पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया वीक’चे आज उद्घाटन ! अभूतपूर्व, ऐतिहासिक सोहळ्यात जगाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया वीक’चे आज उद्घाटन !
अभूतपूर्व, ऐतिहासिक सोहळ्यात जगाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज!!

Saturday February 13, 2016,

3 min Read

देशातील उद्योगाला नवी चालना देणाऱ्या व उद्योगांसाठी ऊर्जा निर्माण करणाऱ्या ‘मेक इन इंडिया वीक’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि. १३ फेब्रुवारी रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुल येथील कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून, या अभूतपूर्व, ऐतिहासिक सोहळ्यात जगाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.


image


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ‘मेक इन इंडिया वीक’च्या तयारीचा आढावा घेतला व वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानातील विविध कक्षांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दालनालाही भेट दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात ‘मेक इन इंडिया सेंटर’चे उद्‌घाटन करतील. त्यावेळी ते सेंटरमधील विविध दालनांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह स्वीडनचे पंतप्रधान, फिनलंडचे पंतप्रधान तसेच देशातील आणि परदेशातील अन्य वरिष्ठ मान्यवर असतील. 

वरिष्ठ परदेशी नेत्यांबरोबर ते व्दिपक्षीय बैठका घेतील.वरळीतील एनएससीआय येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे अधिकृत उद्‌घाटन होणार आहे. देशातील तसेच परदेशातील वरिष्ठ नेते आणि उद्योग प्रमुखांच्या समुदायासोबत ते यावेळी संवाद साधणार आहेत.‘मेक इन इंडिया’ अभियानाला अधिक चालना देण्यासाठी आणि देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी जगासमोर सादर करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ सप्ताह महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यामुळे भारताला जागतिक स्तरावर पसंतीचे निर्मिती केंद्र म्हणून प्रोत्साहन मिळेल. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय तसेच जागतिक उद्योजक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, केंद्रीय आणि राज्य प्रशासन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.तत्पूर्वी, उद्या सकाळी मुंबईत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे.

image


या कार्यक्रमात देशातील आठ राज्य आणि जगातील सुमारे साठ देशांच्या व्यापारी शिष्टमंडळाचा सहभाग असेल. मेक इन इंडिया विक च्या प्रारंभीच्या कार्यक्रमाचा मान महाराष्ट्राला मिळणार असून त्या निमित्ताने राज्यातील मागास भागातील विकसाला चालना देण्-या काही प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूकीचे दरवाजे उघडले जाणार आहेत. या कार्यक्रमातून देशातील विविध राज्यात सुमारे ४.६ लाख कोटी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार केले जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपलब्धी पैकी उत्पादन क्षेत्राच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा पंधरा टक्के वरून पंचविस टक्के इतका वाढणार आहे असे उद्योग विभागाच्या सूत्रांनी सांगितले. देशातील पंचविस उत्पादन क्षेत्रात विदेशी गुंतवणूक अपेक्षित असून यात वाहन उद्योग, हवाई वाहतूक, जैवतंत्रज्ञान, संरक्षण, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, कृषी-प्रक्रिया उद्योग, माध्यमे आणि मनोरंजन उद्योग इत्यादी क्षेत्रात ही गुंतवणूक अपेक्षित आहे.


image


या उपक्रमातून राज्यातील हॉटेल, आदरातिथ्य उद्योगाबरोबरच ऊर्जा तसेच मानव संसाधन विकासाला चालना मिळणार आहे. त्यातून कौशल्य विकासाला देखील गती मिळणार असून पायाभूत सुविधा त्यायोगे नव्याने विकास केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीबी निर्मुलन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तेरा तारखेला शुभारंभ झाल्यानंतर चौदा तारखेपासून सीएनएन आशिया फोरम, यांच्या चर्चासत्राला सुरुवात होणार आहे. त्यात क्षेत्रिय आणि देशीय चर्चा सत्रे असतील. सायंकाळी महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सादर केला जाणार असून त्यातून महाराष्ट्राच्या कला आणि सांस्कृतिक वारश्याची पाहूण्यांना ओळख होणार आहे. १६ तारखेला वाहन उद्योगाशी संबंधित हँकोथॉनचे आयोजन करण्यात येत असून त्यात यातील विकासाच्य़ा संधीबाबतची चर्चा केली जाणार आहे. त्याच प्रमाणे १७ आणि १८ तारखेलाही चर्चा सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्यात एलिफंटा महोत्सव आणि वस्त्रोद्योगाच्या बाबतीत महत्वाच शो आयोजित करण्यात येत आहेत. या सर्वच कार्यक्रमांच्या देशातील यजमान पदाची संधी असल्याने मँग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना राबविताना मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन मुंबईचा ही डंका वाजणार आहे.

image