रेस्तरॉमधील खाद्यपदार्थ घरपोच करणारे ʻग्रॅबयुअरफूडʼ

रेस्तरॉमधील खाद्यपदार्थ घरपोच करणारे ʻग्रॅबयुअरफूडʼ

Monday January 11, 2016,

3 min Read

भलेही आपण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या फूडटेक स्टार्टअप्सच्या गर्दीत वावरत असू, मात्र या स्टार्टअपमुळेच आपले आयुष्य अधिक सुविधापूर्ण झाल्याचे सत्य आपण नाकारू शकत नाही. मसालाबॉक्स, फ्रेशमेन्यू, स्विगी किंवा होला शेफ, गरमागरम खाद्यपदार्थ घरपोच मिळणे, आता अधिक सहजसोपे झाले आहे. अस्सल खवय्यांना याचा कायम आनंद लुटता यावा, यासाठी रोशन केपी, अश्विन राज, रिजिथ रामदास आणि आनंद राज या शालेय मित्रांनी डिसेंबर २०१४ रोजी ʻग्रॅबयुअरफूडʼ (Graburfood)ची स्थापना केली. वर्दळीच्या बाजारात आपले एक वेगळे स्थान निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन, ग्रॅबयुअरफूडने त्यांची वितरण व्यवस्था अविरत आणि विनाअडचण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. २२ वर्षीय रोशन सांगतात की, त्यांच्याकडे खाद्यपदार्थांचे तज्ञ्ज असून, ते ग्राहकांना मदत करतात.

image


रोशन पुढे सांगतात की, ʻऑर्डर नोंदणी झाल्यानंतर ४५ मिनिटांच्या आत आम्ही ती वितरित करण्याचा प्रयत्न करतो. रेस्तरॉपासून पाच किलोमीटर अंतरातील ऑर्डरचे वितरण मोफत करण्यात येते. याशिवाय आम्ही वाढदिवसाच्या केकचे वितरण मध्यरात्रीदेखील करतो.ʼ एखाद्या रेस्तरॉला ऑर्डर देण्याशिवाय ही टीम त्याच रेस्तरॉच्या वितरण व्यवस्थेचा वापर करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरुन अतिरिक्त मनुष्यबळ त्यांना सांभाळावे लागत नाही. मात्र एखाद्या ऑर्डरचे वितरण होईपर्यंत तिची काळजी ग्रॅबयुअरफूडद्वारे घेतली जाते. या टीमला बंगळूरू येथे त्यांचे काम सुरू करायचे होते. मात्र या शहरात या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी अधिक असल्याने, तेथे काम सुरू करणे काही प्रमाणात आव्हानात्मक ठरणार होते. त्यामुळे त्यांच्यासमोरील दुसरा पर्याय होता तो केरळ. सुरुवातीच्या काळात त्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्येक ऑर्डरमागे १० ते १२ टक्के कमिशन घेण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला लोकांचा विरोध होता. त्यामुळे अखेरीस त्यांच्या यादीत काही निवडक रेस्तरॉच शिल्लक राहिली होती.

रोशन सांगतात की, ʻसुरुवातीला आमच्याकडे कर्मचारी नसल्याने संस्थापकांमध्येच कामाची विभागणी करुन देण्यात आली होती. फोनवर एखादी ऑर्डर घेणे, त्यापासून ते ती घरपोच वितरीत करणे, ही सर्व कामे आम्ही केलेली आहेत.ʼ सुरुवातीला या स्टार्टअपला प्रतिदिन केवळ पाच ते दहा ऑर्डर्स मिळत असत. तीन महिने कामाचा अनुभव घेतल्यानंतर मार्च २०१५ रोजी त्यांनी पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. कालांतराने ग्रॅबयुअरफूडने २० रेस्तरॉंसोबत काम सुरू केले आणि सध्या ते कोचीमध्ये प्रतिदिन १०० ते १३० ऑर्डर्सचे वितरण करतात. तसेच त्यांची प्रतिमाह वाढ ही २० ते २५ टक्के एवढी आहे. ग्राहक ग्रॅबयुअरफूडच्या संकेतस्थळावर, फोनद्वारे किंवा एखाद्या रेस्तरॉमध्ये थेट आपल्या ऑर्डरची नोंदणी करू शकतात. या स्टार्टअपमध्ये सध्या १५ कर्मचारी असून, एकट्या कोची शहरात त्यांनी दोन ठिकाणी आपले केंद्र सुरू केले आहे. ग्रॅबयुअरफूड हे आपल्या या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या गुंतवणूकदाराचा शोध घेत आहेत. तसेच कोचीस्थित एका कंपनीसोबत ते स्वतःचे मोबाईल एप्लिकेशन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१६ साली ते एप्लिकेशन तयार होणार असून, एण्ड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध होणार आहे. पुढील तीन महिन्यात कोईंबतूर आणि मंगलोर येथे व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच २०१६च्या अखेरपर्यंत मेट्रोसिटीमध्ये काम सुरू करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

फूडटेक क्षेत्रात सध्या बऱ्याच उलाढाली होत आहेत. स्पूनजॉय आणि डाझा यांसारख्या स्टार्टअपचे काम बंद होणे तसेच टाईनीआऊल आणि फूडपांडासारख्या स्टार्टअप्सना येणाऱ्या अडचणींमुळे या क्षेत्रातील आव्हानांची आपल्याला कल्पना येऊ शकते. प्रतिदिन ३०० ऑर्डर्स मिळणे, हे कठीण काम नव्हे. तर जेव्हा हा आकडा ३००च्या पलीकडे जाईल, तेव्हा खऱ्या खेळाला सुरुवात होईल. सीडफंड वेन्चर पार्टनर तसेच गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक संजय आनंदराम सांगतात की, तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले अन्न उद्योग हे संचलन केंद्रीत असतात. अनेक स्टार्टअप कमी लोकसंख्या विचारात घेऊन सुरुवात करतात, संपूर्ण देशाचा ते विचार करत नाहीत. या विचारात बदल आणण्यासाठी आपल्याला किमान एक पिढी किंवा दहा वर्षानंतरचा विचार करावा लागेल.

जिथे मागणी केली जाते, तिचा पुरेपुर विचार आपल्याला करता यायला हवा. ʻमी देखील हे करू शकतोʼ, हा विचार करुन अनेक लोक या क्षेत्रात येतात, त्यांना या क्षेत्राबद्दल तितकी आत्मीयता असेलच असे नाही. ʻया क्षेत्रात गेल्या दशकापासून आपसूकच बदल होत गेले. या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला या क्षेत्राबद्दल उत्कट भावना असणे, गरजेचे आहेʼ, असे इंडियाकोशन्टचे संस्थापक आनंद लुनिया सांगतात. यासारखा अजून एक फूडटेक स्टार्टअप ʻमसालाबॉक्सʼ हा केरळ येथे सुरू झाला असून, सध्या बंगळूरू येथे कार्यरत आहे. अनेकांच्या मते, या क्षेत्रात अडचणी कमी असल्याने बऱ्याच लोकांना येथे नशीब आजमवायचे आहे.

लेखक - सिंधु कश्यप

अनुवाद - रंजिता परब