अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

Thursday January 28, 2016,

4 min Read

डोळ्यावर काळा चष्मा अन हातात पांढरी काठी घेऊन रस्ता ओलांडणारे, चालत्या रेल्वेत खेळणी विकणारे अंध बांधव आपण आपल्याभोवती पाहत असतो. जर आपल्यासमोर एखादा आंधळा व्यक्ती काठी टेकत टेकत येतो....त्यावेळी आपण त्याच्याकडे ‘बिचारा’ असे बोलून आपल्या मनातले दुःख व्यक्त करतो. पण जर एक आंधळाच व्यक्ती गरिबांच्या लेकरांना शिक्षणाचे धडे गिरवता यावेत यासाठी एक शाळा स्थापित करून चिमुकल्यांसाठी वसतीगृह बनवित आहे...असे तुम्हाला सांगितले तर विश्‍वास होईल का? विश्‍वास नसेल होत तर आता करा. कारण वाशिम जिल्ह्यातील एका अंध व्यक्तीने गरिबांच्या घरी शिक्षणाचा दिवा पेटवून अनोखे कार्य करण्याचे धाडस दाखविले आहे. त्याचा प्रवास हा नक्कीच तुम्हाला थक्क करणारा आहे.


image


वाशिम जिह्यातील मंगरूळपीर येथील झोपडपट्टी वसाहतीत राहणारे हिरामण निवृत्ती इंगोले...डोळस असूनही कुणाकडे जीवन जगण्याची दृष्टी नसते. पण, जन्मजात दृष्टी नसूनही त्याचा डोळसपणा मात्र इतरांना लख्खपणे जाणवावा असा आहे. हे हिरामण इंगोले भलेही डोळ्याने अंध जरी असले तरी त्यांच्या डोळ्यात गरिबांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी मिळावी यासाठी त्यांच्या डोळ्यात शाळेचे स्वप्न मात्र रंगत होते. त्यांना कोणत्याही अक्षराची जाण नाही. परंतू आपल्याला शिकता आले नाही म्हणून आपण गरिबीचे चटके सोसत आहोत, पण आपल्यासारख्या इतरांवर मात्र ही वेळ येऊ म्हणून त्यांची धडपड कायम होती आणि त्यांच्या याच धडपडीमुळे मंगरूळपीर येथील झोपडपट्टी वसाहतीत अक्षरांची रंगबेरंगी बाग फुलली आहे. हिरामण यांनी झोपडट्टी वसाहतीतील स्थापित केलेल्या संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेतून आज अडीचशे गरीब मुले शिक्षणाची ज्योत पेटवून त्यांच्या घरातील दारिद्ˆयावर मात करीत आहेत. शाळा स्थापित करण्यापर्यंतच हिरामण यांचा प्रवास जर तुम्ही पहिला तर तुम्हीही अचंबित व्हाल....

एका झोपडपट्टीत राहणारे व डोळ्याने अंध असलेल्या हिरामण यांचे वयाच्या सहाव्या वर्षीच आई-वडीलांचे छत्र हरपले. ज्या वयात त्यांना आई-वडिलांच्या सहवासाची गरज होती त्या वयात एक अनाथ म्हणून त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला. आई-वडिल गेल्यानंतर निराधार झालेल्या हिरामण यांना त्यांच्या अंध मित्रांनी दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी भिक मागण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी मंगरूळपिरातील अप्सरा हॉटेलात त्यांनी कपबशा विसळणे पत्करले. (मंगरूळपीरच्या जुन्या बसस्थानकानजीक हे हॉटेल होते. ते आता बंद पडले आहे.) शिक्षणाअभावी आपल्याला पुढे जाता आले नाही, ही सल मनात होतीच. मग दिवसभर हॉटेलमधून काम करून जी काही कमाई होत असे त्यातून त्यांनी काही रक्कम बचत करून ठेवण्यास सुरवात केली. त्यांच्या या अंध डोळ्यांनी पाहिलेल्या गरिबांसाठीच्या शाळेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी...निराधार, निराश्रित म्हणून पुढे शासनाकडून सहाशे रुपये महिना मिळू लागला. तोही बचतखात्यात जमा होऊ लागला. बर्‍यापैकी पैसे जमले आणि त्यानंतर सुरू झाली त्यांची मंत्रालयवारी...‘‘ मला गरिबांच्या लेकरांसाठी शाळा उघडायची आहे’’, असे म्हणत ते मुंबई दरबारी शाळेचा प्रस्ताव घेऊन जात. सातव्या चकरांत त्यांना यश आले. महात्मा फुले शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाची १९९३ मध्ये स्थापना झाली नि मंगरूळपीरच्या झोपडपट्टी वसाहतीत ताटव्यामध्ये संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेचा (पहिली ते सातवी) श्रीगणेशा झाला. एका अंधाने हाती घेतलेल्या या मोहिमेचे सर्वांना अप्रूप वाटले. आता लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले. गरिबांच्या लेकरांसाठी, त्यांच्याच उद्धारासाठी, त्यांच्याच वस्तीत निर्माण झालेली शाळा म्हणून दान मिळू लागले. कुणी विटा दिल्या, तर कुणी वाळू. कुणी पैशाची मदत केली. त्यामुळे लोकसहभागातून शाळेची इमारत उभी झाली. ही शाळा चौथीपर्यंत शंभर टक्के अनुदानावर आली. पण, इमारतीचे बांधकाम मात्र आजही अर्धवट स्थितीत आहे. फक्त शाळा स्थापित करून ते थांबले नाहीत तर शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे वसतीगृह असावे असे त्यांना वाटले. परंतू आर्थिक पाठबळाअभावी त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यास अडथळा होत आहे. माझ्या चिमुकल्यांना पुण्या-मुंबईसारखे कॉन्व्हेंटचे शिक्षण कुठलेही शुल्क न आकारता द्यायचे आहे, असे ते म्हणतात. त्यांना संगणक शिक्षण मिळावे, ही त्यांची पोटतिडीक. पण, ते घेण्याची कुवत मात्र नाही. त्यांच्या शाळेत शिकण्यासाठी येणार्‍या गरिबांच्या लेकरांना त्यांना भारतभर सहली फिरवून आणायच्या आहेत. त्यांची इच्छाशक्ती ही अफाट आहे. परंतू त्यांना त्यासाठी भांडवल अपुरे पडत असल्याने त्यांना त्या पूर्ण करता येत नाहीत. या अनुदानित शाळेवर शिक्षकांना कायम करताना त्यांनी एक रुपयाही देणगी स्वीकारली नाही. स्वतः अंध असूनही गरिबांच्या लेकरांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे धाडस जे हिरामण यांनी करून दाखविले, त्याचप्रमाणे प्रत्येक गावा-गावात, जिल्ह्यात, राज्यात असे हिरामण जन्माला आले तर संपूर्ण राज्यात कोणताही गरीब अशिक्षित राहणार नाही. तसेच बेरोजगारीही राहणार नाही. हिरामण यांच्या ध्येयपूर्तीला मानाचा मुजरा...!!!!!

image


  • त्यांच्या या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी गरज आहे ती दानशुरांच्या मदतीच्या हातांची...मदतीसाठी (संतोष शेटे-९६८९३२२५४३, मुख्याध्यापक- नीलेश मिसळ : ९७६६६४९९६६) या क्रमांकावर संपर्क करा.