भारताचा सर्वात तरुण प्रशासकीय अधिकारी : रोमन सैनी

भारताचा सर्वात तरुण प्रशासकीय अधिकारी : रोमन सैनी

Friday October 09, 2015,

5 min Read

वय वर्षे १६… मनसोक्त हुंदडण्याचे हे वय… आणि या वयात मेडिकलच्या परीक्षेत यशाचा झेंडा गाडून ‘एम्स’सारख्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर डॉक्टर म्हणून जबाबदारी पार पाडणे… गंमत वाटते ना? आता पुढे ऐका… ज्युनिअर डॉक्टरसाहेब एवढ्यावर थांबले नाहीत. वयाच्या २२ व्या वर्षी सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेतही यशस्वी झाले आणि आयएएस अधिकारी म्हणून रुजूही झाले. समाजाच्या हिताच्या दोन गोष्टी सुरू आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये रस असलेल्या देशभरातल्या विद्यार्थ्यांनाही ते पडेल ती मदत करताहेत. चारचौघांसारख्याच सामान्य तरुणाची ही कहाणी आहे, पण त्याने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर हे असामान्यत्व प्राप्त केलेले आहे. रोमन सैनी (जयपूर, राजस्थान) हे त्याचे नाव… इतर कुणाचे ऐकण्यापेक्षा रोमन नेहमीच आपल्या आतल्या आवाजाचे जास्त ऐकत असे. जे हवे ते याच बळावर रोमनने प्राप्त केले.

तसे हे सारे सोपे नव्हतेच. रोमन एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. आयएएससारख्या सर्वांत कठीण स्पर्धा परीक्षेत एवढ्या कमी वयात यशस्वी होणे म्हणजे एक दिव्यच. संकटांचा सामना करत ध्येय गाठण्याची जिद्द असणाऱ्या देशभरातील युवकांचा रोमन हा म्हणूनच शिरोमणी. रोमन म्हणजे नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असणाऱ्या युवाशक्तीचे एक प्रतिकच.

image


रोमन सैनी म्हणतात, ‘‘आपण आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो. यशासाठी कुठल्याही बाह्यप्रेरणेपेक्षा अंतप्रेरणा अधिक महत्त्वाची असते. यशाचे गमक बाह्य परिस्थितीत वा बाहेर कुठे नव्हे तुमच्या आतच दडलेले असते. मी संपूर्ण निष्ठा झोकून तेच करत होतो, जे माझे मन मला आतून सांगत होते आणि म्हणूनच मला यश मिळाले. एखादे काम तुम्हाला करावेसे वाटते म्हणून त्या कामाचे अगदी अंतिम टोक गाठणे गरजेचेच आहे, असे मात्र मला वाटत नाही. उदाहरणार्थ मला गिटार वाजवायला आवडते म्हणून काही मी ब्रिटनच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेशॲ घ्यायलाच हवा असे नाही. एक डॉक्टर म्हणून, एक आयएएस अधिकारी म्हणून आणि आता एक उपक्रमशील उद्यमी म्हणून जर मी लाखो लोकांची मदत करू शकत असेन तर मला मदत करायला आवडते हे त्याचे मूळ कारण आहे.’’

रोमनचे हे यश पाहून जर तुम्हाला असे वाटत असेल, की तो आपल्या शालेय, महाविद्यालयीन जीवनात एक टॉपर विद्यार्थी राहिला असेल तर तुम्ही जरा थांबलेलेच बरे. रोमन त्याच्या शाळेतला एक सर्वसामान्य विद्यार्थी होता. अभ्यासातही त्याला फारसा रस नव्हता. घरची आर्थिक स्थितीही तशी बेताचीच होती, पण त्याचा कुठलाही विपरित परिणाम रोमनने आपल्या शिक्षणावर पडू दिलेला नव्हता.

सिंहावलकोन करताना रोमन सांगतात, ‘‘माझ्या लहानपणी वडिलांनी माझ्याबाबतीत नेहमी नाराज असत.’’ याला कारणेही तशीच होती. एकतर रोमनच्या सवयी. वागण्याची तऱ्हा. उदाहरणार्थ ते वडिलांसमवेत नात्यातल्या एखाद्या लग्नाला हजर राहण्याचे टाळत असत. कुण्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही रोमन जात नसत. कुठे येत-जात नाही म्हणून सगळे नातेवाइक रोमनला हा कुणीतरी दुसऱ्याच जगातून आलेला आहे, असे सहज म्हणत. रोमनला असा वेळ घालवणे अनावश्यक वाटत असे. कदाचित यातही त्याच्या यशाचे एक रहस्य दडलेले असावे.

रोमनच्या शब्दांत सांगायचे तर ‘मी माझा वेळ कधीही वाया घालवला नाही.’ बहुदा आवश्यक कामांवरच वेळ खर्च करण्याची रोमनची प्रवृत्ती पुढे जाऊन त्याला समाजासाठी उपयुक्त बनवण्यात सहाय्यभूत ठरली.

जुन्या आठवणी ताजा करताना रोमन सांगतात, ‘‘शाळेत शिक्षक जेव्हा शिकवत असत. तेव्हा मला पळून जावेसे वाटे. मला आवर्जुन वाटत असे, की वर्गात चांगले गुण मिळवणे म्हणजे ज्ञान मिळवणे नव्हे. घोकमपट्टी करून परिक्षा उत्तीर्ण होण्याच्या परंपरेशी मी कधीही सहमत होऊ शकत नाही. मी मेडिकलची परीक्षा देण्यामागे एकच कारण होते, की मला जीवशास्त्र हा विषय आवडत असे. मन लावून मी अभ्यास केला आणि ‘एम्स’मध्ये सिलेक्ट झालो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्यामागेही माझी त्या विषयांतील आवडच कारणीभूत होती.’’

रोमनला शालेय अभ्यासक्रमात रस नसला तरी शिकण्यासाठी आवश्यक जिज्ञासा त्याच्यात ठासून भरलेली होती. ते म्हणतात की प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक व्यक्तीकडून काही तरी शिकणे हे त्यांचे अविरत चाललेलेच असते. नवीन गोष्ट शिकायची तर ‘हे मला माहित नाही’ असे कबूल करण्यात वा स्पष्टपणे सांगण्यात रोमनला कुठलाही कमीपणा वाटत नाही. तुम्हाला काय येतं, या पेक्षा काय येत नाही, हे कळत असलं, आणि जे येत नाही ते शिकण्यासाठी तुमची धडपड असली, की तुम्ही यशस्वी असता, अशी रोमनची यशाची व्याख्या आहे.

आयएएस अधिकारी म्हणून ग्रामिण भागातील लोकांच्या समस्या दूर करण्याची, त्यांच्या अडचणी सोडवण्याची संधी मिळणार म्हणून रोमन आनंदात आहेत. जबाबदारी पार पाडताना नवे काही शिकायला मिळेल म्हणून त्यांनी स्वत:मध्ये कायम जिवंत ठेवलेला विद्यार्थीही खुश आहे.

इतरांसाठी प्रेरणा

प्रेरणेचा अभाव नैराश्याचे मोठे कारण ठरते, याची रोमन यांना जाणीव आहे. स्पर्धा परिक्षेला बसायचे म्हणजे नेमके काय करायचे, याची माहितीही अनेकांना नसते. बसल्यावर लागणारा निकाल धक्का देणारा ठरतो. म्हणूनही अनेक जण नैराश्याच्या गर्तेत गुरफटत जातात. रोमन स्वत:चे उदाहरण अशा मंडळींच्या पुढ्यात ठेऊन त्यांना ‘उठा जागे व्हा’ सांगू इच्छितोय. स्वत:चे यश इतरांसाठी संजीवनी ठरावे म्हणून धडपडतोय. एक ऑनलाइन कल्पना यातूनच त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी ती साकारली आणि आता अशा लाखो युवक-युवतींना ते सहकार्य करू शकतात.

यूपीएससी सर्वांत अवघड परीक्षा

देशभरातून दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. काहींना यश मिळते. जे अपयशी ठरतात, ते निराश होतात. रोमन यांच्या ऑनलाइन कल्पनेचे मूळ उद्दिष्टच अशा विद्यार्थ्यांचे नैराश्य घालवून त्यांचे मनोधैर्य उंचावणे, हे आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचे मार्ग रोमन ऑनलाइन सांगतात. रोमन सांगतात, ‘‘यूपीएससी ही जगभरातील कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत तुमच्या मानसिक क्षमतांचा कस पाहिला जातो. या परीक्षेचा दर्जा मोठा आहे. तरीही ऑनलाइन सहाय्य प्रक्रियेअंती या परीक्षेत यश कसे मिळवायचे, त्याचा मार्ग सापडू शकतो. कोर्सशी संबंधितं सर्व विषयांबाबत चर्चा तर होतेच. सोबतच उत्तरलेखन शैली आणि मुलाखतीला सामोरे जाण्याचे तंत्रही विद्यार्थ्यांना रोमन सैनी समजावून सांगतात.

आतला आवाज, यशाची पायरी

मी सांगितलेल्या पद्धतींचा अवलंब केला तर विद्यार्थी कुठल्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो, हा रोमन यांचा विश्वास आहे. तुम्ही अगदी खोल मनाच्या आतून जोवर कुठल्याही विशेषत: यूपीएससी परीक्षेची तयारी करत नाही, तोवर यश मिळू शकत नाही, यावरही ते ठाम आहेत.

...तर खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे

रोमन अशा मंडळींना सावध करतात जे केवळ पद, प्रतिष्ठा आणि पैसा कमवण्यासाठी प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छितात. डोक्यात असे खूळ घेऊन परीक्षा देत असाल तर यश मिळणार नाही. जनसेवेचे व्रत घेऊन परीक्षेला सामोरे जाल तरच यश मिळेल. स्वत:च स्वत:ला जाणून घेणे म्हणून आवश्यक आहे.

स्पर्धा परीक्षार्थ्यांना ‘रोमन’ आवाहन

‘‘कुणालाही कुठलीही समस्या असेल. माझ्याशी बोला. आयुष्याशी संबंधित समस्या असेल, कुठल्या परीक्षेबद्दल अडचण असेल, करिअर निवडीसंदर्भात काही शंकाकुशंका असतील… जिज्ञासा असेल… मदत हवी असेल, तर ते माझ्या फेसबुक वा ट्विटर प्रोफाइलवर बिनधास्त संपर्क करू शकतात. मी माझ्याकडून जी-जी शक्य ती सारी मदत करण्यास बांधलेला आहे, असे नि:शंक समजा.’’