English
 • English
 • हिन्दी
 • বাংলা
 • తెలుగు
 • தமிழ்
 • ಕನ್ನಡ
 • मराठी
 • മലയാളം
 • ଓଡିଆ
 • ગુજરાતી
 • ਪੰਜਾਬੀ
 • অসমীয়া
 • اردو

आपल्या देशात ‘हेल्थ ऍमेझॉन’ उभारण्याचे लक्ष्य असलेल्या पाकिस्तानी आय-बँकरची कथा

ई-कॉमर्स सध्या चांगलेच जोरात आहे आणि या क्षेत्राची ही भरभराट केवळ भारतापुरतीच मर्यादित नाही तर शेजारच्या पाकिस्तानातही हीच परिस्थिती दिसून येत आहे. इन्व्हेस्टमेंट बॅंकर फुरक्वान किडवाई यांनी सुरु केलेली दवाई (Dawaai) ही ऑनलाईन फार्मसी अर्थात ऑनलाईन औषधविक्रीचे ठिकाण त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल. सततच्या संघर्षात होरपळलेल्या या देशात ई कॉमर्स ची जादू आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक ऑनलाईन रिटेल स्टोअर्सपैकीच दवाईही एक आहे.

बहुतेक सर्व आशियाई देशांप्रमाणेच पाकिस्तानातही मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असून तेथील आरोग्य व्यवस्था ही दोन गटात विभागली गेली आहे. अतिशय महाग अशा खासगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्था एका बाजूला तर स्वस्त सरकारी केंद्रे दुसऱ्या बाजूला, अशी ही स्पष्ट विभागणी आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका पहाणी अहवालानुसार, या देशात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना अतिशय अपुरा निधी उपलब्ध असून, २०१० मध्ये देशाच्या जीडीपीच्या केवळ ०.८ टक्के एवढा निधी सार्वजनिक आरोग्यासाठी देण्यात आला होता. त्याच्याशी तुलना करता, भारतात हीच टक्केवारी होती १.२ टक्के एवढी...

पाकिस्तानातील आरोग्यविषयक विविध समस्यांशी लढण्याच्या दृष्टीने, अनेक तरुण उद्योजकांनी ऑनलाईन फार्मसीज आणि हेल्थटेक संस्था सुरु केल्या आहेत आणि कराची स्थित दवाई ही त्यापैकीच एक आहे.

दवाईचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी असलेले फुरक्वान हे मूळचे इन्व्हेस्टर बॅंकर... पाकिस्तानात परत येऊन, ही संस्था सुरु करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सात वर्षे ते इन्व्हेस्टर बॅंकर म्हणून लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये काम करत होते. त्यांच्या मते, पाकिस्तानसारख्या ठिकाणी मोठा ग्राहक व्यवसाय उभारताना एक मोठा डेमोग्राफीक अर्थात जनसांख्यिकी फायदा असतो.

इतरत्र कुठे तुम्हाला एवढा मोठा वेगाने वाढणारा मध्यमवर्ग मिळू शकतो, ज्याची खर्च करण्याची क्षमता आहे किंवा भविष्यात असू शकेल? एक चांगली जीवनशैली जगण्यासाठी या २०० दशलक्ष लोकांना खर्च करावाच लागतो. हाच विचार मनात ठेवून, फुरक्वान असे काही तरी करु इच्छित होते, जे आवश्यक असेल आणि ज्यासाठी ग्राहकांना फारसे मनविण्याची गरज लागणार नाही.

औषधनिर्मिती क्षेत्र हे त्यामानाने नवेकोरे होते आणि अशा प्रकारच्या उलथापालथीसाठी तयारही होते. सुरुवातीला BOOTS किंवा CVS यांसारखे हेल्थकेअर पाकिस्तानात आणण्याची कल्पना होती, मात्र त्यामध्ये असलेले कमी मार्जिन, किंमत निश्चित करण्यामधील मर्यादा आणि खूपच अधिक नियंत्रित बाजारपेठे यामुळे त्यांनी हा विचार सोडून दिला.

सोय आणि गुणवत्तायुक्त अशी एक एकत्रित औषधविक्री सेवा देऊ करणे हे त्यांचे लक्ष्य होते. लवकरात लवकर रुग्णांच्या घरापर्यंत खात्रीलायक औषधे घेऊन जात, दवाईची टीम रिटेल फार्मसीच्या संकल्पनेचा पुन्हा नव्याने शोध घेत आहे. पाकिस्तानातील औषध उद्योगाची बांधणी करण्याची ही कल्पना आहे आणि तेदेखील सध्याच्या औषधविषयक सर्व कायद्यांचे पालन करत...

“ फक्त पात्र फार्मासिस्टच आमची सर्व औषधोत्पादने हाताळतात, यामध्ये खरेदी, साठा आणि वाटप या सर्वाचा समावेश आहे. हे सर्व सहकारी सोमवार ते शनिवारमध्ये सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत उपलब्ध असतात आणि आमच्या ग्राहकांसाठी आम्ही केवळ एका फोनच्या अंतरावर असतो,” फुरक्वान सांगतात.

ऑनलाईन स्टोअर असल्याने, दवाईडॉटपीके समोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे ते, त्यांच्या प्रिस्क्रिप्शन अर्थात डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणि ग्राहकांचे आरोग्य आणि ओटीसी उत्पादनांसाठी (वेल.पीके), अशी दोन स्वतंत्र पोर्टल्स सुरु ठेवण्याचे... प्रिस्क्रिप्शननुसार विक्री करणाऱ्या ई-टेल स्टोअर्ससाठीच्या ऑनलाईन विपणनावर असलेल्या मर्यादांमुळे प्रामुख्याने हे करावे लागले.

फुरक्वान पुढे सांगतात की, एक तंत्रज्ञान आघाडी सक्षम असल्याशिवाय ऑनलाईन स्टोअर हे पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे ही प्रणाली सातत्याने अद्ययावत करत रहाण्यावर टीमचा विश्वास आहे. ते सांगतात की, या पोर्टलवर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला सुरळीत व्यवहार करण्याचा अनुभव घेता येईल आणि तसेच दरवेळी अधिक चांगली सेवाही अनुभवता येईल, असा आमचा प्रयत्न असतो.

“ दुर्दैवाने, केवळ मागणी नोंदवता येईल यासाठीच वेबसाईट वापरण्याची पाकिस्तानातील बहुतेक ई-टेलर्सची मानसिकता आहे. आम्ही काम करत असलेले नविन तंत्रज्ञान हे जागतिक ई-कॉमर्सच्या क्षेत्रासाठी एक महत्वाचा शोध असेल आणि ज्यापद्धतीने ग्राहक आमच्याशी संवाद साधतात त्यामध्ये आणि एकूणच खरेदीच्या अनुभवामध्ये प्रचंड सुधारणा घडवून आणेल,” फुरक्वान सांगतात.

गेल्या वर्षी दवाईची मासिक महसूली वाढ ही २३ टक्क्यांच्या आसपास होती. बाजारपेठेच्या अभ्यासाच्या आधारे, या टीमचा असा दावा आहे की, महासुलानुसार ते सध्या पाकिस्तानातील सर्वात मोठे ऑनलाईन हेल्थ स्टोअर आहेत आणि देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स स्टार्टअप...

कामाचा व्यवसायावर कशाप्रकारे परिणाम होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव असलेले पदवीधर या टीममध्ये आहेत. फुरक्वान यांच्या मते येथे असलेल्या ओपन फ्लोअर संस्कृतीमुळे आणि पदानुक्रम नसल्यामुळे, ज्या कोणाला काही बदल घडवायचा आहे आणि ज्यांची वेगळा विचार करण्याची क्षमता आहे, अशा सगळ्यांसाठीच हे वातावरण खूपच चांगले आहे.

या क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना घेण्यापेक्षा, फुरक्वान यांनी अशा लोकांची टीम बनविली आहे, जे स्वतःच स्वतःला कामासाठी प्रवृत्त करु शकता आणि आघाडीवर राहून नेतृत्व करु शकतात.

या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचा पदानुक्रम नसलेल्या संस्कृतीचे पालन केले जाते. तसेच प्रत्येक विभागाचे काही लक्ष्य असून, सारखाच दर्जा राखला जातो.

व्यवस्थापकांपासून ते फार्मासिस्टपर्यंत कोणीही सूचना देऊ शकत असल्याने ही कंपनी सातत्याने प्रगती करत आहे आणि रोजच्या समस्यांचा सामनाही... त्याद्वारे कंपनीचे काम अधिक सुरळीतपणे होत असून ग्राहकांना योग्य सेवा देता येत आहे.

पाकिस्तानातील स्टार्टअप्स

पाकिस्तानातील स्टार्टअप्स क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास, फुरक्वान यांच्यामते ते अजूनही बाल्यावस्थेतच आहे. त्यामुळे गुणवान पदवीधर मिळणे हे अवघड आहे, कारण आजही ते टीपिकल एफएमसीजीमध्येच नोकरी करु इच्छितात. आतापर्यंत तरी आपल्या टीम सदस्यांना पाकिस्तानातील पुढील ‘हेल्थ ऍमेझॉन’ उभारण्यासाठीची प्रेरणा देत, ते स्टार टीम बनविण्यात यशस्वी झाले आहेत.

“ आम्हाला परदेशी गुंतवणूकदारांकडून निधी मिळाला आहे, ज्यामध्ये अमेरीकेतील व्हीसी, दक्षिण आफ्रीकेतील सुपर एंजल आणि युकेमधील मॅंकेंझी कन्सल्टंट यांचा समावेश आहे. तर सध्याची फंडींग राऊंड पूर्ण करण्याच्या आम्ही अगदी जवळ आलो आहोत,” फुरक्वान सांगतात.

लाहोर स्थित ब्युटीहुक्ड या ऑनलाईन सलून डिस्कवरी व्यासपीठाचे संस्थापक सहर सैद यांनी युअरस्टोरीशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानातील ई-कॉमर्स बाजारपेठ ही २०१७ पर्यंत ६०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहचण्याची अपेक्षा असून तिचा सध्याचा आकार हा ३० दशलक्ष डॉलर एवढा आहे.

कराची स्टॉक मार्केटचा इंडेक्समध्ये गेल्या काही वर्षांत चाळीस टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे आणि त्याने ३२,००० केएसई १०० इंडेक्स पॉंईंटचा बॅरीयर तोडला होता.

भारताप्रमाणेच पाकिस्तानातही स्टार्टअप ज्याप्रकारे व्यवसाय केला जातो त्यामध्ये निश्तितच क्रांती आणू शकतात.

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

This is a YourStory community post, written by one of our readers.The images and content in this post belong to their respective owners. If you feel that any content posted here is a violation of your copyright, please write to us at mystory@yourstory.com and we will take it down. There has been no commercial exchange by YourStory for the publication of this article.

Related Stories

Stories by Team YS Marathi