हिंदुस्थान कोका कोला कंपनी कोकणात उभारणार प्रकल्प - कोकणातील ५०० युवकांना मिळणार रोजगार

- अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत एक हजार कोटींची कंपनीची गुंतवणूक

हिंदुस्थान कोका कोला कंपनी कोकणात उभारणार प्रकल्प - कोकणातील ५०० युवकांना मिळणार रोजगार

Thursday January 05, 2017,

1 min Read

हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस कंपनी ही कोकणातील अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये गुंतवून नवीन प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पासाठीचे जमीन देकार पत्र आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कंपनीचे उपाध्यक्ष (कार्पोरेट अफेअर्स) उमेश मलिक यांच्याकडे सुपूर्द केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये या कंपनीस शंभर एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. या ठिकाणी कोका कोला कंपनी ज्यूस, बाटलीबंद पाणी व शितपेये यांचे उत्पादन करणार आहे. कोका कोला कंपनीचा राज्यातील हा चौथा प्रकल्प असणार आहे.


image


देसाई म्हणाले की, हिंदुस्थान कोका कोलाच्या या प्रकल्पामुळे कोकणातही औद्योगिक संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग विभागाच्या औद्योगिक विकेंद्रीकरणाच्या धोरणामुळे कोकणात उद्योग येत आहेत. या प्रकल्पामुळे कोकणातील सुमारे 500 ते 600 युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी उद्योग विभागामार्फत प्रयत्न करणार आहे.

मलिक म्हणाले की, मेक इन इंडियाअंतर्गत महाराष्ट्रात हिंदुस्थान कोका कोला कंपनीने हा प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. सुमारे एक हजार कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक येथे करण्यात येणार असून हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असणार आहे.