इन्फोसेक क्षेत्राच्या विकासासाठी अधिक महिलांचा सहभाग निश्चितच मदतगार ठरेल - श्रुती कामत

0

समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांच्या योगदानाचे महत्व सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, “ कुठल्याही समाजाच्या प्रगतीबाबतचा निष्कर्ष काढताना, त्या समाजातील स्त्रियांनी साधलेली प्रगती हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मापदंड असतो.” संपूर्ण समाजाबरोबरच विविध क्षेत्रांनाही ही गोष्ट निश्चितच लागू होते. प्रत्येक क्षेत्रातच स्त्रियांचा सहभाग हा त्या त्या क्षेत्राच्या विकासासाठी अनेक अर्थांनी महत्वाचा ठरतो. इन्फोसिससाठी काम करणाऱ्या एथिकल हॅकर (नैतिक हॅकर) आणि सिक्युरीटी ऍनॅलिस्ट (सुरक्षा विश्लेशक) श्रुती कामत यांनी आंबेडकरांच्या या शब्दांमधून प्रेरणा घेत, आपल्या कामातून ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. एवढेच नाही तर इतर स्त्रियांनाही या क्षेत्रात आणण्यासाठी त्या अथक प्रयत्नही करताना दिसतात. जाणून घेऊ या त्यांची कहाणी...

हॅकींग या शब्दाकडे आजही अनेकदा नकारात्मक दृष्टीने पहाण्याची चूक आपण नेहमीच करत असतो. मात्र आजच्या संगणक युगात हॅकींगची संकल्पना एवढी मर्यादीत निश्चितच नाही. संगणक सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग असून त्यादृष्टीने एथिकल अर्थात नैतिक हॅकर्सचे काम हे अतिशय मोलाचे ठरते. संगणक सुरक्षेच्या या क्षेत्रामध्ये इंटरनेट आणि मोबाईलचा समावेश होतो. खरे तर या क्षेत्रावर आजही पुरुषांचीच मक्तेदारी दिसून येते. पण श्रुती आणि त्यांच्या समविचारी महिला सहकारी हे चित्र बदलण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या व्यासपीठावर चमकण्याची संधी असणाऱ्या इतर स्त्रियांसाठी या क्षेत्रात येण्याचा मार्ग सुकर करतानाही त्या दिसत आहेत, जेणेकरुन येथील स्त्रीपुरुष असमानता कमी होऊ शकेल.

श्रुती मुळच्या उडुपीच्या... इसी कॉन्सिलच्या त्या सर्टीफाईड एथिकल हॅकर आहेत. सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकींग या विषयावर c0c0n, 2014 च्या माध्यमातून त्यांनी शंभरपेक्षा जास्त महिलांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत तर c0c0n, 2013 येथे त्यांनी सिक्युअर एसडीएलसी या विषयावर सादरीकरण केले आहे. त्याशिवाय जेलब्रेक नलकॉन, २०१४ ( Jailbreak NULLCON, 2014) मध्ये त्या सहभागी झाल्या असून NULL/OWASP बंगलोर चॅप्टरच्या त्या सक्रीय सदस्य आहेत. या कार्यक्षेत्रात नवनवीन गोष्टी शिकण्याची त्यांना प्रचंड आवड असून आणि वेब ऍप्लिकेशन सिक्युरीटी या विषयात त्यांना विशेष रस आहे.

विविध परिषदांबरोबरच केरळ पोलिसांनी त्रिवेंद्रम येथे देशभरातील महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत सायबर गुन्ह्यांविषयी व्याख्यान देण्याची संधीही श्रुती यांना मिळाली आहे. या परिषदेबाबत त्या भरभरुन बोलतात. “ देशभरातून आलेल्या विविध पदांवरील दोनशे महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर भाषण देणे हा माझ्यासाठी सन्मानच होता. त्यांच्याबरोबर संवाद साधताना मला खूप आनंद तर झालाच पण हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी प्रेरणादायी होता,” श्रुती सांगतात.

आपल्या विषयावर जागरुती निर्माण करण्याचे काम श्रुती अतिशय प्रभावीपणे करताना दिसतात. मात्र याची मुळे त्यांच्या बालपणापासूनच रुजलेली दिसतात. श्रुती यांचे शालेय शिक्षण उडुपीमध्येच झाले. अभ्यासेतर उपक्रमांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत, खास करुन वक्तृत्व स्पर्धांमध्ये... परिणामी व्याख्याने आणि सादरीकरण या त्यांच्यादृष्टीने अगदी सहज बनले. सर्वांत महत्वाचे म्हणजे या गोष्टीची त्यांना नेहमीच आवडही होती..

बंगळुरुच्या अम्रिता स्कुल ऑफ इंजिनियरींगमधून श्रुती यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविली. “ त्यावेळी मला पहिल्यांदाच घरापासून दूर रहावे लागले. पण स्वंतंत्रपणे रहाण्याचा तो अनुभव मला निश्चितच बरेच काही शिकविणारा होता.” अभियांत्रिकेचे शिक्षण झाल्यानंतर त्यांना इन्फोसिसमध्ये नोकरी मिळाली.

हॅकिंगविषयी श्रुती यांना नेहमीच आकर्षण होते पण या क्षेत्रात कशी सुरुवात करावी, याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. इन्फोसिसमधील प्रशिक्षणादरम्यान सिक्युरीटी अर्थात सुरक्षा हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग होता. या प्रशिक्षणादरम्यानच इन्फोसेक अर्थात माहिती सुरक्षेबाबत शिकण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यातूनच या क्षेत्रात काम सुरु करण्यास त्यांना मदत झाली. त्यावेळच्या त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांची ओळख NULL – the Open Security Community शी करुन दिली. त्यातून त्यांच्यापुढे एक मोठे दालनच खुले झाले. त्यांनी त्यांच्या सत्रांना आणि मासिक बैठकांना नियमितपणे हजेरी लावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांचा इन्फोसेकमधील त्यांचा रस आणखीनच वाढला. “ हे कार्यक्षेत्र खूपच रोमांचक आहे, कारण येथे दररोज नविन शोध लागत असतात आणि त्यामुळे शिक्षण कधीच थांबत नाही,” त्या सांगतात.

श्रुती यांच्या मते भारतात सिक्युरीटी ऍनॅलिस्ट अर्थात सुरक्षा विश्लेषक म्हणून काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे पण माहिती सुरक्षा अर्थात इन्फोर्मेशन सिक्युरीटी (इन्फोसेक) क्षेत्रातील भारतभर होणाऱ्या बैठका आणि परिषदांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग मात्र अजूनही कमी आहे.

मोबाईल, इंटरनेट सुरक्षा, वेब ऍप्लिकेशन सुरक्षा आणि माहिती सुरक्षेच्या या अफाट समुद्रात प्रत्येक लहानसे पाऊल हे देखील एक मोठी उडीच असते. श्रुती आणि त्यांच्याप्रमाणेच एथिकल हॅकर असलेल्या त्यांच्या एक सहकारी अपुर्वा या दोघी मिळून आता केवळ महिलांसाठी इन्फोसेक या विषयावर कार्यशाळा भरविण्याचे काम करत आहेत. “ हो, हा या प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. कम्युनिटी मिटींग्सला फारशा महिला हजेरी लावत नसल्याचे आमच्या लक्षात आले. यासारख्या कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवावा, अशी आमची इच्छा होती. यावर अधिक विचार करताना आमच्या असे लक्षात आले की, या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्या महिलांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा यासाठी एक चांगला मार्ग आहे,” त्या सांगतात.

श्रुती पुढे सांगतात, “सध्या माहिती सुरक्षा क्षेत्रात संतुलित दृष्टीकोन हरवला आहे. आम्हाला वाटते की, असे कार्यक्रम सायबर सुरक्षा क्षेत्रात स्त्रीपुरुष समानता आणण्यासाठी मदतगार ठरु शकतात आणि याबाबत जागरुती पसरविण्याच्या कामातील आमचा खारीचा वाटा आम्ही उचलू इच्छितो.”

केरळमधील कोची येथे COCON (c0c0n) 2014 हा त्यांनी आयोजित केलेला पहिला कार्यक्रम होता. एकशेवीसपेक्षा अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, ज्यांच्यामध्ये विद्यार्थिनी, शिक्षिका आणि काम करणाऱ्या स्त्रियांचा समावेश होता. “ आम्हाला मिळालेला प्रतिसाद खूपच सकारात्मक होता. सहभागी स्त्रियांपैकी अनेक जणींनी या क्षेत्रात कशा प्रकारे कारकिर्द करता येईल, अशी विचारणा केली. तसेच भविष्यातही आम्ही असे कार्यक्रम आयोजित करावेत आणि याविषयी अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहचवावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली,” श्रुती सांगतात.

त्याशिवाय या दोघींनी ‘इन्फोसेकगर्ल्स’ या नावाने एक संकेतस्थळ सुरु केले असून, इन्फोसेकची आवड असणाऱ्या महिलांसाठी हे एक व्यासपीठ आहे. या माध्यमातून महिलांपर्यंत पोहचणे आणि माहिती सुरक्षेबाबत त्यांच्यामध्ये औत्सुक्य निर्माण करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

या उपक्रमाला मदत करण्याची इच्छा असणारे सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबतच्या माहितीचा प्रसार करु शकतात, तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांसाठी इन्फोसेकशी संबंधित विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याच्या कामात सहभागी होऊ शकतात आणि त्यांचे ज्ञान इतरांनाही देण्याची तयारी दाखवून मदत करु शकतात.

अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांची तुलना करता भारतातील महिला एथिकल हॅकर्सची संख्या ही खूपच कमी आहे, पण श्रुती यांच्या मते, अलिकडच्या काळात यामध्ये मोठा बदल होत असून भविष्यात या क्षेत्रातील महिलांची संख्या वाढेल, अशी त्यांना आशा आहे.

श्रुती यांच्या मते सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे जागरुकतेचा आणि सहभागी होण्याचा अभाव... “ मला वाटते अशा कार्यक्रमांमधून महिलांची एकूण उपस्थिती कमी असल्याने, महिला यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक नसतात तसेच आपली चेष्टा होईल या भीतीनेही त्या मदत मागण्यास कचरतात. माझ्या मते इन्फोसेक क्षेत्र आणि त्यासंबंधीचे कार्यक्रम आणि परिषदांपासून महिला दूर रहाण्यामागची ही महत्वाची कारणे आहेत,” श्रुती सांगतात. त्या पुढे म्हणतात, “ मला वाटते, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जागरुकता पसरविण्याचे काम यापूर्वीच सुरु झाले असून त्यामाध्यमातून इन्फोसेक कम्युनिटीमध्ये येण्यासाठी महिलांना निश्चितच प्रेरणा मिळू शकेल.”

आपल्या उद्दीष्टाप्रती असलेली आवड आणि निष्ठा, श्रुती यांना नेहमीच प्रेरणा देत असते. त्यांचे कुटुंब, मित्र आणि प्रशिक्षक ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.

डायान मेरीचाईल्डच्या शब्दात सांगायचे तर, “स्त्री म्हणजे एक संपूर्ण वर्तुळ आहे. तिच्यामध्ये निर्मिती, संगोपन आणि परिवर्तनाची क्षमता असते.” महिलांकडे संगोपन आणि परिवर्तनाची ताकद असते, या गोष्टीवर श्रुती यांचाही संपूर्ण विश्वास आहे. इन्फोसिस या क्षेत्रात कारकिर्द करु इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींना सल्ला देताना श्रुती सांगतात, “ जर तुम्हाला या क्षेत्रात रस असेल, तर त्यामध्ये सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. इन्फोसेक क्षेत्रात वैविध्य आणणे आणि या क्षेत्राचा वेगाने विकास घडविण्याची गरज आहे आणि इन्फोसेकमध्ये येणाऱ्या महिला हे शक्य करुन दाखवितील.”लेखक : तन्वी दुबे

अनुवाद : सुप्रिया पटवर्धन