गरिबीने दिली छाया सोनावणेला प्रेरणा इतर महिलांच्या जीवनात आशेचा किरण झाली छाया

गरिबीने दिली छाया सोनावणेला प्रेरणा
इतर महिलांच्या जीवनात आशेचा किरण  झाली  छाया

Tuesday January 12, 2016,

5 min Read

"एक महिला पूर्ण वर्तुळ असते . तिच्यात सर्जनाची, संवर्धनाची आणि बदल घडवण्याची ताकद असते. "- डायना मारीयाचाइल्ड

या स्त्रीशक्तीचे एक उत्तम उदाहरण छाया सोनावणे आहेत. अहमदाबादला त्यांच्याशी संपर्क साधला.

"एखाद्या मुलीला किंवा महिलेला दिवसाला किमान ५०० रुपये कमवायला आणि स्वतःच्या पायावर उभे राहायला मी शिकवू शकते जेणेकरून तिला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. "

छायाबरोबर साधलेल्या संवादाची ही एक झलक आहे. छाया उच्चशिक्षित नाहीत पण उच्चशिक्षित नसणे हे स्वतःला आणि इतरांना सबला करण्याच्या त्यांच्या इच्छेच्या, निर्धाराच्या आड कधीच आले नाही. गृहिणी छाया ते तरुणींना शिवणकाम शिकवत शिकवत उद्योजिका होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. या उद्योगातूनच त्यांनी त्यांच्या मुलांचे इंग्रजी माध्यमातले शिक्षण, ज्यापासून त्या स्वतः वंचित राहिल्या ते तर पूर्ण केलेच शिवाय मुलांना खर्चिक असे अभियांत्रिकीचे शिक्षणही दिले. आज त्यांची दोन्ही मुले सॉफ्टवेअर इंजिनिअर (अभियंते) असून ते आयटी (माहिती तंत्रज्ञान) कंपन्यांमध्ये काम करत आहेत.


image


"मी एका गरीब कुटुंबातली होते. गरिबी मी अनुभवली आहे. माझ्या मुलांच्या वाट्याला मला तसले आयुष्य नको होते. हीच तीव्र इच्छा मला पुढे नेत राहिली. आज माझी मुले उत्तम आयुष्य जगत आहेत, याचा मला अभिमान आहे. ते दोघे उत्तम प्रकारे कमवत आहेत आणि आम्हाला कोणतीच विवंचना नाही. पण आजही जेव्हा मी आयुष्यातल्या कठीण दिवसांकडे मागे वळून पाहते तेव्हा माझे डोळे भरून येतात. " छाया सांगत होत्या.

साधे बालपण:

जळगावजवळच्या धरणगाव या एका छोट्या गावात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत छाया लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना सात भावंडे होती आणि कुटुंबात कमावणारे एकटे त्यांचे वडीलच होते.

मूलभूत सुविधा, ज्या घरात असतातच असे आपण गृहित धरतो त्या त्यांच्यासाठी स्वप्नवत होत्या. बाहुल्या, खेळणी यांच्याशिवायच त्यांचे बालपण गेले. कुटुंबाकडे मर्यादित साधनस्रोत असले तरी छायाने जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षणाचे स्वप्न मात्र फार दूरचे होते.

गुजरातमधल्या एका गिरणीकामगाराशी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्या अहमदाबादला गेल्या. तो ८० च्या दशकातील काळ असल्यामुळे त्यांच्या पतीची नोकरी प्रतिष्ठेची चांगली मानली जात असे. पण हळूहळू गिरण्या बंद पडू लागल्या. छायाचे पती बेरोजगार झाले. भूक माणसाला स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्या पतीने दुसरा पर्याय शोधला. ते अॉटो रिक्षा चालवू लागले.

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने :

पतीच्या बदलत्या आर्थिक स्थितीच्या छाया मूक साक्षीदार होत्या. गरिबी त्यांना नवीन नव्हती पण बदलेल्या स्थितीमुळे त्या विचारविमुख झाल्या. कुटुंबासाठी काहीतरी करण्याची गरज त्यांना तीव्रतेने जाणवू लागली. शिवणाचे क्लास घेऊन कुटुंबाला हातभार लावण्याचे त्यांनी ठरवले. पण हा निर्णय सोपा नव्हता. रूढीपरंपरांचा प्रचंड पगडा असलेल्या सासरच्या मंडळींच्या विरोधाचा सामना छायाला करावा लागला. केवळ पतीच्या पाठिंब्यामुळे निर्णयाचे पारडे त्या त्यांच्या बाजूने झुकवू शकल्या.

सासूबाईंचे शब्द त्यांच्या कानात घुमत असत, "ती काय करू शकणार आहे". या शब्दांनीच आपल्यातील क्षमता दाखवून देण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. महिलांचे कपडे शिवणाचे कौशल्य त्यांनी तीन महिन्यात आत्मसात केले. त्यानंतर घरी आॅर्डर्स घ्यायला त्यांनी सुरुवात केली.

त्यांचे काम एवढे उत्तम होते की आपोआपच त्यांचे नाव झाले आणि आॅर्डर्सचा ओघ अखंड चालूच राहिला. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती तर सुधारलीच शिवाय नवा आत्मविश्वास जागा झाला. त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचे ठरवले. गरीब स्त्रिया आणि मुलींसाठी शिवणाचे क्लास घेण्याचे त्यांनी ठरवले. जेणेकरून या महिला आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. क्लासमध्ये अधिकाधिक महिला प्रशिक्षणासाठी येऊ लागल्याने छायाने रुजवलेल्या 'देवश्री' चे रूपांतर वटवृक्षात झाले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे व्हावे याचे प्रशिक्षण देणे सुरू असताना छायाला दुसरे मूल झाले. छाया स्वतः इंग्रजी माध्यमातल्या शिक्षणापासून वंचित राहिल्या पण मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा त्यांचा निर्धार होता. खरे तर कुटुंब आर्थिकदृष्ट्या अजूनही तितकेसे स्थिरस्थावर नसताना त्यांनी घेतलेला निर्णय धाडसी होता. पण छाया आपल्या निर्णयावर ठाम होत्या.


image


तुमचे प्रेरणास्थान कोण? यावर छाया लगेच उत्तर देतात. "माझी आई. माझी आई माझ्यासाठी मोठे प्रेरणास्थान आहे. आमचे कुटुंब खूपच मोठे होते. तुटपुंज्या स्रोतात सर्वांना खूष ठेवण्याची किमया ती साधायची."

परिवर्तनाची सारथी -

क्लास सुरू करून आता २५ वर्षे झाली. या काळात विद्यार्थिनी नाहीत असा एकही महिना आतापर्यंत उजाडलेला नाही. गरीब कुटुंबातून आलेल्या ३००० महिलांना आतापर्यंत आपण शिकवले असल्याचे छाया सांगतात. या महिला स्वतःचा शिवणाचा व्यवसाय चालवून कुटुंबाला हातभार लावत आहेत. याचा आपल्याला खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो, असे छाया सांगतात.

"अनेक बायका, ज्यांना मी शिवणकाम शिकवलं त्या आपल्या मुलींना माझ्याकडे शिकवण्यासाठी पाठवतात" छाया हसतहसत सांगतात.

महात्मा गांधी म्हणतात "या जगात जो बदल पाहण्याची तुमची इच्छा आहे, तो बदल तुम्ही स्वतः व्हा". छाया यांनी तेच केले आहे. त्यांचा मुलगा जय त्याला आठवत असलेला बालपणीचा आईबाबांचा एक किस्सा सांगतो. एका मुलीला पोलिओमुळे अपंगत्व आले होते. तिच्या वडिलांना तिला शिवणाच्या क्लासला घालायची इच्छा होती. पण तिच्या पायात खूपच कमी जोर असल्याने शिकवणं अवघड होईल असे सांगत अनेकांनी तिला शिकवण्याचे नाकारले होते. ते छायाकडे आले.

छाया यांनी यावर मार्ग काढण्याचे ठरवले. त्यांनी त्या मुलीला क्लासमध्ये तर प्रवेश दिलाच शिवाय खास तिच्यासाठी स्वयंचलित शिवणयंत्राची सोय करून तिला शिकवायला सुरुवात केली. चार महिन्यांनी ती मुलगी शिवणकाम शिकली आणि स्वकमाई करू लागली.

महिला सबलीकरण :

महिला सक्षम झाल्या पाहिजेत असे छाया यांना वाटते किंबहुना त्यांची ती तीव्र आंतरिक इच्छा आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्या सांगतात, "माझा उद्देशच हा आहे की अधिकाधिक मुलींना प्रशिक्षित करावं आणि माझ्यासारखं करावं. त्यांनी स्वकमाई करावी, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वतःच्या कुटुंबालाही आधार द्यावा. खास करून आपल्या मुलांचं भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या मातांविषयी मला खूप कळकळ वाटते."

मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी घरातच तयार केलेला मोठा हाॅल मुलींच्या लगबगीने चैतन्यमय झालेला असतो. प्रत्येकजण काहीनाकाही करण्यात गढलेली दिसते. छाया आता आजी आहेत. आपल्या सासूबाईंचे शब्द खोटे ठरवल्याचा त्यांना आनंद आहे. स्वतःमध्ये जेव्हा जिद्द असते तेव्हा अशक्य असे काहीच नसते हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे.

त्यांचा निरोप घेताना मनात आयन रँडचे शब्द घुमत होते , "प्रश्न मला कोण पराभूत करू शकणार आहे हा नाहीच आहे तर कोण मला थांबवू शकणार आहे, हा आहे." छाया याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

लेखिका :तन्वी दुबे

अनुवाद : सोनाली कुलकर्णी

    Share on
    close