गरीब मुलांचे आयुष्य सुधारावे म्हणून झटत आहेत दिल्लीतील दोन महिला पोलीस

0

पोलिसांचे नाव ऐकताच सामान्य माणसाच्या मनात खाकी वर्दी घातलेल्या माणसाची प्रतिमा उभी राहते, जो सहसा हातात काठी अथवा बंदूक घेऊन लोकांवर एक प्रकारची जरब ठेऊन असतो. पोलीस सहसा कठोर आणि कोरडेपणाने काम करताना आढळतात, मात्र नेहमी असेच असते असे नाही किमान दिल्ली पोलीसच्या दोन महिला कॉनस्टेबल ममता नेगी आणि निशा यांच्या बद्दल तर असे अजिबातच म्हणता येणार नाही. या दोन महिला कॉनस्टेबल गरीब मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना आयुष्यात काही चांगले बनता यावे म्हणून झटत आहेत.

उत्तर दिल्ली मधील तीमारपूर आणि रुपनगर पोलीस ठाण्यांवर रोज झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गरीब परिवारातील मुलांना शिकवले जाते. तसेच त्यांना त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या वाईट गोष्टींवर नजर ठेवण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. ज्याने पोलिसांना तपासाच्या कामात मदत होऊ शकेल तसेच अपराध घडण्याआधीच त्याला आळा घालणे शक्य होईल.

ममता युवर स्टोरी ला सांगतात – “ तीमारपूर आणि रूपनगर पोलीस ठाण्यांबाहेर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. या झोपड्यांमध्ये राहणारे बहुसंख्य लोक परिवाराच्या पालन पोषणासाठी छोटी मोठी कामे करतात. या कुटुंबांमधील मुले शाळेनंतर मोकळ्या वेळात इथे तिथे फिरत असत, ज्याने त्यांना वाईट संगत आणि सवई लागण्याची शक्यता होती. सोबतच झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलींवर अत्याचार होण्याचाही धोका होता.”

अशा परिस्थितीत मागील सहा महिन्यांपासून या दोन पोलीस ठाण्यांमधील कॉनस्टेबल ममता नेगी (तीमारपूर) आणि कॉनस्टेबल निशा (रुपनगर) यांनी इथे मुलांना शिकवण्याचा आणि त्यांना स्व संरक्षण शिकवण्याचा चंग बांधला आहे.

निशा सांगतात “ प्रत्येक पोलीस ठाण्यात सुमारे ५० मुले शिकण्या साठी येतात. यातील अधिकांश मुले ही सरकारी शाळेत जाणारी अथवा काही कारणाने शाळा सुटलेली आहेत. बरीच मुले शिकण्यात हुशार आहेत मात्र योग्य दिशा आणि सल्ला न मिळाल्याने मागे पडलेली आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये शाळेच्या अभ्यासक्रमासोबतच इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान यावरही विशेष लक्ष पुरवले जाते".

ममता सांगतात “ मी स्वतः एका सरकारी शाळेत शिकले आहे. सरकारी शाळांमध्ये केवळ साधनांचा अभाव असतो असे नाही तर बऱ्याचदा शिक्षक केवळ नावासाठी शिकवत असतात. सगळ्यांकडेच वेगळी शिकवणी लावण्यासाठी पैसे नसतात. चांगली गोष्ट ही आहे की या मुलांचे आई बाबा गरीब आणि कमी शिकलेले असूनही ते शिक्षणाप्रती जागरूक आहेत आणि रोज आपल्या मुलांना इथे शिकवण्यासाठी पाठवतात.”


निशा सांगतात “ मी दिल्ली पोलिसात भरती होण्याआधी मुलांना शिकवत असे. अशात मुलांना शिकवण्याच्या निमित्ताने मलाही शिकण्याची संधी मिळते. इथे शिकायला येणारी अधिकतर मुले चांगलीच हुशार आहेत ज्यांना केवळ चांगला मार्ग आणि चांगले वातावरण देण्याची गरज आहे.”

इथे शिकणारा निखील प्रांजळ पणे काबुल करतो की आधी त्याची इंग्रजी भाषा चांगली नव्हती मात्र जेव्हा पासून तो इथे येऊन शिकू लागला आहे त्याच्या इंग्रजीत खूप चांगली सुधारणा झाली आहे. आता इंग्रजीच्या परीक्षेत त्याला चांगले गुणही मिळू लागलेत. निशा मॅडमनी सांगितलेला देश सेवेचा संदेश निखीलने चांगलाच अंगी उतरवलाय. त्याने आता मोठे झाल्यावर पोलीस होण्याचे स्वप्न बाळगले आहे. काजल म्हणते “ ममता मॅडम आम्हाला केवळ अभ्यासच शिकवत नाहीत तर नृत्य आणि योग सुद्धा शिकवतात. त्या आम्हाला स्पर्धेत जिंकल्यावर चाॅकलेट आणि पेन देतात. मॅडम आम्हाला अक्षरधाम मंदिर पाहायला घेऊन गेल्या होत्या जिथे आम्ही आपल्या देशाची संस्कृती तसेच महान पुरुषांबद्दल माहिती घेतली.

दिल्ली पोलिसांच्या ‘शी टू शक्ती’ या उपक्रमाअंतर्गत हा वर्ग चालवला जातो. ज्याचा मुख्य उद्देश महिला सबलीकरण आहे. ‘शी टू शक्ती’ या उपक्रमाच्या माध्यमातून दिल्ली पोलीस वेगवेगळ्या काॅलेज मधील मुलींना आत्म रक्षणाचे प्रशिक्षण देते. वेळोवेळी अँटी ईव टीजिंग ड्राइव सुद्धा चालवते आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यास मदतही करतात.

लेखक : अनमोल

अनुवाद : सुयोग सुर्वे