एका विरामानंतर नव्याने कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या महिलांना मदत करण्याचे लक्ष्य... 

0

आजच्या घडीला शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. एक प्रकारे किमान या क्षेत्रात तरी स्त्री-पुरुषांमधील अंतर झपाट्याने कमी होत आहे, असेच म्हणावे लागेल. याबाबतच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतात पदवीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ४५.९ टक्के तर पीएच.डी साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ४०.५ टक्के स्त्रिया आहेत. पण त्याचबरोबर दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष नोकऱ्यांमधील स्त्रियांच्या प्रमाणात मात्र घट होताना दिसत आहे – २००४-०५ मध्ये ३७ टक्के एवढे असलेले प्रमाण २००९-१० मध्ये २९ टक्क्यांवर आले आहे. २०११-१२ मध्ये शहरांमध्ये नोकरी करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण हे १४.७ टक्के, जे १९७२ मध्ये १३.४ टक्के एवढे होते. याचाच अर्थ एवढ्या वर्षांत या प्रमाणात अगदीच किरकोळ वाढ झाली होती. आजच्या घडीला कामगार शक्तीत स्त्रियांचा समावेश वाढविणे हे खऱ्या अर्थाने गरजेचे झाले आहे. यामागील कारण पुरेसे स्पष्ट करण्यासाठी पुढील आकडेवारी निश्चितच उपयोगी पडेल, ज्यानुसार जर २०२५ पर्यंत कामगार शक्तीतील महिलांच्या प्रमाणात केवळ १० टक्क्यांनी जरी वाढ झाली (आणखी ६४ मिलियन महिला), तरी भारताचा जीडीपी १६ टक्क्यांनी वाढू शकेल.

आज अशा अनेक संस्था आहेत ज्या स्त्रियांना व्यावसायिक कारकिर्द सुरु करण्यासाठी किंवा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी मदत करत आहेत. विशेष म्हणजे मालक वर्गालाही आता या गोष्टीचे महत्व जाणवू लागले असून, एका ब्रेकनंतर पुन्हा कामाला सुरुवात करु इच्छिणाऱ्या महिलांचा विचार एक व्यवहार्य गट म्हणूनही त्यांच्याकडून होताना दिसत आहे. बऱ्याचदा मूल झाल्यामुळे किंवा कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी म्हणून महिलांना काही काळासाठी नोकरीतून विराम घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत पुढील संस्था या स्त्रियांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि पुन्हा एकदा कॉर्पोरेट क्षेत्रात पाय रोवण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करतात.

जॉब्जफॉरहर (JobsForHer)

नेहा बगारीया यांनी वर्षभरापूर्वी जॉब्जफॉरहर या बंगळुरु स्थित संस्थेची स्थापना केली. सर्वप्रकारची पात्रता असूनही, केवळ काही कारणांमुळे स्त्रियांना कारकिर्दीला रामराम ठोकावा लागतो. एकप्रकारे हे रिवर्स ब्रेन ड्रेनच असते. असे हे रिवर्स ब्रेन ड्रेन थांबवून स्त्रियांना पुन्हा एकदा त्यांची कारकीर्द सुरु करण्यास मदत करणे हेच नेहा यांचा स्वप्न होते. महिला दिनाचे औचित्य साधून सात मार्च ते अकरा मार्च दरम्यान त्यांनी एक मोठी डायवर्सिटी ड्राईव्ह आयोजित केली होती. सॅपिएंट, टार्गेट, मेकमायट्रीप, रिलायन्स, माईंडट्री आणि मंत्री डेवलपर्स यांसारख्या देशातील अव्वल कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या ड्राईवच्या बरोबरच जॉब्सफॉरहर आता बंगळुरुबाहेरही आपले पोर्टल सुरु करत असून, अखिल भारतीय स्तरावर जात, मुंबई, दिल्ली आणि चैनईवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

जॉब्सफॉरहर.कॉम ला सध्या दरमहा ५०,००० व्हिजिटर्स भेट देत असून, दरमहा सुमारे अडीच लाख पेज व्ह्यूज मिळत आहेत. आपल्या पहिल्याच वर्षात, बंगळुरु येथे कार्यरत असलेले जॉब्सफॉरहर आताच सुमारे साडेसातशे कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांशी जोडलेले आहे, ज्यामध्ये सिटीबॅंक, फ्युचर ग्रुप,जीई, गोदरेज ग्रुप, कोटक महिंद्रा ग्रुप, स्नॅपडील, युनिलिव्हर आणि इतर अनेक लघु आणि मध्यम उद्योगांचा आणि स्टार्टअप्सचा समावेश आहे. ते विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी देऊ करतात, ज्यामध्ये पूर्णवेळ, अर्धवेळ, वर्क-फ्रॉम-होम ते फ्रिलान्सिंगसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

अवतार आय-विन( Avtar I-Win)

चैनई-स्थित अवतार आय-विन ही महिलांना त्यांची कारकीर्द नव्याने सुरु करण्याच्या कामी मदत करणाऱ्या अगदी सुरुवातीच्या काळातील काही संस्थांपैकी एक संस्था असून, २००५ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. अवतार आय-विनच्या संस्थापिका डॉ. सौंदर्या राजेश यांचा असा विश्वास आहे की, भारतीय स्त्रियांना तोंड द्याव्या लागणाऱ्या विशिष्ट समस्यांमुळे, येथील कॉर्पोरेट जगतात नेहमीच स्त्री-पुरुष समानता दिसून येते असे नाही. २००६ मध्येच त्यांनी फ्युचर ग्रुपमध्ये सुमारे साडेचारशे महिलांना काम मिळवून देण्यात सहाय्य केले होते. सौदर्या सांगतात, “ भारतातील काम करणाऱ्या स्त्रियांपैकी ४८ टक्के स्त्रिया या तीशीच्या आतच ब्रेक घेतात, तर एसटीईएम (सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनियरींग आणि मॅथ) मधील साठ टक्के स्त्रिया त्यांच्या कारकीर्दीतील पहिल्या दहा वर्षांमध्येच ब्रेक घेतात. या स्त्रियांना त्यांची कारकीर्द पुन्हा सुरु करताना खूप झगडावे लागते. कामगार शक्तीतील स्त्रियांच्या सहभागाचा विचार करता , आज इतर आशियाई देश, उदाहरणार्थ श्रीलंका हे भारतापेक्षा खूपच चांगले करत आहेत.”

अवतार आय-विनच्या नेटवर्कवर आज सुमारे चाळीस हजार स्त्रिया असून त्यांनी आजपर्यंत आठ हजार स्त्रियांना एका ब्रेकनंतर नोकरी मिळवून दिली आहे.

शीरोज (SHEROSE)

जानेवारी, २०१४ मध्ये स्थापना झालेल्या नॉयडा-स्थित शीरोज.इनच्या साईरी चहल या सहसंस्थापिका आहेत. भारतीय महिलांसाठी शीरोज कॉर्पोरेट नोकऱ्या आणि त्याचबरोबर लवचिक आणि वर्क-फ्रॉम-होम नोकऱ्यांचा शोध घेते. शीरोज काम करणाऱ्या स्त्रियांच्या एका समुदायाची उभारणी करत असून, त्यांना मार्गदर्शक आणि संसाधने मिळवून देण्यासाठी मदत करते. ही संस्था अशा महिलांना मदत मिळवून देण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करत आहे, ज्या चांगल्या कारकिर्दीबरोबरच आयुष्य आणि नोकरीमध्ये तोल साधण्याच्या प्रयत्नात असतात. एंजल राऊंडच्या माध्यमातून शीरोजने पाच कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या संस्थेकडून महिलांना मोठ्या प्रमाणात आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक संधी देऊ केल्या जातात. ज्यामध्ये महिला-अनुकूल मालक, लवचिकता, मोमप्रुनर प्रोग्रॅम आणि पार्टनरशीप प्रोग्रॅमचा समावेश आहे. शीराज कम्युनिटीच्या माध्यमातून महिलांना कारकीर्दीच्या विविध पर्यायांसबंधी माहिती उपलब्ध होऊ शकते, तर शीरोज मेंटॉर्सच्या माध्यमातून या महिलांना स्वतःच्या शर्थींवर यशस्वी होण्यासाठी मदत केली जाते.

हरसेकंडइनिंग्ज (HerSecondInnings)

हरसेकंडइनिंग्जची स्थापनाच मुळी या तत्वावर झाली होती, की महिलांना केवळ नोकरी मिळवून देणे हेच पुरेसे नाही तर महिला व्यवसायिकांना प्रत्येक स्तरावर सक्षम करण्याचीही गरज आहे. बहुतेकदा जेंव्हा एखादी स्त्री ही मोठ्या विरामानंतर पुन्हा कामाला सुरुवात करते, तेंव्हा तिचा कौशल्य आणि अनुभवाच्या दृष्टीने सर्वोत्तम अशा कामाच्याबाबत खूप गोंधळ असतो. तिची वैयक्तिक आवडनिवड किंवा सोय लक्षात घेऊन, कदाचित अधिक आकर्षक किंवा योग्य क्षेत्रात जाण्याचीही तिची इच्छा असू शकते. दोन हजारपेक्षा जास्त महिला नोकरीच्या पर्यांयासाठी किंवा त्यांची कौशल्ये आणि उपलब्ध पर्याय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठीचे प्रशिक्षण मिळविण्यासाठी म्हणून या पोर्टलचा वापर करत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन इ-कोचिंगचा पर्यायही उपलब्ध आहे.

मंजुला धर्मलिंगम आणि माधुरी काळे यांनी नोव्हेंबर, २०१४ मध्ये या संस्थेची स्थापना केली. हरसेकंडइनिंग्ज सध्या मुंबई आणि बंगळुरुमध्ये कार्यरत असून, वर्क-फ्रॉम-होम, तात्पुरत्या असाईंमेंट, कायम नोकऱ्या, प्रकल्प, कन्सल्टन्सी यांसारखे विविध पर्याय आणि उद्योगाच्या संधीही देऊ करते.

लेखक - शकीरा नायर
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन