जातीवंत ‘सैराट’ कलाविष्कार साकारणा-या नागराज यांच्या कामगिरीची 'फोर्ब्स'नेही घेतली दखल

0

नागराज मंजुळे हे नाव सध्या घराघरात प्रत्येकाच्या ओठावर आलं आहे. कालपरवापर्यंत नागराज मंजुळे यांचा फँड्री हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत चर्चेचा विषय होता, पण सैराट नावाच्या सिनेमाने मराठीतील सर्व विक्रम मोडीत काढत एका सामाजिक विषयावर जे भाष्य केले आहे त्यातून नागराज मंजुळे ही व्यक्तिरेखा मराठी सिनेक्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील चर्चेचा विषय झाली आहे. ‘सैराट’चा गौरव आता जगप्रसिद्ध मासिक फोर्ब्सनेही केला आहे. सैराटच्या माध्यमातून जातीव्यवस्थेचं भयाण वास्तव चित्रित करून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या या असमान्य, अलौकिक चित्रपट क्षेत्रातील संघर्षकथेला जाणून घेण्याचा ‘युवर स्टोरी’ने प्रयत्न केला.

सैराटच्या यशकथेने मराठी सिनेजगताला अनेक वर्षांच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. केवळ तीन आठवड्यात राज्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना पन्नास कोटींचा गल्ला जमवून, ग्रामिण बोलीभाषेतल्या या सिनेमाने मल्टिफ्लेक्स वाल्यांची बोलती बंद केली आहे आणि ते दिवसभर केवळ सैराट दाखवायला विवश झाले आहेत. इतकेच नाही अगदी कमी खर्चात कोणत्याही अभिनयकौशल्याचा अनुभव नसलेल्या ग्रामिण भागातील पोरासोरांना घेऊन राष्ट्रीय-आंतर राष्ट्रीय क्षेत्रात मराठी सिनेमाची दखल घ्यायला भाग पाडणारी चित्रकृती साकारणा-या मंजूळे यांच्या या भन्नाट सिनेमाच्या यशाला सलामच करावा लागतो.

. “मराठी प्रेक्षकांनी मला जे भरभरून प्रेम दिले आहे त्यांच्या ऋणातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही,” नागराज सांगतात. त्यांना आता मिळालेल्या यशाने त्यांच्या जीवनावर प्रकाश पडला आहे.लेखक, दिग्दर्शक, कवी, अभिनेता असलेले नागराज हे सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे. नागराज यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहायला आवडायचं. मिळेल तिथे, शाळा बुडवून ते चित्रपट पाहायला जात असे, मग तो गावातल्या टुरिंग टॉकिजमधला चित्रपट असो किवा एक रुपयात व्हिडिओवर दाखवला जाणारा चित्रपट असो. रामायण नावाची प्रसिध्द मालिका बघायला त्याकाळी मंजुळे यांना लोकांच्या खिडकीतून मिळेल तितका भाग पाहण्याची ओढ असे कारण घराचा, घरच्या सांपत्तिक स्थितीचा काहीच पत्ता नव्हता,पण मनात सिनेमाच्या, दृकश्राव्य माध्यमाच्या केलेचे वेड होते. सिनेमा बघणे हा त्यांच्यातील ‘सैराट’पणाचा एकमेव गुण होता. तोच त्यांना आज इथपर्यंत घेउन आला आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यांना अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहायला आवडायचं. नागराज यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण जेऊर येथे झालं. पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयात एम.ए. व त्यानंतर एम.फिल. केलं. शिक्षण सुरु असताना संधी मिळेल तेव्हा ते चित्रपट पहात असत.

नागराज यांचा जन्मच वडार या भटक्या समाजात झाला त्यामुळे ग्रामीण भागातल्या जातिव्यवस्थेचे रखरखीत वास्तव अनुभवलेल्या नागराज यांच्या मनात खूप काही साचलेलं असायचं. कोणतीही जीवनाची दिशा नसलेल्या या माणसाने सगळे दाहक जीवनानुभव घेतले त्यावेळी त्यांना व्यक्त व्हावसं वाटायचं. तेव्हा ते स्वतःची दैनंदिनी लिहायचे, दैनंदिनी लिहिता लिहिता ते कविता लिहायला लागले. खूप कमी जणांना माहितीये की नागराज हे एक उत्तम कवी आहे. त्याच्यासाठी कविता हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. खरंतर नागराजची ही अव्यक्त मनोवस्था त्यांना सिनेमापर्यंत घेऊन आली. खूप बोलल्यानंतरही खूप काही बोलायचंय, पण ऐकायला किंवा ते समजून घ्यायला कोणी नाही अशावेळी सिनेमा हा त्यांचं हक्काचं व्यासपीठ बनलं. सुरवातीला त्यांनी ‘पिस्तुल्या’ हा मराठी लघुपट तयार केला. समाजभान देणारा व एका दुर्लक्षित वर्गाच्या अवस्थेवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या लघुपटाला ५८वा राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला होता. त्यानंतर नागराज यांनी काढलेला पहिला चित्रपट ‘फँड्री’. फँड्रीच्या निमित्ताने नागराजच्या या अव्यक्त भावना प्रेक्षकांना भावल्या, त्यांनी ती कलाकृती अक्षरशः डोक्यावर घेतली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम व्यवसाय केलाच पण या सिनेमामुळे पहिल्यांदाच मराठीत एक अनोखी प्रेमकथा तेवढ्याच अनोख्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेला.

नागराज यांच्या मते “ प्रेक्षकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद किवा मान-सन्मान हा कधीच कलाकारांच्या हातात नसतो, कलाकाराने स्वतःचे काम फक्त प्रामाणिकपणे आणि सातत्याने करत रहावे, मी माझ्या कामामध्ये कायम सातत्य ठेवले त्यामुळेच मला माझ्या कामाचे कधीच दडपण येत नाही, मात्र मिळालेल्या सन्मानांमुळे प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढतायत, मला त्याची पुरेपूर जाणीव आहे” आज नागराज यांनी जी ‘सैराट’च्या निमित्ताने अवचित प्रसिध्दी मिळवली, त्यामागे त्यांच्या रखरखीत आयुष्यातील तपश्चर्या आहेच पण यश मिळाल्याबरोबर त्यांना स्पर्धा आणि असुया यांनाही तोंड द्यावे लागते आहे. सैराट या कथेच्या नायक आणि नायिका जरी वास्तवाचे प्रतिनिधित्व करतात तरी निव्वळ मनोरंजन हा काही या सिनेमाचा बाज नाही. त्यातील भीषण वास्तव मांडताना त्याला दिलेली अनवट प्रेमाची झालर आणि संगिताच्या खुमासदार शैलीने हा सिनेमा दर्शकांच्या मनात घर करून राहतो. काही वर्षापूर्वी हिंदीत अमिरखान यांनी ‘पिपली लाईव्ह’ केला होता. त्याच्या पलिकडे जात नागराजने या मध्ये प्रेमकथा आणि समाजाच्या मनातील भेसूर जातीव्यवस्थेच्या वास्तवाला जी निशब्द काळी किनार जोडली आहे. त्यामुळे गाण्याच्या तालावर नाचणा-या प्रेक्षकांना शेवटी निशब्द करून त्याने विचार करत बाहेर जायला विवश केले आहे, हेच त्याचे यश आहे. सैराटच्या यशानंतर नागराज बद्दल समूह संपर्क माध्यमातून उलट-सुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यात नेहमी प्रमाणे अनेक गट आणि तट आहेत, या सर्वांचे मत मान्य़ करत नागराज म्हणतात की, “कुणी वंदा कुणी निंदा मला त्याचे आता काहीच वाटत नाही कारण मला जे मांडायचे होते ती मी मांडले आहे”

वंचितांच्या संस्कृतीतील ज्या गोष्टी कधी पुस्तकातही नव्हत्या त्या चंदेरी दुनियेतल्या रुपेरी पडद्यावर साकारण्याचे काम नागराज करत आहे आणि यातच नागराज यांच्या सिनेमाचे वेगळेपण आहे की हे सगळं वास्तव आहे. गावाकडच्या कथा थेट सातासमुद्रापार पोहोचवत नागराज यशस्वी झाले. पिस्तुल्या, फँड्री आणि आता सैराट... दिग्दर्शक म्हणून यशस्वी वाटचालीत नागराज यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा आला होता. त्यातील फाळके याच्या व्यक्तिरेखेच्या जवळ घेऊन जाणा-या नागराज यांनाही यूअर स्टोरीचा सलाम, आणि शुभेच्छा!

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा  :

भारतीय महिला क्रिकेटचा चमकता तारा : मिताली राज!
माणसांनी माणसांसाठी सुरू केली आहे, माणुसकीची मोहीम ‘नाम फाऊंडेशन’!
उद्योजकतेच्या जगतात सांगलीचा ठसा उमटवणाऱ्या पयोद उद्योगसमूहाच्या देवानंद लोंढे यांची यशोगाथा