महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी सरसावली 'रोशनी'

महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी सरसावली 'रोशनी'

Saturday March 05, 2016,

3 min Read

महिला प्रत्येक क्षेत्रात कितीही पुढे गेल्या कर्तृत्ववान झाल्या तरी महिलांच्या प्राथमिक किंवा मुलभूत गरजा अजूनही दुर्लक्षित आहेत. एकदा घराबाहेर पडलं की घरी परते पर्यंत त्यांनी स्वच्छतागृहात जायचेच नाही असं अजूनही गृहीत धरलं जातं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या फार कमी असते, आणि असलीच तर ती स्वच्छ असतातच असं नाही. स्वच्छतागृह ही तर अगदी मुलभुत गरज असूनही ती दुर्लक्षित आहे. मासिक पाळी सुरु असताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अजूनही मासिक पाळीबाबत घ्यावयाची काळजी आणि सॅनिटरी नॅपकीन्सचा वापर याबाबत म्हणावी तितकी जागरूकता समाजात आलेली नाही. मासिक पाळी सुरु झाली की खेडेगावात मुलींना शाळेत पाठवलं जात नाही.

या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा होते मात्र ते कृतीत उतरत नाही. महिलांच्या या मुलभूत समस्यांबाबत जागृतीसाठी पुण्यातील 'रोशनी' हा युवकांचा गट काम करत आहे. प्रवीण निकम आणि त्याचे सहकारी राईट टू पी आणि मासिक पाळीच्या समस्यांबाबत जागृती करण्यासाठी काम करत आहेत.

image


प्रवीण निकम पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेत आहे. त्याने पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून राज्य शास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. पदवीचं शिक्षण घेत असताना, प्रवीण आसामला अभ्यास दौऱ्यावर गेला होता. त्याच दरम्यान प्रवीणला एक रोशनी नावाची लहान मुलगी भेटली. ती घरी एकटीच होती. तिची शाळा बंद करण्यात आली होती. कारण काय तर रोशनीला मासिक पाळी सुरु झाली होती. आसाम मधील त्या समाजात मुलीला मासिक पाळी सुरु झाली की शाळेत न पाठवण्याची प्रथा आहे. मासिक पाळी मुळे मुलींचं शिक्षण थांबणं हे प्रवीणला फार चुकीचं वाटलं. याबाबत जनजागृती करायला हवी असं त्यानं ठरवलं.

image


आसामहून परत आल्यावर प्रवीणने एक गट तयार केला आणि त्या गटाला रोशनी असं नाव दिलं. या गटाच्या माध्यमातून राईट टू पी आणि मासिक पाळी यावर त्यांनी पथनाट्य करायला सुरवात केली. त्याच दरम्यान पुण्यात महाविद्यालयांमध्ये महिलांची स्वच्छतागृह अपुरी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. पुणे विद्यापीठाकडून त्याने महिलांच्या स्वच्छतागृहांची माहिती मागवली. पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत ६०० महाविद्यालयं आहेत, त्यापैकी २५ महाविद्यालयांनी त्याला उत्तर दिलं. महाविद्यालयातील स्वच्छतागृह अपुरी आहेत आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच स्वच्छतागृह स्वच्छ करण्याचं ठरवलं.

image


 'रोशनी' च्या कार्यकर्त्यांनी मग झाडू हातात घेतला आणि पुणे शहरातील अस्वच्छ स्वच्छतागृह स्वच्छ करण्याची मोहीमच सुरु केली. त्यासाठी त्यांनी फेसबुक वर एक पेज सुरु केलं. जे स्वच्छतागृह रोशनी चे कार्यकर्ते स्वच्छ करायचे त्याचा अस्वच्छ फोटो आणि स्वच्छ केल्या नंतरचा फोटो ते त्या पेजवर टाकायचे. असं करत करत त्यांनी शहरातील जवळ जवळ सगळीच सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ केली.पण स्वच्छतागृहांपेक्षा मासिक पाळीचा विषयही ज्वलंत होता. याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय रोशनीने घेतला आणि यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांच्या मदतीने शाळांमध्ये आणि आयटी कंपन्यांमध्ये कार्यशाळा घेण्यास सुरवात केली.

image


रोशनी गटाला प्रत्येक खेडेगावात संडास बांधून द्यायचा आहे. कमी खर्चात बायो टॉईलेट कशी बांधता येतील याचा ते विचार करत आहेत. याशिवाय रोशनी गट अंध आणि अपंगांच्या समस्यांवरही काम करत आहे.

प्रवीणच्या याच प्रयत्नांच्या भाग म्हणून त्याला २०१४ साली संयुक्त राष्ट्रांच्या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच राष्ट्रकुल युवा पुरस्काराचाही तो मानकरी ठरला आहे. राष्ट्रकुल च्या युवक कौन्सिलवरही प्रवीण निवडून गेला आहे. यापुढे कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याचा प्रवीणचा विचार आहे आणि त्यादृष्टीने त्याची वाटचाल सुरु आहे. 

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्वच्छ भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढे सरसावले २१ वर्षीय दोन तरुण

‘स्वच्छ भारत’ साठी शालेय विद्यार्थ्यांचे घाणीच्या साम्राज्याविरुद्ध एक आव्हान ‘द बॅग इट चॅलेंज’

तुमचा कचरा देखील उचलतात आणि पर्यावरणाचे रक्षण देखील करतात, तुम्ही पण माहिती करून घ्या कोण आहेत ते?...