‘गिफ्ट-ए-पेंशन’: कामगारांचे भविष्य घडवण्यासाठी उचललेले अद्वितीय पाऊल

0

जीवनाचे जवळजवळ ७० वसंत पाहिलेले देशराज व्यावसायाने ड्रायव्हर आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते एकाच कुटुंबासोबत काम करत आहेत. इतका मोठा काळ काम करत राहिल्यामुळे त्यांना त्या कुटुंबाच्या सदस्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यांना कोणी नोकर समजत नाही.

जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना आरामात आपल्या घरी असायला हवे होते. परंतु आताही त्यांना आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी करावी लागत आहे. आराम किंवा सेवानिवृत्तीसारखे शब्द त्यांच्यासाठी स्वप्नच आहे. रिटायर्डमेंटबाबत बोलल्यानंतर ते हसतात आणि म्हणतात की आयुष्यभऱ काम करूनच त्यांना आपले पोट भरावे लागणार आहे. आणखी खोदून खोदून विचारल्यानंतर ते म्हणतात, “ जर मी आराम केला तर मला जेवण कोण देईल?”

आपल्या सर्वांचे रोजचे जीवन हे देशराज आणि त्यांच्यासारख्या इतर लोकांवर अवलंबून आहे. जर ते एक दिवसही एखाद्या कारणामुळे गैरहजर राहिले तर आपल्या आयुष्यात भूकंप येईल. आपण त्यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात पगार देतो, परंतु ते देत असलेल्या सेवेच्या बदल्यात तेवढे पुरेसे आहे का?

ते आपल्याला सेवा देतात. या सेवेच्या बदल्यात त्यांचे शरीर थकल्यानंतर त्यांना काही मदत होईल असे काही तरी करणे हे आपले कर्तव्य नाही का ?

स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतर देखील आपल्या देशात जवळजवळ ९० टक्के कामगार गैर-सरकारी अथवा आपल्या व्यक्तिगत पातळीवर खासगी स्वरूपात काम करत आहेत. शरीर व्यवस्थित काम करू शकते तो पर्यंत राबून हे कामगार आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. एकदा का उतरते वय लागले की मग बहुतेक कामगारांचे शरीर श्रम करण्यालायक राहत नाही. त्यावेळी मग या लोकांना ‘बचती’चे महत्त्व काय आहे याची जाणीव होते.

वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणे हे प्रत्येक कामगाराचे स्वप्न असते आणि भारतात आजही जे लोक छोटे-मोठे काम करून आपला चरितार्थ चालवतात अशा लोकांसाठी पेन्शन वगैरेच्या बाबतीत विचार करणे ही दूरची गोष्ट आहे.

आत्ताच्या घडीला आपल्याकडे बहुतेक कामगार हे घरकाम करणारे नोकर, आया, स्वयंपाकी, माळी, पहारेकरी( वॉचमन), ड्रायव्हर अशा प्रकारची कामे करणारे आढळतात. याव्यतिरिक्त समाजाचा एक मोठा वर्ग मजूरी करत, रद्दी विकत आणि इतर कामे करत आपले जीवन व्यतीत करत आहेत. म्हातारपणात जेव्हा शरीर काम करण्याच्या स्थितीत नसेल तेव्हा आपला चरितार्थ कसा चालवायचा हा सर्वात मोठा प्रश्न अशा लोकांसमोर उभा ठाकलेला असतो.

अशा प्रकारे आपला चरितार्थ चालवणा-या लोकांसाठी सामाजिक सुरक्षा देता यावी या हेतूने ‘मायक्रो पेंशन फाऊंडेशन’ ही संस्था निर्माण करण्यात आली आहे. या फाऊंडेशनने जेव्हा समाजाच्या तळागाळात जाऊन काम करायला सुरूवात केली तेव्हा भारतात सुमारे ४ कोटी घरकामगार असल्याचे उघड झाले. या घरकामगारांपैकी बहुतेकांना बचत करायची इच्छा आहे परंतु त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांना बचत करता येत नाही ही गोष्ट फाऊंडेशच्या लक्षात आली आणि अशा कामगारांसाठी फाऊंडेशनतर्फे ‘पेंशनची भेट’ ही योजना पुढे आली. या पेशनच्या योजनेला ‘गिफ्ट-ए-पेंशन’ या नावाने ओळखले जाते.

‘गिफ्ट-ए-पेंशन’ हे एक इंटरनेटद्वारे चालवले जाणारे व्यासपीठ आहे. या योजनेच्या आधारे मालक किंवा कामगाराला नियुक्त करणारी व्यक्ती वृद्धापकाळातल्या पेंशनसाठी आपल्या नोकराची नोंदणी करवून घेऊन त्याच्या म्हातारपणाच्या सुखी आयुष्याची हमी देण्याचे काम करू शकते. वय झाल्यानंतर हा कामगार जेव्हा काम करण्याच्या पात्रतेचा राहणार नाही किंवा मग काम सोडून आरामाचे जीवन जगण्याची त्यांची इच्छा असेल तेव्हा ती इच्छा त्याला या योजनेद्वारे साकार करता येऊ शकते.

या योजनेद्वारे नोंदणी केल्यानंतर कामगाराला भारत सरकारच्या पेंशन योजने अंतर्गत सरकारी मदतीच्या स्वरूपात वार्षिक एक हजार रूपयांची रक्कम ( सुरूवातीची काही वर्षे) दिली जाते. या व्यतिरिक्त या योजनेत नोंदणी केल्यानंतर एसबीआय़ लाईफद्वारे त्याला ३० हजार रूपयांच्या विम्याची सुविधा सुद्धा दिली जाते. शिवाय कामगाराशी सतत संपर्क साधून त्याने बचत करावी यासाठी त्याला प्रेरित केले जाते.

‘मायक्रो पेंशन फाऊंडेशन’च्या अधिकारी पारूल खन्ना ‘गिफ्ट-ए-पेंशन’ बाबत सांगताना म्हणतात, की संपूर्ण देशभरातले लोक या योजने अंतर्गत आपल्या कामगारांची नोंदणी करवून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पारूल खन्ना यांच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत नोंदणी करवून प्रत्येक आठवड्याला १० लाखाहून अधिक लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

सप्टेंबर २०१४ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकाने या आगळ्या वेगळ्या योजनेची प्रशंसा केलेली आहे. मात्र पात्रता असूनही या योजनेला जितके यश आणि आणि किर्ती मिळायला हवी होती तितकी ती मिळालेली नाही. जो समाजाचा वर्ग बचत या शब्दाबाबत विचार करत नव्हता अशा वर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या फाऊंडेशनच्या प्रयत्नांची प्रशंसा तर प्रत्येकाने केलेलीच आहे, परंतु अशा कामगारांना शोधून त्यांची पेन्शन योजनेसाठी नोंदणी करावी म्हणून त्यांना तयार करणे हेच फाऊंडेशनच्या लोकांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे.

कामगारांना नोंदणीसाठी प्रेरित करून त्यांना बचत करण्याचे महत्त्व पटवून देणे आणि त्यानंतर आपल्या भविष्यासाठी जमा केलेले पैसे सुरक्षित आहेत असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणे हे अतिशय मोठे आव्हान असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्या ४५० लोकांनी आपल्या घरकामगारांची ‘गिफ्ट-ए-पेंशन’ योजनेच्या अंतर्गत नोंदणी करवून घेतली आहे असे लोक हे सांगू शकतील की हे काम किती कठीण आहे.

आपल्या घरकामगाराची नोंदणी या योजने अंतर्गत करून घेणारे बंगळुरूचे बँक व्यावसयिक अतुल वैद्य सांगतात की या योजनेबाबत त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनी त्यांच्या घरी गेल्या तीन वर्षांपासून काम करणा-या मोलकरणीची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. खरे तर आपल्या या विचाराला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागले. अनेकवेळा त्यांना आपल्या मोलकरणीच्या आई-वडिलांना आपल्या घरी बोलावून ‘बचत’ आणि भविष्यात त्या बचतीचे महत्त्व काय आहे याबाबत पटवून द्यावे लागले. अतुल सांगतात की पहिल्यांदा त्यांनी त्यांना बचतीबाबत समजावून सांगितले आणि त्यांनतर मग त्यांना पेन्शनबाबत समजावण्यात फार कष्ट पड़ले नाहीत.

पेंशनबाबत ऐकून ते खूश झाले होते. आपल्या मुलीला तिच्या आयुष्याच्या एका विशेष टप्प्यावर काम सोडून देण्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपला चरितार्थ चालवण्यासाठी तिला कुणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही हे जाणून त्यांना फारच आनंद झाला. आपल्या काळात ‘गिफ्ट-ए-पेंशन’ सारखी योजना असती तर या वयात त्यांना लाभ घेता आला असता. म्हणून त्या काळात अशा प्रकारची योजना नव्हती या गोष्टींचे त्यांना वाईट वाटत होते.

मूळचे बिहारचे असलेल्या या कुटुंबाला समजावण्याव्यतिरिक्त अतुल आणि त्यांच्या पत्नी अपर्णा यांनी त्यांना या योजनेशी संबंधित काही व्हिडिओ सुद्धा दाखवले आणि सोबतच त्यांच्या मनात उत्पन्न होणा-या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली. भविष्यात जरी हे लोक इथले काम सोडून दुसरीकडे गेले वा इतर कुणाकडे कामाला राहिले, तरी देखील त्यांच्या बचतीवर त्यांचाच हक्क राहिल. शिवाय ही पेंशन त्यांना सतत मिळत राहिल अशी माहितीही या लोकांना देण्यात आली. आणि समजा काही कारणामुळे किंवा अडचणीच्या काळात एखाद्या महिन्यात त्यांना पैसे भरता आले नाहीत, तरी देखील त्यांचा पैशांवरचा आपला हक्क संपुष्टात न येता तो कायम राहिल अशी ही माहिती त्यांना देण्यात आली.

अतुल पुढे सांगतात, “आमची मोलकरीण आपल्या पगारातून मासिक ३०० रूपयांची बचत करते आणि मी आणि अपर्णा स्वखुशीने तिच्या बचतीमध्ये २०० रूपये टाकतो. दर महिन्याला एका पिझ्झाच्या रकमेहून कमी रक्कम देऊन एक प्रकारे त्या बिचारीचे म्हातारपणातले दिवस सुखी बनवण्याचे काम आम्ही करत आहोत.”

२० वर्षे वयाची ही मुलगी जर याच प्रमाणात बचत करत गेली तर भविष्यात दर महिन्याला तिला सुमारे ७६०० रूपयांची पेंशन मिळेल. आणि आज मासिक ६ हजार रुपये कमावणा-यासाठी ही रक्कम पुरेशी असेल.

या योजनेनुसार मालकाला केवळ आपल्या कामगाराची नोंदणी करावी लागते आणि या साठी त्याच्याकडून फक्त ३०० रूपये घेतले जातात. नोंदणीनंतर कामगाराला एक मायक्रो पेंशन प्रीप्रेड कार्ड आणि एक वेलकम कीट दिले जाते. याद्वारे कामगाराचे बँक खाते असेल तर तो आपल्या खात्यात आपली बचत सतत करू शकतो.

पारूल पुढे सांगतात, की आपली सेवा करणाऱ्याला यापेक्षा चांगली भेट कुणीही देऊ शकत नाही आणि ती ही अगदी घरबसल्या आणि केवळ काहीच मिनिटांच्या मेहनतीने.

याबाबत बोलताना पारूल पुढे सांगतात, “ या प्रक्रियेत सुरूवातीची नोंदणी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केली जाऊ शकते. नोंदणीच्या चार दिवसांनतर आपण दिलेल्या पत्त्यावर कुरिअरद्वारे काही कागदपत्रे पाठवली जातात. या कागदपत्रांवर मालकाला सही करावी लागते.या प्रक्रियेतली खास गोष्ट म्हणजे या प्रक्रियेला आणखी सोपे बनवत काही काळानंतर सही केलेली कागदपत्रे कुरिअरद्वारे आपल्या दरवाजातूनच परत मागवली जातात आणि या कामासाठी तुम्हाला कुठेही जावे लागत नाही.”

सुरूवात झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजेच पहिल्या सहा महिन्यांतच या योजनेने विशेष लोकप्रियता मिळवलेली आहे. ‘गिफ्ट-ए-पेंशन’ या वेबसाईटवर दररोज सुमारे ५०० ते १००० लोक माहितीसाठी भेटी देतात.

‘गिफ्ट-ए-पेंशन’ च्या टीमचे एक सदस्य सांगतात, “ अजूनही बरेच लोक या याबाबतीत जागृत नसले, ते या योजनेबाबत आता कुठे माहिती मिळवणे सुरू करत असले, तरी आत्ता पर्यंत या योजनेसाठी जवळजवळ १४०० कामगारांनी आपली नोंदणी केलेली आहे. यापैकी ४५० कामगारांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरातील लोकांनी आमच्या योजनेत रूची दाखवलेली आहे. आणि ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आजही देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि आसपासच्या परिसरातले लोक आपल्या कामगारांच्या बाबतीत उत्साही दिसत नाहीत. आम्ही या परिसरांचा प्रतिसाद पाहून काहीशे निराश झालेलो आहोत.”

या योजनेत नोंदणी करण्यात आलेल्या कामगारांमध्ये महिला कामगारांची संख्या ५५ टक्के इतकी आहे.

सुरूवातीला मिळोलेल्या यशानंतर आता ‘गिफ्ट-ए-पेंशन’ची टीम दिल्लीतील एका छोट्याशा जागेवरून दूरवर आपल्या भविष्याकडे दृष्टीक्षेप टाकत आहे. ‘गिफ्ट-ए-पेंशन’टीमचे सदस्य सांगतात, “ जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचून त्यांना भविष्यासाठी बचतीचे महत्त्व पटवून देणे हे आमचे प्राथमिक लक्ष आहे आणि या मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहोत. भविष्यात अशा कामगारांसाठी आरोग्य विमा योजना सुरू करण्याची आमची योजना आहे.”

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Stories by sunil tambe