क्यूं की सास... ते ट्रँक्विल वेडिंग्ज – अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका पूजा घईंचा प्रवास

क्यूं की सास... ते ट्रँक्विल वेडिंग्ज – अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका पूजा घईंचा प्रवास

Friday February 05, 2016,

4 min Read

क्यूं की सास भी कभी बहू थी आणि विरासत या मालिका असो की, आदर्श मुलगी, पत्नी किंवा राजकन्या अशा वेगवेगळ्या भूमिका असोत; ३९ वर्षीय पूजा घई यांनी मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका म्हणून स्वीकारलेलं प्रत्येक काम ताकदीने, समर्थपणे पेललयं.

image


पडद्यावर आणि प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक कामगिरी पूजा चोख बजावतात. त्यांना १४ वर्षांचा मुलगा आहे. पंचतारांकीत स्थळी विवाह सोहळे साकारणात मातब्बर असणाऱ्या, ट्रॅनक्विल वेडिंग्जच्या त्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत.

पूजा सांगतात, “मी मालिकांमध्ये काम करत असतानाही माझ्या मनात कुठेतरी उद्योजिका बनण्याचं स्वप्न दडून होतं. पण मी करत असलेल्या कामातून मला आनंद मिळत असल्यानं ती गोष्ट तशीच राहून गेली. त्यावेळी छोट्या पडद्यावर खूप काही नवीन चांगल्या घडामोडी घडत होत्या. चांगल्या दर्जाचे कार्यक्रम असायचे. पण नंतर हळूहळू हा दर्जा खालावू लागल्यावर माझा त्यातला रस कमी होऊ लागला. मग मी पुढे दुसरा पर्याय निवडला. २००० सालाच्या दरम्यान मॉडेलिंगच्या विश्वात दाखल झाले”.

त्यांनी २००६ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटने सुरूवात केली. पण काही महिन्यात त्यांच्या लक्षात आलं की, कॉरपोरेट इव्हेंटस् पेक्षा विवाह सोहळ्यांचं व्यवस्थापन करणं जास्त उत्साहपूर्ण असेल. मोठ्या ग्राहकांच्या विवाहसोहळ्यांचं आयोजन आणि व्यवस्था हा आता त्यांच्या आवडीचा विषय झाला. लवकरच त्यांनी या कारभारावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

विवाहच का?

पूजा सांगतात, “विवाहांमध्ये कलात्मक सर्जनशीलतेला खूप वाव असतो. आपल्याला वेगवेगळे प्रयोग करून नवनिर्मिती करता येते. विवाहांमध्ये खूप धामधूम असते. प्रचंड काम असतं. आमंत्रणं, वधूची तयारी, वेगवेगळ्या थीम्स, जेवण, सजावट अशा नानाविविध गोष्टी असतात.” पूजांना विवाहाच्या या प्रत्येक गोष्टींमध्ये भाग घ्यायला आणि काम करायला आवडतं.

त्यांना त्या कुटुंबाचाच एक भाग होऊन काम करायला आवडतं. त्यामुळे त्यांना परिवाराच्या आवडीनिवडी, त्यांची जीवनपद्धती, वर-वधूचा भावबंध यागोष्टी जाणून घ्यायला सोपं जातं. या सर्व गोष्टी ध्यानात घेत मग वधूवरांच्या या अमूल्य क्षणाला सोनेरी झाक लावण्याचं काम त्या करतात.

त्या स्पष्ट करतात, “वधू-वरांच्या आवडीनिवडी, बारिकसारीक गोष्टी माहीत करून, सखोल अभ्यास करूनच त्यांच्या महत्त्वाच्या दिवसाला सुंदर बनवता येतं”.

या सगळ्या प्रक्रियेदरम्यान पूजा आणि त्या कुटुंबांचही एक अनोखं नातं निर्माण होतं. हे सर्व करताना पूर्णत्व किंवा तृप्तीची भावना मिळते असं त्या सांगतात.

ट्रँक्विल वेडिंग्ज

पूजा म्हणतात, “सगळ्या विवाहांमध्ये वेगळेपणा असतो”. त्यामुळेच प्रत्येक वेळी नवीन विचार आणि कल्पनांवर खूप मेहनत घ्यावी लागते.

आम्ही साकारत असलेले सगळेच विवाह हे पंचतारांकीत स्थळी पार पडत असल्याने त्यांना स्थळ शोधण्याकरता खूप प्रवास करावा लागतो, बैठका घ्याव्या लागतात. म्हणजेच पूजा सतत धावपळीत असतात. पूजांच्या ग्राहकांच्या यादीत बियाणी, धूत आणि नेपाळचे अब्जाधीश बिनोद चौधरी या काही बड्या हस्तींचा समावेश आहे.

image


पूजासोबत कामाच्या आवश्यकतेनुसार ३०-४० जणांची टीम काम करते. त्या सांगतात, “आम्ही संपूर्ण रंगीत तालीम करतो. यात वधूवरांनी एकत्र कसं चालायचं, कार्यक्रमाला आवश्यक असणारी प्रकाश आणि ध्वनी व्यवस्था, अशा सगळ्या बाबींचं, प्रत्येक मिनिटांचं सविस्तर टिपण आमच्याकडे असतं. आम्ही या क्षेत्रात गेली ५ -६ वर्ष काम करत असल्यामुळे माझ्या पूर्ण टीमला माझ्या कामाची पद्धत माहीत झालीय. कुटुंबांना ‘तुम्ही टॉप ऑफ द वर्ल्ड आहात’ ही जाणीव करून देणं आणि कशालाही नाही म्हणायचं नाही, हा आमच्या कामाचा मंत्र आहे. मग कधी ग्राहकांना हेलिकॉप्टर हवं असलं तर चार तासांमध्ये त्याची व्यवस्था करावी लागते”.

जमीनीवरच पाय

पूजा यांच्या कठोर मेहनतीमुळे त्यांना आज एवढं यश मिळतयं. ग्राहकांशी त्यांची नाळ चांगली जुळल्याचं त्या सांगतात, “हे सगळं माउथ पब्लिसिटीमुळे घडलं”.

इतरांपेक्षा त्या वेगळ्या कशा ठरतात,

“मी लोकांसोबत स्वतःला जोडून घेते. मी लोकांसोबत वेळ घालवते. त्यांच्यासोबत जेवतेही”.

मालिकांमुळे त्यांचा चेहरा जरी लोकप्रिय असला तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत.

टीव्हीतले दिवस

संभाषणाचा ओघ टीव्ही आणि मॉडेलिंगकडे वळल्यावर पूजा सांगू लागल्या की, त्यांनी टीव्हीवर काम करताना खूप मजा केली. त्या कामात नेहमी व्यस्त असायच्या. कधी कधी तर दिवसाला एकाहून अधिक जाहिरातींचं शूटींग करायच्या.

वेळेचं गणित

अभिनेत्री म्हणून काम करताना शूटींग्समुळे पूजा कामकाजात आधीपासूनच खूप व्यस्त असत. उद्योजिका झाल्यावर त्यांना आता कामानिमित्त प्रचंड प्रवास करावा लागतो. त्या सांगतात, “तुम्ही जेव्हा स्वतःच तुमच्या बॉस असता, तेव्हा तुम्हांला तुमचं वेळापत्रक नीट आखता येतं. माझ्या आताच्या कामामध्ये मला जून ते सप्टेंबर दरम्यान मोठी सुट्टी मिळते. हा वेळ मी माझ्या कुटुंबासोबत घालवते. त्यावेळात आम्ही बाहेर जाऊन सुट्टीचा आनंद लुटतो”.

पूजांची आई ही त्यांची भक्कम पाठीराखी आहे. त्या सांगतात, “आईच्या बाबतीत मी खरचं खूप भाग्यवान आहे. माझ्या मुलाच्या जन्मापासून ती नेहमी माझ्यासोबतच असते. मला कधी काही लागलं की ती लगेच हजर असते. कामासाठी मी बाहेर असते तेव्हा माझ्या मुलाची काळजी तीच घेते. माझ्यासोबत ती नेहमी उभी असते, पाठींबा देते, प्रोत्साहन देते आणि माझं यशही साजरं करते”.

पुढील पाच वर्ष

आयुष्य हे खूप गुंतागुंतीचं नसतं, आपण योग्य समतोल साधला तर गोष्टी सहज होऊ शकतात, यावर पूजा यांचा विश्वास आहे. विवाह सोहळ्यांनंतर ग्राहकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधानाचे जे बोल असतात, ते त्यांना नेहमी प्रेरणा देतात आणि पुढे यायला हिंमत देतात.

आणखी पाच वर्षानंतर त्यांना जागतिक पातळीवर जायचंय आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायचं आहे. त्यांचा ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचलाय आणि पाच देशांमध्ये त्यांची कार्यालय आहेत असं त्यांचं स्वप्न आहे. लंडन, दुबई, हाँगकाँग किंवा न्यू जर्सी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर विवाह सोहळ्यांचं आयोजन करण्याची त्यांची मनिषा आहे. अजून सुंदर स्थळं, सुंदर सेटस् आणि दिमाखदार विवाहसोहळे करण्याच्या दृष्टीने त्या पावलं उचलत आहेत.

लेखिका – तन्वी दुबे

अनुवाद – साधना तिप्पनाकजे