अंधांसाठी भारतातील पाहिलं वृत्तपत्र , स्वागत थोरात यांचा स्तुत्य उपक्रम

अंधांसाठी भारतातील पाहिलं वृत्तपत्र , स्वागत थोरात यांचा स्तुत्य उपक्रम

Sunday December 06, 2015,

4 min Read

स्वागत थोरात फेब्रुवारी २००८ पासून भारतातलं पहिलं ब्रेल लिपीतलं वृत्तपत्र चालवत आहेत. स्पर्शज्ञान म्हणजेच स्पर्शाने मिळणारी माहिती, हे त्याचं ५० पानी वृत्तपत्र, दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला प्रकाशित होतं आणि ज्याची वाचक नित्यनेमाने वाट बघत असतात. स्वागत म्हणतात " आम्ही सुरुवातीला १०० प्रती छापायचो. आज प्रत्येक पंधरवड्याला आम्ही ४०० प्रती काढतो. ज्या अंधांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांमधील विविध संस्थाना आणि शाळांना आम्ही पाठवतो. यातली प्रत्येक प्रत सुमारे ६० जण वाचतात याचा अर्थ आमच्या वाचकांची संख्या २४ हजाराहून अधिक आहे ."

image


स्वागत यांचं बालपण अत्यंत मजेत गेलं आणि अर्थात आता ते ज्या समस्येवर काम करतायत त्याची व्याप्ती त्यांना ठाऊकच नव्हती. त्यांनी त्यांच्या आवडीनिवडी जपल्या, त्या म्हणजे वन्यजीव छायाचित्रण, नाटककार आणि चित्रकारितासुद्धा.

अंधाऱ्या जगाशी त्यांची ओळखच मुळात १९९३ झाली. स्वागत यांनी अंधांना शिकवल्या जाणाऱ्या शैक्षणिक पद्धतीवर एक डॉक्युमेंटरी 'काळोखातील चांदणे' बनवली. दूरदर्शनच्या बालचित्रवाणी या कार्यक्रमासाठी त्यांनी ही डॉक्युमेंटरी बनवली होती आणि त्यावेळी अंधांसोबत काम करताना स्वागत यांना त्यांच्या जगाची आणि त्यांच्या जगण्याची एक वेगळीच ओळख घडली.

image


दृष्टीहीनांसोबत अधिक वेळ घालवताना त्यांना जाणवलं, की दृष्टी नसली तरी त्यांच्यात खुप विविध कौशल्य दडलेली आहेत. त्याचबरोबर विविध कलात्मकता साकारण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यात आहे. स्वागत यांनी या कलाकारांसोबत काम करायला सुरुवात केली आणि १९९७ मध्ये त्यांनी एक नाटक बसवलं, 'स्वातंत्र्याची यशोगाथा'. या नाटकाने 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये आपली नोंद केली. कारण त्यात ८८ दृष्टिहीन कलाकार सामील होते. या नाटकाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनही कौतुकाची पोचपावती मिळाली.

या नाटकाच्या प्रयोगाच्या दौऱ्यादरम्यान प्रवासात , हे कलाकार खुप काही वाचत असत, पण अर्थात ब्रेल लिपीतील साहित्याची वानवाच होती, " त्यांनी मला सांगितलं, की त्यांना वाचायचं आहे, पण पुस्तकच उपलब्ध नाहीत त्यांनी मला मदत मागितली आणि मी फक्त त्यांच्या इच्छेचा मान ठेवला." स्वागत आपल्या जुन्या आठवणी सांगत होते.

स्वागत यांनी त्यानंतर थोड्याच दिवसात 'स्पर्शगंध' या मासिकाच्या तीन विशेष आवृत्ती संपादित करून काढल्या आणि या सर्वाना भेट म्हणून दिल्या. त्यानंतर प्रसिद्ध लेखक पु. ल.देशपांडे यांच्या पत्नी आणि लेखिका सुनिताताई यांच्या मदतीने पु.लं च्या काही कथासुद्धा संपादित केल्या. पु.लं.चं 'तीन पैशाचा तमाशा ' हे नाटक जे ब्रेख्तच्या ' थ्री पेनी ऑपेरा' वर आधारित आहे, या नाटकाचं ४४ दृष्टिहीन कलाकारांना घेऊन दिग्दर्शन केलं.

image


या छोट्यामोठ्या कामांमध्ये स्वागत यांना समाधान मिळत नव्हतं, त्यांना या इतक्याच कार्यक्रमांवर थांबायचं नव्हतं तर आपल्या अंध मित्रांसाठी त्यांना काहीतरी ठोस आणि भरीव कार्य करायचं होत. त्यांनी ब्रेलमध्ये वृत्तपत्र सुरु करायचं ठरवलं. भारतातील अशाप्रकारचं हे पाहिलं वृत्तपत्र आणि त्यासाठी त्यांनी भांडवल जमा करायला सुरुवात केली. निधी गोळा करणं, ब्रेल छपाई मशिन्स आणणं अशी विविध तयारी सुरु होती. त्यांच्या स्पर्शज्ञान या आवृत्तीची पहिली प्रत फेब्रुवारी २००८ मध्ये प्रसिद्ध झाली.

तेंव्हापासून त्याचं स्पर्शज्ञान हे वृत्तपत्र, दृष्टीहिनांना त्यांच्या आसपास घडणाऱ्या ताज्या घटनांचा वृत्ताद्वारे स्पर्श करवून आकलन करण्यावर भर देत आहे . त्याचसोबत वन्यजीव संवर्धन, पर्यावरण , राजकीय हालचाली, प्रेरक आत्मचरित्रं, सामाजिक मुद्दे , आंतरराष्ट्रीय घडामोडी , शैक्षणिक आणि भवितव्यातील संधी अशा अनेक गोष्टी या वाचकांना या वृत्तपत्रात मिळतात. मार्च २०१२ पासून स्वागत हे , रिलायंस फाउंडेशन च्या 'रिलायंस दृष्टी' या हिंदी ब्रेल पाक्षिकाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. स्वागत यांना त्यांच्यासमोरील आव्हानांबद्दल विचारलं असता, त्यांनी स्मितहास्य केलं. " मी प्रत्येक आव्हान ही एक संधी समजतो . मराठीत एक म्हण आहे ' वाचाल, तर वाचाल ' ! मला असं आवर्जून वाटतं की माणसाची जगण्याची लढाई ही फक्त, अन्न ,वस्त्र , निवारा यापुरती मर्यादित नसते, तर त्याही पलीकडे ती असते. वाचनाने माझ्या वाचकांना त्यांच्या रोजच्या जगण्याची पद्धत बदलायला भाग पाडलं आणि त्यांना अधिक आत्मविश्वास प्राप्त झाला. त्यांचा संपूर्णपणे झालेला कायापालट मी पाहिलाय . "

स्वागत हे वन्यजीव छायाचित्रकार आहेत आणि आजवर त्यांनी देशातल्या ५० विविध राष्ट्रीय उद्यानांना आणि ३०० वन्यजीव अभयारण्यांना भेटी दिल्यात. १ लाखाहून अधिक छायाचित्र , आणि वन्यजीवनावर आधारित , ४०० तासांचं दृश्यचित्रण त्यांच्याकडे आहे. वन्यजीव संवर्धनाची ही संपूर्ण माहिती त्यांनी आजवर ३०० शाळांना भेटी देऊन तिथल्या विद्यार्थ्यांना दिली आहे. तसंच रणथम्बोर राष्ट्रीय उद्यान, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आणि सुंदरबनातील वन्यजीवनाची गणनासुद्धा स्वागत यांनी केली आहे. सध्या ते काश्मीरमधील वन्यजीवांच्या वैविध्यतेवर एक डॉक्युमेंटरी बनवत आहेत .

image


स्वागत याचं नाट्यप्रेमसुद्धा शाबूत आहे. त्यांनी, ज्योतिबा फुले यांच्या लेखणीतून उतरलेलं , 'तृतीय नेत्र' ,हे सामाजिक नाटक सुद्धा दिग्दर्शित केलं. ज्यात मागासवर्गीयांचा शिक्षणाअभावी केला जाणारा छळ सादर करण्यात आला आहे . स्वागत यांच्या प्रयत्नांमुळे १४६ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या नाट्याला व्यासपीठ मिळालं. सध्या ते या नाटकावर आधारित मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.

त्यांच्या कामाची दाखल घेत त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत . ज्यामध्ये , नाट्यगौरव , महाराष्ट्र दीप , स्नेह , राजीव गांधी, सेल्युट मुंबई (एका वाहिनी तर्फे दिला जाणारा पुरस्कार) आणि 'द रियल हिरो ( सी एन एन -आय बी एन वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणार पुरस्कार ) आदी पुरस्कारांचा समावेश आहे . या सर्व सत्कारांपेक्षाही त्यांना मोलाचा वाटतो , तो म्हणजे नम्रता हा गुण जपणे .

आजसुद्धा स्वागत यांचा सर्वाधिक वेळ हा ब्रेल लिपीच्या त्यांच्या वृत्तपत्रासाठी आणि ही भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात जातो. त्यांनी ही भाषा अनेकांना शिकवली सुद्धा आहे . त्यांच्या मते कर्म आणि इतरांप्रती कणव असणे, हे उद्याचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी आवश्यक असणारे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत .

मुळ लेखक: सौरव रॉय

अनुवाद: प्रेरणा भराडे