बहिणीच्या हौतात्म्यानंतरही नोकरी सोडून समाजासाठी शरद कुमरेंनी जीवन केले समर्पित!

0

देशप्रेम आणि समाजकल्याणाची भावना अनेकांच्या रक्तातच असते, ते सारे काही सोडून देश सेवेलाच आपले उद्दिष्ट ठरवतात आणि प्रत्येक काम निस्वार्थपणाने करतात. शरद कुमरे हे देखील असेच एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या रक्तातच देशप्रेम आहे, त्यामुळे त्यांनी एक चांगली सरकारी नोकरी सोडून आपले जीवन समाजकल्याणात झोकून दिले आणि देशाच्या उत्थानाच्या दिशेने प्रयत्न सुरु केले.

शरद यांच्या भगिनी शहिद बिंदू कुमरे २००१मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहिद झाल्या होत्या. मृत्यू होण्याआधी त्यांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. या घटनेनंतर शरद यांनी पण केला की, ते आपले जीवन देशासाठी अर्पण करतील आणि देशासाठी शक्य ते सारे काही करतील. शरद मध्यप्रदेशातील आहेत, त्यांचे शिक्षण, नोकरी सारेकाही इथलेच आहे. ते सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर होते, मात्र त्यांनी विचार केला की नोकरीसोबतच ते देश आणि समाजासाठी फार काही करू शकणार नाहीत म्हणून मग त्यांनी चांगली नोकरी सोडून ‘पराक्रम जनसेवी संस्था’ स्थापन केली. या संस्थेव्दारे त्यांनी भ्रष्टाचाराविरुध्द मोहिम चालवली. त्या दरम्यान त्यांनी कित्येक आरटीआय दाखल केले आणि भ्रष्ट अधिका-यांना कारावासात पाठविले. त्या काळात त्यांना खूपच त्रास सहन करावे लागले. ते ज्यांच्या विरोधात होते त्यांची राजकीय शक्ती होती, पण शरद त्यांना न भिता आपल्या कामात लढत राहिले.

भ्रष्टाचाराशिवाय त्यांनी पर्यावरणाच्या विषयातही काम केले. शरद यांनी अनेक गावे (जावरकाठी, नकाटोला, आमाटोला,गांव जिल्हा शिवनी, डोंडिया जिल्हा होशंगाबाद, मध्यप्रदेश) दत्तक घेतले आणि त्या ठिकाणी मूलभुत कामे सुरू केली. याच गावातून त्यांनी एक लाखापेक्षा जास्त वृक्षारोपण केले. त्यांच्या चांगल्या कार्यांसाठी त्यांना ‘ग्रिन आयडल ऍवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.

शरद यांचा एक पेट्रोलपंप आहे जो पूर्णत: सौर ऊर्जाधारित आहे. हा एक ‘इकोफ्रेंडली पेट्रोलपंप आहे, येथे नारळ, केळीच्या बागा आहेत याशिवाय अनेक प्रकारच्या भाज्याही उगवण्यात आल्या आहेत, लहानग्यांसाठी झुले आहेत. या पंपाला मागच्या दोन वर्षांपासून सातत्याने ग्रीन पुरस्कार मिळतो आहे. याशिवाय ते वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयांनाही रोपे भेट म्हणून देत असतात. ते म्हणतात की ते कुठेही जातात तेंव्हा लोकांना हार किंवा फुले भेट म्हणून न देता ते त्यांना एक रोपटे भेट देतात.

शरद सांगतात की, भारतात प्रतिभेची कमी नाही,पण वाईट राजकारणाने देशाचे नुकसान झाले आहे. राजकारणानेच देशात दंगे होतात. नेहमी एकत्र राहणारी लोकंच मूठभर वाईट लोकांच्या सांगण्यावरून एकमेकांच्या रक्ताचे भुकेले होतात आणि एकमेकांचे रक्त वाया घालवतात. शरद या गोष्टींनी अस्वस्थ होतात आणि लोकांची समजूत घालतात की अश्या चिथावणीला त्यांनी बळी पडता कामा नये. ते सारे धर्मजातीच्या लोकांना एकमेकांना मदत करायला सांगतात आणि रक्तदान महादान असल्याचे सांगतात. शरद म्हणतात की सा-यांचे रक्त सारखेच तर आहे, मानवाने धर्म-जाती तयार केल्या,पण ईश्वराने सा-यांना सारखेच बनविले आहे. ते स्वत: ७०पेक्षा जास्तवेळा रक्तदान करते झाले आहेत. सन१९९३पासून आतापर्यंत त्यांनी चारशेपेक्षा जास्त रक्तदान शिबिरे घेतली आहेत. मध्यप्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे हे काम चालते.

शरद सांगतात की, सामान्यलोकांचे त्यांना पूर्ण सहकार्य असते, लोक मोठ्या प्रमाणात या शिबिरात येतात आणि रक्तदान करतात. या कामासाठी ते वेगवेगळ्या रुग्णालयांना संपर्क करतात जेथे ते एकत्र केलेले रक्त पाठवितात.

शरद यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले, “ लहान मुलेच आमचे भविष्य आहेत पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण त्यांना नैतिकमुल्यांची शिकवण देऊ शकत नाही जे योग्य नाही. मुलांना चांगल्या शिक्षणासोबतच नैतिकमुल्यांचे शिक्षण देखील दिले जाणे आवश्यक आहे, त्यांच्यात संस्कारांचा अभाव असता कामा नये. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढली पाहिजे. देशप्रेमाची भावना असायला हवी. पुस्तकीज्ञानाशिवाय त्यांना माहिती व्हायला हवे की, काय चांगले आहे आणि काय वाईट”

त्याप्रमाणेच मुलांना प्रोत्साहित, आत्मनिर्भर आणि त्यांच्यात नैतिकमुल्य वाढवण्यासाठी शरद यांनी ‘आकाश टिम’ स्थापन केली आहे. त्या माध्यमातून ते मुलांना रचनात्मक कार्यात देश आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदा-या कोणत्या याची जाणिव देण्याचा प्रयत्न करतात. हीच मुले झाडे लावतात, रक्तदान शिबीरात भाग घेतात, तसेच मुलांसाठी क्रीडास्पर्धाही घेतल्या जातात.

शरद सांगतात की जनसेवा करणे आता त्यांच्या जगण्याचा भाग झाला आहे आणि त्यातच त्यांना त्यांचा आनंद मिळतो. त्यांच्या पत्नी डॉ. लक्ष्मी कुमरे या कामात नेहमीच त्यांना साथ देतात. शरद भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पाहतात आणि भारताला सर्वात अग्रेसर देशांच्या पंक्तीत पाहू इच्छितात.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे.