नवउद्योजकांनी सतत नाविन्याचा ध्यास घ्यावा

0

सध्या महाराष्ट्रामध्ये नवनवीन उद्योग सुरु होत आहेत. या उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी नवीन उद्योजकांनी सतत नाविन्याचा ध्यास घ्यावा, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केले.

भारत सरकारच्या आयडीईएमआय या संस्थेतर्फे राष्ट्रीय उद्योजकता दिवस आज  साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘एक्सलन्ट इन एन्टरप्रेनरशिप’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी देसाई बोलत होते. यावेळी 'आम्ही उद्योगिनी'च्या प्रमुख मीनल मोहाडीकर, एमएसएमई आयडीबीएमआय, मुंबईचे कार्यकारी संचालक एस.व्ही.रसाळ, डेव्हलपमेंट इन्स्टिट्युटचे अध्यक्ष राजीव गुप्ते, सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते.

देसाई पुढे म्हणाले की, राज्यातील लघु उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती देण्याचे काम एमएसएमई या संस्थेमार्फत केले जाते. नव्याने भरारी घेणाऱ्या उद्योजकांना भांडवल व तंत्रज्ञानाची काळजी करण्याचे कारण नाही. कारण या संस्था वेळोवेळी उद्योजकांना पाठबळ व मार्गदर्शन देत असतात. लघु उद्योगांसाठी 20 टक्के भूखंड राखीव ठेवण्यात आलेला आहे. राज्यातील प्रमुख एमआयडीसीमध्ये राज्य शासन दुकान, गाळे तयार करुन नवीन उद्योजकांना देणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

याप्रसंगी चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन म्हात्रे म्हणाले की, यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर एकच ध्येय ठेवणे आवश्यक आहे. मला रोज काही तरी नवीन शिकायचे आहे या वृत्तीमुळेच तुम्हाला तुमच्यामधील उद्योजकाला चालना मिळू शकते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयडीइएमआय संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजीव रसाळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमादरम्यान आम्ही उद्योजिकाच्या संचालिका मीनल मोहाडीकर म्हणाल्या की, आम्ही उद्योजक आणि उद्योगी यांना घेऊन निशुल्क काम करीत आहोत. सध्या मुंबईमध्ये आमची दहा ठिकाणी केंद्रे सुरु आहेत. या केंद्रांमध्ये महिलांना छोटे-छोटे उद्योग उभे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यावेळी त्यांनी पुण्याच्या उद्योजिका यांना माजगाव डॉकयार्ड व रेल्वेमध्ये एलईडी दिवे पुरविण्याचे काम मिळाले असल्याचे सांगितले. छोट्या उद्योगापासून त्यांनी मोठा उद्योग सुरु केलेला आहे. त्यामध्ये त्यांची प्रयत्न, चिकाटी आणि परिश्रम दिसून येते.