांच्या गावातील कोणत्या मुलीने केला नसेल. मात्र त्यांचा आदर्श केवळ त्यांच्या गावातीलच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातील लोकांनीदेखील घ्यायला हवा, असे जेव्हा आम्ही त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी स्मितहास्य करुनच ती गोष्ट टाळली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र ʻविंग्स ऑफ फायरʼपासून प्रेरणा घेऊन आणि आपल्या मित्रपरिवाराने दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याचे ठरविले. २०१२ साली त्यांनी Coursegig.com (कोर्सगिग.कॉम)ची स्थापना केली. कोर्सगिग एक व्यावसायिक प्रशिक्षण आणि मोठ्या स्तरावर अध्ययन साहित्य उपलब्ध करुन देणारे ऑनलाईन माध्यम आहे. त्यांच्याकडे विविध विषयांना संबंधित अध्ययन साहित्याचा विशाल संग्रह असून, ते ऑनलाईन प्रशिक्षकदेखील उपलब्ध करुन देतात.

पलक्कड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिता पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाकरिता कोईंबतुर येथे आल्या. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी २००८ साली चेन्नई येथे एका बीपीओमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथे घालवलेले वेळ आणि मिळालेला अनुभव त्यांच्या जीवनात अनेक प्रसंगी त्यांना उपयोगी पडला. अनिता सांगतात की, ʻआज जर मी माझ्या आय़ुष्यात काही मिळवण्यासाठी सक्षम आहे ते त्याकाळी मिळालेल्या अनुभव आणि व्यतित केलेल्या वेळेमुळेच.ʼ एवढी वर्षे आपल्या घरापासून दूर राहणेदेखील अनिता यांच्याकरिता आव्हानात्मक होते. त्यांना त्यांच्या परिवाराची आठवण येत असे. परिवारापासून लांब राहणे, त्यांच्याकरिता कठीण होऊ लागले. त्यामुळे २००९ साली त्यांनी आपल्या नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर आपल्या घराजवळच काही करण्याची संधी त्या शोधत होत्या. या दरम्यान त्यांना जे काम मिळाले ते त्यांना समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे त्यांनी फ्रीलांस कंटेन्ट प्रोड्युसर म्हणून काम करणे, सुरू केले. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास केला. अनितासाठी तो काळ अत्यंत कठीण होता. मात्र त्यामुळे त्या अधिक निडर बनल्या. अनिता सांगतात की, ʻत्या कठीण काळाने मला माझ्या जीवनात पुढे जाण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य़ दिले.ʼ अनिता यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. आतापर्यंतच्या जीवनप्रवासातील चुका आणि संघर्ष या गोष्टींमुळे बरेच काही शिकायला मिळाल्याचे अनिता सांगतात.

फ्रीलान्सर म्हणून काम करताना त्यांनी व्यवसायातील बारकावे शोधण्यासोबतच व्यवसायाची रणनीती आणि बाजाराचा अभ्यासदेखील केला. त्या सांगतात की, ʻबाजाराच्या विश्लेषणामुळे मला माझ्या डोक्यात वारंवार येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडले जसे की, मी हे काम का करत आहे. तसेच त्यामुळे मला माझ्या प्रतिस्पर्धकांबद्दल माहितीदेखील मिळाली.ʼ विवाह आणि मातृत्व या गोष्टी अनिता यांच्या उद्योगाच्या आणि स्वप्नपूर्तीच्या मार्गामध्ये अडसर ठरल्या नाहीत, याचा त्यांना अभिमान आहे. शिवाय त्या आपल्या ध्येयापासूनदेखील दूर गेल्या नाहीत, याचा त्यांना आनंद आहे. त्या सांगतात की, ʻमाझे अधिकतम मित्र मला सांगतात की, ते त्यांच्या परिवारासोबत व्यस्त आहेत. पारिवारीक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना इतर काही कऱण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र माझ्या मते, जर कोणी मनात आणेल तर दोन्ही गोष्टींचे नीट व्यवस्थापन करुन त्यामध्ये संतुलन राखता येऊ शकते. पुढे काय करायचे आहे, याबद्दल मी नेहमी स्वप्न पाहत असते आणि ते कसे पूर्ण करायचे आहे, याचादेखील विचार करत असते. मला यामुळे आनंद मिळतो. महत्वाकांक्षा आणि आशावाद यामुळे मला जीवन जगण्याची उर्जा मिळते.ʼ

आपल्या टीमबद्दल अनिता आनंदाने सांगतात. त्या म्हणतात, ʻमाझी टीम खूप चांगली आहे आणि माझ्या प्रत्येक निर्णयाचे ते समर्थन करतात. माझ्याकडे सध्या कामात मदत करण्यासाठी तीन कर्मचारी आहेत आणि बाकी सर्व फ्रीलान्सर आहेत. माझे व्यवस्थापनाचे काम सोपे करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र अनेकदा माझे कार्यालय नसल्याची कमतरता मला जाणवते.ʼ

यावर्षी सुरुवातीला एक मोठा निर्णय अनिता यांनी घेतला आहे. कोचीन येथे Keyways Edu Service (किवेज एजु सर्विस)ची त्यांनी स्थापना केली आहे. त्या सांगतात, ʻकिवेजच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या प्रकारची शैक्षणिक सहाय्यता उपलब्ध करुन देतो. विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होत आहे की नाही आणि आपल्या शिक्षणासंबंधीचे लक्ष्य मिळवण्यासाठी ते योग्य दिशेने प्रयत्न करत आहेत की नाहीत, यासाठी आम्ही त्यांना इंटरनेट आणि तांत्रिक संसाधने उपलब्ध करुन देतो. आमचे मुख्य लक्ष्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणे आहे. जेणेकरुन येणाऱ्या काळात ते एका उत्तम कारकिर्दीच्या दिशेने पाऊल टाकतील.ʼ आता Coursegig.com आणि academicpaperhub.com दोघांनाही किवेज एजु सर्विसमध्ये विलिन करण्यात आले आहे. यापैकी academicpaperhub.com पेपर तयार करण्याचे काम करते. एक उद्योजक म्हणून त्यांनी कधी नेटवर्किंगबाबत नाक मुरडले नाही. विविध संघटनांच्या त्या सदस्या आहेत. यामुळेच बऱ्याच लोकांच्या संपर्कात येण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यापैकी अनेक लोकांनी त्यांना ध्येयप्राप्तीकरिता प्रेरित करण्याचे काम केले आहे. आपल्या स्वप्नांना पूर्ण करताना दुसऱ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करा, असा संदेश देणाऱ्या अनिता स्वतःला सदैव सक्रिय ठेवण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यान करतात. मी फक्त सकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देते आणि जे काही करते, त्यावर मला गर्व आहे, असे अनिता सांगतात.

Related Stories

Stories by Ranjita Parab