नवी मुंबईतील गतिमंद मुलींची सुसाट भरारी!

0

ऑलिम्पीक स्पर्धेत विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी एकाग्रता आणि वेग या दोन्हीचा एकाचवेळी कस लागतो. एकात बुद्धीची तर दुसर्‍यात शारीरिक चापल्याची कसोटी लागते. पण, जन्मत: या दोन्ही गोष्टीचा अभाव असलेल्या नवी मुंबईच्या दोन गतिमंद विद्यार्थीनींनी ‘विशेष’ हिंमत आणि सरावाच्या जोरावर यूएस स्पेशल ऑलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे.

स्नेहा वर्मा व दिशा मारू
स्नेहा वर्मा व दिशा मारू

शारीरिक विकलांग मुले ज्या कुटुंबात असतात त्या आईवडिलांना आपल्यानंतर मुलांचे काय हा फार मोठा प्रश्न असतो. मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या तरुण मुलींचे प्रश्न तर याहून अधिक गंभीर. परंतू नवी मुंबईतील खारघर येथे राहणार्‍या स्नेहा वर्मा व पनवेलच्या दिशा मारू या दोन विशेष विद्यार्थीनींनी आपल्या कर्तुत्वाने अशा पालकांच्या निराशा असलेल्या डोळ्यात अंजन घातले आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्सच्या ४० मी. फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये खारघर येथे राहणार्‍या स्नेहा वर्मा ( २१ ) हिने सुवर्णपदक आणि पनवेलच्या दिशा मारू (२६) हिने ४० मीटर फ्रि स्टाइल प्रकारात रौप्यपदक मिळवून सार्‍यांनाच अवाक केले आहे. या दोघी सीबीडीमधील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी असून अंगी कौशल्य आणि मनातला आत्मविश्वास या दोघांची सांगड घालून जगण्याच्या लढाईत कुठेही कमी पडणार नाही, हेच यांनी जगाला दाखवून दिले आहे.

स्नेहा वर्मा हीने वयाच्या दहाव्या वर्षापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेतले असून आतापर्यंत तिने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावर पोहण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. २०१३ साली कर्नाटकात झालेल्या राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. पोहण्याच्या सरावाबरोबरच ती नृत्याचेही प्रशिक्षण घेत असून शहरातील अनेक नृत्यस्पर्धेतही तिने भरपूर बक्षिसे मिळविली आहेत. पनवेलच्या दिशा मारू या विद्यार्थिनीनेही २५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत चांदीचे पदक मिळविले. दिशा मारूने वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेतले असून २०१३ मध्ये कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेत फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदक, कर्नाटकातील मोंडा येथे फ्री स्टाइल व ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण आणि रिले प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक स्पर्धेत रिले प्रकारात दोन कांस्यपदक मिळवली आहेत. या स्पर्धेसाठी दिशा आणि तिच्या पालकांनी गेली १० वर्षे अथक परिश्रम घेतले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमांची सांगड तिच्या या यशामागे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवणार्‍या दिशाने आता समुद्रात पोहून जाण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलेले आहे. दिशा म्हणजे आमच्यासाठी देवानी दिलेली भेट असून तिच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान असल्याचे दिशाच्या पालकांनी सांगितले.

ऑलिम्पिकमधील वर्ल्ड समर गेम्समध्ये सुवर्णपदक प्राप्त स्नेहा वर्मा
ऑलिम्पिकमधील वर्ल्ड समर गेम्समध्ये सुवर्णपदक प्राप्त स्नेहा वर्मा

सीबीडी बेलापूर येथील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान गेले २१ वर्षे अपंगांसाठी कार्यरत असून या संस्थेमार्फत स्नेहा व दिशासारख्या अनेक विशेष खेळाडू निर्माण करण्याचे कार्य केले आहे. या मुलींचे अविरत कष्ट पाहून तोंडात बोट गेल्याशिवाय राहत नाही. दिशा गेली २३ वर्षे , तर स्नेहा ११ वर्षांपासून स्वामी ब्रम्हानंद शाळेच्या विद्यार्थीनी आहेत. शाळेचे संस्थापक शिरीष पुजारी व प्राचार्या सुकन्या वेंकटरामन यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. अपंगत्व असूनही सर्वसामान्य मुलांपेक्षा मुलींची कामगिरी आणि त्यांना मिळालेले यश नक्कीच वाखणण्याजोगे असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक परिस्थितीचा मेळ बसविताना होणारा दमछाक, सार्वजानिक ठिकाणी गेल्यानंतर इतरांच्या विस्फारणार्‍या नजरा, मानसिक विकलांगाच्या शैक्षणिक सुविधांमध्ये अपुरी पडणारी व्यवस्था या स्तरावर स्नेहा व दिशा या दोघींच्या संघर्षाची सुरवात झाली. आपल्या गतिमंदात्वावर मात करून आम्हीही सर्वांच्या पुढे जाऊ शकतो, हे दोघी विद्यार्थींनीनी त्यांच्या प्रवासातून दाखवून समाजाला विधायक संदेशही दिला आहे.

ऑलिम्पिकमधील वर्ल्ड समर गेम्समध्ये कांस्य पदक प्राप्त दिशा मेरू
ऑलिम्पिकमधील वर्ल्ड समर गेम्समध्ये कांस्य पदक प्राप्त दिशा मेरू