आठवी शिकलेल्या शीला यांनी बंजारा समाजाच्या स्त्रियांना बनवले आत्मनिर्भर 

0

ही गोष्ट आहे मागासलेल्या समाजातील एका अशा स्त्रीची, जिची इच्छा असून देखील ती पुढे शिकू शकली नाही तसेच संकुचित वृत्ती असलेल्या समाजात स्त्री स्वातंत्र्यावर लादलेले बंधन व जोडीला आर्थिक विवंचना ही होतीच अशा परिस्थितीत तिने आपला उत्साह थंड पडू दिला नाही सतत संघर्ष करून आज ती फक्त आपल्या पायावरच उभी नाहीतर शहरातून परत आपल्या गावात येऊन गावातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जीवाचे रान करत आहे. त्यांनी संघर्षाची अशी एक ज्योत पेटवली आहे जिचा प्रकाश हळूहळू जवळपासच्या गावात पोहचवून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे.

इंदोर पासून ४० किलोमीटर दूर खंडवा रोड नजीक १२०० लोकसंख्या असलेल्या गावात शीला राठोड यांचा जन्म झाला. अभ्यासाची आवड असलेल्या शिलाला आठवीनंतर गावात शाळा नसल्यामुळे पुढे शिकता आले नाही तसेच बंजारा समाजाचे काही कटू नियम शीला यांच्या प्रगतीच्या आड आले. १९ व्या वर्षी शीला यांचे लग्न इंदोरच्या मुकेश राठोड यांच्याशी झाले. गांव सोडून इंदोरला आलेल्या शीलाला जीवनात येऊन काहीच करू न शकल्याचे शल्य बोचत होते याचे कारण म्हणजे शीला यांचे आयुष्य घरातील चुलीपुरतेच मर्यादित राहिले होते. काही दिवसानंतर राठोड दांपत्याच्या घरी मुलाचा जन्म झाला. शीला यांचे पती मुकेश एका फॅक्टरी मध्ये छोटीशी नोकरी करत होते ज्यामुळे त्यांच्या सुखी कुटुंबाचा उदरनिर्वाह आरामत चालला होता पण मुलाला शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली तेव्हा शीला यांनी चांगल्या शिक्षणाचा निर्णय घेतला. अतिरिक्त घरखर्च वाढलेला बघून शीला यांनी शिवणकाम शिकून जवळच असलेल्या एका तयार कपड्याच्या फॅक्टरी मध्ये काम करण्यास सुरवात केली. मिळकत वाढल्याने शीला यांनी स्वतःची एक शिलाई मशीन घेऊन बाजारातील मागणीनुसार  कपडे शिवू लागल्या.

अधूनमधून शीला माहेरी गेल्यावर त्यांना एक गोष्ट नेहमी खटकत असे की तेथील स्त्रिया आजपण डोक्यावर पदर  घेवून घरकामात स्वतःला खपवत असे. एकट्या माणसाच्या कमाईने घरातील भाजी भाकरीचा प्रश्न मिटत असे पण प्रगती होत नव्हती. गावातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी शीला यांनी इंदोर सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे त्यांच्या नवऱ्याने व सासरच्यांनी कौतुक केले. आपल्या कुटुंबाच्या पाठींब्यानंतर आपली शिलाई मशीन घेऊन शीला आपल्या गावाला पोहचल्या. बंजारा समाजात शीला यांना बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नसायची त्यांनी घरोघरी जाऊन या कामासाठी स्त्रियांना उत्तेजन दिले. समाजातील मुखीयाला विश्वासात घेऊन समजावले, पाच महिन्याच्या कठीण प्रयत्नानंतर स्त्रिया या कामासाठी तयार झाल्या. गावातील अनेक स्त्रियांकडे शिलाई मशीन होती पण त्याचा उपयोग घरातील कामासाठी होत असे रोजगाराच्या दृष्टीने कुणी त्याचा विचार केला नव्हता. शीला यांनी एका नंतर एक अशा दहा स्त्रियांना घरातून बाहेर पडून कामासाठी तयार केले. आपल्या वडिलांच्या घरातील एका खोलीत या उद्योगाची सुरवात झाली. दोन महिने स्त्रियांनां प्रशिक्षण देऊन ऑगस्ट २०१५ मध्ये या नव्या उद्योगाची सुरवात झाली, ज्यात शर्टाची कॉलर बनवण्याचे काम घेतले गेले. कामातील सफाई नंतर नोव्हेंबर मध्ये शीला यांना पूर्ण शर्ट बनवण्याची ऑर्डर मिळाली. ज्या स्त्रियांनी कधी घराच्या बाहेर पडण्याचा विचार सुद्धा केला नव्हता त्या आता दोन तीन तास काम करून १५०० ते २५०० रुपये महिना कमाऊ लागल्या.

ग्वालू गावातील या बदलाने शेजारील गांव चोरल मध्ये या गोष्टीची चर्चा सुरु झाली. चोरल मधील स्त्रियां सुद्धा शीला यांची फॅक्टरी बघण्यासाठी तसेच काम शिकण्यासाठी येऊ लागल्या. चोरल गावातील १५ स्त्रियांनी काम करण्याची इच्छा दर्शवली पण अडचण ही होती की चोरल गावातील स्त्रियांना ग्वालू मध्ये रोज येणे कठीण होते त्या अडचणीवर पण मार्ग निघाला. स्त्रियांचा हा उत्साह बघून चोरलच्या एका संस्थेने त्यांना उद्योग उघडण्यासाठी एका जागेचा ठराव मंजूर केला. शीला यांनी मुद्रांक योजनेच्या अंतर्गत २० हजाराचा ओव्हरड्राफ्ट घेऊन काही पॅडल मशीन खरेदी करून चोरल मध्ये या उद्योगाला सुरवात केली. आज दोन्ही गावातील २५ स्त्रियां आपल्या घरकामानंतर २-३ तास वेळ काढून काम करतात. या स्त्रियांसाठी शीला इंदोरला जाऊन ऑर्डर घेऊन, कच्चा माल गावात आणून दोन दिवसात तयार शर्ट शिवून ऑर्डर पूर्ण करतात. ६ महिन्यांच्या परिश्रमानंतर त्यांचे उत्पन्न हे ८० हजारापर्यंत पोहचले आहे. आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक स्त्रीला अंदाजे २ हजार रुपये व शीला यांना १० हजार रुपये मासिक उत्पन्न मिळत आहे.

शीला यांनी युवर स्टोरीला सांगितले की,’’प्रारंभी शर्ट शिवण्याची पूर्ण कमाई मला मिळायची, तेव्हा मी विचार केला की ही कला आपल्या गावातील स्त्रियांना शिकवून त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवून त्यांच्यातील योग्यता सिद्ध करण्यासाठी त्यांना मदत करावी. आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना पूर्णवेळ काम करण्यासाठी तयार करत आहे. पुढे आम्ही शर्ट कापण्यापासून ते शिवण्यापर्यंतचे काम इथेच करणार आहोत’’.

शीला लवकरात लवकर इंटरलॉक,पिकोसाठी आधुनिक मशीन लावणार आहे, त्यामुळे त्या शर्टला पूर्णपणे इथेच तयार करून पाठवू शकतील. शीला यांच्या उद्योगाला मदत करणाऱ्या संस्थेचे मुख्य सुरेश एमजी यांनी सांगितले,’’लवकरच अन्य महिलांना वाटरशेड अंतर्गत चार हजारापर्यंत व्यक्तिगत कर्ज दिले जाईल. ज्यामुळे त्यांना सुद्धा शिलाई मशीन विकत घेऊन या उद्योगाला हातभार लावू शकतील. तसेच शीला यांच्या उद्योगाला आदिवासी विभागाच्या घुमक्कड जातीच्या योजनेतंर्गत एक लाखाचे कर्ज देण्यात येईल ज्यामुळे त्या आधुनिक मशीन लावून कामाला पुढे नेवू शकतील. आम्ही इंदोरच्या प्रशासनाशी चर्चा करून या स्त्रियांच्या प्रगतीसाठी योजना बनवत आहोत".

इंदोरचे कलेक्टर पी.नरहरी यांनी युवर स्टोरीला संगितले, "शीला यांनी आमच्या जिल्यात एक उदाहरण कायम केले आहे. पुढे जाण्याचा उत्साह असणाऱ्या स्त्रियांसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच तत्पर असते. शीला यांचा उत्साह बघून आम्ही तत्काल मुद्रा योजनेच्या अंतर्गत २० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करवले ज्यामुळे त्या आपला उद्योग पुढे नेऊ शकतील. अशा उद्यमी स्त्रियांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ देणार नाही. आम्ही यांच्या उत्पादनाला चांगला बाजार भाव व उत्पादन वाढवण्यासाठी सहाय्य करत आहोत. काही काळा नंतर या स्त्रिया देशासाठी नक्कीच एक उदाहरण बनतील.’’

एका छोट्याश्या सुरवातीने शीला व त्यांच्या सखींनी स्वतःला आत्मविश्वासाने समाजासमोर उभे केले. आज सुरवात जरी लघु व्यवसायाने झाली तरीही यांच्या जिद्दीला बघून त्यांचा अखंड प्रवास सुरु झाला आहे. अशातच मोठी गोष्ट ही आहे की या स्त्रियांना ‘स्टार्टअप इंडिया’बद्दल भलेही माहिती नसेल पण त्यांचा विकास हा बंजारा समाजाच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी नक्कीच सहाय्यक ठरणारा आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने त्यांचे हे महत्वाचे योगदान असेल.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !

केवळ पाच रुपये नसलेल्या महिला झाल्या आत्मनिर्भर, सूरु केली स्वतःची बँक!

महिला बचत गटांनी थांबवली गावातल्या स्थलांतराची पावले

लेखक : सचिन शर्मा
अनुवाद : किरण ठाकरे


.